समजगैरसमज

 समजगैरसमज




©®गीता गरुड.


"गे वैनी, गे शैलाचे आव्शी गेलं खय?" आपली गाय चरायला सोडून लाडूकाकी शैलाच्या गजालीला आली होती. 


"गे लाडूवैनी तांदूळ हाडूक गेललय होवरीत. वायच आसडून ठिवतय." शैलाची आई, सुलक्षणा म्हणाली.


"शैलाक बगललय तेरोजा पांदीतसून येय होता. साद घाली होतय पन येक नाय नि दोन नाय. लगनाक नाय झाले स मह्यने नि लाडूकाकीची वळाख इसारला पॉर." शैलाक आवडतत म्हनान जाम घेऊन इलय. ही धर पिशी, ठेव भुतूर.


जामाची पिशवी दरवाजाच्या मागील बाजूस टेकवून  सुलक्षणा लाडूकाकीच्या गजालीला बसली. "शैला बोलाक नाय म्हनतस..ता कानात बोती घालून गानी आयकत चलत आसतला, तेकारनान नायतर तुजो आवाज आयकान न आयकल्यासारा करीत की काय. इल्यार अगुदर तुजी चवकशी करता."


सुलक्षणाने लाडूकाकीला माठातलं पाणी प्यायला दिलं. उन्हाने तिच्या घशाला कोरड पडली होती. तांब्याभर पाणी ती घटाघटा प्यायली, माथ्यावर थोडं थापून घेतलन. सुलक्षणाने लाडूकाकीच्या पुढ्यात पानाचं ताट सरकवलं. लाडूकाकी पानाचा देठ तोडून पानाला नखाने चुना लावू लागली.. गालातल्या गालात हसत म्हणाली,"डाक्दरांनी तमाखू खाव नको म्हनान सांगल्यानी तवापासना सुनांनी माझी तमाखूची डबीच खय नायनपट करून टाकल्यानी. हय वायच टेकतय म्हनान  तुझ्या धर्मान चिमटीभर तमाखू तोंडात टाकूक गावता."


"लाडूवैनी, तुझ्या भल्यासाठीच तुझ्या सुनांनी तुझी तमाखूची डबी गायब केली आसतली." आतमधे वळईत आईचं नं लाडूकाकीचं संंभाषण ऐकणारी शैला बाहेर आली, लाडूकाकीच्या अगदी जवळ बसत म्हणाली.


"व्हय तर भला करतहत माझा. बगावा तवा व्हयते पद्मिनींची मुंडी मोबायलातनी. घोवांनी घेऊन दिल्यानी हत धाबारा हजाराचे खोके ते दागिन्यांसारे मिरवतत. तरी नशीब परसाकडला जातान घेऊन जानत नाय. आपलेच दात नि आपलेच व्हट म्हनाचा नि चिप रव्हाचा. तेंचा राज्य इलाहा काय करतीत ता खरा. आमचे कारकदीत आमी कुकु लावल्याबिगर घराचो हुंबरो कधी वलांडलव नाय. ह्या बायांका कमीपना वाटता कुंकू लावूक. "


"काकी, आजकल टिकली लायतत. मीव टिकलीच लायतय न्हय."


"ती तरी खय लायतत. भुंड्या कपाळान वावरतत. हातव भुंडे ठेयतत.  असलो राग येता माका! बोलाक गेला काय माझा ताँड दिसता. हेंचेफुढे तोंडातसून शब्द काढूची सोय नाय. गे असांदे, रव्हांदे..असा करीत रव्हतले.  माझ्या कपाळाचा कधी घामान निथळला तर मातर कपाळाक लाव जा सांगतीत. लेकीसनीव असाच सांगीत. सुनास्नी मातर सूट. मगे सुनांका सासरो पिरेमळ, मायाळू वाटता नि सासूबाय रीतीचा बोलता म्हटल्यार कजाग वाटता." लाडूकाकीची टेप काय बंद होता होत नव्हती. पंढरपुरी कुंकुवाचा ठसठशीत टिळा तिच्या गोऱ्या भाळावर उठून दिसत होता, त्याखालचं तुळशीचं गोंदण नं हनुवटीखालचा गोंदणाचा ठिपका. एवढ्या उन्हातान्हात फिरूनही काकीचं गोरपण जसंच्या तसं होतं. काळसावळे काका, काकीला शोभत नव्हते खरे पण कातडीच्या रंगाला संसारात दुय्यम स्थान असतं. महत्वाची भूमिका निभावतात ती उभयतांची मनं. ती एक झाली की तो जोडा लक्ष्मीनारायणाचा होतो. 


"काकी, काका बरे आसत ना गे." शैलाने  लाडूकाकीपाशी काकांची आस्थेने विचारपूस केली.


"आसत बरे. चललाहा म्हनाचा. हातपाय फुटतत तेंचे. पयली कामा काय कमी केली ता सगळा भायर पडताहा. इलो दिस ढकलताव झाला. रे बाबू आमच्या गायक वायच आरते घाल रे." बाबू गायीपाठी गेला तसा लाडूकाकीने आपला मोर्चा शैलाकडे वळवला. शैलाचं लग्न लाडूकाकीच्या घरवाल्यांनीच जमवून दिलं होतं. शैलाचा नवरा जिल्हा परिषदेत कामाला होता. नोकरीत पुढे बढतीच्या संधी होत्या म्हणून त्यांनी शैलासाठी शब्द टाकला होता. शैलाने लाडूकाकीसाठी आणलेलं काळ्याभोर लांबसडक केसांच गंगावण, आंबाड्याची जाळी नि आकडे तिला दिले शिवाय टपोऱ्या कळ्यांची वेणी दिली. लांबून वेणी पाहिली तरी ती क्रुत्रिम असेल असं वाटत नव्हतं.


लाडूकाकी त्या साजाकडे डोळ्याचं पातं न लवता पहात राहिली. इतक्यात शिल्पाने लाडूकाकीचा आंबाडा सोडला.

"काकी, केस खय तुझे?"


"न्हेल्यान हुंदरान..तर काय काकी तरनी रवतली काय सदीची. आदी पोरा काय करी नाय हुती म्हनान डोक्याक ताप नि आता सुना इल्या तर सुना नीट अग्गतीन वागनत नाय म्हनान ताप. जीवाक अजाबात थारो नाय माझ्या."


शैलाला लाडूकाकीच्या बोलण्याचं हसू आलं. तिला हसताना बघून तिची आई तिच्यावर डाफरली. "तू कित्याक दात काढतहस? काकी तुका चेडू मानता म्हनान मन मोकळा करता तुझ्याजवळ नि तुझी निराळीच तर्हा."


शैलाने लाडूकाकीच्या केसांना गंगावण बांधून मस्त चापूनचोपून आंबाडा घातला, वरती नवीन आणलेली वेणी माळली नि लाडूकाकीकडे आरशी धरत म्हणाली,"बघ कशी दिसतस आता. काकाव बघून खूष जातले. काकी, तू नुको ता टेंशन घितस. सूना आपल्या मनापरमान वागतले. आपुन जुळवून घेऊक व्हया. तुझी सासू डोईर पदर घेय,तुया घितस आता? तुझी सासू नववारी नेसा, तुया गोल नेसतस. सणासुदीकच नववारी नेसतस.   तसाच ह्या टिकलेचा. माझ्यासाठी खाऊ घेऊन इलस तसाच सुनांकाव कायकाय सरप्राईज अधीमधी न्हेऊन दी. तेंच्या आवडीची भाजी बनव, तेंच्या माह्यराकडले गजाली काढ. मगे बग कसे मोबाईल सायटीक ठेवून गजाली करूक लागतीत. काकी,माझ्याकडे ना खड्यांची टिकलीची पाकीटा आसत. माझी नणंद मुंबयक टिकलीच्या कंपनीत कामाक असा. ती पाठवता माका नये नये डिझाइनचे टिकले. काकनाव हाडली हत नयीन डिझाईनची. मिया दितय. तू न्हेऊन सुनांका दी. बग लावली नाय तर माका सांग."


दुसऱ्या दिवशी लाडूकाकी सवडीने आली. शैला आईसोबत जात्यावर दळण दळत होती. 

"कसला दळाप काढतहास?"


"शैलाक उकडे तांदळाचे लाडू खावची हुक्की इली हा, म्हनान वायच पायलीभर तांदूळ भाजलय. गुळ, येलची सगळा आसा घरात. माह्यराक कसा हक्कान मागता, आपुनव करून घालूक व्हया." शैलाची आई खुटा घट करता करता म्हणाली.


"व्हय तर. शैला माजा गुनाचाच हा. तडेव सासूबाय काय मागात ता करून घालतली तेका. तोंडातच गॉड हेच्या. कल बगलस माज्या हारी टिकल्यांची पाकीटा नि काकना लावून दिल्यान. आज सकळ दोनव सुनांनी न्हाऊनधुवून झाल्याबरूबर तोंडांका पावडरी फासून कपाळाक टिकले लायल्यानी, हातीत काकना चढवल्यानी. आक्शी गवळणीगत दिसतहत. शैला, तुया म्हनतस ताच खरा बाय. सुनांच्या कलान घेवक व्हया. आज सकळ सुपारी कातरताना माझो हात  अडकित्त्यात गावलो, ही रक्ताची धार लागली. थोरलीन बरफ धरल्यान, जखमेत हळदीची फकी भरल्यान. रगात गेला नि माका येऊक लागली घेरी, भिरभिराक झाला निसता. फीरीजात येकच लिंबू शिल्लक होतो. धकलीन तांबयोभर लिंबूसरबत करून हाढल्यान नि माका पिऊक लावल्यान नि मगे झिल दवेखान्यात घेऊन गेलो. आज गाईचाव सगळा सुनांनीच केल्यानी. माका पानयात हात बुडवूचो नाय, हात बरो होयतागद दोघींनीव बजावल्यानी तशी तेंच्या रुपात माझी आयेच गमली माका."


लाडूकाकीचा सुनांबद्दल असणारा गैरसमज आपण दूर करू शकलो या विचाराने शैलाला खूप बरं वाटलं. त्याच रात्री लाडूकाकीच्या यजमानांना देवाज्ञा झाली. सुलक्षणा शैलाला घेऊन लाडूकाकीच्या घरी गेली. वाडीतल्या माणसांनी लाडूकाकीचं घर भरलं होतं. अचानक ध्यानीमनी नसताना होत्याचं नव्हतं झाल्याने लाडूकाकीला जबर मानसिक धक्का बसला होता. सुना मात्र लेकीसारख्या तिच्याजवळ बसून होत्या. दोन्ही सुनांनी लोकांना सासूचं सौभाग्य लेणं काढू दिलं नाही. त्यांच्या निर्णयावर त्या ठाम राहिल्या.  ”एखादी मुलगी कुंकू, गंध अगर टिकली लहानपणापासनं लावते, लहानपणापासनं हातात बांगड्या घालते मग पुढेही तिच्या इच्छेनुसार तो साजश्रुंगार करते पण पती गेला म्हणून तिचं कुंकू पुसणं, वगैरे रीतींनी त्या स्त्रीच्या आधीच खचलेल्या, दु:खी मनाला किती आघात पोहचवतात. ज्या रीतीभाती अनिष्ट आहेत त्या बाद कराव्यात. प्रत्येकाने स्वतःच्या घरातून सुरूवात करावी, अनिष्ट रुढींची पायमल्ली करण्याची."लाडूकाकीची सून त्वेषाने बोलत होती नि लाडूकाकीच्या कपाळावरला कुंकवाचा लाल टिळा अधिक उठून दिसत होता. 

एकजण पुढे आला..म्हणाला,"मगळसुत नि जोडवी तर लग्नापासूनच घालतत ना." 


धाकटी पुढे झाली, म्हणाली," मनाने एक झालेलं जोडपं ते, जीवनसाथी अर्ध्यावर वाट सोडून गेला तरी ती सहचारिणी त्याची उरलेली कर्तव्ये जीवात जीव असेपर्यंत तडीस न्हेण्यासाठी झटते मग तिची सौभाग्यलेणी उतरवून नेमकं काय सिद्ध करतात लोकं..समाजाचं दुबळेपण का आणखी काही! लाडूकाकीच्या सुनांच्या  प्रश्नांपुढे सगळेच निरुत्तरीत झाले. सरपंचांनी सुनांच्या म्हणण्याला आपला पाठिंबा दर्शवला. 


शैला मनात म्हणत होती..लाडूकाकीचं दु:ख थोडं हलकं होईल, तेंव्हा तिला नक्कीच आपल्या सुनांच्या निर्णयाचा अभिमान वाटेल.


समाप्त.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट