सुलेखाचं काय चुकलं?


 सुलेखाचं काय चुकलं?


सुलेखा सध्या वडिलांजवळ असते. वयवर्ष पस्तीस. सुलेखा तिच्या आईवडलांची एकुलती एक मुलगी.तिच्यानंतर डॉक्टरच्या पायऱ्या अनेकदा झिजवूनही त्या उभयतांना मुल झालं नाही. 


शेवटी त्यांनी सुलेखालाच आपलं सर्वस्व मानलं. लहानाचं मोठं केलं. डिगरीपर्यंत शिक्षण दिलं. सुलेखाच्या वडलांची मानसिक स्थिती काही कारणाने बिघडल्याने थोडे महिने ते मनोरुग्णांच्या इस्पितळात होते. त्या काळात बऱ्याचशा नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. सुलेखाच्या आईने कसाबसा कुटुंबाचा डोलारा सांभाळला. थोड्याच महिन्यांत सुलेखाचे वडील बरे झाले पण लोकांच्या त्या कुटुंबाकडे पहाणाऱ्या नजरा गढुळल्या त्या कायमच्याच.


सुलेखा वयात आली  तशी तिच्यासाठी स्थळं बघू लागले. मधल्या काळात सुलेखा एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करु लागली.

शेवटी एक स्थळ सांगून आलं. मुलाची सरकारी नोकरी होती. नणंदेच लग्न झालं होतं. घरात सासू व दिर होते. सासरे फोटोत जाऊन बसले होते. 


सुलेखाच्या वडलांनी आपल्या तुटपुंज्या कमाईतून सुलेखासाठी दागिने केले. रितीरिवाजानुसार सगळ्या नातेवाईकांसाठी साड्या,शर्टपीस वगैरे घेतले. नवरदेवाला कपडे,अंगठी,चैन घेतली. लग्न लागलं. सुलेखा सासरी गेली. एकदोन वर्ष नीट गेली. नणंदेचा सुलेखाच्या घरावर चांगलाच अंमल होता. 


सुलेखाच्या आईवडिलांना मुंबईत करमेना. मग त्यांनी तिथली खोली विकून लेकीच्या सासरच्या शहरात घर घेतलं. सुलेखा आईवडलांकडे अधेमधे जाऊ लागली.

सुलेखाच्या आईला मधुमेह झाला. नीट पथ्यपाणी न पाळल्यामुळे पुढेपुढे तिची तब्येत दिवसेंदिवस  खंगू लागली. तिला अर्धांगवायूचा झटका आला तेंव्हा सुलेखा माहेरी आईच्या शुश्रुषेसाठी जाऊन थांबली. 


सुलेखाची आई पूर्णतः परावलंबी झाली होती. तिच्या शुश्रुषेसाठी बाई ठेवणं हे सुलेखाच्या वडलांना आर्थिकदृष्ट्या परवडणारं नव्हतं. तरीही ते त्यातल्या त्यात कमी पगार घेणाऱ्या बाईची चौकशी करत होते . तोपर्यंत मात्र सुलेखाला आईजवळ रहाणं क्रमप्राप्त होतं. याच गोष्टीचा तिच्या नणंदेला राग आला. तिने भावाला सांगितलं की सुलेखाला परत घरात घ्यायचं नाही. गेली आहे तिथेच राहू दे. 


सुलेखाचं सगळं सामानही त्यांनी तिच्या माहेरी पाठवून दिलं. सुरेखाशी तिच्या नवऱ्याने घटस्फोट घेतला. दरम्यानच्या काळात सुलेखाची आई तिला सोडून गेली. सुलेखाचे वडील अधिकच दीनवाणे व सैरभैर झाले. सुलेखाच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. सुलेखा आत्ता तिच्या वडिलांजवळच रहाते. नोकरी करते. परित्यक्ता स्त्रीचं जगणं जगते. 


खरंच काय चूक आहे यात सुलेखाची?ती मुलगी आहे ही चूक आहे का? तिने आईची शुश्रूषा केली ही चूक आहे का? सुनेने सासूसासऱ्यांची सेवा करणे हे तिचं इतिकर्तव्य आहे म्हणतात मग एक लेक म्हणून तिने तिच्या म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा केली तर मात्र ते चुकीचं का ठरावं? आयुष्यभर वाढवलेल्या लेकीवर म्हाताऱ्या आईवडलांचा तीळमात्रही अधिकार नाही का? लेकीचा माहेरच्या प्रॉपर्टीत हिस्सा असतो मग माहेरच्या दु:खात ती वाटेकरी झाली तर ते चुकीचं असतं का? स्त्री स्त्रीचा जाच करणं कधी थांबवणार?


आत्ता कायदेशीररीत्या सासूसासऱ्यांची देखभाल करणे हे जावयाचेही कर्तव्य आहे पण हे कर्तव्य किती टक्के जावई पाळतात? सून लांब रहात असेल तर तीने फोन करुन आपल्या सासूसासऱ्यांची विचारपूस करावयास हवी हे रास्तच आहे पण अशी अपेक्षा करणारे किती जावई त्यांच्या सासूसासऱ्यांची महिन्यातून एकदातरी आस्थेने चौकशी करतात? त्यांच्याशी आपुलकीचे दोन शब्द बोलतात. का कर्तव्याच्या सगळ्या गोष्टी ही फकस्त स्त्रीजातीची मक्तेदारी आहे? भारी,जरतारी,आधुनिक कपडे बायकोला घेऊन दिले की स्त्रीला स्वातंत्र्य मिळते का? बाह्यांगी स्वातंत्र्य काय कामाचे? स्त्रीला वैचारिक स्वातंत्र्य किती घरातून मिळते?


-------गीता गजानन गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट