अव्यक्त प्रेमाची कहाणी

 अव्यक्त प्रेमाची कहाणी


©®गीता गरुड.



"रश्मी इलासा वाटता मुमयसून," जास्वंदीची फुलं वळईतल्या गणपतीच्या भिंतीसमोरील कठड्यावर ठेवता ठेवता आजी म्हणाली ते राजेशने ऐकलं नि लगबगीने उठून बसला.


"रे तुका आज रजा आसा ना कालेजाक मगे कित्याक उठतहस. नीज वायच उना येयतागद. राती गाडी उसरान इली नि धा वाजता घराकडे इलस. थयसरच कामाच्या ठिकानार आरतेपरते खयतरी जागा बघ रव्हाक. मगे तुजा लगीन झाला काय बायलेक घेऊन जा वांगडाक." असं म्हणत आजी पदराचा शेव तोंडावर धरत हसली. तरी राजेश आजीच्या बोलण्याकडे लक्ष नसल्यासारखं दाखवत उठला. घरात इकडेतिकडे पडलेले बारीकसारीक कपडे राजेशने आतल्या होवरीतल्या दांडीवर टाकले. गोधड्यांच्या घड्या करून त्याही आत खाटीवर न्हेऊन ठेवल्या. 


आजीने चहाला आधण ठेवलं होतं. त्यात गवतीचहाची पात, आलंही टाकलं होतं. आजीचं करणंच कसं साग्रसंगीत. चहाच्या पहिल्या घोटालाच तरतरी आली पाहिजे असा फक्कड चहा. न्हाणीतलं कढत पाणी तांब्याने जर्मनच्या बादलीत उपसून घेऊन राजेशने दात घासून तोंड धुतलं. आजे नुकतेच वाड्यातनं येत होते. त्यांच्या हातात दुधाची कितली होती. रश्मीच्या आजीकडे दुधाचा रतीब टाकायचा होताच. 


"चाय वतलय रे राजू, खय रव्हलस," आजी गाळलेला चहा कपात ओतत होती. तापवलेलं रात्रीचं दूध ओतताच चहाचा रंग उजळला.  "चाय घी. पाठीमागल्या डब्यातली बटराची पिशी काढ नि बटर घे भुतुरले तवसर मिया रश्मीच्या घराकडे जाऊन येतय दूध देव्क व्हया टायमार न्हेऊन. मुंबयची पावन्या इली आसत ना. म्हातारेक खडे येळ गावतलो हडे येव्क."


"आजये, मिया जातय दुधाचो तांबयो घेऊन. तुया तुझी कामा आटप." चहात बटर बुडवता बुडवता राजू पुटपुटला तसे राजूचे आजे मिशीतल्या मिशीत हसले.


"तुमका काय झाला हसाक?" आजी फणकारली तसे आज्यांनी बाजूचं पानाचं ताट पुढ्यात ओढून घेतलं नि सुपारी कातरू लागले.


राजेशने आज्यांकडे दुर्लक्ष केलं. बाहेरच्या खांबाला टांगलेल्या बारक्याशा आरशीत बघून केसांचा भांग पाडला. केस स्टाइलमधे विंचरले. आजी म्हणाली,"हात धुऊन ये नि मगे दूध घेऊन जा. आबोलेचो वळेसर गुतून ठेवललो मांडणीच्या खिळ्याक लावललो हा तोव घेऊन जा."


भरगच्च आबोलीचा वळेसर नी दुधाचा तांब्या घेऊन मागच्या पाणंदीच्या वाटेने तो रश्मीच्या घराकडे जायला निघाला. रश्मीच्या घराकडे घाईगडबड चालू होती. दोन दिवसांनी रश्मीच्या मोठ्या भावाच्या मुलाचं बारसं होतं. राजेशने रश्मीच्या आजीच्या हातात दुधाचा तांब्या न्हेऊन दिला पण रश्मी कुठे दिसेना. "अरे वा वळेसर पाठयल्यान मामीन माझ्यासाठी." म्हणत रश्मीच्या आईने राजेशच्या हातातला वळेसर घेतला. राजेशला हो ना काहीच बोलता येईना. 


"राजेश वायच पाळणो काढ रे माळ्यावयलो,"रश्मीच्या वडलांनी, तात्यांनी ऑर्डर सोडली. रश्मीचे वडील मुंबईत हायकोर्टात वकील. त्यांची जरबच अशी होती की राजेश काही न बोलता शिडी लावून माळ्यावर चढला. तो पाळणा पाठल्यादाराकडे न्हेऊन ठेवला तोच तात्या म्हणाले,"राजू, पाळण्याची साफसफाय कर." 


राजेश आता वैतागला कारण तो आला होता त्याच्या बालमैत्रिणीला रश्मीला भेटण्यासाठी. रश्मी चौथीत असेतोवर गावीच शिकायला होती त्यामुळे राजेशची नि तिची छान दोस्ती होती. चौथीचा तिचा निकाल लागला नि तात्या तिला घेऊन मुंबईला जायला निघाले तेंव्हा सर्वांचेच डोळे पाणावले होते पण सर्वात जास्त कोण रडला होता तर तो राजू होता. तात्यांनी त्याला समजावलं होतं, रश्मी सुट्टीला गावी येत जाईल म्हणून. 


जवळजवळ दहावीपर्यंत रश्मी दरवर्षी सुट्टीत गावी यायची. सुट्टीत वाडीतली सगळी मुलं मिळून धमाल करायचे. राजेश तर आपल्या वाटणीची करवंद, हेळू, जांभळंही रश्मीला द्यायचा. बालपणीच्या मैत्रीचं रुपांतरण त्याच्याही नकळत प्रीतीत होत होतं. गेली पाचेक वर्ष रश्मीच्या आईच्या आजारपणामुळे रश्मीला गावी येता आलं नव्हतं. 


राजेशने ठरवलेलं, आजीसोबत रश्मीच्या भावाच्या लग्नाला जायचं. रश्मीचं घर बघायचं, ती आता कशी दिसते पहायचं पण कुणी खबर आणली की रश्मीच्या भावाने प्रेमविवाह केला. त्यांच लग्न नोंदणी कार्यालयात पार पडलं नि राजेशचं रश्मीच्या मुंबईतल्या घरी जाणं बारगळलं. 


राजेशने पाळण्याची नीट निरगत लावली नि जायला निघणार तोच मागून रश्मीचा आवाज आला,"राजेश..राजू.."


राजेशची पावलं तिथेच थबकली.त्याने मागे वळून पाहिलं. हो रश्मीच होती ती. किती बदलली होती. अधिकच सुंदर दिसू लागली होती. तिने स्लीव्ह्जलेस टॉप नि स्कर्ट घातला होता. कोवळ्या काकडीसारखे तिचे रेशमी हात, सायीचे ओठ, करवंदी डोळे, गालावरची ठळक खळी नि चमचमत्या चांदण्यांसारख्या लुकलुकणारी दंतपंक्ती..राजेशने लाजून मान खाली वळवली. त्याचं लक्ष तिच्या स्कर्टखालच्या उघड्या गोरेट्या पायांकडे नि तिथून पुढे गुलाबी पावलांकडे, अगदी पुढे नाजूक बोटांकडे नि त्यावरील लाल नेलपेंटकडे गेलं. उरात धडधड होऊ लागली."


समुद्राची गाज कानावर यावी तसं रश्मीचं हसू त्याच्या कानावर आलं. "अरे लाजतोयस काय राजू! कित्ती वर्षाने आले मी. बोलणार नाही माझ्याशी!"


"नाय ता आपला ता इसारलय." त्याच्या या अवस्थेकडे पाहून रश्मीला हसू आवरेना. 


"राजू चल आपण गखा घेऊन फका काढूक जावया. येतय नं मला मालवणी. मुंबयक गेलय नि जीभेरची मालवणीव इसारलय बघ. आता तुज्यावांगडा पोटभर बोलून घेतलय." रश्मी अशी आपल्या भाषेतनं बोलू लागताच राजूला हुशारी आली. रश्मीच्या आईला सांगून ते दोघं ओल्या काजुबिया काढण्यासाठी बाहेर पडले. 


हिरव्यागुलाबी टम्म फुगलेल्या काजुबिया हेरून राजू त्या गखेने उडवत होता नि रश्मी लहान मुलीसारख्या त्या टोपलीत गोळा करत होती. तोंडाने तिची अव्याहत बडबड चालू होती. कॉलेज, सीएची परीक्षा..असं बरंच काही ती त्याला सांगत होती. राजूनेही बीए झाल्यावर एमएसाठी प्रवेश घेतला होता पण तो सकाळचं कॉलेज करून नोकरीही करत होता. आईवडलांचे छत्र लहानपणीच गमावलेल्या राजूला लवकरातलवकर करतंसवरतं व्हावं लागलं होतं. त्याला प्राध्यापक व्हायचं होतं. काजुबिया काढून झाल्या तशी दोघं घराकडे वळली. राजूनेच अंगठ्यात धरून काडीने सगळ्या काजुबियांतले गर काढून दिले. 


रश्मीने त्याला चहा नि मुंबईहून आणलेला केक दिला. केक खाताना तो तात्यांच्या गप्पा ऐकत होता. तात्यांकडे बाईवयले साठम आले होते. तात्या साठमांना सांगत होते,"पोरांचा काय खरा नाय ओ साठमांनू. थोरल्या झिलान प्रेमविवाह केल्यान म्हनान आता खबरदारी घितलय. रश्मीचा लगीन ठरवून ठेवलय. नवरोमुलगो वकील आसा. माझ्या हाताखाली शिकताहा. रश्मीचा शिक्षान पुरा झाला की तेचेवांगडा लगीन लावून देतलय. सगळी आमची हौसमौज पुरी करून घेवची रव्हलीहा ती लेकीच्या लग्नात पुरी करून घेतलव. लगीन मुलकातच करुचा ठरवलाहा. माटव बांधुया, कर्णो, वाजाप, जनताभाजी, कांद्याची भजी, सोजी..सगळा काय ता झोकात करूया. गावच्या लग्नातली मजा मुंबयच्या बुफे नि फुफेक येना नाय. बरोबर ना रे राजू. मदतीक येतलस मा."


राजूच्या डोळ्यात आभाळ भरून आलं होतं. त्याने इतकी वर्ष रंगवलेली स्वप्नं त्या होवरात वाहून जाणार होती.


"इलय हा तात्यांनू. याक अर्जंट काम आठावला," असं काहीतरी पुटपुटत तो तिथून सटकला.


"असो काय तो चाय देखूल पिऊक नाय." रश्मीची आजी पाणंदीच्या वाटेने भरभर चालणाऱ्या राजूला साद घालत राहिली.


समाप्त

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट