नवा डाव
नवा डाव ©®गीता गरुड. राजश्री व श्रेयस,दोघेही परदेशात वास्तव्यास होते व नुकतेच आईवडिलांना भेटावयास भारतात आले होते. मायदेशी आल्यापासून श्रेयसचं रोमँटिझम अधिकच वाढलं होतं. कुठे आईबाबा दिसत नाहीसं बघितलं की लगेच राजश्रीला मागून मिठी मारे. तिच्या गोऱ्यापान मानेवर ओठ टेकवे. राजश्रीचा मात्र कोण बघतय का या भीतीने जीव अर्धामुर्धा होई. शेजखोलीत ती त्याला चांगलेच रागे भरे. मग तोही लाडात येऊन म्हणे,"राज,तिथे असं कोण बघतय का या भितीत हळूच तुला मिठीत घेण्यात जे थ्रील असतं ना ते एकांतात मिठीत घेण्यात नाही गं." यावर राज म्हणे,"वेडा आहेस अगदी,प्रेमवेडा. हे प्रेम किती वर्ष उतू जाणार असं?" "म्हातारे होईपर्यंत.. नव्हे चिरकाळ." मग राज त्याच्या मिठीत विरघळून जाई. श्रेयसची लहान बहीण रेवती तिच्या मुलाला,निरजला घेऊन दादावहिनीला भेटायला आली. दोन वर्षापूर्वी एका अपघातात रेवतीचे पती मिलिंद जागीच गतप्राण झाले होते. त्यावेळी श्रेयस व राजश्री तिला भेटायला आली होती. त्यांनी तिला माहेरी रहाण्यास सांगितलं होतं पण तिने नकार दिला होता. ती मिलिंदच्या वडिलांसोबत सासरी रहायची. निरजचाही ...