नात्यांना रुजू देऊ!
#नात्यांना_रुजू_देऊ!
सानिका एका प्रायव्हेट कंपनीत मोठ्या हुद्दयावर कामाला होती. तिचा नवरा,सौरभ सॉफ्टवेअर इंजिनिअर होता.नुकतंच एक वर्ष झालेलं त्यांच्या लग्नाला.
सानिकाने स्वतःला छान केरी करणं हा तिच्या नोकरीचाच एक भाग होता. प्रेझेन्टेशन देताना तिच्या ज्ञानाबरोबरचं तिचा नीटनेटकेपणा,बाह्यसौंदर्यही तितकच महत्त्वाचं होतं व तसं स्वतःला छान केरी करणं,लाईट मेकअप करणं तिलाही मनापासून आवडायचं.
सानिकाला नवनवीन फेशनचे आधुनिक पोशाख घालणं जसं आवडायचं तसंच सणासुदीला छान साडी नेसून,मेचिंग बांगड्या,नेकलेस,कर्णफुलं घालून गजरा माळून नटायलाथटायलाही फार आवडायचं. तिच्या पगारात या तिच्या हौसी निश्चित भागत होत्या .
किती पैसा साठवायचा,किती घरी वापरायचा व किती बचत करायची या साऱ्याची गणितं सानिकाच्या मनात नीट ठरलेली होती. सानिकाचा नवरा सौरभ,याचाही तिला पाठिंबा होता. सौरभने सानिकाला तिच्या पगाराचं मेनेजमेंट तिच्या मनाने करायची मोकळीक दिली होती.
सानिकाचे सासरे सेवानिवृत्त झाल्यावर ती दोघं सानिका व सौरभच्या आग्रहास्तव त्यांच्या घरी रहायला आली. काही दिवस बरे गेले पण सानिकाच्या सासूला,लताक्काला तिचं घरकामाला बाई लावणं पसंत पडेना.
सानिकाचं मेकअप करुन ऑफिसला जाणं लताक्काला आवडत नव्हतं. सानिका ऑफिसला गेली की लताक्का तिच्या यजमानांना सानिकाच्या तक्रारी सांगू पाहे पण त्यांना कानाने ऐकू कमी यायचं. ते आपले मानेने हो हो करत पुस्तक वाचत बसायचे. यजमानांकडे काही डाळ शिजत नव्हती. मनातली तगमग मांडायची कुठे हा प्रश्न सानिकाची सासू,लताक्कापुढे पडला.
धुण्याभांड्याला येणाऱ्या सखूला ती सुनबाईच्या नट्टापट्ट्याबद्दल,एकंदरीतच उधळेपणाबद्दल व तिच्यावेळी तिने सासूच्या हाताखाली किती हाल काढले,तिची सासू किती कडक होती,किती जणांचा गोतावळा घरात होता हे अगदी साग्रसंगीत सांगू लागली. जाताना सखूला चहाबिस्कीटं देऊ लागली तर कधी नाश्त्याला केलेल्या इडल्या,पोहे तिला देऊ लागली. सखूच्या मनात लताक्कांबद्दल मऊ कोपरा निर्माण झाला.
कॉलनीत बऱ्याच जणांकडे सखू कामाला जायची. सानिकाबद्दलची तिच्या सासूबाईची मतं वरच्या मजल्यावरच्या बर्मन आंटीपासून ते खालच्या मजल्यावरच्या करमरकर काकूंपर्यंत पोहोचली.
लताक्का सानिकासमोर अगदी शहाण्या सासूसारखं वागे. कुठे कापसाच्या वाती बनव,कुठे खुरासणी बनवून ठेव,कुठे नाचणीचे लाडू कर..अशी कामं करत बसे. सानिकालाही सासूबाईंचा खूप आदर वाटे.
संध्याकाळी सानिकाला घरी यायला उशीर होई. लताक्का ती येण्याआधीच सर्व स्वैंपाक करून ठेवी. सकाळी डब्यासाठी लागणारी भाजी निवडून ठेवत,दळण आणून ठेवे. पण सानिकाच्या पाठीमागे शेजाऱ्यापाजाऱ्यांत माझी सून काही करत नाही. मलाच सगळं करावं लागतं असंही सांगे.
एकदा सानिकाचे वडील आजारी झाले. सानिकाने लताक्कांना फोन करुन माहेरी जातेय असं
कळवलं. चार दिवस सानिका वडिलांसोबत इस्पितळात थांबली. त्यांना वेळेवर नाश्ता,जेवण देत होती. तिथून निघताना इस्पितळाच्या बीलाचे पैसेही तिचे वडील नकोनको म्हणत असताना तिने भरले. कार्ड पेमेंट केलं व फोन करुन सौरभलाही तसं कळवलं. सौरभ तिला म्हणाला, 'सानिका, तू बाबांच बील भरलस ते योग्यच केलंस.' त्याचं नेमकं हेच बोलणं लताक्काने ऐकलं पण लेकाला काही बोलायची तिची हिम्मत नव्हती कारण लेक तिलाच ओरडला असता की ते सानिकाचे वडील आहेत मग तीने त्यांच मेडीकलचं बील भरलं तर त्यात गैर काय म्हणून लताक्का मुग गिळून गप्प राहिली. यजमानांपुढे बोलण्यात काहीच अर्थ नव्हता पण लताक्काला अस्वस्थ वाटत होतं. नेमकी सखूपण दोन दिवस येणार नव्हती. त्यांच्या पोटात खुटखुटू लागलं.
लताक्का शेवटी देवळात जाण्यासाठी म्हणून निघाली. समोरच इस्त्रीवाल्या भैयाची बायको कपड्यांना इस्त्री करत होती. इस्त्रीवाला कपड्यांच बोचकं नदीवर धुवायला घेऊन गेला होता व भाभी कपड्यांना इस्त्री करत होती. लताक्का त्या गाल्याजवळ गेली. भाभीने तिला नमस्कार केला. लताक्काने भाभीची विचारपूस केली.
इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर लताक्काची गाडी सानिकावर आली. सानिका कसा पैसा वाया घालवते,स्वैंपाकात मदत करत नाही, किती वेळ पावडरलाली लावण्यात घालवते,किती पैसे कपडे घेण्यात घालवते व शिवाय माहेरालाही कसे पैसे पुरवते याची केसेटच लताक्काने भाभीसमोर वाचली व भाभीची सहानुभूती मिळवली.
साहजिकच भाभीकडून ही बातमी इतर सख्यांच्या कानोकानी गेली.
सानिका एकदा त्यांच्याच बिल्डींगमधील तिच्या एका मैत्रिणीच्या घरी काही कामानिमित्त गेली होती. तिच्या मैत्रिणीच्या सासूने, सानिकाची सासू तिच्यापाठी तिची सोसायटीत कशी उणीधुणी काढते ते तिला सांगितलं.
सानिकाला हे ऐकून फारच वाईट वाटलं. सानिकाने तिच्या आईला फोन केला व सासूचं दुष्कुत्य सांगितलं. सानिकाच्या आईला फार वाईट वाटलं तरी तिने सानिकास या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यास सांगितलं व नातं रुजायला थोडा वेळ दे असंही समजावलं.
असेच दिवस जात होते. शेजाऱ्यांकडून सानिकाची सासूबाई,लताक्का तिची करत असलेली निंदा सानिकाच्या कानी पडत होती. सानिकाला तिचे आईबाबा सतत दुर्लक्ष करण्यास सांगत होते. तेच ती करत होती तरी कामावरुन घरी येताना सोसायटीतल्या स्त्रिया तिच्याविषयी कानात कुजबुजत त्याचे सानिकाला फार वाईट वाटे. कधीकधी तिला सासूला याबद्दल विचारावं असं वाटे पण मग परत वाद होतील म्हणून ती गप्प राही.
एके दिवशी सकाळी लताक्का अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेली तिथे पाय घसरून पडली . कशीबशी वर उठत होती तर बाथरुमच्या नळाला तिचं डोकं आपटलं. सानिका ऑफिसला जाण्यासाठी तयारी करत होती. लताक्काची हाक ऐकू येताच ती बाथरूमजवळ गेली. लताक्काने कशीबशी कडी काढली. तिला धड उभं रहाता येत नव्हतं. सानिकाने तिला खांद्याचा आधार देत उठवलं व बेडरुममध्ये आणलं. नेमका सौरभही महिन्याभर परगावी गेला होता. सानिकाने शेजारच्या दादाला बोलावून आणलं.
दोघांनी मिळून लताक्काला हॉस्पिटलमध्ये न्हेलं. डॉक्टरांनी लताक्काचा पाय प्लास्टरमध्ये घातला व तिला म्हणाले,"बाथरुमची लादी म्हणजे स्वर्गातली पहिली पायरी असते लताक्का, आत्ता सुनबाई घरात होत्या म्हणून ठीक नाहीतर संध्याकाळपर्यंत तिथंच अडकला असतात की नाही म्हणून यापुढे जरा सावधगिरी बाळगत जा." सानिकाने डॉक्टरांनी नमूद केल्याप्रमाणे सगळी गोळ्या औषधं घेतली व ती दोघं लताक्काला घेऊन घरी आली.
सानिकाने वीस दिवसांची रजा घेतली. लताक्काला गोळ्या,औषधं,नाश्ता सगळं सानिका देत होती. मनापासून तिची सेवा करत होती. लताक्काला लेक नव्हती. सानिकाच्या सेवाभावामुळे तिला सानिकात तिची लेक दिसू लागली व तिचं मनच तिला खाऊ लागलं की एवढ्या निरागस मुलीची आपण का बदनामी करतो.
सानिकाचे आईवडीलही अधनामधना लताक्काची विचारपूस करायला येत होते. थोड्याच दिवसांत प्लास्टर काढलं. सानिका लताक्काच्या पायाला मलम लावी. गरम पाण्याचा शेक देई. संध्याकाळी त्यांना बागेतून फिरवून आणे. सानिकाच्या आईने लताक्कासाठी डिंकाचे लाडूही करून दिले.
लताक्का हिंडुफिरू लागल्यावर सानिका कामावर जाऊ लागली. आत्ता लताक्काच्या डोळ्यांत सानिकाला आईची माया दिसू लागली. सानिकाला आवडणारे पदार्थ त्या तिला निगुतीने करुन खाऊ घालू लागल्या. सोसायटीतल्या बायकांसमोर लताक्कांनी त्यांचा सुनेकडे बघण्याचा द्रुष्टिकोन किती चुकीचा होता याची कबुली दिली.
आत्ता सानिका आईला फोन करते पण फोनवर आईला लताक्का तिचे कसे लाड करतात, तिला कसं जपतात हे सांगते मग सानिकाची आई म्हणते,"बघ बाळा,कोणताच माणूस मनापासून वाईट नसतो. लताक्कांच्या डोळ्यांवर जुन्या विचारांचा पडदा होता तो तू तुझ्या सेवाभावाने दूर केलास आणि तुला त्यांच्यातल्या ममतेचं दर्शन झालं तेच जर तू त्यांना उलट उत्तर केलं असतस तर मात्र तो पडदा अजून अजून घट्ट होत गेला असता व जीवनात एका प्रेमळ नात्याला तू मुकली असतीस."
मुलीची आई हीच मुलीचं घर फोडण्यास जवाबदार असते असं बरंच लोक म्हणत असतात. ते खरंच चुकीचं आहे. काही अपवाद असतील,आहेत म्हणून सगळ्याच मुलींच्या आई किंवा मुलांच्या आई वाईट असतात असं म्हणणाऱ्यांची कीव येते.
------गीता गजानन गरुड.

Chaan lihila ahey......khara ahey.....natey changla honyasathi....time dyawach laagto
उत्तर द्याहटवाइतक्या सहजतेने चांगुलपणा दिसेल अशी संधी निर्माण होते का? आणि झाली तरी चांगुलपणाला स्वीकृती मिळते का?
उत्तर द्याहटवा