लाडावलला पॉर


 लाडावलला पॉर


©®गीता गरुड.


येसगावच्या ठेंगणे मास्तराला तीन मुलं नि एक मुलगी होती. तीन मुलांच्या पाठीवर पाचेक वर्षांनी हेमलता जन्माला आली म्हणून ती तिन्ही भावांची नि आईबापाची अत्यंत लाडकी होती.


ठेंगणे मास्तरांनी घरात सुना आणल्या त्या गरीब, सालस घरातल्या. तिन्ही सुना कशा लाखात एक होत्या. एकमेकींशी जुळवून घ्यायच्या. सुनांनी सासरघरी पाऊल टाकताक्षणीच प्रत्येकीला सासूने तंबी दिली,"आमच्या हेमलता उर्फ बबलीचो द्वेष करायचो नाय.  बबलीक कामाची सवय नाय तेचवांगडा तुमी सरत लावलली दिसली तर तुमका माह्यराक पोचती करतलव."


प्रत्येक सुनेला सासूबाईचं हे वागणं खटकत होतं पण तिघी मूग गिळून गप्प होत्या. "नणंदेशी पंगो घेतलो नि ह्या सासूच्या नजरेत इला तर आपली रवानगी माह्यराक नि मगे पाठीमागल्या भयनींचीव लग्ना होताना पंचायत." तिघी धुणं धुवायला गेल्या की आपली दु:खं मोकळी करत.


थोरलीचा मोठा भाऊ, पत्या मतिमंद होता. ती म्हणे,"माझ्या आवशीबापाशीक इस वर्षाच्या झिलाचा सगळा करूचा लागता. तेंच्यापाठी हालवनयास आसत आयुक्सभराचे. आपली सासू काय आपलो छळबीळ नाय करना. फकस्त चार कौतुकाचे, मायेचे बोल तिच्याकडना येना म्हाग आसा."


मधली रंजना म्हणायची, "हे बबलीक बसूक पाट, जेवूक चांदीचा ताट, वाटी, आचवूचेसाठी आव्स तांब्यो घेऊन उभी रव्हता. बापूस टाल देतत ताँड फुसूक. हेचेपरीस चार बुका जास्तीची शिकात तर चांगल्या घरात पडात. सांगीत कोन? आपुन बोला नि वाईट होवा, सांगल्यानहा कोनी!""


धाकटी  लावण्या मात्र चटपटीत होती. आपला फायदा कसा करून घ्यायचा तो तिला बरोबर ठाऊक होता. परसवामागच्या पाणंदीतनं जग्या मोटरसायकल फटफटवत न्यायचा. जग्याचा आवाज आला की बबली भिरभिरतं फुलपाखरू व्हायची. खरंतर याआधी बबलीचं सुत सदा महाडीकशी जुळलं होतं. त्याच्यासोबत ती कॉलेजातून डायरेक्ट सिनेमाला जायची. हॉटेलात जाऊन फेमिली रुमात बसून मिल्कशेक प्यायची, आईस्क्रीम खायची. लावण्याच्या भावाकडनं ही सारी बातमी लावण्याला कळली होती. लावण्याला आपलं  प्रेमप्रकरण कळल्याने बबली लावण्याशी बोलताना नरमाईने बोले. तिला आपली कामंही सांगत नव्हती.


वर्षभर सदा महाडिकला आपल्या इशाऱ्यांवर  खेळवल्यावर बबलीचा सदामधला इंटरेस्ट ओसरत गेला. गोव्यात कामाला असणारा, कसला तरी भारी बिझनेस करणारा जगन उर्फ जग्या तिला भूरळ घालू लागला. सदाचे निरोप ती चुकवू लागली. जग्याचे सेट केलेले केस, पाच बोटातल्या पाच घडीव अंगठ्या, उभी कॉलर, रेबनचा गॉगल, अपटुडेट रहाणी यांनी जगनला गावात मान होता. जगनने कसलीशी कंपनी सुरू केली  होती. तो लोकांची गाठभेट घेई व त्यांना सांगे,"बँकेत पैसे ठेवलास तर तुमका गावता काय पाच नाय तर स टक्के व्याज. इनकम टेक्सचीव भानगड आसता. त्यापरीस आमच्या 'फास्टर ग्रोथ' मधी पैसे ठेवलास तर तुमका वर्षाक पंचवीस टक्के व्याज गावात."


