जेवणाचं ताट द्यावं पण पाट देऊ नये.


 जेवणाचं ताट द्यावं पण पाट देऊ नये!


©®गीता गरुड.


मारुतअण्णा गोदरेजमधे नोकरीला होते. विक्रोळीत कन्नमवार नगरमधे वन रुम किचनचं त्यांचं घर होतं. थोरल्या लेकीचं लग्न लावून दिल्यानंतर वर्षभरातच मोठ्या धुमधडाक्यात लेकाच्याही लग्नाचा बार त्यांनी उडवून दिला होता. 


वनरुमकिचनच्या घरात सासूसुनेचं पटेना झालं. सेवानिवृत्त झालेले मारुतअण्णा सकाळसंध्याकाळचे दोनचार फेऱ्या मारुन आल्यावर दिवसभर घरातच असायचे. बैल गवतकाडी खाऊन रवंथ करत बसावा तसाच सकाळी वाचलेला पेपर परत परत वाचत बसायचे. त्याच त्याच मालिका पुन्हा पुन्हा पहायचे, पहाताना खो खो असायचे. सुनेला रागच यायचा मारुतअण्णांचा. जा म्हणूनही बोलू शकत नव्हती कारण खोली होती मारुतअण्णांच्या नावावर. 


सुनबाई रागाने चारचार दिवस माहेराला जाऊन राहू लागली. यावेळेला पंधरवडा उलटून गेला तरी परत आली नाही तेंव्हा मारुतअण्णांच्या पत्नीने, शारदाक्काने लेकाला विचारलं,"प्रतिभेन फोनबिल केललो काय तुका?"


"नाय गे."


"तुया तरी चवकशी केललस तिची?"


"माझ्या आवशीबापाशीवांगडा भांडान जाता.मिया कित्याक चवकशी करू. आपल्या पायान गेली हा तशी आपल्या पायान परत येयत."


आपल्यामुळे आपल्या लेकात व सुनेत भांडणं होणं व ती वेगळी रहाणं मारुतअण्णांना व शारदाक्कांना पटत नव्हतं. शेवटी ती दोघंजण सुनेच्या माहेरी गेली. प्रतिभेच्या आईने त्यांना पहाताच इकडचं तोंड तिकडे फिरवलं.


प्रतिभाही आतल्या खोलीत निघून गेली. कुणी पाण्याचंही विचारलं नाही. तरी लेकासाठी सगळा अपमान गिळून मारुतअण्णा प्रतिभेला हाक मारत म्हणाले,"प्रतिभा,.आम्ही दोघा तुका न्हेऊक इलव. आमी गावाक जातलव दोन दिसांनी, तुया आता राग सोड नि घराक चल. आमी आता गावाकच रव्हतलव." प्रतिभेच्या आईने हे ऐकलं मात्र, तिचा चेहरा केवढा खुलला! 

"अवो माजी प्रतिभा काय उलटसुलट बोलली असात तर मोठ्या मनान माफ करा. प्रतिभा तुझे कपडे भर जा. तुमी कायमची गावाक जावचा म्हनताहास ता बाकी बरा ठरवलास. गावची हवा ती गावची हवा. हय सोना शिजवून खाला तरी तेका थुकीची चव नाय. गावी कसा ताजे मासे, भात खावूक गावतलो. शिवाय गावच्या झाडापेडांवरव लक्ष देवूक गावात. आता जेवूनच जावा. मटान हाडूक पाठवतय बंटीक."

यावर शारदाक्का म्हणाली,"जेवानबिवान करूचे भानगडीत पडा नुको. आमकाव बेगे बिगे भरूचे आसत तेकारनान बेगिन जातव."


मारुतअण्णा नि शारदाक्का गावी गेले. मुला, मुलीच्या संसारांच्या घड्या रीतसर बसवून त्यांना मानाने गावी जायचं होतं पण सुनेला आपला उबग आल्याने केवळ लेकाचीसुनेची भांडणं होऊ नयेत, सून परत नांदायला यावी याकरता करावी लागलेली ही तडजोड मारुअण्णांच्या मनाला कायमची यातना देऊन गेली.


नवऱ्याचं मन बायकोहूनअधिक कोण जाणणार! शारदाक्काने गावच्या घरी पाऊल टाकल्यापासनं पदर कंबरेला खोचला नि कामाला लागली. दर गणपतीहोळीला येजा असल्याने घराची साफसफाई होतीच पण आता कायमचं रहायचं म्हंटल्यावर ती जरा अधिक करावी लागली, बाजुच्या बयोला सोबतीला घेऊन सारवण केलं. घराला अगदी नव्या नवरीसारखं तेज आलं. बयोची शेरडं घेऊन मारुतअण्णा स्वतः रानात जाऊ लागले. तेवढाच बयोच्या कामाला हातभार नि मारुतअण्णांचाही वेळ त्यांत रमू लागला.


अधेमधे मुलगा, सून फोन करायचे. तोंडदेखली विचारपूस करायचे. कधी सणासाठी खर्चाला म्हणून पैसे पाठवायला सांगायचे. शारदाक्काही पाठवा त्यांना म्हणून सांगायची. "आपलीच पोरा. तेंच्यार रागेजून कसा चलात? आपल्याशिवाय तेंका आसा तरी कोन?" अशी ती नवऱ्याची समजूत काढायची.


मारुतअण्णांना व शारदाक्काला गावाकडची हवा मानवू लागली. त्यांच्याच वयाची माणसं ओसरीवर त्यांच्याशी चार जीवाभावाच्या गप्पा मारायला येऊ लागली. गावातली जत्रा, शिमगा अशा सणांना मारुतअण्णा सपत्नीक गावकऱ्यांत सहभागी होऊ लागले. 


एकदा मारुतअण्णांचा मुलगा व सून दोघेही अचानक गावी आले. शारदाक्काला खूप बरं वाटलं. जवळजवळ वर्षभराने ती मुलाला व सुनेला पहात होती. शारदाक्काने सून घरी आली म्हणून  सत्यनारायणाची पूजा ठेवली. नवीन जोडप्याला पुजेला बसवलं. 


मुलगा मारुतअण्णांशी अगदी विनयाने बोलत होता. दोघं जोडीने येणाऱ्याजाणाऱ्यांच्या पाया पडली. सुनेने सवाष्णींना हळदीकुंकू लावलं, त्यांना मुंबईहून आणलेली मिठाई व प्रसाद, शेवचिवडा प्लेटीतनं दिला. त्यांच्याशी तोंड भरून बोलली. सुनेचं हे नवं रुप पाहून शारदाक्काचं मन सुपाएवढं झालं. "


"शारदाक्का, तुमची सुनबाई रुपान सुंदर असाच पण गुणानबी लाखात येक आसा. येवडी शिकलली आसा पन बोलना कसा प्रेमळ. आमच्यातलीच वाटली आमका. तिका आमच्या घराकडे घेऊन येवा. वाडीतली घरा नि घरांतल्या मानसांची ओळखदेख जाऊंदेत तिका. येशीत ना बाय!" असं विचारताच प्रतिभाने गोड हसत मान डोलावली.


मारुतअण्णा मुलाला घेऊन बाजारात गेले. मुलासोबत बाजारात फिरताना एक वेगळाच आनंद, अभिमान त्यांच्या देहबोलीतून व्यक्त होत होता. 


शारदाक्काने सुनेला व बायोला मदतीला घेऊन घावणे, खापरोळ्या, नदीचे मासे, गावठी कोंबडा असं गोडतिखट बरचसं करून त्यांना जेवायला वाढलं. लेकसून आपल्या हातचं चवीने खाताहेतसं पाहून तिलाही केलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटलं.


बयोने आपल्या केळीवरचा घड खास या मुंबईच्या पाहुण्यांसाठी आणून दिला. परड्यात धरलेल्या वालीही त्यांच्यासाठी शारदाक्काला न्हेऊन दिल्या. " परत येताना बयोक बरासा पाताळ घेऊन ये गो प्रतिभा,"शारदाक्काने बयोने मायेने दिलेल्या केळीच्या घडावर हात फिरवत म्हंटलं तसं प्रतिभा म्हणाली,"आई, तुम्ही दोघं दहाबारा दिवसांसाठी चला आमच्यासोबत मुंबईला. तुमचाही हवाबदल होईल थोडा."

सुनेने अगत्याने बोलावताच शारदाक्का गुलाबाची कळी खुलावी तशी खुलली नि मोठ्या आशेने मारुतअण्णांकडे पाहू लागली. मारुतअण्णा वळईत येरझारा घालताघालता सासूसुनेचं बोलणं ऐकत होते. टिव्हीवर राजकारण्यांचे बनेल वादसंवाद चालू होते. "ओ आयकलास, सूनबाय मुंबयक घेऊन जाताहा आपनाक. जाऊया ना."


मारुतअण्णांनी आपली चाल थोडी धिमी केली व कसलासा विचार करत म्हणाले,"गणपतीनंतर जावया मह्यनोभर रव्हाक. गणपतीत तुमी दोघाव चारदिस अदुगर येवा. मगे आमी येतव. दिपवाळीतागत थयच रवतलव. दिपवाळीनंतर ह्या घराच्या दुरुस्तीचा काम करूक घेतंलय. घर बांधून इसेक वरसा झाली. तेचीव डागडुजी करना गरजेचा आसा."


यावर मारुतअण्णांचा मुलगा म्हणाला,"अण्णा, या घराची डागडुजी करूया की पण अजून काही वर्षांनी. तुम्हाला आम्ही तिकडे बोलवतोय त्याला कारण आहे. प्रतिभेच्या आईच्या बिल्डींगच्या बाजुला जी मोठी सोसायटी होतेय ना तिथे टुबीएचके बुक करायचं मनात आहे आमच्या. मला लोन मिळतय पण कमी तेंव्हा आपला सध्याचा ब्लॉक विकावा म्हणतोय. शेजारचे घारुअण्णा सांगेन त्या किमतीला घ्यायला तयार आहेत पण ब्लॉक तुमच्या नावावर आहे म्हणून.."


मारुतअण्णांच्या लक्षात सगळा प्रकार आला. लेकाचं नि सुनेचं मधाळ बोलणं किती स्वार्थापोटी आहे हे लक्षात येताच त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली तरीही तिथेच बसलेल्या बयो व तिच्या मुलांसमोर तमाशा नको म्हणून शक्य तेवढ्या संयत स्वरात ते म्हणाले, "  तुमका आमची अडचण होऊक लागली ह्या लक्षात येताच आम्ही आमचा चंबुगबाळा गुंडाळून हय मुलकात रवाक इलव. जवानीत काटकसर करून माझ्या बापाशीक मिया पैकं पाठवी, बापाशीनव मातीचा घर पाडून मी दिलले पैसे वापरून ह्या चिरेबंदी घर बांधला. मिया नि तुझी आव्स, आमी दोगांनीव कदी हौसमौज कसली ती केली नाय. हे तुजे आवशीच्या हातीत दोन तरी सोन्याची काकणा आसत काय बग बरा. तुमच्यासाठी मिया मोप केलय. तुमका घर घेव्चा आसा तर जरून घेवा पन सवताच्या कर्तबगारीर घेवा. मानसान जेवनाचा पान द्यावा पन बसुचो पाट कोनाक देव नये म्हनतत ता खोटा नाय. मिया माझी खोली तुमच्या नावार करून देतलय ह्या दिवासपान बघुचा बंद करा. इलाहास ती तुमच्या जीवाक व्हये तितके दिस रव्हा नि भेटीबिटी घेऊन आपल्या कामाधंद्याक जावा."


मारुतअण्णांचे बोलणे ऐकून मारुतअण्णांच्या लेकाची व सुनेची तोंडं काळीठिक्कर पडली. आल्यापासनं गोड बोलणारी सून तिरीमिरीत बोलू लागली,"उद्या सकाळच्याच गाडीला निघतो आम्ही. आमच्या अडचणीत तुम्ही साथ द्याल वाटलं होतं पण कसचं काय.." 


शारदाक्कांनी मुलाला जेवायला बोलावलं. मुलगा मला नको म्हणत ओसरीवर जाऊन बसला. मारुतअण्णांनी भिंतीला लावलेला पाट जमिनीवर मांडला व म्हणाले,"कुळदाची पिठी केलहस ना नि बयोकडच्या वालीची भाजी. बेगिन जेवूक वाढ माका. देवळात मिटींग हा जाऊक व्हया."


समाप्त

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट