ती हरली होती.
ती हरली होती
©®गीता गरुड.
"का गं सावरी, आज एवढा उशीर केलास यायला?"सावरीला तिच्या आईने इंदूताईंनी विचारलं.
सावरीने आईच्या प्रश्नावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. स्वत:तच हरवल्यासारखी ती वॉशरुममधे शिरली. अंगावरले एकेक वस्त्र उतरवून तिने टबमधे टाकले नि शॉवर घेऊ लागली. गार पाण्याचे ओघळ तिच्या गालांवरून, मानेवर, मानेवरून उरोजांवर, अंगप्रत्यंगांवरून वहात होते. अंगात उडालेला वणवा ती शांत करू पहात होती. डोळ्यांना धारा लागल्या होत्या. आपली हक्काची वस्तू कुणीतरी दुसऱ्याने मिरवणं याहून अधिक दु:ख ते काय!
सावरी लहानपणापासूनच पहिल्या तीन नंबरात असायची. इंदूताईंना तर सावरीचा केवढा अभिमान होता! दहावी, बारावीत ती मेरीटमधे आली होती. पुढेही अभियांत्रिकी शाखेतून पदवी मिळून एका नामवंत कंपनीत रुजू झाली होती. त्याचदरम्यान प्रज्वलशी तिची ओळख झाली. जातायेतानाची ओळख पण प्रज्वलचं हसरं, उमदं व्यक्तिमत्त्व तिच्या नजरेतून सुटलं नाही. प्रज्वल ज्युनिअर कॉलेजात नुकताच प्राध्यापक म्हणून रुजू झाला होता. इ़ंग्रजीचा प्राध्यापक असल्याने अगदी फ्लुएंटली इंग्लीश बोलायचा. एटिकेट्स तर नावाजण्यासारखे. सावरीच त्याच्या मागे पिंगा घालू लागली. इंदूताईंना तसेच सावरीचा मोठा भाऊ संग्राम व वहिनी सलोनी यांना तिचा हा चॉइस मुळीच पसंत नव्हता. जावई आणायचा तर आपल्या तोलामोलाचा असं इंदूताईंच स्पष्ट मत होतं, पण सावरी कुणाचंही ऐकली नाही. शेवटी प्रज्वल व सावरीचं लग्न झालं. मात्र सासरी प्रज्वलला हवा तसा मान जाऊदेत पण आपुलकीची वागणूकही मिळत नव्हती.
सावरीने घरकामासाठी दोनतीन बाया लावल्या. ती कधी नववधूसारखी घरात वावरलीच नाही. आपलाच तोरा मिरवायची. प्रज्वलच्या आईला तिचं हे वागणं सहन होईना. दोघींत खटके उडू लागले. आईची बाजू घेऊ की बायकोची..प्रज्वलची मधल्यामधे गळचेपी होऊ लागली.
दोन खोल्यांच्या घरात सावरीचा श्वास कोंडू लागला. मोठं घर घेऊया असा तिने घोशा लावला. प्रज्वल व सावरी दोघंजणं घर शोधण्यासाठी फिरू लागली. एका नवीन इमारतीमधला फ्लेट तेंनी बुक केला. लोन सावरीच्या नावावर घेतलं. जुनं घर सोडून नवीन घरात जाणं प्रज्वलच्या आईच्या जीवावर आलं होतं. तिला जुन्या घरीच रहायचं होतं पण प्रज्वल ऐकेना. प्रज्वलच्या आईची भांडीकुंडी नवीन घरी पोत्यांतच राहिली, ती माळ्यांवर चढवली गेली. इथे सगळं सुनेच्या मालकीचं होतं. किचनमधली कॉपरबॉटमची भांडी, सिरेमिकचे डिनरसेट..प्रज्वलच्या आईला तिथे अगदी बुजल्यासारखं होऊ लागलं.
सावरीला प्रमोशन मिळालं. ती आता घरी उशिरा येऊ लागली. तिच्या पार्टीज, ड्रिंक्स घेणं सगळं प्रज्वलच्या मिडलक्लास मेंट्यालिटीच्या बाहेरचं होतं. आता खरं तर प्रज्वलला घरात नवीन पाहुणा यावासा वाटत होता. पण सावरी तयार नव्हती. बाळ आलं की त्याची जबाबदारी आली, जी ती घेऊ इच्छित नव्हती. सावरीचं मीच सगळं करते, माझा पैसा, माझं घर..याने वादाला तोंड फुटू लागलं.ती प्रज्वलच्या आईलाही उलटसुलट बोलू लागली.
माझी मम्मा बघा कशी एक्टीव्ह असते नाहीतर तुम्ही, काय केलंत ओ आयुष्यभर. नुसतं आपलं खायला काळ नि भुईला भार..सावरीचं तोंड सुटलं होतं. तिची सासू मुक्याने अश्रू गाळत होती..नेमका त्याचवेळी प्रज्वल घरात शिरला. त्याला सावरीचं हे बोलणं सहन झालं नाही. आजपावेतो ती त्याच्या पुरुषार्थाला डिवचत होती पण तो ते खपवून घेत होता पण त्याच्या जन्मदात्रीला तिने असं बोलणं त्याला सहन झालं नाही. खरंतर त्यादिवशी त्याच्या वडिलांची पुण्यतिथी होती. वडील जाताना त्याने वडलांचा हात हातात घेऊन आईला कधीही अंतर दिलेणार नाही असं वचन दिलं होतं. त्यादिवशी तो नेहमीच हळवा व्हायचा. आवेशात येऊन त्याने सावरीच्या दोन कानाखाली लगावल्या. माझ्या आईची माफी माग बोलला. हा अपमान, ही थप्पड सावरीच्या जिव्हारी लागली.
"तुम्ही दोघंही भिकारडे आहात. तुमची लायकी नाही रे
माझ्या घरात रहायची. चालायला लागा इथनं. नरकात जा." ती मोठ्या त्वेषानं ओरडू लागली. तिने वॉर्डरोब उघडले. प्रज्वलचे कपडे त्याच्या अंगावर फेकले. त्याच्या आईच्या सुती साड्या, पोलकी तिच्या अंगावर भिरकावली. "भिकारडी माणसं. चालायला लागा."
प्रज्वल आईला घेऊन तिथून चालता झाला. त्याने काही महिन्यांतच सावरीला लग्नबंधनातून मुक्त केलं. सावरीची आई आता तिच्यासोबत राहू लागली. या गोष्टीला जवळजवळ पाचेक वर्ष लोटली. मधल्या काळात एका प्रोजेक्टसाठी सावरी आईला घेऊन अमेरिकेत राहिली होती. तिथे एल्बर्टशी तिचा संबंध आला. तिला वाटलं होतं एल्बर्ट आपल्याला आयुष्यभर साथ देईल. आपल्यासोबत भारतात येईल पण एल्बर्टने स्वतःच्या स्वार्थासाठी सावरीच्या देहाचा, पैशाचा, पोझिशनचा वापर करून घेतला व तिला सोडून फरार झाला. पुन्हा ती एकटी झाली. पैसा, मानमरातब सगळं सगळं होतं तरी काहीतरी नव्हतं. आता तिला अपुरंअपुरं असल्याची जाणीव होत होती.
सावरी आईसोबत भारतात आली. आताशी तिचं आईशीही नीट पटत नव्हतं. इंदूताई तिला पुन्हा लग्न कर सांगत होत्या पण तिला हुकुमत गाजवायची होती. तिच्या बोटांच्या तालावर नाचणारा माणूस तिला सापडत नव्हता.
आज संध्याकाळी कारने येताना तिचं लक्ष समुद्रकिनारी गेलं. तिथे तो होता..हो प्रज्वलच होता तो. तिने कार पार्क केली. प्रज्वल भेळ घेत उभा होता. त्याला दिसणार नाही, अशी ती उभी राहिली. भेळ घेऊन तो दहाबारा पावलं पुढे गेला. तिथे वाळूत एक बाई बसली होती. वेणीचा शेपटा, नीटनेटकी साडी, हातात हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र, प्रज्वल तिच्याजवळ जाऊन बसला.
वाऱ्याने त्या दोघांचे केस भुरभुरत होते. एक छोटीसी गोबऱ्या गालांची धिटुकली मम्मी, पप्पा करत धावत येऊन त्यांना बिलगली नि सावरीला त्याचक्षणी जाणवलं, पैशापाठी धावण्याच्या मोहात तिने काय नि किती अनमोल क्षण गमावले होते. डोळे पुसत ड्राईव्ह करत ती घरी आली होती. आईच्या नजरेला नजर न देता वॉशरुममधे शिरली होती. शॉवरच्या प्रत्येक धारेसोबत त्या स्वार्थी एल्बर्टने आपल्या शरीराचा घेतलेला भोग ती मिटवू पहात होती पण ते मिटता मिटत नव्हतं.
प्रज्वलचा सुखी संसार पाहून आजपर्यंत मिळवलेली सर्व सुखं तिला थिटी वाटत होती. ती हरली होती..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा