ताई, धर माझे पाय!

 ताई, धर माझे पाय!


©®गीता गरुड.






बारावीची परीक्षा सुरू झाली. नेहाला बिल्डींगमधील साऱ्या काकाकाकूंनी येऊन शुभेच्छा दिल्या होत्या. नेहाच्या आईने किराणा, दळण सारं आणून ठेवलं होतं का तर नेहाजवळ थांबता यावं. तिला भूक लागली तर काहीतरी हलकंफुलकं घरातलं पौष्टीकसं करून देता यावं यासाठी थालपीठाची भाजणी, पातळ पोह्यांचा चिवडा अशी सारी जय्यत तयारी केली होती. नेहा अगदी मनापासून अभ्यास करत होती. तिचा छोटा भाऊ निखिल हा सहावीत होता. तोही ताईसोबत अभ्यासाला बसे. ताईच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून कारटून अगदी हळू आवाजात पाही. 


नेहाताईचा रसायनशास्त्राचा पेपर होता. ताई परीक्षेवरून आल्यावर थोडी झोपली. आईने नेहा व निखिल दोघांनाही त्यांच्या आवडीचं मसालादूध करून दिलं. निखिल खाली खेळायला पळाला.


 नेहा अभ्यासाला बसली. एक दिवसाची मधे सुट्टी होती पण अभ्यासक्रमही खूप होता. सगळ्या धड्यांची उजळणी करणं गरजेचं होतं.


नेहा अभ्यासाला बसली , तिने किती वेळात किती धडे करायचं सगळं आधी मनात आखून घेतलं आणि सुरूवात करणार इतक्यात जोरात बीट्स वाजू लागले..दिलदार मनाचं रुबाबदार..वाढीव तुमचा ह्यो कारभार..तुमचा येगळाच हाये तामझाम..सरकार तुमी केलंय मार्केट जाम..

ही पोरी साजूक तुपातली..ढण ढण ढण ढिंच्याक ढण ढण ढिंच्याक..मनमोहना तू राजा सपनातला..हे राजसा..


"आssई आssई कसा करू मी अभ्यास! आता काय करायचं?"


"नेहा बाळा मी सगळ्या खिडक्या लावून घेते. उगी रहा," आईने तिला पोकळ धीर दिला.

खालून आवाज येतच होता..ही दोस्ती तुटायची नाय..झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट..तू जरा माझ्याशी बोल ना..ओठांची मोहर खोल ना..डाव्या डोळ्यावर बट घळली..नागीण सळसळली..घरात आतल्या खोलीत त्या माऊलीची पोर चिंतेने विव्हळत होती नि आवाज येत होता..भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा.


"आई बघ गं फरशीपण हलतेय. खिडक्या वाजताहेत. आई कशी करू मी उजळणी! तू जरा जाऊन सांगतेस त्यांना?"


 पाणी प्यायला म्हणून आलेला निखिल नेहाताईची अवस्था पाहून गंभीर झाला. खाली जितूदादाची हळदी होती. अगदी बारा वाजेस्तोवर गाणी सुरू रहाणार होती. आईचा चेहरा अगदी केविलवाणा झाला होता.


"आपण एखाद्या अभ्यासिकेत जाऊया का?" आईने मधला मार्ग काढला.


"आई, आपल्या इथनं फारच लांब आहे अभ्यासिका. आणि मला घरातच अभ्यास करायचाय. माझं घर असताना मी का असं फिरत राहू!"नेहा अगदी रडायला आली होती.


निखिल खाली गेला. जितूदादाच्या घरच्यांनी हळदीसाठी स्टेज लावला होता. माईक वगैरे साऱ्याची व्यवस्था होती. निखिलने माईक हाती घेतला व म्हणाला,"जितूदादाच्या हळदीच्या जितूदादाला खूप खूप शुभेच्छा. आम्ही सारी मुलं जितूदादाच्या हळदीत खूप मजा करणार. काय लागेल ती मदत करणार. पण एक छोटीशी विनंती आहे. जितूदादा कौतुकाने निखिलचं बोलणं ऐकत होता. जितूदादा प्लीज अगदी हळू आवाजात गाणी लाव. माझ्या ताईने आणि तिच्या सोबतच्या इतर मुलांनी वर्षभर झटून बोर्डाचा अभ्यास केला आहे. त्यांना या आवाजात उजळणी करताच येत नाहीए रे."


"फार बोललास. दे तो माईक इकडे."जितूदादाच्या एका मित्राने निखिलच्या हातातला माईक काढून घेतला पण जितूदादाने माईक हाती घेतला व म्हणाला,"दोस्तांनो, या माझ्या छोट्या दोस्ताने माझ्या डोळ्यात अंजन घातलं. आनंद साजरा करण्यासाठी डिजे लावलाच पाहिजे असं थोडंच आहे! दहावी बारावीच्या तसेच इतरांच्याही वार्षिक परीक्षा होईस्तोवर आपल्या वसाहतीत डिजे वाजवला जाणार नाही."

निखिल व त्याच्या मित्रमैत्रिणींनी मिळून टाळ्या वाजवत जितूदादाचे आभार मानले.


नेहा डोकं गच्च धरून झोपली होती. तिला आईने जागं केलं व अभ्यासाला बसवलं. रात्री जेवायला बसताना नेहा म्हणाली,"अचानक आवाज कसा काय बंद झाला? जितूदादाची मनधरणी कुणी केली! आवाज बंद झाला म्हणून निवांत अभ्यास करता आला. वाटतय.. वाटतय जितूदादाचं मन वळवलं त्याचे जाऊन पाय धरावेत." नेहा असं म्हणत आमटीभाताचा भुरका मारत होती. निखिल तिच्यासमोर दत्त म्हणून उभा नि म्हणतो कसा,"मग धर माझे पाय!"

आईने त्याच्मा पाठीवर एक हलका रट्टा दिला तोच बाबा म्हणाले,"अगं, खरंच सांगतोय तो. खाली माईकवर यानेच आर्जव केलं की माझ्या ताईच्या व तिच्यासोबतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत तेंव्हा गाणी हळू आवाजात लावा."

आई कौतुकाने आपल्या एवढ्याशा धीटस लेकाकडे पहातच राहिली नि नेहाने तर भाऊरायाला घट्ट मिठीत घेतलं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ए पिस ऑफ वेलवेट