लोकं जगनच्या म्हणण्याला भुलली. बायकोपोरांच्या अंगाखांद्यावरचं सोनंही काहींनी विकून टाकलं नि फास्टर ग्रोथ कंपनीची भर केली. काहींनी आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकल्या नि ते पैसे वाटून घेऊन फास्टर ग्रोथमधे गुंतवले. जगनची पत पाहून बबली भुलली. त्याच्यासोबत हिंडूफिरू लागली. बबलीच्या वडलांनीही आपली थोडी वाडवडिलार्जित जमीन विकून जगनच्या कंपनीत पैसे गुंतवले.


"आये, जगनचो बंगलो असा, चार चारचाकी गाडये आसत, गेरेज असा सवताच्या मालकीचा. मिया जगनवांगडा लगीन करतलय. हे माझे भाव मह्यनोभर नोकरी करून जा कमवतत तेच्या दुपटीन जगन येका दिसात कमवता. मिया माझ्या भावांका जगनचे कंपनीत नोकरीक लावतलय. आस्ते आस्ते तेंका पार्टनर करून नाय घितलय तर नावाची बबली नाय!"


थोरल्याने आईवडलांना समजवायचा यत्न केला,"ह्या जगनचा माका काय खरा दिसना नाय. स सात टक्के याज गावता तर ह्यो पंचवीस टक्के याज कसो काय देताहा?"


"दादा, जगन शेअरमधी पैसे लावता. साधारणशाची कामा नाय ती. लय डोक्याचा काम आसता. निसते फोनार फोन येतत तेका. गोव्यातव बंगलो बांधूक घितल्यान हा तेना." बबलीच्या या बोलण्यावर मधला बोलला,"बबले, तू आमची एकुलती एक भयन आसस म्हनान आजपातूर तुझे सगळे लाड पुरवलव. आयेनव तुजे जास्तीचेच लाड केले आसत. आमच्या बायकाव बिचाऱ्या तुझ्या धाकाखाली वागतत. भैन दिलल्या घराक जातली म्हनान आमी सगळा गमता तरी चिप रवतव पन जगन्यावांगडा लगीन केलस नि तेचो बिजनेस चललो नाय तर तर तुका माह्यराचे दरवाजे बंद होतले."


मधल्याचं हे बोलणं ऐकून बबलीने गळा काढला. बबलीची आई तिन्ही मुलांना शिव्याशाप देऊ लागली. "आपापल्या बायकांचे बैल आसत हे. खाली मुंडी नि पाताळ धुंडी अशी हे सुनांची गत. हेंच्याच तोंडान आज भयनीक बोलाक लागले हे. बबलीचो आव्सबापूस जीतो आसतागद तिका माह्यराचो दिंडीदरवाजो उघडो रव्हतलो. धेनात ठेवा."


इतक्यात नोटांची पुडकी घेऊन बबलीचे वडील आले,"जगनशेटने याज दिला हा बगा कितक्या. आता बसून खाव्क काययेक हरकत नाय. जगन्यासारो जावय शोधून सापडूचो नाय. माका ठंडा पिऊक दिल्यान. चार चाकी गाडीतसून आड्यातागद सोडल्यान."


झालं, जगन नि बबलीचं लग्न लागलं. बबलीच्या वडलांनी लेकीला सोन्याने मढवली. गोठपाटल्या, कैरीहार, मोहनमाळ, नथ, अंगठी, जावयाला दोरखंडासारखा सोन्याचा गोफ, दोन्हीकडचा लग्नाचा खर्च, जेवणावळी..बबलीच्या वडलांसोबत बबलीचे तिन्ही भाऊही या लग्नखर्चाने अगदी मेटाकुटीला आले. तरी बबलीचे वडील मात्र भरभक्कम व्याज मिळतय म्हणून खूष होते.


 मुलांच्या अपरोक्ष एकदोन भक्कम रकमेच्या एफडी मोडून त्यांनी जावयाच्या कंपनीच्या सर्टिफिकेट्स घेतल्या. बबलीला दिवस गेले. तिला मुलगा झाला. बबलीच्या अंगावरही आता दुपटीने सोन चढलं होतं. सगळ्या घरकामाला मोलकरणी होत्या. जगनशेठ दोनदोन दिवस कामानिमित्त बाहेरगावी असायचा. घरात फ्रीज, एसी, वॉशिग मशीन, सगळं सगळं होतं. बबलीची आई तर दोन दोन महिने बबलीकडेच जाऊन राहू लागली होती. जावयाच्या स्टेटसचा तोरा मिरवत होती.


तिन्ही सुना मात्र  आखडू नणंदेची कटकट गेली म्हणून मनापासनं खूष होत्या. गरीबाघरच्या त्या लेकी एकमेकींना सांभाळूं घेत होत्या. सणाला तिघींनी साड्या घेतल्या की घरच्या घरीच पिको करून आलटून पालटून नेसायच्या. इतरांच्याही साड्या त्यांनी फॉलबिडींगला घ्यायला सुरूवात केली. धाकटीचा टेलरींगचा कोर्स झाला होता. तिला थोडी खटपट करून सरकारकडनं शिलाई मशीन मिळालं. मधली चार बायांशी गप्पा मारून शिवण घेऊन यायची. धाकटीला पोलक्यांना हातशिलाई, काजा करून द्यायची. ही तिघींची उठाठेव पाहून सासरा म्हणे,"कसली भीकेची लक्षणा ही. तेपरीस माझी बबली बघा. तिचो पायगुण बघा,जावयबापू वरतेवरते शिडी चढतहत. दोन वर्षा झाली, नेमाने याज घरी येऊन देतहत."


बबलीने भावांना नवऱ्याच्या कंपनीत रुजू व्हायची संधीही दिली पण भावांनी ती नाकारली. बबलीला रागच आला त्यांचा. ती भाऊबीजेलाही माहेरी जायची बंद झाली.


 हळूहळू जगनच्या वागण्यात बदल होऊ लागला. तो महिनोनमहिने गायब राहू लागला. बबलीला घरखर्चासाठी पैसे ठेवीनासा झाला. घरातल्या नोकरचाकरांचे पगार थकले. एकेक करून सगळे नोकर नोकरी सोडून गेले. एवढ्या मोठ्या बंगल्याची झाडझूड करताना बबली थकून जाऊ लागली.  तिच्या अंगावरले सुवर्णालंकार सराफाकडे चालते झाले.


बबलीच्या मुलाला चिकन, मटण, मासे, मिठाई खायची सवय लावल्याने तशा उंची खाण्यासाठी तो हट्ट करू लागला, नाही मिळालंकी हातपाय झाडू लागला, डोकं आपटून रडू लागला. बबली नि बबलीची आई भांबावून गेल्या. सलग तीन महिने लोकांना त्यांच्या ठेवींवर व्याज देण्यास जगन असमर्थ ठरल्याने लोकं त्यांच्या बंगल्यापुढे ठिय्या देऊन बसू लागली, घोषणा देऊ लागली. आमचे पैसे परत द्या म्हणू लागले. पोलीस बंदोबस्त वाढला. बबली रडून रडून हैराण झाली. पोलीस तिची कसून चौकशी करत होते. शैवटी बबलीचे भाऊच मदतीला धावून आले. त्यांनी पोलसांशी बोलचाल करून बबली व आपल्या भाच्याची सुटका करून घेतली.


बबलीचे वडील डोक्याला हात लावून बसले होते. जाणारायेणारा त्यांच्या जावयाला शीथू करत होता. गावातल्या कित्येक लोकांना जगनने देशोधडीला लावले होते. बबलीचा सगळा तोरा मिटून गेला होता. मोराच्या पिसाऱ्यासारखा तिच्या गर्वाचा फुलोरा, कोंबडीच्या पिसांएवढाही राहिला नव्हता.


 ती जगनच्या आईवडिलांच्या घरी जाऊन आली पण त्या दोघांनी "जगनच्या नावान आमी आंघोळ केलाव. तुझो नि आमचो काययेक संबंध नाय," असं म्हणत तिच्या तोंडावर दरवाजा आपटला. बबली नाक मुठीत धरून परत माहेरी आली. भावांनी तिला समजावलं,"बबले, झालागेला वाईट सपान होता समज नि इसरून जा. ह्या लेकरासाठी जग आता. तुझ्या वयन्यांसोबत कामाक लाग. दिस बदलाक येळ लागना नाय."


बबलीचा सोन्या तिच्या भावांच्या मुलांत मिसळला. हट्ट करणं सोडून एक भाकर चौघात गोडीने खाऊ लागला. बबली मात्र आईला बोल लावायची,"आये, तुया माजे नको इतके लाड करून ठिवलस. माका बरा काय नि वाईट काय वळखाक दिलस नाय. भाकरी फुलता कधी? चुलीत आग असात, नि तवो तापललो आसलो तरच. तू माका कच्चा खेळणा बनवलस. संस्कारांच्या, येवहाराच्या भट्टीक भाजाक दिलस नाय नि माज्या आयुष्याची गणिता बिघडवलस."


बबलीच्या आवशीबापाशीकडे आता बबलीचे बोल ऐकून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. शिवाय नातू मोठा होईल तशी अनेक बोटं, अनेक नजरा त्याच्यावर फिरणार होत्या.."अरे हो ना त्या जगन्याचो, त्या चोराचो झील," म्हणणार होत्या आणि ते त्या नजरांना त्या बोटांना रोखू शकणार नव्हते.



समाप्त

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट