त्या दोघी
त्या दोघी "मिता,आज कसं येणं केलंस?" मिताली च्या आत्याने तिला विचारलं. "आत्तु,अगं जोडून सुट्टी मिळाली. बरेच दिवस तुझीमाझी भेट होत नव्हती. म्हंटलं,जाऊन आत्तुची ख्यालीखुशाली घ्यावी." मिताली आत्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाली. "कोण,मिताताई बरं झालं आलात. तुमच्या आत्याला जरा सोबत होईल." आत्याचे यजमान तात्यासाहेब मिताची तोंडदेखली दखल घेत पेढीवर निघून गेले. "बघ,इतक्या दिवसांनी आलीस पण बोलले का तुझ्याशी चार शब्द!" आत्या नाराजीच्या स्वरात म्हणाली. "आत्या,अगं तू पण काय लहान मुलासारखं करतेस. दसरा,दिवाळी जवळ आली. पेढीवर किती राबता असेल! खरंतर तू पण गेलं पाहीजेस पेढीवर." "मला का हौस नाही! पुर्वी बऱ्याचदा हट्ट केला पेढीवर घेऊन चला म्हणून पण यांनीताकास तूर लागू दिला नाही. पाचसहा नोकर आहेत पेढीवर. तुम्ही घरातलच बघा, म्हणाले. दुसानेंच्या घरातल्या बायका पेढीवर जात नाहीत म्हणत सासूबाईंनी यांचीच री ओढली. चल हे चालायचंच. अर्धा जन्म गेला या रहाटगाडग्यात. आता चर्चा करुन काय उपयोग म्हणा. तू एवढा प्रवास करुन आलैस ती थकली असशील. जरा न्हाऊन घे बघू. तोवर त...