साखरांबा


 साखरांबा


©®गीता गरुड.


मनुला पुण्यात दिली होती. नवरा मोठ्या कंपनीत कामाला होता. टुबीएचकेचं घर. दोन गोजिरवाणी मुलं, सासूसासरे साऱ्यांचं करण्यात मनु दंग असायची. वर्ष कशी झरझर सरत होती. 


मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की दाजींचा, मनुच्या वडलांचा फोन यायचा."मने, येतहस ना पोरांका घेव्न. तुझी आव्स वाट बघताहा. तुझ्या वाटेकडे आक्शी डोळे लावून असा." आजीआजोबांकडे कोकणात जायचं म्हणून दोन्ही मुलं खूष व्हायची. मनुचा भाऊ आनंदाही आपल्या मुलीला व पत्नीला घेऊन यायचा. मनु दाजींसाठी, आईसाठी कपडे खरेदी करून न्यायची. मनुने आणलेली धोतरजोडी दाजी कौतुकाने नेसायचे. वरती पांढरेशुभ्र सदरे ल्यायचे.


मनु माहेरी गेली की मनाने लहान होऊन जायची. मुलांना, भाचीला आपल्या लहानपणीच्या गोष्टी सांगायची. परसवातल्या साखरांब्याला गळामिठी घालायची. त्याच्या  जीर्ण खोडावर हळूवार हात फिरवायची नि त्याच्या हिरव्याकंच विस्ताराकडे बघत पुटपुटायची,"वाट बघी होतस ना माझी. माकाव तुझी याद येयत होती. तुझ्या मोवराचो परिमळ माझ्या नाकाक तडे पुण्याक घमघमता म्हंजे बघ. तुझ्या अंगाखांद्यावयले बाळकैरे माझ्या नजरेक तडेसून खुनावतत. थय गावतत रे आमे. व्हये तितके गावतत तोतापुरी नि आजून कसलेकसले जातींचे पन तुझ्या आम्यांची चव कशी येयत तेंका." 


मनु मग कैऱ्या काढून घ्यायची नि खळ्यात बसून आडाळ्यावर चिरायची. ताज्या कैऱ्यांच्या फोडींचा गंध, करकरीत आवाज तिच्या मनावर सम्रुद्धीचं, समाधानाचं तेज पेरायचा. दोन महिने मग ताज्या कैऱ्यांच्या फोडी, त्यावर तिखट,मीठ, चवीपुरता गुळ नि वरतून थोडं खोबरेल तेल..याशिवाय पेज नि जेवणं अधुरी असायची.


काही कैऱ्यांची कापं करून मनु वाळवण घालायची. आईसाठी, वहिनीसाठी नि घरी न्यायला असा आमटाणीचा साठा करायची. उन्हात सुकलेल्या त्या आंब्याच्या फोडी मग पावसात जरा पाण्यात भिजत घालून चटणी, सारासाठी वापरता यायच्या.


कैऱ्या पिकल्या की खारींचा, पोपटांची जत्राच भरायची. साखरांब्यावर फांद्यांवरती पाखरांची पंगत नि खाली लहानग्यांची जंत्री लागायची. मनुही त्यांत लहानगी व्हायची. दगड मारून आंबे पाडायची. बाहेरून हिरवाच रंग, देठाला जरा पिवळसर असायचा नि डिंक अगदी देठाला थोडासा पण मिरमिरेपण अजिबात नसायचं. "कोन किती आंबे खाता सरत लावया,"म्हणत बालगोपाळांशी ती आंबे खायची शर्यत लावायची. आंब्याचा केशरी रस चोखत पारावर बसून गप्पा रंगायच्या, बाठी अगदी पांढरीशुभ्र होईस्तोवर ती चोखण्याचं शास्त्र मुलांना सांगायची. केशरी रस अगदी कोपरापर्यंत ओघळायचा. 


"इला माझा चेडू पोराटोरांका घेव्न आंबे खाव्क. वरीसभरान गमताहा माका."साखरांबा मनुवर फांद्यांनी वारा घालत पुटपुटायचा. मनु नि तिची वैनी एके सकाळी मुलांना फर्मान सोडायची,"वाणयाकडे जाऊन किलोभर साखर घेऊन येवा जावा." नि मग साखरांब्याचे आंबे उतरवून मिक्सरवर रस काढून, चवीला साखर घालून तो दाटरस स्टीलच्या ताटांत पसरवला जायचा.

"बाबू माटवार चढ रे बेगिन. येयेक ताटा दितव ती ठीव अगत्तीन."आजी नातवाला हुकुम सोडायची. 


नातूही माकडासारखा खांबावर चढून माटवावर चढायचा नि रांगेत साटांची ताटं मांडायचा. उन्हाने साठं दोनच दिवसांत छान वाळायची. बाबूला मात्र तिन्हीसांजेआधी साठांची ताटं उतरवून देणं, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी दहाएक वाजता वरती ठेवणं अशी कामं लागायची. तोही मनापासून करायचा. 


खाली खळ्यात धुडगूस चालू असायचा. खळ्याच्या या टोकापासनं अगदी तुळसीपर्यंत गोलांट्याउड्या, खांबखांब, विषाम्रुत कितीक खेळ रंगायचे. 

"पेज खाऊक येवा रे पोरांनू. हात धुवून येवा न्हानयेतसून. काजीच्या पानांची खोलपी करून हाडा." असं म्हणत, वाकलेली आजी पेजेचा टोप ओसरीवर आणायची. ताटातनी पेज न्हिवत घालायची. पेजेसोबत वालीची भाजी नि साखरांब्याच्या केशरी, मधुर फोडी.  सगळी पोट भरून पेज जेवायची. 


मागिलदारच्या पाट्यावर ओलंखोबरं, लालसुक्या मिरच्या, हळकुंड, कैरीच्या फोडी, धणे घेऊन मनु चटणी वाटायला बसायची. गंध चटणी वाटायची."मिशर आसा ना गो मने. कित्याक पाट्यार वाटतस?" मनीला कितीही टोकलं तरी मनुच्या हातांची, हातातल्या चुड्याची, वरवंट्याची नि चटणीची एकतानता सांधलेली असायची. "माझ्या दाजींका पाट्यावरचीच चटणी आवाडता म्हनान वाटतय." म्हणायची. 


गाबतीन मनुला हाक मारत यायची,"गे मने, कवा इलस, बारीक झालंस गो. वैनीबाय ताट घेऊन ये. तारले, पेडये, बांगडे आसत. नातवंडांका कपे काढून घाल. हे असले मासे हाडांका चांगले. केल्शिअम क काय म्हनतत ता असता भुतूर नि सारदेखूल भारी होता." 


सार, भात, मासे जेवताना लेकीने पाट्यार वाटलाहा म्हनताना दाजी चार घास अधिकच जेवायचे. माहेरसुख उपभोगून निघताना मनुची पावलं जड व्हायची. आजी मुलांना खाऊसाठी कनवटीच्या नोटी काढून द्यायची. मुलांचे मुके घ्यायची. दाजी डोळ्यातल्या पाण्यांना बांध घालायचा आटोकाट प्रयत्न करायचे.


चार वर्षापुर्वी मात्र दाजी फणस काढताना पडले नि पुरते जायबंदी झाले. त्या दोघांना आनंदा मुंबईला घेऊन गेला. मनु मुलांना घेऊन आनंदाच्या घरी गेली. दाजींना बघून तिला भरून आलं. दाजींना फारच लागलं होतं. जखमा अजून भरल्या नव्हत्या, त्यात रक्तदाबही वाढला होता. 


दाजी नि आईला गावी ठेवणं अशा अवस्थेत जोखमीचं ठरेल म्हणून आनंदाने त्यांना मुंबईला ठेवून घेण्याचा निर्णय घेतला होता. घर तसं लहान होतं पण साऱ्यांनी एडजस्ट करायचं ठरवलं ते दाजी नि आईसाठी.


 मनु आता मुलांना सुट्ट्या लागल्या की चार दिवसाकरता का होईना भावाकडे येऊन राहू लागली. दाजी बरे झाले तसे जावयबापूंनीही दाजी व आईला पुण्याला रहायला न्हेलं पण जावयाकडे मन रमेना. पाहुण्याच्या घरी जास्ती थांबता नये असं दाजींचं मत. आठवडाभरातच पुन्हा मुलाकडे गेले मग आईची तब्येत डोकं वर काढू लागली. तिचा संधिवात, नि त्यासंलग्न दुखणी. या साऱ्यात गावचं घर मात्र दाजी नि आईच्या वावराला मुकलं. उन्हाळ्यातल्या वाळवणांना, मुलांच्या धुडगुसीला मुकलं. गेल्या पावसाळ्यात तर घराच्या मागच्या भिंतीला तडा गेला. हे कळताच आनंदाइतकंच मनुचं मनही गहिवरून आलं.


