गोमाता
गोमाता
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-7389619452372445"
crossorigin="anonymous"></script>
©®गीता गरुड.
सदानंद इयत्ता आठवीत होता. सदानंदचा बापूस रमाकांत त्यांच्या गावाच्या शेजारील गावात अण्णा खोतांच्या घरी घरगडी म्हणून कामाला होता. रमाकांतची आई, वासंतीही खोतांकडेच घरकामाला जायची.
रमाकांत खोतांची गुरं चरायला घेऊन जायचा. गायरानावर गुरांना चरायला सोडून आपण तिथेच बासरी वाजवत बसायचा. दिवस मावळतीला आला की गुरांना आणून वाड्यात बांधायचा.
"आये, आपुनव वाडा बांधुया." रात्री निजताना सदा आईला म्हणायचा.
"वाडो बांधून तेतूर दावणेक बांधूक ढोरा खडेसून हाडुची!" आई सदाला आपल्या बेताच्या परिस्थितीची जाणीव करून द्यायची.
"आये, बाबा खोतांची ढोरा राखता. आपली ढोरा हाडली काय आपली ढोरा राखूक जायत नि मीव गवातकाडी घालीन ढोरांका. तेंका व्हाळार न्हाऊक घेऊन जायन. माका लय आवाडतत ढोरा नि आये ढोरा आपली आसली काय तुका होवरे सारवुचेसाठी हेचेतेचेकडसून श्यान मागून हाडुचीव गरज नाय लागुची मगे आपुनना गोबरगेस घेवया. आये, तुझे डोळे चुलीतल्या धुरान चुरचुरतत ना."
सदाचा हा ढोरांसाठीचा लकडा नेहमीचाच असायचा. आईशी बोलताबोलता त्याचे डोळे पेंगू लागायचे. तो झोपला की वासंती त्याचं पांघरुण सारखं करायची.
" देवीआई माझ्या झिलाच्या सगळ्या इच्छा पुऱ्या कर,"अशी मनोमन प्रार्थना करायची.
सदा अभ्यासात हुशार होता. दहावीला जिल्ह्यातून दुसरा आला. गावाने त्याचा सत्कार केला. रमाकांत व वासंती सदाला घेऊन खोतांच्या वाड्यावर गेले. खोतांनी सदाची पाठ थोपटली. खोतीणबाईंनी सदाला व त्याच्या आईवडिलांना गोडधोड खाऊ घातलं. खोतांनी पैशांचं पाकीट सदाच्या हाती दिलं. सदाने ते घेतलं नाही.
"नुको कित्याक म्हनतस?" खोतांनी विचारलं.
त्यावर सदा काही सेकंद काहीच बोलला नाही मग म्हणाला,"अण्णांनू, माका पैसं नुको. देव्चाच आसा तर गोमाता देवा एकारदी. माका लय आवड असा गायीची."
रमाकांत सदावर ओरडला,"सदा, अण्णा जा दितत ता घेव्चा सोडून तुजा काय ह्या भलताच. गायीक चराक कोन घेऊन जातला? तुया जाशीत कालेजात."
"मिया सानचा घेऊन जायन तिका चराक. चारव कापीन. तिचा सगळा काय ता करीन."
अण्णा खोतांनाही आता सदाच्या या बोलण्याचं, आर्जवाचं अप्रुप वाटलं. खोत म्हणाले,"तुका व्हयी ती गाय घेऊन जा वाड्यातली पन निगा राखूक व्हयी गाईची. माका गाय जर रोड झालली गमली तर वर्रसाच्या आत घराकडे घेऊन येतलय."
सदा खूष झाला. त्याने होकारार्थी मान हलवली व तो वाड्याकडे पळाला. एक सोनवर्णी कालवड त्याने निवडली. खोतीण बाईंनी गाईला हळदकुंकू लावलं, तिला चाऱ्याचा घास भरवला व सदाच्या हाती सोपवली. सदाला ती कालवड घेऊन येताना कोण आनंद झाला होता. त्याने घराच्या डावीकडील पडवीत एका खांबाला तिचा दोर बांधला. नारळाच्या झावळ्या विणून वरती छत तयार केलं. गायीचं नाव सोजिरी होतं तेच ठेवलं.
आता सकाळी उठलं की सदा पहिलं सोजिरीचं तोंड बघायचा. तिला चारा घालायचा. तिच्या मानेला खाजवायचा. सोजिरीलाही सदाचा लळा लागला. सदा पडवीच्या दारात दिसला की सोजिरी हम्मा हम्मा करत हंबरायची. सदा जवळ आला की आपल्या खरखरीत जिभेने त्याचे हात चाटायची.
सदा सोजिरीसाठी चार कापून आणून ठेवायचा. तिला पाणी दाखवायचा. एकवेळ स्वतः न्याहारी न करता कॉलेजात गेला असेल पण सोजिरीची आबाळ होऊ दिली नाही. सोजिरी आता वयात येत होती, सदाही कॉलेजातल्या एकेक पायऱ्या चढत होता. तो बीएससी झाला. स्पर्धा परीक्षा देत होता.
सदाला बँकेत लेखापाल म्हणून नोकरी लागली. त्याने आईवडलांना आता बाहेरची कामं करू नका म्हणून सांगितलं पण रमाकांत म्हणाला,"झिला, खोतांकडचा काम म्हंजे घरचाच काम. तेंचा काम जीवात जीव आसतागद करतलय."
सदाच्या सोजिरीला आता गोंडस पाडा झाला होता. सोजिरीचं दूध लुचूलुचू प्यायचा. सदाने पहिला पगार झाला तसे खोतांना व खोतीणबाईंना कपडे भेट म्हणून दिले. त्यांच्या पाया पडला. आईला म्हणाला,"आये, तुला पुढच्या पगारात लुगडं आणतो. अदुगर माझ्या सोजिरीसाठी नि राजुसाठी वाडा बांधायचं सुरू करतो. सदाचं सोजिरीवरचं प्रेम का आईला ठाऊक नव्हतं! चिऱ्यांचा, सिमेंटचा वाडा बघताबघता तयार झाला. रमाकांतने स्वत: वाड्याची जमीन केली. मध्यभागी बांबूची गताडी बांधली. त्यात गवत टाकलं. सोजिरी नि राजूला नव्या वाड्यात न्हेऊन बांधलं.
सदाचं लग्न ठरलं. महिन्याभरातच त्याचे दोनाचे चार हात झाले. सदाची पत्नी शोभा शिकलेली होती. घरातली सगळी कामं करायची पण तिला शेणाचा, गोमुत्राचा तिटकारा होता. ती वाड्यात पाऊल टाकायची नाही. सोजिरीसाठी चार कापायला जायची नाही की आंबोण तयार करायची नाही. सदाला वाटत होतं आपल्यासारखंच आपल्या पत्नीनेही सोजिरीवर, राजूवर जीव लावावा. गोसेवा करावी, नसेल येत तर शिकून घ्यावी पण शोभा ऐकायला तयार नव्हती. सदाला शोभाचं वागणं पटत नव्हतं. शेवटी लग्न म्हणजे तडजोडच, त्याने स्वतःला समजावलं.
वर्षाच्या आत शोभा गर्भार राहिली. इकडे सोजिरीही गर्भारशी होती. सदाचं सारखं कामावरनं आलं की वाड्याकडे जाणं, राजुसोबत वेळ घालवणं, वाड्याची साफसफाई करणं शोभाला आवडत नव्हतं. एकदोनदा तिने ते बोलूनही दाखवलं पण त्यावरून त्या दोघांत खटके उडू लागले. काही झालं तरी सदा त्याच्या सोजिरी नि राजुकडे गेल्यावाचून रहाणार नव्हता.
सोजिरीला दुसराही पाडा झाला. रात्रभर सदा तिच्यासोबत होता. वेणा येताना सोजिरी कासावीस होत होती. सदा तिच्या पाठीवर मायेने हात फिरवत होता. ते इवलंस वासरू धडपडत उठलं, आईच्या पान्ह्याला लुचू लागलं. इकडे शोभालाही आठव्या महिन्यातच कळा सुरू झाल्या. तिचं नाव जिथे घातलेलं ते डॉक्टर बाहेरगावी गेले होते मग दुसऱ्या डॉक्टरकडे न्हेलं. बाळी फारच लहान, कमी वजनाची होती. ती भुकेजली होती. आईच्या स्तनाला लावल्याबरोबर भुकेजला जीव बोंड ओढू लागला पण दूध नं आल्याने ती फार काकुळतीने रडू लागली.
डॉक्टरांनी बाहेरचा डबा लावा म्हणून लिहून दिला. ते डब्याचं दूध त्या तान्ह्या लेकराला पचेना. जुलाबाने हैराण झाली. घरी आणल्यावर तिला गप्प करण्यासाठी सदा इकडेतिकडे फिरवत होता. वासंतीच्या डोक्यात कायतरी आलं. ती लगबगीने छोटा गढू घेऊन वाड्यात गेली. सोजिरीला म्हणाली,"बाय गे, माझ्या सुनेक दूध येयना. तुझा दूध पाजतय माझ्या नातीक. ता तरी पचांदेत." सोजिरीला काय कळलं तीच जाणे. तिने मान हलवली नि पान्हा सोडला.
वाटीचमच्याने वासंती बाळीला पायांत घेऊन सोजिरीचं दूध भरवत होती आणि भुकेली बाळी ते चुटूचुटू पित होती. ते द्रुश्य पाहून शोभाचं मन हेलावलं. ती स्फुंदू लागली. वासंतीने छकुलीला शोभाच्या स्वाधीन केलं, म्हणाली,"बघ पॉट भरल्याबरोबर कसा खेळाक लागला चेडू. नि तुया कित्याक रडतहस. ओल्या बाळंतीनीन अशी डोळ्यातसून टिपा काढू नयेत. झाला काय तुझा? कोन काय बोलला?" त्यावर शोभा रडतच म्हणाली,"आई, मी सोजिरीचा, राजूचा राग करायचे, त्यांच्या शेणाची मला किळस यायची. कधी सोजिरीच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवला नाही मी नि सोजिरीने मात्र माझ्या बाळीला, माझ्या छकुलीला दूध दिलं. मला खूप अपराधी वाटतय आज."
"काययेक मनात ठेवू नुको बाय माजे. तुकाव सवय होतली आपुनच गायवासराची. नि नाय झाली तरी सोजिरी काय मानूस नाय, गोमाता असा ती. तू रागेव नायतर फटकार, नायतर माया कर. ती तिचा दूध देव्चा कर्तव्य करतली."
"हो आई, माझे डोळे उघडले सोजिरीने. आता मीही सोजिरीची नि तिच्या वासरांची मनापासून काळजी घेईन,"सासूचा हात हातात धरत शोभा म्हणाली. दारात उभे असलेले बापलेक एकमेकांकडे पहात समाधानाने हसले.
समाप्त

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा