राब पुस्तक आढावा

 

राब
लेखक-अनंत मनोहर
कॉन्टिनेन्टल प्रकाशन



राब ही कथा आहे सह्याद्रीच्या कुशीतल्या आनेगावची.
यात आपल्याला गुणा भेटते. गुणाच्या नवऱ्याला त्याच्या चुलत्याने घराबाहेर काढलेलं असतं. ती दोघं दूर बंगलोरला रहायची. गुणाचा नवरा गेल्यावर गुणा एकाकी पडते पण आपल्या लेकराला, शिवाला कष्ट करून वाढवते. शिवा बऱ्यापैकी समजुतीत आल्यावर ती दोघं पुन्हा आनेगावला येतात. गुणाचा चुलत सासरा, त्याच्या घरमालकीणीच्या शब्दाबरहुकुम भितीपोटी का होईना गुणाची जमीन परत करतो. शिवाला मदत करतात बाबाजी नि चंदरराव, हे त्याच्या वडलांचे दोस्त. चंदररावाची पत्नी अन्नपूर्णा, गुणाची सखी होते. अन्नपुर्णाची लेक पुतळा तर गुणाजवळच जास्त रमू लागते. पुढे पुतळा नि शिवाचं लग्न होतं.

कथा तशी साधी, सरळ पण या कादंबरीत
कोकणातील ऋतुचक्र, घेतली जाणारी हळवं भात, महान भात, वरई, नाचणी अशी पिकं, करांदे, कणगी अशी कंदमुळं याबद्दल माहिती दिली आहे.

निसर्गाच्या शाळेत शिकून तयार झालेला बाबाजी, शिवाला येथील गवे, अस्वलं, रानडुकरं, काळवीटं, यांचा वावर, जीवनपद्धती याबद्दलचं ज्ञान देतो. बाळू मोरेसारख्या माणसापासनं दोन हात लांब रहायला शिकवतो.

बऱ्याचदा पाऊस न पडल्याने दुष्काळ पडतो, लोकांना खायला अन्न मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, लोकं कशीबशी तग धरतात.

थोडक्यात समाधानी, जास्तीची महत्वाकांक्षा न बाळगणारी, आंधळे कष्ट करणारी अशी ही लोकं आणि त्यांचं जीवन बघून कधीतरी यांची प्रगती होऊ शकेल का ही अशीच ऊसासारखी चरख्यात पीचत आयुष्य घालवणार असं विचारमंथन करणारा बाहेरचं जग पाहून आलेला शिवा याची ही कहाणी.

कोकणातलं एकंदरीत लोकजीवन, तिथली बोलीभाषा याचं समग्र दर्शन कादंबरी वाचताना घडतं.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट