लेकीचा वाढदिवस
लेकीचा वाढदिवस
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7389619452372445"
crossorigin="anonymous"></script>
©®गीता गरुड.
सकाळपासनं नानांच चित्त थाऱ्यावर नव्हतं. तसं पहाटे चारला उठून प्राणायाम केला त्यांनी, सवयीप्रमाणे फिरुनही आले पण कुणाशी हसणं नाही बोलणं नाही, आपल्याच कोषात गुरफटल्यासारखे.
नानीने चहा आणून दिला तोही साखर कमीच चहापूड जास्तच असं काही न बरळता गुपचूप प्याले.
नानीने अर्धा किलो गाजरं धुवून आणून त्यांच्या पुढ्यात ठेवली. एरवी "रिटायर झाल्यापासना तुझ्याहाताखालचो घरगडी समजाक लागलस माका. जरा म्हनान एके जाग्यार स्वैन बसाक देनस नाय ,"अशी नानांनी बडबड केली असती. नानीला त्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या असत्या. समोर दहाबारा काजूगर भाजून आमिष म्हणून ठेवावे लागले असते, झालंच तर घोटभर आणिक चहा.. पण आज काही अजबच वातावरण होतं.
नानांनी गाजरावरची तुसं तासून काढली नि खिसणी घेऊन खिसू लागले. अगदी तालात आले की विचारायचे,"नानी तुका किती खिस देव!" मग नानी रागवायची. डोळे वटारून म्हणायची,"वय वाढताहा तसे आजून आजून तरणे होत चललेहत. फुढ्यात तरनीताठी लेकरा बसली आसत त्याचाव भान नाय हे मानसाक."
नाना हसून म्हणायचे,"अगो मिया आपलो साधाभोळो मानूस. वायच आपला माजा थोडका ज्ञान पाजतय पोरांका. बाकी त्यांचा ती शिकतली आपुनच."
मुलगी सोनाली नि मुलगा सोहम यांना नानांच्या खोडकर स्वभावाची चांगलीच माहिती होती. ती दोघंही त्यांच्या विनोदावर खळखळून हसायची. नानांच्या या खेळकर स्वभावामुळे नि नानीच्या नेटक्या सांसारिकपणामुळे त्या घरात गोकुळ नांदत होतं.
वर्षभरापुर्वी सोहमला औरंगाबादला जावं लागलं. तिथल्या नामांकित महाविद्यालयात त्याला एमबीएसाठी प्रवेश मिळाला होता. सोहम नसल्याने गोकुळ थोडं उदास झालं होतं खरं पण ती उदासिनता सोनालीच्या चिवचिवाटामुळे कमी होत होती म्हणण्यापेक्षा जास्त जाणवत नव्हती.
नानांना सोहमच्या दूरगावी रहाण्याची सवय झाली कारण तो तसा अंमळ कमीच बोलणारा होता पण सोनाली..सहा महिने झाले सोनालीचं लग्न होऊन तरी सोनालीचा चेहरा नानांच्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. तरी दोन दिवसातनं एकदा तरी सोनाली फोन करायची, नानांशी बोलायची. एकदोनदा येऊन साताठ दिवस राहुनही गेली होती.
'सोहमचा काय वरीसभरानंतर घराकडेच तर येवचो आसा,' नाना स्वतःच्या मनाला समजावत पण सोनालीचं तसं नव्हतं, चेडू दिलल्या घरचा..'
चार दिवस माहेराच्या अंगणात चिवचिव करणारी चिमणी भुर्र उडून गेली होती.
नानांना खळ्याकडेही बघवेना. याच खळ्यात सोना पायात छुमछुम पैंजण घालून नाचायची. खेळताना पडली की ढोपरं फुटायची मग इवल्याशा डोळ्यातनं पाणी वहायचं नि नानाच लागायचे मग जमिनीवर मारायला, सोनाला पाडलं म्हणून जमिनीला चार चापट्या बसल्या नि दुखऱ्या ढोपरांवर नानांच्या ओठांतली फु़ंकर बसली की सोनाची कळी खुलायची. नाना आपल्या गंजीफ्रॉकने तिच्या गोबऱ्या गालांवरचे माणिकमोती टिपायचे नि तिला खांद्यावर घेऊन खळाभर फिरवायचे.
शाळेत जातानाही तिला सायकलवर घेऊन जायचे. सोनासाठी खास पुढे सीट बसवून घेतली होती नि सोहम नानांच्या मागे बसायचा, लहान असुनही त्याला मागे बसायला आवडायचं.
मुलं दोन्ही मर्जीमाप होती. कधी कुणाच्या कळी घेऊन घरी आली नाहीत. आजूबाजूचे शेजारी म्हणायचे, मुलं असावी तर नानानानीच्या मुलांसारखी.
सोनाली गाणं शिकली, रांगोळीकला शिकली. नानांनी तिच्या कलेला प्रोत्साहन दिलं. पुढे तिने कलाशाखेत जाण्याचा निर्णय घेतला त्यालाही नानांनी अनुमती दिली.
सोनाने प्रत्येक वर्षी फर्स्ट क्लास सोडला नाही. आता लग्न झाल्यावर तिकडची सासरकडची माणसंही चांगली लाभली. सासू म्हणाली पुढं शिकायचंय तर शिकून घे. एकदा मुल झालं की त्यात मग शिक्षण वगैरे राहून जातं. सोनाने एमएसाठी प्रवेश घेतला होता. तिथल्या महाविद्यालयात जाऊ लागली होती. घरी आली की सासूच्या हाताखाली घरचं काम शिकत होती त्यामुळे माहेरी येऊन दहाबारा दिवस रहाणं काही होत नव्हतं.
सोनाच्या विचारांत नानांचं गाजर खिसणं चालू होतं. नीट लक्ष नसल्याने शेवटची दोन गाजरं उरली होती आणि गाजरासोबत बोटही खिसणीवर सालपटलं.
नानीने तिच्या आवडीची मालिका लावली होती,"काय ते सदीना सासूसूनेचे सिरयली बगतस!" वगैरे नानांनी साईडला क्यासेट न लावलेली असल्याने नानीलाही मालिका बघण्यात मजा येत नव्हती. नानांच्या विरोधाला हिरीरीने विरोध करत मालिका बघायला आवडायची तिला. मालिकेला रंग चढत जायचा पण हे अगदीच अळणी वातावरण झाल्याने तिची नजर नानांवर खिळली होती.
नानांच्या चेहऱ्यात झालेला बदल पाहून तिने खाली पाहिलं तर रक्ताचा थेंब बोटावर दिसला. तिने पटकन खिसाचं ताट बाजूस ओढलं खिसणी सिंकमधे टाकून ती हळदतेल घेऊन आली. नानांच्या बोटावर तिने हळदतेल बसवलं नि बोट उभं धरायला सांगितलं. "चित्त थाऱ्यार नाय हा तुमचा. चेडवाचो वाढदिस म्हनान तेचे आवडीचो गाजराचो हलवो करुक घितलय मिया नि तुमी ह्या बारकासा ताँड करून बसलास."
"गो आसा खय सोना तुजो हलवो खाऊक."बोलताना नानांचा गळा दाटून आला. त्यांच्या गळ्याची ती हालचाल नानीच्या नजरेतून सुटली नाही. तिलाही भरून आलं.
"देवकीक दिवस गेले हत. अआजून सासूक सांगाक नाय. ठेयता काय एबॉर्शन करुक जाता देवाक म्हायती. मेले हे जाहिराती बगलास. पाच पाच मिनटांनी येयत रव्हतत." नानी विषय बदलत होती. नानाही उगाचच मान हलवत होते. त्यांच लक्ष शोकेसमधल्या बाहुलीकडे गेलं. गेल्यावर्षी वाढदिवसाला हट्टाने तिने मागवून घेतली होती. एवढी मोठी झाली तरी वाढदिवसाला बाहुली हवी. नाना तिला खुळा पोरग्या म्हणायचे. ती मान वेळावायची.
नानीचा गाजरहलवा तयार झाला. दुधाची घट्ट साय, वेलचीपूड, साखर, गाजराचा खिस यांचा एक संमिश्र गंध घरात पसरला. नानीने मटारपुलाव केला. जेवायला ताटं घेतली नि सोहमचा व्हिडीओ कॉल आला.
खळ्यात येरझारा घालणाऱ्या नानांना नानीने बोलवून घेतलं. समोर त्यांची परीराणी सोना होती. जावई होते,.विहिणबाई होत्या, सोनाची नणंद, नणंदेचा छोटू, व्याही सारेजण बसले होते. सोहम खास ताईच्या वाढदिवसादिवशी ताईच्या घरी सरप्राईज द्यायला गेला होता.
नानांना तर शब्दच सुचत नव्हते. डोळे भरून येत होते. लेकाबद्दल क्रुतज्ञता दाटून येत होती, लेकीची द्रुष्टीभेट झाल्याचा आनंद डोळ्यांतून वहात होता.
"नाना चीअरअप. तुमी असे नाराज रव्हलात तर माका कसातरीच वाटतला." सोना म्हणाली. नानांनी चष्मा काढून डोळे पुसले नि तोंडावर स्मितहास्य आणलं.
विहिणबाई, सोनाची नणंद दोघींनी सोनाला ओवाळलं. तिच्या आवडीचा गाजरहलवा तिला भरवला. केक कट केल्यानंतर सर्वांनी सोनाला शुभेच्छा दिल्या, भेटवस्तू दिल्या.
सासूबाईंनी चौकडची हिरव्या काठाची नारळी अंगाची साडी भेट दिली, नणंदेने पर्स भेट दिली, सोनाच्या नवऱ्याने नाजुकसा नेकलेस तिच्या गळ्यात घातला.
नानांच्या लक्षात आलं,'सोहमकडे फक्त खानावळीचे पैसे नि आडीआडचणीसाठी दिलली मोजकी रक्कम. ह्यो असोच गेलो की काय!'
पण नाही. असाच कसा जाईल भाऊराया! सोहमने चांगली हातभर लांबीची बाहुली दिली सोनाताईला. पिंगट केसांची, निळ्या डोळ्यांची, गुलाबी गालाची नि तलम आकाशी झगा ल्यालेली ती बाहुली मिळताच सोना एवढी खूष झाली की बस रे बस.
सोहमने वळून नानांकडे पाहिलं. नानांचा ऊर कौतुकाने भरून आला होता. त्यांनी डोळ्यांनीच लेकाला थोपटलं.
समाप्त.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा