फिन्द्री (पुस्तक आढावा)
डॉ. सुनीता बोर्डे
मनोविकास प्रकाशन
मुखपृष्ठ व आतील चित्रे - अन्वर हुसेन
फिन्द्री म्हणजे नकोशी..कादंबरीतील बाप नावाच्या पुरुषाला मुलगा हवाय पण मुलगी होते. आई लेकीला पान्ह्याला घेऊन बसलेली असते. बाप तराठ होऊन येतो नि त्या अर्भकाला चेंडूप्रमाणे अंगणात उडवतो. लेकरू निपचीत पडते धुळीत. आई टाहो फोडते. कुणी म्हणतं इस्पितळात न्हेऊ, कुणी म्हणतं काही उपेग नही. आईच ती, लेकराला छातीशी कवटाळते, आपल्या जणू गात्रांत ओढून घेते..आईपण..काय बोलावं..आईपणासाठी शाळेच्या शिक्षणाची गरज नसते..ते उपजत असतं हाडामासात मुरलेलं..आईच्या उबेनं फिंद्री डोळे उघडते, हातपाय हलवते..ही संगी बाबाला डोळ्यासमोर नको शेवटी आई तिला समज आल्यावर बोर्डींगात घालायला न्हेते. फिंद्रीला जाऊ नाही वाटतं आईस सोडून पण आई म्हणते आपल्या बाबासाहेबान सांगितलंय या चिखलातून वर उठायचं आसलं तर शिकाया पायजेल. तिथल्या ताईंना आर्जव करते. संगीला केस बांधता येत नैत म्हणून तिचा बॉपकट(बॉबकट)करून घेते. केस विंचरताता संगी म्हणते, बरं झालं आईनं केस कापले. बॉपकट केला की केस इचरायची कटकट नाय तसा बापकट करता येतो का? तो कट केला की आईच्या मागचा, भावंडांच्या मागचा मार, श्या चुकतील. हे विधान काळजाचा ठाव घेतं. हीच संगी तिसरीत असताना बाप हिच्या बोर्डींगातल्या स्वैंपाकीणबाईशी संबंध ठेवतो, यावरून संगीची शाळा परत आईच्या जीवास घोर मग काही काळ ती आजोळी रहाते. आईचं मार खाणं, कुणाकडे कामाला जाणं सुरू असतं. बाप साखर कारखान्यात ड्रायव्हर असतो पण पगार घरी येतच नाही. पगार झाला की पावलं दारुच्या गुत्त्याकडे..उधारी भागवायला नि परत ढोसायला नंतर ठेवलेलीला सोन्याने मढवायला तिच्याकडे नि बायकोच्या पदरी श्या, लाथाबुक्क्या.
आई कुकवाच्या डबीतलं कुकु कपाळावर लावते, पदराच्या टोकाने तो चंद्रम रेखाटते नि म्हणते बाय बिना धन्याची बाई म्हणजे बीन झाकणाचा डबा, कुणीबी यावं नं लुबाडून न्यावं. धनी कसा बी आसना असायला हवा..हाच धनी दारूच्या नशेत बायकोच्या, पोरांच्या अंगावर राकेल ओततो, काडी लावू पहातो, जाळू पहातो तर कधी दिवाळीसाठी आणलेले मातीचे पाऊस तिच्या टाळक्यात फेकून मारतो, संगीला बाहेरचं दिव्यांचं झाड बघायला मिळत नाही तर हे उभं रक्ताचं झाड पहाणं तिच्या नशिबी येतं, कुणाकुणा शेजाऱ्यांकडे तर कधी लिंबणीखाली ती माय बापडी पोरांना घेऊन रहाते का तर नवरा मारील म्हणून तरी आपला नवरा पेला नाय तर देवमाणूस म्हणते. काही रुढीपरंपरांनी बाईच्या मनाला केवढा फास घातलाय, तिला होणारा त्रासही ती जगापुढे ओरडून सांगायला धजत नाही. हेही एक प्रकारचं बाईला जडलेलं व्यसनंच, नाही का!
दुसऱ्यावेळची बोर्डींगची फी देण्यासाठी संगीची आजी तिच्या गळ्यात असलेले दोन सोन्याचे मणी मोडते नि म्हणते, सोन्याचं काय घेऊन बसलियास, माझी नात शिकली की बाबासाहेबाच्या सांगन्यापरमान तिच्या आयुक्साचं सोनं होईल.
या अशा ससेहोलपटीत संगी शिकत जाते, द्विपदवीधर होते, प्राध्यापिका होते. तिची मैत्रीण छाया..छायाची दहावीची परीक्षा जवळ आलेली असताना सावत्र आई तिला घरी न्हेते, तिचं लग्न लावून देते. छाया संगीस भेटायला येते. नवऱ्यान दिलेलं घड्याळ संगीला देते नि म्हणते खूप शीक, अव्वल ये. संगी म्हणते नवऱ्याला काय सांगशील तर म्हणते सांगीन हरवलं. घड्याळाचं काय घेऊन बसलीस..माझी तर वेळच हरवलीय बघ. छाया बाळतपणात मुलाला जन्म देऊन या जगाचा निरोप घेते.
यातून स्पष्ट होतं ..आईबाप दोघे सुजाण हवे तर मुलांचं आयुष्य सुरक्षित नाहीतर मुलांच्या नशिबी वनवास, दारिद्रय, परवड. काही रुढी, विचारांचा पगडा एवढा घट्ट बसलाय की बाया कितीही सुधारल्या तरी त्यातून स्वतःला सोडवू पहात नाहीत का तर समाजाच्या, स्वतःच्या भयापायी.
कथेतील संवाद मराठवाडी भाषेत आहेत. कथेत श्यांची रेलचेल आहे. आम्ही आपलं म्हणतो आमच्या मालवणीत शिव्या हैत, तसं नै ते आपण आपली लोकभाषा वाचावीच शिवाय इतर लोकभाषा असलेली पुस्तकंही वाचावी, त्या त्या प्रदेशाची संस्कृती, जगणं कळतं. भाषा समजायला तसं अवघड नसतंच कारण जगणं इथूनतिथून सारखंच असतंय.
फिंद्री जरूर वाचावी अशी आहे. पुस्तकात अन्वर हुसेन यांनी काढलेली चित्रं फार सुंदर व बोलकी आहेत.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा