आनंदवनभुवन पुस्तक आढावा

 

आनंदवनभुवन
गो. नि. दांडेकर
Majestic book stall



जातीभेद, वर्णभेद यावरून शतकानुशतके उभे दावे माणसामाणसांमधे मांडले जात होते, आहेत नि यापुढेही मांडले जातील. दाण्डेकरांची ही गोष्ट कोणत्याही धर्माची अगर वर्णाची कड घेणारी नाही. गोष्टीबद्दल सांगण्याआधी थोडं गो .नी. बद्दल. गो. नीं.च लिखाण वाचताना मला खूप असं प्रसन्न वाटतं. आपलं घरातलं वडीलधारं आपल्याला गोष्ट सांगतयसं वाटतं. अक्षरं, वाक्यं, पानं पुढं सरकतात. गोष्टींतली माणसं, तो परीसर लख्खपणे मन:चक्षुंपुढे उभा रहातो. एखादा चित्रपट पहातोयसं आपण अक्षरापलिकडचं ते जग पाहू लागतो. तांबडफुटी, पडघवली, शितू, म्रुण्मयी..यांतल्या ठसठशीत व्यक्तीरेखा, तो निसर्ग सगळं कसं जीवंत, आपल्याला खुणावणारं.
या पुस्तकात एक म्हण सापडली.आपण म्हणतो नं राईचा पर्वत करतात तसंच यात बऱ्याच ठिकाणी लिहिलय..रजाचा गज करतात असं.
गो. नी. दाण्डेकर, श्री. ना.पेंडसे दोघांचीही लेखनशैली माझ्यातल्या वाचकाला मोहवून टाकते.
या गोष्टीकडे वळुया. ही एक दीर्घकथा आहे. नायक आहे महादेव मोरे. लहानपणी आईचं दूध काही कारणास्तव मिळालं नाही. ज्या दुधआईनं तिचं दूध याला पाजलं, ती पुढे महारोगी झाली. गावातल्या सगळ्यांच्या हाकेला धावून जाणाऱ्या त्या म्हातारीच्या अंतिम यात्रेला कोणी येईना तेंव्हा महादेव व त्याचा मित्र जाधव तेथे रात्रभर थांबले, आणिक गावातला एक जुनाजाणता माणूस एवढेच काय ते. तद्नंतर मात्र महादेवाच्या मनात शंकेची पाल चुकचुकते की कदाचित त्यालाही पुढे महारोग होईल.
महादेवाचे वडील जातात तेंव्हा त्याला शाळा सोडून घराकडे यावं लागलय. घरी दूरची आत्या रहावयास येते शिवाय गोदाक्का ही दूरची बहीण आपला नाकर्ता नवरा व पिलावळीसह येऊन बसते. महादेव काळीत घाम गाळतो, सोनं पिकवतो. वडिलांनी ठरवून ठेवल्याप्रमाणे शकुंतलेशी त्याचं लग्न होतं. लग्नाची नवलाई सुरू होते तोच शकूच्या पाठीवर डाग उमटतात, टेस्ट पॉझिटिव्ह निघते, नि असतील शिते तिथे जमतील भूते या न्यायाने तिथे ठिय्या देऊन बसलेली गोदी शकूला फाडून खायची शिल्लक ठेवते.

महादेव शकूस घेऊन शेतात कोपीत रहातो, तिथे लांडग्यांचं भय, लोकं पिक कापायला येईनाशी होतात आणि महादेवालाही महारोग होतो. त्याच्या बोटांची संज्ञा नष्ट होते. हा नवीन शब्द मिळाला मला. विज्ञानातल्या संज्ञा एवढंच ठौक होतं, यात संज्ञा हा भान, जाणीव या अर्थाने वापरलाय. मग ही दोघं एका कुष्ठाश्रमात रहायला जातात पण तिथे सगळं ख्रिस्ती धर्माप्रमाणे करावं लागे.

आपल्या प्रार्थना, अभंग म्हणणं मान्य नव्हतं. महादेव इतर कुष्टांना प्रार्थनेसाठी, अभंगासाठी जमवतो, भजनकिर्तन करतो, त्याच्या उत्तेजनाने एक चाचा नमाज पडतात, या कारणात्सव त्या जोडप्याची तेथून उचलबांगडी होते..पुढे त्यांना कुष्ठांसाठी आयुष्य अर्पणारे डॉ. दादा भेटतात. दादा त्यांना आपल्या आश्रमात घेऊन येतात. त्या आश्रमात प्रत्येकाच्या हाताला काम, तिथले रुग्ण मानाने जगणारे, आपापल्या देवतांना भजण्याची मुभा. तनासोबतच मनाचीही तपासणी करणारे दादा..महादेवशकू त्यांना साथ देतात. शकू तिथल्या लेकीबाळींची आई, बहीण होऊन जाते. त्यांच्या जखमा धुणं, वहाणारं पाणी पुसणं, बेंडेज बांधणं, स्वैंपाकावर देखरेख ठेवणं, मुलींची वेणीफणी करणं, त्यांना स्वच्छतेच्या सवयी लावणं सारं मनाने करू लागते. त्यांच्या दु:खापुढे तिचं दु:ख तिला नगण्य वाटू लागतं. महादेव शेत नांगरतो, विहीर खणायला घेतो. अशी ती दोघं आपलं जीवन या कार्यासाठी वाहतात. गोष्टीत जाधव म्हणून महादेवचा मित्र आहे, तो खूप विनोदी आहे. मजा येते,त्याचे संवाद वाचताना. बायकोला सरकार म्हणून साद घालतो. मित्रत्व खऱ्या अर्थाने जपतो जाधव.

महारोगी ही एकच जात घेऊन ही देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या विद्रूप माणसांची आनंदवनभुवन ही वस्ती नांदते. हीच माणसं हातीपायी धड असताना सगसोयऱ्यांची जीवलग होती पण रोगाची लक्षणं देहावर दिसू लागताच त्यांना समाज कसा बहिष्कृत करतो ते मन घट्ट करून वाचावं लागतं. बाकी यात सासू, सून भांडणं, प्रणयप्रसंग वगैरे काही नाही.
©®गीता गरुड


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट