ज्याचं त्याचं विश्व

 


शाळेत आज प्रज्ञाचा वाढदिवस होता. प्रज्ञा, नगरसेवकाची  मुलगी. पांढराशुभ्र फ्रीलवाला फ्रॉक गोऱ्यापान प्रज्ञाला शोभून दिसत होता. प्रज्ञा बसमधे चढली तेंव्हा सर्व बच्चेकंपनीचं लक्ष तिच्या ब्यागकडं जातं. एवढी बंगल्यात रहाणारी सोनपरीसारखी दिसणारी टपोऱ्या डोळ्यांची प्रज्ञा नक्की कोणतं चॉकलेट वाटेल, चॉकलेटसोबत पेन्सिल का सुगंधी खोडरबर का मग रंगीत शार्पनर. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर कुतुहल.

प्रज्ञा तिच्या सीटवर बसली. बसमधेही तिला नेहमी साहेबांची मुलगी म्हणून रॉयल ट्रिटमेंट, पुढची सीट ठरलेली. मुलंही त्याबद्दल तक्रार करत नसत. कदाचित लहानपणापासूनच मोठ्या हुद्देवाल्यांनी,त्यांच्या मुलांनी पुढे बसायचं असतं हे बीज मुलांत रोवलं गेलंय म्हणून असेल. कितीही गर्दी गाडीत असली तरी प्रज्ञाच्या सीटला धक्का नसे.

प्रज्ञाने सीटवर दप्तर ठेवलं. तिचं दप्तरही तिच्यासारखंच गोडगुलाबी बार्बीचं..इम्पोरटेड..तिच्या मामानं आणलेलं म्हणे. प्रज्ञाचा मामा लंडनला रहायचा.  तिथनं तो प्रज्ञासाठी पुस्तकं,ब्याग,स्टेशनरी,चॉकलेट्स पाठवत असे.

निरज यशला म्हणाला,"ए काय आणलं असेल रे वाटायला तिने?"

"इम्पोरटेड चॉकलेट?";यश उत्तरला तेंव्हा त्याच्या गालात हसू नि ओठांतून हलकीशी लाळ ओघळली.

बाजुला बसलेली श्रावणी म्हणाली,"वाट बघा. माझी आई म्हणते, गरीब लोकांचाच हात वर असतो. ही श्रीमंत लोकं पक्की कंजूष असतात."

निरजने देवाला मनातल्या मनात प्रार्थना केली..'देवबाप्पा, प्रज्ञाने इम्पोरटेड चॉकलेट वाटायला आणलं असुदे..आणि..आणि शार्पनर लाल रंगाचे वरतून बॉलसारखे दिसणारे. सारखं डस्टबीनजवळ जायची गरज नाही. पेन्सिलीचा टोक काढल्यानंतरचा फुलोरा त्यातच राहील."

प्रज्ञाने दप्तरातून पिशवी काढली तेंव्हा निरजने गच्च डोळे मिटून घेतले नि मनातल्या मनात त्याला हव्या असलेल्या वस्तू डोळ्यासमोर आणल्या. ते सोनेरी कव्हरमधलं प्रज्ञा खाते तसलंवालं इम्पोरटेड चॉकलेट आणि तो लालबुंद शार्पनर.. गिरमिट. त्याने ठरवलं..घरी गेल्यावरच चॉकलेट खायचं, बबडीला देऊन. बबडी निरजची लहान बहीण दोन वर्षाची. सकाळी त्याने बबडीला मारलेलं कारण बबडीने त्याच्या बालभारतीच्या पुस्तकाचं पान फाडलेलं. तरी बाबा त्याच्यावरच रागे भरलेले. लहानै ना ती म्हणालेले..पण  निरजचा बबडीवरचा राग गेल्याने  त्याला बबडीसोबत ते चॉकलेट वाटून खायचं होतं.

"ए निरज गायतोंडे, अरे लक्ष कुठाय तुझं." प्रज्ञाने तिच्या नाजूक बोटांनी त्याला हलवलं. निरजने डोळे उघडले. समोर हसऱ्या डोळ्यांची गुलाबी ओठांची प्रज्ञा. तिच्या हातात खरंच सोनेरी कव्हरवालं इम्पोरटेड चॉकलेट.

"यस! इम्पोरटेड चॉकलेट.." निरज दोन्ही हात वर करुन ओरडला. प्रज्ञा खुदकत हसली मग त्याने जीभ चावत हात पुढे करुन तिला वाढदिवसाची शुभेच्छा दिली.

प्रज्ञाने त्याला चॉकलेट आणि अजून एका पिशवीतली रंगीत गुलाबी फुलांची पेन्सिल दिली. तिच्यामागे सोनेरी पत्र्याची गुंडाळी..त्यात गुलाबी रबर बसवलेला होता. निरज तिला थँक्यू म्हणाला. ती पुढे गेली.
श्रावणी म्हणाली,"तशी स्वभावाने चांगली आहे प्रज्ञा."

निरज व यश तोंडावर हात ठेवून हसले. थोड्याच वेळात स्टॉप आला. यशने चॉकलेट खायला सुरुवात केली. निरज म्हणाला,"ठेवायचं होतंस ना?"

यश म्हणाला,"कुणासाठी..दादासाठी..हँ. तो कुठे देतो मला चॉकलेट. त्याचं तो खातो. माझं मी."

यशचा दादा आठवीत होता. तो स्कुलबसमधून यायचा बंद झाला होता. तो बीएसटीच्या बसने यायचा. यशला तो अभ्यास शिकवताना धपाटे घालायचा म्हणून यशला त्याचा जाम राग येत असे.

यशची आई बँकेत होती म्हणून मग यशचा दादा त्याचा अभ्यास घ्यायचा पण यशला मनापासून वाटत असे की निरजच्या आईसारखं आपल्या आईनेही घरी रहावं म्हणजे त्याला दादाच्या जाचापासून सुटका मिळेल.

यश,निरज बसमधून उतरले. वर्गात गेले. प्रार्थना सुरु झाली..वंदे मातरम वंदे मातरम..प्रार्थनेच्या वेळी कोणी खुडबुड केलेली बेंद्रेबाईंना आवडत नसे. पट्टीचा मार मिळे म्हणून सगळा वर्ग शांत.

निरजने हळूच डोळे किलकिले करुन वर्गावर नजर फिरवली. बेंद्रेबाई चष्म्यातून मोठाले डोळे करुन निरजकडे बघत होत्या. निरजचं बाईंकडे लक्ष जाताच त्याने डोळे गच्च मिटून घेतले.

गणिताची तासिका सुरु झाली. बेंद्रेबाईंनी भागाकाराचं गणित मांडलं नि निरजला फळ्याजवळ बोलावलं. निरजने अगदी नीटनेटकं गणित सोडवलं. बेंद्रे बाईंनी खूष होऊन त्याला गुलाबी खडू दिला. सगळ्या मुलांचे डोळे त्या गुलाबी खडूकडे वळले. निरजने तो खडू  दप्तराच्या खिशात अलगद ठेवला.

बाईंनी यशलाही बोलावलं.  यश फळ्याजवळ गेला पण मग त्याला काल दादाने गणित चुकलं म्हणून घातलेला धपाटा आठवला न् त्याचा हात थरथरु लागला. त्याला चौदा पाचे सत्तर आठवेना. त्याने पासस्ट लिहिलं. त्याचा प्रचंड गोंधळ उडाला. वर्गातली मुलंमुली फिदीफिदी हसू लागली.

बाईंनी यशच्या बोटांवर पट्टी मारली. त्याने हात मागे घेतला म्हणून परत जोराने मारली. यश कळवळला. निरजची बोटं चुरचुरली. निरजला वाटलं, आज तो पहिल्या बेंचवर असता तर हळूच त्याने चौदा पंचे सत्तर सांगितलं आसतं यशला. यशचे डोळे पाण्याने भरले पण बेंद्रेबाईंना कणव आली नाही. जा जाऊन जागेवर बस जा..त्या ओरडल्या.

निरजला बेंद्रे बाईंचा राग आला. यश येऊन जागेवर बसला. तो रडत होता म्हणून निरजने त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला, तितक्यात बेल वाजली.

इतिहासाचे भोसले सर वर्गावर आले. बाजीप्रभूने लढवलेली पावनखिंड सरांनीमुलांसमोर जीवंत उभी केली.

यशच्या डोळ्यासमोर प्राणपणाने लढणारा बाजीप्रभू आला..शिवाजी महाराज आले. तो गणिताच्या तासाला बसलेला मार विसरला. भोसले सरांनी मुलांचा ग्रुहपाठ तपासला. यशच्या मुद्देसूद उत्तरांचा व नीटनेटकेपणाचं कौतुक केलं पण ते खडू देत नसत. खडू तर फक्त बेंद्रे बाई द्यायच्या..गणित बरोबर आलं की.

शारीरिक शिक्षणाच्या तासिकेला काळे सर मुलांना खाली घेऊन गेले. बाहेर पाऊस होता म्हणून बेसमेंटमधे कवायत करून घेतली. मामाचं पत्र हरवलं खेळायला सांगितलं मुलं मोठा गोल करुन बसली. एकीचा रुमाल घेऊन खेळ सुरु झाला. मामाचं पत्र हरवलं..ते मला सापडलं..चालू होतं. यशचं लक्ष बेसमेंट बाजूच्या कँटीनमध्ये  होतं. तिथून गरमागरम वड्यांचा सुवास येत होता.

यशला आई खाऊला पैसे देत नसे पण त्याच्या दादाला पैसे मिळायचे. बसने जायचा ना तो. कधीकधी आईला सांगायचा, "आज जेवण नको. मित्राचा वाढदिवस होता. त्याने वडापावची पार्टी दिली. चार वडापाव हाणले."

यशच्या इतर मित्रांकडेही खाऊला पैसे नसायचे. बर्थडे म्हणजे चॉकलेट,रबर वाटणं. घरी केक कापणं..बास. यश ने ठरवलं की आईला सांगायचं..नव्हे हट्टच धरायचा वडे कर म्हणून. यशला टॉन्सिल्सचा त्रास असल्याने घरी तळण कमीच व्हायचं. रात्री न चुकता सितोफलादी चुर्ण घातलेलं मधाचं चाटण त्याला खावं लागे. त्याला ते मुळीच आवडत नसे पण मग घसा धरायचा म्हणून खावं लागे. त्याचा दादा शॉवर घ्यायचा पण यशला थंड पाण्याने न्हाणं, थंड पाणी पिणं सगळंच व्यर्ज होतं. यशच्या समोर पिंजऱ्यातला पोपट आला..जो तो होता आणि पिंजऱ्याबाहेरचा जो त्याचा दादा.

खेळ संपला तशी सगळी वर्गात आली. मराठीच्या चितळे बाई आल्या नव्हत्या. सगळ्यांनी एकच कल्ला केला. मॉनिटर दिप्ती व प्रकाशने डस्टर आपटून आपटून,ओरडून ओरडून सगळ्यांना गप्प करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. प्रतिक्षा वेलणकरचं नाव लिहिताच प्रतिक्षा वेलणकर दिप्तीशी भांडायला लागली. तू मुद्दाम माझं नाव लिहितेस. तुझ्या मैत्रिणीही बोलतात पण त्यांची नाही नावं लिहित. पार्सिलिटी करतेस म्हणू लागली. दिप्तीने तिचं मुळीच ऐकलं नाही. शेवटी प्रकाशने एक तोडगा काढला. नागेश साठमला मिमिक्री करायला सांगितली.

नागेश साठम पडत्या फळाची आज्ञा मानून स्टेजवर आला. त्याने  मराठी हिंदी नट,नट्या तसेच शाळेतल्या बाईंच्या नकला करुन दाखवल्या. अगदी डावा डोळा सारखा लवणाऱ्या जामसंडेकर बाईंचीही. सगळा वर्ग खो खो हसू लागला. प्रकाशने मुलांना हात वरती करुन टाळ्या वाजवायला सांगितलं. मुख्याध्यापक चंदने फेरी मारत होते. त्यांनी नागेश साठमच्या नकला पाहिल्या. आत येत त्यांनी नागेशची पाठ थोपटली. नागेश, नकला करच पण त्याचबरोबर स्वत:चं असं काही तरी वेगळंही कर.  नागेश, "हो सर" म्हणाला. सरांनी फळ्यावरची नावं पाहिली. त्या मुलांना उभं केलं व दोन पानं शुद्धलेखन लिहायला सांगितलं. प्रतिक्षा वेलणकर व तिच्या मैत्रिणींनी दिप्तीकडे बघत नाक मुरडलं तसं दिप्तीने तिचे खांदे उडवले.

"काय समजते ही दिप्ती खानोलकर स्वतःला. मॉनिटरच तर झालेय. रुबाब दाखवते इन्स्पेक्टर असल्याचा." प्रतिक्षा वेलणकर धुसफुसली.

"अगं जाऊदेत. नव्याचे नऊ दिवस. उद्या कोकलून कोकलून घसा दुखला की समजेल तिला मॉनिटरपद काय असतं ते." वीणा जामखेडे म्हणाली.

"हो अगं, तू मॉनिटर असताना कुठे एवढी नावं लिहायचीस. निदान दोनतरी चान्स देत होतीस..मग वॉर्निंग..नाहीच ऐकलो तर नाव पण तेही बहुदा बाई यायच्या आत पुसलेलं असायचं." वेलणकर म्हणाली.

रिया खडकबाण, वीणा जामखेडेच्या डब्यातला बेसनचा पोळा घेत म्हणाली,"बेंद्रे बाईंची चमची आहे नं ती. चालायचच. बेंद्रे बाईंना अनंताची फुलं आवडतात आणि वीणाच्या दारात अनंताचं मोठ्ठं झाड आहे. वीणा त्यांना फुलं नेऊन देते सकाळीच सकाळी स्टाफरुममधे. मी बऱ्याचदा पाहिलय."

"बाकी मैत्रिणींशी बोलावसं वाटत नाही तिला. एकलकोंडी कुठची." प्रतिक्षा डबा आत ठेवत म्हणाली. सगळे एकीला पळाले. तिथेही रांग..हात पाठी. निरज सहसा एकीला जायचाच नाही. त्याला तिथल्या त्या वासाचा जाम वीट यायचा. आपल्याला उलटी होतेय की काय असं वाटायचं त्याला, वॉशरुमच्या बाजूला हात धुवायला गेला तरी.

यशचा दादा सुरज आठवीत असल्याने त्यांचे वर्ग दुसऱ्या मजल्यावर होते. बाथरुममधे मुलं पेनाने काहीबाही गिरपटून ठेवू लागली होती. सुरज धार मारताना नेहमी ते वाचायचा. बदामाचं चिन्ह..त्यातला बाण आणि कुणा मुलामुलींची नावं. ही कामं सहसा नववीदहावीतल्या मुलांची असायची. सुरजलाही आताआता वर्गातल्या मुलींबद्दल आकर्षण क काय वाटू लागलं होतं पण तरीही नेमकी कुठची मुलगी आपल्याला जास्त आवडते हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं.

शाळा सुटली तशी यश व निरज गाडीत येऊन बसले. निरजने यशला त्याचा गुलाबी खडू दिला. यश खूष झाला.  त्यानेही निरजला खिशातल्या दोन खारका दिल्या. बसकाका खिडकीतून बाहेर तोंड काढू नका सांगत होते.

निरज घरी आला तर आईने बनवलेल्या खमंग थालीपीठाने त्याची भूक चाळवली. नीरजने हातपाय धुतले नि थालीपिठ न् लोण्याचा गोळा घेऊन खायला बसला तशी त्याची धाकटी बहीण बबडी दद्दा दद्दा करत जवळ आली. निरजने तिच्या ओठांना लोणी लावलं तसं ती जीभेने मिटक्या मारु लागली.  निरजने मग चॉकलेट काढलं नि बबडीला तोडून दिलं. आईला थोडं दिलं. उरलेलं बराच वेळ थोडं थोडं खात बसला. इम्पोरटेड होतं ते. सारखंसारखं थोडीच मिळणार होतं!

यश घरी आला. त्यालाही भूक लागलेली. त्याने डबे उघडले. एका डब्यात वेफर्स ठेवलेले. ते घेऊन तो खात बसला. मग थोड्या वेळाने मित्रांच्या हाका ऐकून तो खाली उतरला व मैदानावर खेळण्यासाठी गेला. तिथे त्यांची आणि मुलींच्या चमूची थोडी बाचाबाची झाली. रोजचंच होतं ते. यश नि त्याच्या मित्रांना क्रिकेट खेळायचं असायचं नि मुलींना डब्बा ऐसपेस,रशीउडी,खोखो..शेवटी मेजॉरिटीच्या मतांनुसार मुलींच्या म्हणण्यानुसार खेळ सुरु झाला.  बऱ्याच उशिराने सुरज आला तसा यश त्याच्या पाठोपाठ घरी गेला.

 काही वेळातच त्यांचे आईबाबा आले. आई आज हेअरकट करुन आली होती. आईचा कुरळ्या केसांचा पोनी यशला फार आवडायचा. आईचे मानेवर रेंगाळणारे केस त्याला मुळीच आवडले नाहीत. आईने आरशात पाहिलं. बाबांनीही बोटांचा मोर नाचवत तिच्या लुकला पसंती दिली. सुरजला आईने यशचा अभ्यास घ्यायला सांगितलं न् ती स्वैंपाकाला लागली.

सुरज गणितात अगदी  हुशार होता पण शिकवण्याची कला त्याला अवगत नव्हती. तो हातात फुटपट्टी घेऊन बसायचा न् यशचं गणित चुकलं की त्याच्या उघड्या मांडीवर मारायचा. बाबा बाहेरच्या खोलीत बातम्या बघत बसायचे. आई तेवढी सुरजला समजावणीच्या सुरात सांगायची,"दमाने घे रे दादा. लहान भाऊ आहे ना तुझा."

"दगड आहे नुसता दगड." सुरज यशचं पुस्तक बाजुला टाकत म्हणाला. यशने मग गाइडात बघून गणितं उतरवली. डोळे पुसले नि कविता म्हणू लागला. धडे,कविता..यशला फार आवडायच्या.

सुरजने त्याचा अभ्यास पुर्ण केला न् गोष्टीचं पुस्तक वाचत बसला. यशला जाणून घ्यायचं होतं..त्या पुस्तकात कोणाची गोष्ट होती ते पण सुरज अंगावर येईल म्हणून तो गप्पच राहिला. त्याला आठवली..प्रज्ञाने दिलेली पेन्सिल. ती त्याने दप्तरातनं बाहेर काढली व तिला छान टोक काढलं.

चौघं मिळून जेवली. यशने आईला बटाटेवडे हवेत म्हणून आग्रह केला. आई म्हणाली,"सुट्टीच्या दिवशी करते." यशला आईने आपलं ऐकलं याचंच खूप बरं वाटलं.

-------

शाळेत मैदानात मुली हाफ पँटीवर व्यायाम करत होत्या. कब्बडीचा सराव चालायचा त्यांचा. सुरजच्या वर्गातली काही पोरं गटाने पँसेजमधना त्या मुलींकडे टक लावून बघत असत. सुरजही त्यांच्यात सामील झाला. मुलींना तसं बघणं त्याला आवडू लागलं. ते बरोबर की चूक त्याला ठाऊक नव्हतं पण त्यांच्या घोटीव मांड्या पहाव्याशा वाटायच्या त्याला. रात्री मग तेच स्वप्नात येत रहायचं. आताशा काही मुलांना मिसरूड फुटू लागलं होतं. आवाज बदलू लागला होता. सुरजही ओठांवरनं बोट फिरवायचा..मिसरुड येतय का पहायला.

यश अंघोळ झाली की उघड्या अंगाने घरभर नाचायचा सुरज मात्र टॉवेल गुंडाळून बाहेर येऊ लागला होता. गालावर येणाऱ्या पुळ्यांना आईची फेअर अँड लव्हली लावू लागला.

------

शाळेत भाषणाची स्पर्धा होती. नीरज व यशनेही भाग घेतला होता. नीरजला स्टेजवर गेल्यावर काहीच आठवेना. माइक हातात घेऊन तो नुसताच उभा होता. यशने मात्र संभाजीराजेंवर भाषण करुन उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. भाषणात यशचा प्रथम क्रमांक आला. यशला कधी एकदा घरी सांगतोय असं झालं होतं. घरी जाताच त्याने आजुबाजूच्या मित्रांना आणि मग आई आल्यावर आईला ही खुषखबर सांगितली. आईही खूष झाली. तिने खरंच बटाटेवडे केले. सोबत लसूणचटणी व मिरच्याही तळल्या.

सूरजने एकदोनच बटाटेवडे खाल्ले. त्याच्या गालांवर पुरळ येत होता म्हणून तेलकट कमी खायचं ठरवलं त्याने.
सुरजला आता संस्कृत हा विषय होता. गावडे बाई संस्कृत शिकवायच्या पण त्यांचा आवाज फक्त पहिल्या बाकावरच्या मुलांना ऐकू यायचा कारण त्यांचा आवाज बारा महिने घसा बसल्यासारखा. सुरजला हिंदी घेतलं असतं तर बरं झालं असतं असं वाटू लागलं.

संस्कृततसाठी क्लास शोधायचा त्याने ठरवलं. एकदोघांकडे त्याने चौकशी केली आणि नाक्याजवळच्या केणी बाईंकडे तो क्लासला जाऊही लागला. नेहमीच्या युनिफॉर्ममधे शाळेत येणारी मालविका जठार तिथे सैलसर वेणी घालून वेणीत गावठी गुलाबाचं फुल माळून यायची. कधी पंजाबी ड्रेस तर कधी स्कर्टटॉप घालून यायची. मुलंमुली शाळेत एकमेकांशी बोलायची नाहीत पण क्लासमधे बोलायची. कदाचित असं बोलण्यासाठीच ती क्लासला जायची. सुरजची मात्र कोणत्या मुलीशी बोलण्याची हिंमत नव्हती. त्याला बहीण नसल्यामुळे मुलींशी बोलताना तो जाम लाजायचा. आजुबाजूचे मित्र इतके सहज मुलींशी जोक कसे शेअर करु शकतात याचं त्याला कौतुक वाटायचं.
माला माले माला: प्रथमा
मालम् माले मालान् द्वितीया
म्हणताना त्याला त्या ओळींत मालविकाच दिसायची.

नीरजची छोटी बबडी आता घरभर हिंडू लागली होती. निरजच्या बसस्टॉपवर तर ड्रायव्हरकाकाही तिला उचलून घ्यायचे. बसमधली सगळी मुलंमुली तिला हाक मारायचे. मुली तर पप्पी घ्यायला बघायच्या. बबडी त्यांना दोन्ही हातांनी फ्लाइंग किस(उडती पप्पी)द्यायची.

-----

परीक्षेत यशला गणितं येत नव्हती पण त्याने सहकाराचं तत्व अवलंबलं. यशच्या आजुबाजूच्या मित्रांनी त्याला गणितं दाखवली जी त्याने भरभर कॉपी केली. नीरजला यशचं वागणं बिलकुल आवडलं नाही. काही दिवसांत पेपर मिळाले. त्यात गणितात यशला पन्नासापैकी चाळीस मिळाले. हाययेस्टला बेचाळीस होते.

यशने निरजला पेपर दाखवला. निरज म्हणाला,"खरं खरं सांग. हे तुझे स्वत:चे मार्कस आहेत का? किंवा तू स्वतःला विचार." यशचा चेहरा पडला. निरज त्याला म्हणाला, "तू कॉपी करणार असशील तर तुझी माझी दोस्ती खतम."

यशने निरजला प्रॉमिस दिलं की तो परत कॉपी करणार नाही. यावेळी त्याला गणितात नेहमीपेक्षा खरंच छान मार्क्स पडले होते. आईनेही त्याचं कौतुक केलं पण त्याच्या डोळ्यासमोर निरजचा चेहरा यायचा आणि हे मार्क्स आपल्या बुद्धीने मिळवलेले नाहीत याची रुखरुख त्याला लागायची.

यशचा दादा सुरज क्लासला जायचा त्या केणी बाईंच्या मुलीकडे म्हणजेच अर्चना ताईकडे आई यशला गणिताच्या क्लाससाठी पाठवू लागली. सुरज व यश एकत्रच केणीबाईंकडे पोहोचायचे. अर्चनाताई टेरेसमधे क्लास घ्यायची. क्लासमधे दहाएकच मुलं होती. अर्चनाताई मुलांना गणितं शिकवून झाली की रोज एक गोष्ट सांगायची, शिवाय गणितही प्रत्येकाला समजेपर्यंत शिकवत रहात्रची. सरावासाठी बरीच गणितं सोडवून घ्यायची. याचा चांगला तो परिणाम यशवर झाला. त्याला गणितं सोडवायला मजा वाटू लागली. नऊमाईत यश गणितात थर्ड हाययेस्ट आला तेंव्हा तो खूप खूश झाला. ते मार्क्स त्याने स्वतः अभ्यास करुन जिद्दीने मिळवले होते.

सुरज मात्र क्लासला जाऊनही न गेल्यासारखाच होता. त्याचं अर्ध लक्ष मालविकेतच गुंतलं होतं. मालविकाच्या आजुबाजूच्या मुलींनाही आताशा सूरजबद्दल संशय येऊ लागला होता. असाच एकदा वर्गात तो मालविकेकडे टक लावून बघत असताना धाडदिशी त्याच्या कानाखाली बसली. तो गांगरला. सरांनी विचारलं,"काय शिकवत होतो मी?" सुरजला धड सांगता येईना.
"कुठे तंद्री लावून बसतोस आजकाल? उद्या शाळा भरायच्या आधी पालकांना घेऊन ये."
सुरज रडायला लागला. "चुकलो..चुकलो सर..परत असं करणार नाही." सर कुठले ऐकायला.

संध्याकाळी जेवणं झाल्यावर आई अंथरुणं घालत होती.

"आई, उद्या तुम्हा दोघांना शाळेत बोलावलाय."सुरज खाली मान घालून बोलला.

"का रे? या यशने काही खोडी काढली की काय? यश कितींदा सांगायचं तुला वर्गात मस्ती करायची नाही म्हणून. दादाची बघ एकही तक्रार नसते." आता मात्र सुरजच्या डोळ्यांतून पाणी थांबेना. यश तर दादाला प्रथमच रडताना पहात होता. आपला दादा एक अत्यंत हुशार, शिस्तप्रिय विद्यार्थी आहे एवढंच त्याला ठाऊक होतं. उलट यश कधी रडला तर सुरज त्याला मुलींसारखा काय रडतो म्हणायचा आणि आता दादाच..

सुरज अंथरुणावर पालथा झोपला. सगळी निजानीज झाली तसे आईला त्याचे दबलेल्या आवाजातले हुंदके ऐकू आले. आई त्याच्या उशाला बसली.
"काय झालंय ते सांग बघू. असा कुढत राहू नकोस." आई सुरजच्या केसांत बोटं फिरवत म्हणाली. बाबाही त्याच्या जवळ येऊन बसले. यश जागाच होता. डोक्यावर पांघरुण घेऊन दादा काय म्हणतोय ते गुपचूप ऐकत होता.

"आईबाबा मी मालविका शिंदेकडे पहात होतो म्हणून सरांनी.."

"अरे पण का बघत होतास तिच्याकडे? मुल़ीकडे असं बघत रहाणं टपोरी पोरांचं काम. दोन वेळा शिष्यवृत्ती मिळवलीस. तुझ्यासोबत शाळेत आमचाही सन्मान होतो आणि आता मोठा होतोयस तसे आमच्या अब्रुचे धिंदवडे काढायचे ठरवलैस की काय!" बोलताना बाबा अक्षरश: थरथरत होते.

एकंदरीत दादाने काहीतरी चुकीचं केलंय न् घरातलं वातावरण भलतच तापलय हे यशच्या लक्षात आलं. त्याला तर जोराची  एकीला लागलेली पण या अशा वातावरणात उठलो तर दादा सुटेल न् त्याच्या वाट्याचे धपाटे आपल्या पाठीवर पडतील या विचाराने तो डोळे मिटून राहिला.

आई, बाबांना समजावत होती..दादाची बाजू घेत होती,"अहो, नुकताच वयात येतोय सुरज. होतं असं या वयात. आपण आपल्या लेकराला समजावून नाही घेणार तर कोण घेणार बरं."

"हे त्या मालविकेच्या वडलांना नि शाळेतल्या सरांना समजावून सांग उद्या. आणि अशीच पाठीशी घाल मुलाला. मी वैरी ना त्याचा म्हणून कळकळीने ओरडतोय त्याला." आई मग शांतच राहिली..सुरजचं डोकं थोपटत. आईच्या स्पर्शातून सुरजला जाणवत होतं..आपण चुकलो तरी आपल्याला सावरायला आई आहे आणि कितीही त्रागा केला तरी बाबा उद्या शाळेत येणार."

आपल्या मनावरचं ओझं आईकडे सोपवून सुरज शांत झोपला.

सकाळी सुरजसोबत त्याचे आईबाबा शाळेच्या शिक्षककक्षात गेले. सर रजिस्टर घेऊन बसले होते.
सरांनी तिघांनाही बसा असं खुणावलं.
कोणीच काही बोलत नव्हतं. सुरज मान खाली घालून बसला होता.
"सुरज काल मी रागावलो तुझ्यावर ते तुझ्यावरच्या आस्थेपोटी. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून या शाळेत येतोयस. वक्तृत्व,खेळ ,शिष्यवृत्ती..सगळ्यात बक्षीसं मिळवली आहेस पण म्हणून काल जसं त्या मुलीकडे..असो..असं पुन्हा होता कामा नये. आकरँषण वाटणं स्वाभाविक आहे. कधीतरी मुलींकडे बघणं हेही तुझ्या वयात नैसर्गिक आहे पण गेले तीनचार दिवस पहातोय मी. तू तासिकाभर डोळ्याचं पातं न लवता तिच्याकडे."

"सर..सर चुकलो मी. परत नाही असं होणार."

"पाय धर सरांचे." सुरजचे बाबा कडाडले.

सुरज सरांचे पाय धरण्यासाठी वाकला तसं सरांनी त्याला जवळ घेतलं. "सुरज तुझ्या मित्रांना जर कळलं ना तर तुझ्या नावासोबत तिचं नाव जोडून टॉयलेटच्या भिंती बदामांनी भरतील. आवडेल तुला असं?"

सुरजने नकारार्थी मान हलवली.

