पुस्तक समीक्षण माझ्या आयुष्याची गोष्ट



माझ्या आयुष्याची गोष्ट



गिरीजा कीर


गिरीजा कीर, पुर्वाश्रमीच्या रमादेवी मुदवेडकर. तिला तिचे दादा, आजोबा दोघंही देवी म्हणत. आजोबा बेळगावी निष्णात वकील होते. दादा म्हणजे वडील हे बँक मेनेजर होते. दादांची पत्नी मुलं लहान असतानाच देवाघरी गेली. आईविना पोरांना, श्री व देवीला घेऊन ते कोल्हापूरास आले. तिथल्या बँकेत रुजू झाले. विनम्र स्वभावाने लोकमानसात प्रिय झाले. 


घरचं करायला बालविधवा मावस बहीण माटूला घेऊन आले. माटू घरचं सगळं करायची पण परिस्थितीच्या चटक्यांनी अतितिखट झालेली तिची जीभ इच्छा असूनही देवीला आईची माया देऊ शकत नव्हती. देवीची थोरली बहीण दादांच्या भावाकडे रहायची. देवी व श्री मात्र दादांच्या संस्कारात वाढले. 


दादाच या हळव्या पोरीचे आई, बाप, गुरू झाले. तिला रंगीत काचा हव्या म्हणून घरी कोणी सवाष्ण नसतानाही कासारास बोलवून घेणारे व देवीस ती रंगीत काचांची दौलत मिळवून देणारे दादा, लेकीसाठी पाट्यावर मेंदीचा पाला वाटणारे दादा, तिच्यासाठी चपात्या करून देणारे दादा ते थेट ते ऐंशीच्या घरात असता ती माहेरवाशीण म्हणून गेली असता, माझ्या हातची कॉफी पीच म्हणून आग्रह करणारे, तिला स्वतः केलेली मुरांबापोळी मायेने खाऊ घालणारे दादा, माणसांतलं च़ागलं ते आठवावं, वाईट ते सोडून द्यावं देवी म्हणून तिला उपदेश करणारे दादा, कफल्लक झाले असता, तिच्याकडे इच्छा नसतानाही पाच रु. मागणारे दादा आणि ते देणारी सासरची गिरीजा ते देता यावे म्हणून तरी पदोपदी अपमान होत असतानाही संपादिकेची नोकरी न सोडता येणारी गिरीजा, असं हे बपलेकीचं नातं आपल्यासमोर उभं रहातं.


देवीला संस्कार करणारे तिचे मुरुडमधले, रुया कॉलेजातले शिक्षक, आपली धीरगंभीरता, सोशिकपणा देवीत रुजवणारा मुरुडमधला तिचा सखासोबती.. खळाळता समुद्र या साऱ्यांचा ती आवर्जून उल्लेख करते. आपल्या लाघवीपणाने बऱ्याचजणांची मानसकन्या होते.


 

देवी प्रेमविवाह करते खरा, पण सासूस सुनेच्या विद्वत्तेचं कौतुक नाही, माहेराहून काहीच न आणल्याने, स्वजातीची नसल्याने सासू तिला घालूनपाडून बोलत आली. शेवटी देवीचं कुटुंब एकत्र कुटुंबातनं बाहेर पडलं नि बेस्ट वसाहतीत राहिलं. तिथनं साहित्य सहवासात राहिलं. पैशाची ओढाताण, नवऱ्याची धरसोडव्रुत्ती, तिच्या कर्तुत्वाबद्दल जाणूनबुजून ठेवलेली अनभिज्ञता, हे असतानाही गिरीजेची खिंड लढवणं, लिहित रहाणं, समाजासाठी कामगार केंद्रात, काराग्रुहांत जाऊन कथाकथन करणं, साध्यासोप्प्या कथा सांगून त्यांच्या मनात चांगल्या नेणिवांच बीज रोवणं, कमिशनरांकडून केसेस आणून त्या अभ्मासून त्या वास्तववादी केसेसचा आपल्या कथाबीजासाठी वापर करणं, बऱ्याचदा संपादकांनी नाडणं, त्यातून होणारा मन:स्ताप मग हळव्या मनाला होणारी दादा नावाच्या आधारव्रुक्षाची आठवण..पुस्तक मनात घर करतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट