अव्यक्त प्रेमाची कहाणी
अव्यक्त प्रेमाची कहाणी ©®गीता गरुड. "रश्मी इलासा वाटता मुमयसून," जास्वंदीची फुलं वळईतल्या गणपतीच्या भिंतीसमोरील कठड्यावर ठेवता ठेवता आजी म्हणाली ते राजेशने ऐकलं नि लगबगीने उठून बसला. "रे तुका आज रजा आसा ना कालेजाक मगे कित्याक उठतहस. नीज वायच उना येयतागद. राती गाडी उसरान इली नि धा वाजता घराकडे इलस. थयसरच कामाच्या ठिकानार आरतेपरते खयतरी जागा बघ रव्हाक. मगे तुजा लगीन झाला काय बायलेक घेऊन जा वांगडाक." असं म्हणत आजी पदराचा शेव तोंडावर धरत हसली. तरी राजेश आजीच्या बोलण्याकडे लक्ष नसल्यासारखं दाखवत उठला. घरात इकडेतिकडे पडलेले बारीकसारीक कपडे राजेशने आतल्या होवरीतल्या दांडीवर टाकले. गोधड्यांच्या घड्या करून त्याही आत खाटीवर न्हेऊन ठेवल्या. आजीने चहाला आधण ठेवलं होतं. त्यात गवतीचहाची पात, आलंही टाकलं होतं. आजीचं करणंच कसं साग्रसंगीत. चहाच्या पहिल्या घोटालाच तरतरी आली पाहिजे असा फक्कड चहा. न्हाणीतलं कढत पाणी तांब्याने जर्मनच्या बादलीत उपसून घेऊन राजेशने दात घासून तोंड धुतलं. आजे नुकतेच वाड्यातनं येत होते. त्यांच्या हातात दुधाची कितली होती. रश्मीच्या आजीकडे दुधाचा रतीब टाकायचा...