माझा धनगरवाडा(पुस्तकाचा आढावा)
माझा धनगरवाडा लेखक: धनंजय धुरगुडे रोहन प्रकाशन, पुणे घर..विसावा, आसरा, आधार देणारं मायेचं, हक्काचं ठिकाण. हे घरंच ज्यांच्या नशिबी नाही त्या धनगरांतल्या एकाची ही कहाणी. धनुची ही गोष्ट. धनुला आई आहे, वडील आहेत. काका, आज्जी, आजोबा आहेत पण सर्वांना एकत्र रहाता येत नाही. शेळ्या, मेंढ्या चारणं हा पिढीजात व्यवसाय. पोटासाठी शेळ्या, मेंढ्यांची खांडं नि बिर्हाड घेऊन सह्याद्रीच्या खोऱ्यांत फिरावं लागतं. म्हातारी माणसं तेवढी वाड्यावर रहातात. बिर्हाडात वाणसामान ठेवण्यासाठी पाटी असते, अंथरूण, पांघरुण न्हेण्यासाठी घोडी असतात. दोघे तिघे मेंढके आपापल्या खांडांना घेऊन ठरवलेल्या शिवारानी जातात. तिथे तंबू ठोकून कवळकाठी गोळा करतात. चुली ढणाणा पेटू लागतात. त्यावर कालवण शिजतं, बाजरीच्या भाकरी गरागरा फुगतात पण मग छानच की..बघणाऱ्याला छान..जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे. मधुनच सुसाट्याचं वारं वहातं. तंबू उडवून न्हेतं, टपापा गारा पडतात, पाण्याचे सपकारे उडवतात. विजा चमकू लागतात, पोरंबाळं मोकळ्या आभायाखाली..काय वाटत असावं त्या माऊलींना! चुलीतला जाळ विझतो, मेहनतीनं कांडून आणलेल्या पिठाचं पाण्याने गदवण होत...