दाजी होते त्या अवस्थेत घराकडे जायला निघाले होते. आनंदाने त्यांना कसंबसं थोपवून धरलं. पावसाळा ओसरल्यावर घर बांधायचं ठरलं. दाजींची थोडी आर्थिक पुंजी व आनंदाची बचत वापरून टप्प्याटप्प्याने घराचं काम सुरू झालं. मध्यंतरी एका विकासकाने साखरआंब्याच्या जागेवरची जमीन विकत घेण्याची इच्छा दर्शवली. आईने ही गोष्ट मनुला सांगितली. आई म्हणाली,"आंदा, घरासाठी येवढो पैसो खर्च करताहा. साखरांब्याची जिमीन इकल्यार तेचे डोसक्यावरचोव भार वायच कमी जायत. आंबोव आता जुनो झालो हा. फुढच्या वादळात आपुनच मोडून जायत. जिमिन इकल्यार बरा होयत."


 मनु आईचं म्हणणं ऐकत होती खरं पण तिच्या डोळ्यासमोर सळसळत्या पानांनी तिला वारा घालणारा तिचा साखरांबा होता. साखरांबा आता म्हातारा होतोय म्हणून तो तोडला तरी चालेल? या साखरांब्याने किती माया केलीय माझ्यावर, माझ्या मुलाबाळांवर. माझं माहेरचं जवळचं माणूसच आहे तो." मनु स्वत:शीच बोलत होती. तिच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. 


”पुन्हा गावाकडे गेलं की तिथे साखरांबा नसेल, त्याजागी एखादी इमारत उभी रहात असेल.."मनुचं हे बोलणं मनुच्या अहोंनी ऐकलं. त्यांनी आनंदाला मनुला किती त्रास होतोय ते सांगितलं.


"काय करू भाओजी. दहा ठिकाणांनी खर्च उभे राहिलेत. बघताय ना. दाजींचं आजारपण, त्यानंतर आईचं आजारपण, घराच्या भिंतीला पडलेली भेग, हे सगळं सावरतोय तर लेकीच्या उच्चशिक्षणाचा खर्च समोर उभा."


"एवढंच ना. पाहुणे अडीअडचणीला उपयोगी पडले नाहीत तर काय कामाचे? मी पाठवतोय पैसे. तुला जमतील तेंव्हा सावकाशीने दे. साखरांब्याची जमीन नको विकूस."


"भाओजी पण."


"पण नाही नि बीण नाही. आपल्या घरातलं माणूस निरुपयोगी झालं म्हणून वाळीत टाकतो का आपण तशीच आपली वाडवडिलार्जित जमीन व त्यावरची झाडं आपण सांभाळायची असतात. आम्हाला गावच नाही रे. तुम्हाला आहे, ते सांभाळा."


घर बांधून होऊ लागलं तशी दाजींची तब्येतही आपसूक सुधारू लागली. आईही संधिवाताचं दुखणं विसरली. नवीन घराचा ग्रुहप्रवेश थाटामाटात केला. माहेरवाशिणीला आठेक दिवस आधीच बोलावलं होतं. मुलानातवंडांनी घर भरलं. पोत्यांतली भांडी घासून लख्ख करून मांडलीवर सजली. दाराला आंब्याच्या पानांची तोरणं लागली. मनु नवऱ्याला, मुलांना घेऊन आली होती. आनंदा कोणताही निर्णय घेताना तिचा व भाओजींचा सल्ला विचारात घेत होता. दाजी नि आईला सोबत करण्यासाठी गावातलीच एक मुलगी ठेवली होती. 


मनु साखरांब्याच्या पारावर जाऊन दुपारची बसत होती. साखरांबा आपल्या फांद्यांची पानं सळसळून तिच्याशी गुजगोष्टी करत होता.

 "येयत रव्ह मने माझ्यासाठी, मिया तुझी वाट बघित आसतय. बघिनसाऱ्या वाटता गो तुका.."असं जणू तिला सांगत असायचा. त्या साऱ्यांचा निरोप घेताना पुन्हा मनुचं मन हळवं नि पावलं जड व्हायची.


समाप्त

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट