हुंदका
हुंदका
©®गीता गरुड
रचनाने सुट्टी पडताच मामाला फोन लावला,"मामा.. मामा ये नि मला घेऊन जा."
"हो रचू, उद्या येतो मी. तुझी ब्याग भरून ठेव. आई कशी आहे!आईला बरं वाटत नाहीए का?"
"काय माहित. ती नं पप्पा डॉक्टरकडे गेलेत खरे."
"तू आईची विचारपूस केली नाहीस!"
"अरे मामा. मी किनई दहा वाजता उठले, त्याआधीच ती दोघं निघून गेली होती. मला शेजारच्या उमाआज्जींनी चहापोहे दिले पण ना मला तुपसाखरपोळी हवी होती. हे पप्पापण नं आईला कशाला घेऊन गेले." इतक्यात दाराची बेल वाजली. फोनवर मामाला बाय करून रचना दार उघडायला धावली. पप्पा आईच्या हाताला धरून घेऊन आले होते. तिच्यासाठी त्यांनी कुकरला मऊभात लावला. कुकर झाला तसा तिला मऊभात वाढून दिला. पाणीही दिलं नि औषधगोळ्या स्वतः काढून दिल्या. पप्पा आज मम्मीला एवढी स्पेशल ट्रीटमेंट का देत आहेत हे रचनाला कळत नव्हतं.
मम्मी कशी आजारी पडेल! मम्मीलोकं कधी आजारी पडतात का! तिने तिच्या निळ्या डोळ्यांच्या नि पिंगट केसांच्या बाहुलीला विचारलं तशी बाहुलीनेही नकारात्मक मान हलवली. रचनाला वाटलं, आईला विचारावं,"मम्मा तुला काय होतय?" पण एकही शब्द तिच्या तोंडातून निघेना.पप्पांनी तिला ऊन ऊन पाणी काढून दिलं व आपल्या हाताने आंघोळ करायला सांगितली, कपडेही दिले घालायला. पप्पा आज मम्माचा रोल करत होते.
पप्पांनी स्वतःला नि रचनाला मऊभात वाढून घेतला.
"हे माझं ताट नव्हेच.. मला मऊभातासोबत भाजलेली सांडगी मिरची हवी, रचना फुरंगटून म्हणाली."
आई अगदी खालच्या सुरात रचनाला रागे भरली,"एवढं पप्पांनी वाढलय तर खा न गुपचूप. मिरच्याबिरच्या काय मागतेस त्यांच्याकडे. त्यांना काय डबे ठाऊक आहेत!"
तशी रचना उठून किचनच्या ओट्याकडे धावली खाली वाकून तिने फडताळातली कुटाच्या मिरच्यांची बरणी काढली,झाकण उघडून त्यातल्या चार मिरच्याही काढल्या.
"शाब्बास,"म्हणत बाबांनी त्या घेतल्या.
"पप्पा, मी देऊ भाजून. मला येतं भाजता."
"नाही हं मनू. मी देतो भाजून तोवर तू बाहेरचं केराचं टोपलं आणून आत ठेव नि हात स्वच्छ धू."
आपल्याला हवं ते काम करायला मिळालं नाही म्हणून रचना नाराज झाली. आईला तिने मानेला हिसका देत नाही म्हणून सांगितलं असतं खरं पण पप्पांना असं म्हणण्याची तिची डेरींग नव्हती. हाताला लागलेलं मिरचीचं मीठ, चटपटीत मसाला चाखत ती दाराबाहेर गेली. केराचं टोपलं घरात आणून ठेवलन. पप्पांच्या सूचनेप्रमाणे साबण लावून हात धुतले नि पप्पांसोबत जेवायला बसली. पप्पांनी कसा पटापटा मऊभात संपवला. भांडी मोरीत टाकून त्यांनी शर्टपँट चढवली. शर्ट बिनाइस्त्रीचंच होतं कारण आईला बरं नव्हतं म्हणून तिने इस्त्री केली नव्हती.
रचनाने मिरचीभात खाल्ला व ताट मोरीतल्या टबात ठेवलं. आईकडचंही ताट तिने टबात टाकलं. रचनाच्या मनात आलं,"ही मम्मी आता उठणार कधी? ही अशीच झोपून राहिली तर आमटीभात कोण करणार? पाणीपुरी खायला कोण न्हेणार? घरातला केर कोण काढणार? फर्निचरवरची धूळ कोण साफ करणार? फरशी कोण पुसणार?" रचनाला पुसलेली चकचकीत फरशी फार आवडायची. रचना मग गेलरीत आली. चौकटी आखून बाजूच्या परीला सोबत घेऊन खेळली.
जराशाने कुल्फीवाल्या काकांची हाळी ऐकू आली. लाल फडकं बांधलेलं मोठं भांड डोक्यावर घेऊन कुल्फीवाले काका यायचे. डोक्यावर पांढरी टोपी, अंगात पांढरा सदरा, पांढरा पायजमा नि कपाळी गंध असे ते वडाच्या पाराजवळ आले की हाळी द्यायचे मग सगळ्या खोल्यांतून चिल्लीपिल्ली नाणी घेऊन चवड्यांवर धावत सुटायची. कुल्फी कशी गोड, थंडगार, गारेगार..
परीच्या आईने तिला कुल्फी आणायला पाठवलं. रचनाला वाटलं आपणही मागावे आईकडे पैसे पण आई तर निजली होती. परी तिला कुल्फी खाऊ देईल म्हणून ती गुपचूप घरात आली. कुणाकडून काही घ्यायचं नाही अशी आईचीच तर शिकवण होती मग बाजूच्या उमाआज्जी आल्या तशी आईने डोळे किलकिले केले. त्यांनी रचनाच्या आईसाठी साखरलिंबू आणलं होतं. रचनाची आई ते चोखू लागली.
आज्जी म्हणाली,"तसा उशीरच झाला रचनाच्या पाठीवर भावंड यायला पण ठीकै आठ वर्षाचं अंतर म्हणजे काही जास्त नाही. माझ्या मोठ्या भावात नि माझ्यात सतरा वर्षांच अंतर होतं." मग आज्जीने रचनाला जवळ घेतलं. बाजूची तेलफणी घेऊन रचनाच्या वेण्या बांधून दिल्या. एका वेणीचं टोक दुसऱ्या वेणीच्या मुळाला नि दुसरीचं पहिलीच्या मुळाला असं बांधून आजीने रचनाच्या वेण्यांचा झोका बांधला तसं आज्जीसोबत आलेला आज्जीचा नातू, डुग्गू खूदकन हसला. झोप्पाळा..झोप्पाळा म्हणत त्याने त्या वेण्यांच्या कमानींना झोके दिले नि तोंडावर इवले हात धरून हसू लागला. डुग्गू हसू लागला की त्याच्या डोळ्यात चमक यायची. चकाकणारी माणकंच जणू. डुग्गूने काही केलं तरी रचना त्याला ओरडत नसायची. तिला डुग्गू फारच आवडायचा.
रचनाने डुग्गूच्या गोबऱ्या गालांची पप्पी घेतली. त्याला पोटावर उचलून घेत फिरवू लागली. काऊचिऊ दाखवू लागली तशी उमाआज्जी म्हणाली,"रचना, आता तुझी आईही तुझ्यासाठी डुग्गूसारखाच भाऊ आणणारै बरं. आईला त्रास द्यायचा नाही. हट्ट करायचा नाही. तिचं म्हणणं ऐकायचं." रचना काहीच बोलली नाही फक्त आईच्या पोटाकडे बघत राहिली पण ते तर तिला नेहमीसारखंच वाटलं. थोड्या वेळाने आज्जी डुग्गूला घेऊन निघून गेली.
रचना मोरीत गेली. तिने अशी भांड्यांनी भरलेली मोरी पाहिली नव्हती. आईचं काम कसं टापटीप. रचनाने फ्रॉक वर गुंडाळून घेतला. उष्टं कचऱ्याच्या डब्यात टाकलं नि ती चारपाच चहाची, मऊभाताची भांडी, ताटं सारं घासून, धुऊन काढलं. तेवढ्याशा कामानेही तिला थकायला झालं. तिने भांडी पुसून मांडणीवर लावली. कपडे कसे धुवायचे तिला खरंच ठाऊक नव्हतं. आई साबण लावते नि सुबक सुबुक करते एवढंच ठाऊक होतं. ती बाहेर आली मग केरसुणी घेऊन तिने दोन्ही खोल्यांतला केर काढला. फडक्याने फर्निचर पुसलं. थोडं पाणी बादलीत घेऊन जमेल तशी फरशी पुसली.
इतक्यात मम्मी उठली नि मोरीत गेली. ती भडाभडा उलट्या काढत होती. रचनाला खूप भिती वाटली. मम्मी आता रहाणार की जाणार असं होऊन गेलं तिला. मम्मी टॉवेलने तोंड पुसत बाहेर येऊन भिंतीला टेकून बसली तसं तिच्या कुशीत शिरून रचना रडू लागली.
"मनू, ए मन्या काय झालं रडायला! मला उलटी करताना पाहून घाबरलीस! हात वेडे!"
"मम्मी तुला काही झालं तर..नको आपल्याला दुसरं बाळ. तू आधी लवकर बरी हो."
मम्मीने तिचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. तिच्या केसांतून हात फिरवत म्हणाली,"अगं खरंच काही झालं नाहीए मला. ही उलटी, मळमळ असं होतच. नवीन पाहुणा येणार म्हणजे थोडा त्रास व्हायचा. कोणास ठाऊक पाहुणा येतोय की पाहुणी."
"मला फक्त तू हवीस,"रचना मम्मीच्या पदराचं टोकं हातात घेत म्हणाली. मग मम्मीने तिला गोष्ट सांगितली. गोष्ट ऐकता ऐकता रचनाचा डोळा लागला.
दुसऱ्या दिवशी रचनाचा मामा येऊन तिला आपल्याकडे घेऊन गेला. मामीचं नि रचनाचं छान बोरकुट, मेतकुट जमायचं पण यावेळी मामीचे डोळे अगदी ओढलेले वाटत होते. रचनाने मामीला, आईला बरं नसल्याचं नि घरी नवीन बाळ येणार असल्याचं सांगितलं. मामी थोडं हसली खरी पण परत नाराज झाली. दुपारी मामीची बहीण आली होती, त्या दोघींत डॉक्टरकडे जाऊन आल्याच्या गप्पा झाल्या नि डॉक्टरांनी म्हणे मामीला बाळ होणारच नाही सांगितलेलं. मामीची बहीण रडणाऱ्या मामीची समजूत काढत होती.
मामीची बहीण निघून गेल्यावर रचनाने मामीला तिच्यासोबत चुलबोळकी खेळायला बोलावलं. मामी रचनाला नाही म्हणायची नाही. त्या दोघी खेळू लागल्या. खेळात रचना सासूबाई नि मामी सूनबाई बनली होती नि मामी सासूबाईंच्या सांगण्यानुसार स्वैंपाक करत होती, पाटपाणी घेत होती.
मामीही आपलं दु:ख विसरून खेळात रंगली होती इतक्यात रचना म्हणाली,"जरा डोळ्याला डोळा लागू देत नाही सूनबाई तुझं कारटं. जरा दूधाला घे बघू त्याला नि तिने आपली बाहुली मामीच्या पदराआड धरली."
मामीला केवढ्यानं हुंदका आला. ती मोठ्यानं रडू लागली. धरणाचे दरवाजे उघडावेत नि कोंडून ठेवलेला पाण्याचे अजस्त्र झोत सुटावे तसं झालं होतं मामीचं.
रचना भांबावली. मामीचे डोळे पुसत म्हणाली,"मामी, नको गं रडूस. आईला बाळ झालं की आईला सांगते मी ते तुला द्यायला. माझ्याशी खेळायला बाजूचा डुग्गू आहे ना पण तू रडु नकोस ना."
मामीने तिला कुशीत घेतलं मग दोघीजणी एकमेकींना बिलगून राहिल्या. कधीतरी दोघींचा डोळा लागला.
समाप्त

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा