माझा धनगरवाडा(पुस्तकाचा आढावा)
माझा धनगरवाडा
लेखक: धनंजय धुरगुडे
रोहन प्रकाशन, पुणे
घर..विसावा, आसरा, आधार देणारं मायेचं, हक्काचं ठिकाण. हे घरंच ज्यांच्या नशिबी नाही त्या धनगरांतल्या एकाची ही कहाणी.
धनुची ही गोष्ट. धनुला आई आहे, वडील आहेत. काका, आज्जी, आजोबा आहेत पण सर्वांना एकत्र रहाता येत नाही. शेळ्या, मेंढ्या चारणं हा पिढीजात व्यवसाय. पोटासाठी शेळ्या, मेंढ्यांची खांडं नि बिर्हाड घेऊन सह्याद्रीच्या खोऱ्यांत फिरावं लागतं. म्हातारी माणसं तेवढी वाड्यावर रहातात. बिर्हाडात वाणसामान ठेवण्यासाठी पाटी असते, अंथरूण, पांघरुण न्हेण्यासाठी घोडी असतात. दोघे तिघे मेंढके आपापल्या खांडांना घेऊन ठरवलेल्या शिवारानी जातात. तिथे तंबू ठोकून कवळकाठी गोळा करतात. चुली ढणाणा पेटू लागतात. त्यावर कालवण शिजतं, बाजरीच्या भाकरी गरागरा फुगतात पण मग छानच की..बघणाऱ्याला छान..जावे त्याच्या वंशा तेंव्हा कळे. मधुनच सुसाट्याचं वारं वहातं. तंबू उडवून न्हेतं, टपापा गारा पडतात, पाण्याचे सपकारे उडवतात. विजा चमकू लागतात, पोरंबाळं मोकळ्या आभायाखाली..काय वाटत असावं त्या माऊलींना! चुलीतला जाळ विझतो, मेहनतीनं कांडून आणलेल्या पिठाचं पाण्याने गदवण होतं, पोरं उपाशी, धनगरराजा उपाशी, अंथरुणंपांघरुणं ओलीचिंब..हे असं निसर्गाच्या भरवश्यावरचं जीणं..एवढा आटापिटा..पिझ्झा बर्गरसाठी नव्हे..भाकरी कालवणासाठी.
शाळा कुठली! पण धनुच्या बापाला वाटतं माझ्या पोरांनी शिकावं, आपल्यासारखं मेंढकं बनून सदीचं कणाकणाने झिजू नये. थोरला शंकर, त्यामागून धनु त्यामागून धुळा शाळेत जाऊ लागतात. सहा महिने धनगरवाड्यावरच्या गावी तर दिवाळीनंतर कुठे बिर्हाड जाईल त्या गावी पोरं शाळेत जायची. धनाला मुलंच काय काही शिक्षकही धनगरड्या म्हणायचे. धनाला कोपऱ्यात बसवलं जायचं. लग्नाच्या पंगतीतही धनगरांची पंगत वेगळी. ही परिस्थिती धनाला बदलायची होती. शाळा तीनसाडेतीन कि.मी. दूर. हा पोर शाळेत जातायेता सनावळ्या, प्रश्नोत्तरं पाठ करायचा. रात्री दिवाबत्तीची सोय नाही तर झाडांवरचे मुठमुठभर काजवे डालग्यात सोडून त्यावर वाकळ आ
पांघरून डालग्यात बसून याचा अभ्यास. पहिला नंबर कधी चुकवला नाही. पुढे साताऱ्याला बोर्डींगला राहिला नि शिकू लागला. मुलांसाठी प्रेरणादायी असं हे पुस्तक आहे. परिस्थिती माणसात जिद्द निर्माण करते.
शेळ्यामेंढ्यांचा व्यवसाय तसा पहायला सोप्पा वाटतो, पण या शेळ्यामेंढ्यांना खाद्य कमी मिळालं तर त्या झुरणीला लागतात. जास्त पाला खायला मिळाला की त्यांचा बीपी वाढतो नि त्या मरतात किंवा वाडग्यात किडी, किटकं शिरली की रोगराई होते नि शेळ्या, मेंढ्या मरतात. कधी लांडगी दबा धरून बसतात नि शेळी पळवतात. निवांत झोप नाही..जंगली जनावरा़ची, सरपटणाऱ्या प्राण्यांची सतत भिती. यातून आपल्या मुलांनी तरी सुटावं, त्यांना सुखाचे दिवस दिसावे म्हणून लेखकाच्या आईवडिलांनी आजुबाजूच्या मे़ढक्यांचा, नातलगांचा रोष पत्करला, काबाडकष्ट करुन मुलांना शिक्षणासाठी पैसे पुरवत राहिले.
भटक्या विमुक्त जमातीचं जगणं पुस्तकातून वाचायला मिळालं.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा