सुलेखाचं काय चुकलं?
सुलेखाचं काय चुकलं? सुलेखा सध्या वडिलांजवळ असते. वयवर्ष पस्तीस. सुलेखा तिच्या आईवडलांची एकुलती एक मुलगी.तिच्यानंतर डॉक्टरच्या पायऱ्या अनेकदा झिजवूनही त्या उभयतांना मुल झालं नाही. शेवटी त्यांनी सुलेखालाच आपलं सर्वस्व मानलं. लहानाचं मोठं केलं. डिगरीपर्यंत शिक्षण दिलं. सुलेखाच्या वडलांची मानसिक स्थिती काही कारणाने बिघडल्याने थोडे महिने ते मनोरुग्णांच्या इस्पितळात होते. त्या काळात बऱ्याचशा नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. सुलेखाच्या आईने कसाबसा कुटुंबाचा डोलारा सांभाळला. थोड्याच महिन्यांत सुलेखाचे वडील बरे झाले पण लोकांच्या त्या कुटुंबाकडे पहाणाऱ्या नजरा गढुळल्या त्या कायमच्याच. सुलेखा वयात आली तशी तिच्यासाठी स्थळं बघू लागले. मधल्या काळात सुलेखा एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करु लागली. शेवटी एक स्थळ सांगून आलं. मुलाची सरकारी नोकरी होती. नणंदेच लग्न झालं होतं. घरात सासू व दिर होते. सासरे फोटोत जाऊन बसले होते. सुलेखाच्या वडलांनी आपल्या तुटपुंज्या कमाईतून सुलेखासाठी दागिने केले. रितीरिवाजानुसार सगळ्या नातेवाईकांसाठी साड्या,शर्टपीस वगैरे घेतले. नवरदेवाला कपडे,अंगठी...