सुरजचे आईबाबा त्याला सोडून आपापल्या ऑफीसला निघून गेले. सुरजही आता सतत मालविकेकडे बघणं टाळू लागला तरी कधी वाटलंच,रहावलं नाही की हळूच एखादा द्रुष्टीक्षेप टाकायचा. हे सुरजचं एकतर्फी प्रेम मालविकेच्या गावीही नव्हतं.

--------------

शाळेला सुट्टी पडली तशी यश आजीकडे जाण्यासाठी हट्ट करु लागला मग आईने त्याला गावी न्हेऊन सोडलं. गावी त्याच्या आजीच्या घराजवळच नदी असल्याने मामाची मुलं,तो व सुरज  सगळे नदीवर आंघोळीला जायचे. मामी चुलीवर गरगरीत भाकऱ्या थापून ठेवायची. गरमागरम म्हशीचं दूध आणि भाकरी न्याहारीचा बेत असायचा.

मामा कधी त्यांना सिनेमा बघायला न्यायचा तर कधी दूर डोंगरावर भटकंतीला न्यायचा. तरी सुरज मात्र कुठेतरी हरवलेला असायचा. तिथे त्याला मालविका आठवायची. मामाची गायत्रीही आता मोठी झाली होती. आठवीत होती ती. गायत्रीच्या जागी सुरजला मालविका दिसायची. गायत्री नेहमीप्रमाणे सुरज दादाशी बोलायला बघायची पण तो मुद्दामहून टाळायचा तिला. करवंदाच्या झाळीतनं काळीभोर करवंद तोडून देत नव्हता ना करवंद दाताने चावून कोंबडा का कोंबडी हे बघण्यात त्याला इंटरेस्ट होता.

यश मात्र तासनतास नदीच्या पाण्यात डुंबायचा. रात्री आजोबांसोबत मासे पकडायला जायचा. आजोबा जाळं शिवायला बसले की ते बघत बसायचा. तिथे मामाच्या खोलीत खूप सारे चांदोबा होते. यश ते अधाशासारखे वाचून काढायचा. रात्री त्याच्या स्वप्नात वेताळ यायचा. मग तो आजीला घट्ट मिठी मारायचा. आजीने वेताळाला पाहिलं तर आजी त्याला केरसुणीने बदडून काढेल. वेताळ कधी आपल्या वाटेला येणार नाही याची यशला खात्री होती.

सुट्टी संपायच्या आधी दहा दिवस यशची आई त्या दोघांना न्यायला आली. तिथे आई काहीच काम करत नव्हती. अगदी लहान मुलींसारखी हुंदडत असायची. फुलं काढून गजरा ओवायची. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनशैलीचं वर्णन तिथल्या काकवांना सांगायची. त्याही पदर तोंडावर धरुन ऐकत बसायच्या. आजुबाजूला सगळेच नातलग होते. प्रत्येकाच्या घरातनं माहेरवाशिणीला जेवणाचं बोलावणं असायचं. कोणाकडे आमरसपुरी,कुणाकडे घावणघाटलं तर कुणाकडे आणखी काही. यशला मात्र मामीच्या हातचा ताज्या माशांचाआमसुलं,तिरफळं घालून केलेला केशरी सार आवडायचा. उकड्या भाताने भरलेलं यशचं ताट नि वाटीतले सार,मासे..हे यश हाणत असताना बघून यशची आई म्हणायची,"वहिनी,तुझ्याकडेच ठेव बाई याला. तुला सांगते, यातला पाव भागही भात खात नाही हा शहरात. किती नाकदुऱ्या काढाव्या लागतात." यावर आजी बोलायची,"हुं, नजर नको लावू माझ्या वासराला. खाताहा तितका खावंदेत. मोठो बापयो होतलो तो." यशला आजीची भाषा आवडायची.

यावर्षीच्या निकालात यशला खरंच सुरजदादापेक्षा जास्त टक्के पडले होते. त्यामुळे तो आनंदात होता. आजोबांनी त्याला बक्षीस म्हणून वीस रुपयेही दिले. सुरजचा निकाल मात्र दहा टक्क्यांनी घसरला होता.
सुरजला मामा बैल राखायला,म्हशी धुवायला लांबवर घेऊन जायचा. तिथे मामाशी त्याचं काय बोलणं झालं कुणास ठाऊक पण मालविकेचा विषय त्याने डोक्यातनं काढून टाकला आणि आता आयएएस बनायचं त्याच्या मनाने घेतलं. त्यासाठी तो नववीपासूनच तयारीला लागणार होता.....

सौ. गीता गजानन गरुड.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट