उन्हाळ्याची सुट्टी


 गीता गजानन गरुड.

आंब्रड.


#उन्हाळ्याची_सुट्टी


लहानपणी शाळेला सुट्टी पडली की दोन तीन दिवसांत आम्ही गावी जायचो.गावी जायच्या आधी बाबा मला लाकडी भातुकली आणून द्यायचे.त्याकाळी कोकण रेल्वे नव्हती.आम्ही परळ बस डेपोजवळ एसटीत चढायचो . हडी गाडी असायची एवढं आठवतं.आम्ही सगळी सख्खी,चुलत भावंड,आई,काकी,आत्तेची मुलं व दोन काका असे आम्ही गावी जायला निघायचो.चार बेंचतरी आमच्या कुटुंबाने भरायचे.


बाबा व बाकीचे काका मग मागाहून सुट्टी मिळाली की यायचे.एसटीत चढलं आणि एसटी सुरु झाली की मी माझं डोकं आईच्या मांडीवर टेके.मला एसटीत जाम गरगरे.चक्कर येई.बाकीची भावंड, वडे,वेफर्स असं बरंच काही चरायची पण मला त्यातलं काही खायला मिळत नसे.रात्री गाडी जेवायला थांबे.एव्हाना सगळ्यांचे पाय टम्म फुगलेले असायचे.गाडीत पिवळसर लाईट असायची.सगळीजणं एकी वगैरे करुन यायची.बरीचजणं गाडीतच जेवायची.आईचा डबा ठरलेला असे..आंबोळ्या,काळ्या वटाण्याची घट्ट भाजी व कैरी,ओला नारळ घातलेली चटणी.

आई सगळ्यांना केळीच्या पानावर आंबोळी,त्यावर उसळ व चटणी असं घालून देई.मी सोडून सगळीजणं जेवत.


थोड्या वेळात कंडक्टर गाडीत चढे.जोरात बेल वाजवे.मग खाली उतरलेले सगळे पटापट गाडीत चढत.सगळीजणं आल्याची खात्री करुन कंडक्टर बेल मारी.परत गाडी वेग पकडे.एव्हाना खिडकीतून गार वारा येऊ लागे.त्याने माझी मळमळ दूर व्हायची.मग मी खिडकीतून बाहेर बघत बसे.ते मैलाचे सफेद,तांबडे दगड सुरु झाले की मला खात्री पटे की आत्ता थोड्या तासात आपण गावी पोहोचणार.वाटेतल्या झाडांच्या खोडांनाही तसाच पांढरा,खाली तांबडा रंग काढलेला असे.गार वारा लागे म्हणून आई माझ्या कानांना रुमाल बांधे.काजूची,आंब्याची एकेक झाडं मागे जाताना पहाताना गंमत यायची.


मग थोडथोडं उजाडू लागे.गाडी चहा पिण्यासाठी थांबवत.गाडीतली माणसं जरा पाय हलके करुन येत.एव्हाना बरेच प्रवासी उतरलेले असायचे.

कसाल येऊन गेलं की थोड्या वेळाने गाडी आमच्या रानबांबुळी तिट्यावर पोहोचे.आमचे सख्खे तसेच चुलत आजोबा, आम्हाला उतरवून घेत.आमचे सामान घेत.


एका छोट्याशा पाऊलवाटेने आम्ही घराकडे जायचो.

आधी मांगर(गुरांचा गोठा)दिसू लागे.खळ्यात आजी उभी असायची.आम्हाला सगळ्यांना कवेत घ्यायची.माझी नातरुवा इली म्हणायची.


घराच्या बाजूलाच न्हाणी असायची,चुलीवर मोठं मडकं ठेवलेलं असे.त्या मडक्यात दिवसभर गरम पाणी असे.तिथेच बाजूला पेरणीच्या खाली फडतर होती.तिथे आम्ही न्हायचो.किंवा माडाच्या मुळात फडतरी असायच्या तिथेही न्हायचो.


गावी कोंबड्याच्या आरवण्याने सकाळी लवकर जाग येई.मशेरी लावून तोंड धुतलं की आम्ही चुलीजवळ आजीशेजारी जाऊन बसायचो.आजी आम्हाला चहा घावणे/आंबोळ्या खायला देई. खाऊन झालं की आम्ही आजोबांबरोबर शेळीतल्या शेतात बुचडी(भाताचे गोटे व खत) पेरायला जायचो.आजोबा शेत नांगरायचे.आम्ही त्यांच्यापाठून ओळीत टोप घेऊन फिरायचो व बुचडी घालायचो(पेरायचो).बुचडीत भात,रखा,व खत असायचं.त्यामुळे बुचडी पुरी होईपर्यंत आम्ही राखाडी व्हायचो.तिथे बाजूला जांभळाचं झाड होतं.खूप मोठी,टपोरी जांभळ असायची झाडावर.दगड मारून घड खाली पडले की आम्ही जांभळं खायचो.जांभळं खाऊन जीभ व दात नीळेजांभळे व्हायचे. 


घरी आल्यावर आम्हाला पूर्ण धुवून काढण्यात येई.आई चुलीवर मडक्यात उकड्या तांदळाची पेज करायची व टोपात वाळायची(पेज व थोडा भात काढून घ्यायची).बाकीचा भात दुपारच्या जेवणाला असायचा.पडवीत आम्ही गोल करुन बसायचो.एका मोठ्या टोपात पेज पेश व्हायची.जोडीला हापूस आंबे.

खोलगट ताटातून आम्ही पेज जेवायचो.आजी तुळशीची पुजा करायची.आजोबा देवपूजा करायचे.आम्ही त्यासाठी लागणारी जास्वंदाची फुलं काढून आणून ठेवायचो.तुळशीजवळ फणसाच्या पानात प्रसाद म्हणून ठेवलेली साखर किंवा गुळ खूप गोड लागे.


 दुपारच्या जेवणात ताकाची कढी भात,कुळदाची आमटीभात,डाळभात यातलं काहीतरी  असायचं.जेवून झालं की आम्ही नवा व्यापार खेळायला बसायचो.तासनतास खेळायचो.भातुकली खेळायचो.

आजोबांचे पाय दाबायचो.दुपारी आइसकँडीवाला येई.लाल,पिवळ्या आईसकँडी मस्त लागत.


उन्हं उतरु लागलीकी शेताच्या कोपर्यात क्रिकेट खेळायचो.मांगरात (शेतातलं लहान घर) लपाछपी,आंधळीकोशिंबीर, डोंगर का पाणी खेळायचो.बैठ्या खेळात सापशिडी,ल्युडो,नवा व्यापार,चोरपोलिस,नावगावफळफुलं खेळायचो.भरपूर चांदोबा वाचायचो.एक चुलत काका खूप गोष्टींची पुस्तकं आणून द्यायचा.झपाटल्यासारखी ती पुस्तकं वाचायचो.


संध्याकाळी मग आमची एकेकाची साबणाने रगडून चिखलधुणी होई.संध्याकाळी परत पेज पिऊन ,

खळ्यात बसायचो.तिथे आजोबा प्रार्थना, पाढे म्हणून घ्यायचे.रात्री जेवल्यार आम्ही चटई टाकून खळ्यात उताणी पहुडायचो.आजोबा आम्हाला सप्तर्षी दाखवायचे.आजी खूप भारी गोष्टींच्या जगात घेऊन जायची.चांदण्याच्या प्रकाशात, गडद हिरव्या झाडांत काजवे चमकायचे.


थोड्या दिवसांत रतांबे(कोकमफळे)पिकू लागत.मग आमची गँग पारकराच्या शेतात जाई.तिथे आमची रतांब्याची झाडं आहेत.गडीमाणूस झाडावर चढून झाड हलवे.मोठ्या टोपल्यांत आम्ही ते रतांबे वेचायचो.टोपल्या रतांब्याने भरल्या की काक्या त्या डोक्यावर घेऊन घरची वाट धरत.त्यांच्यामागे आम्ही.रतांब्यांचा ढीग पडवीत पडे.मग रोज दुपारी रतांबे फोडण्याचं काम मोठी माणसं करायची.रतांब्यातला रस एका मडक्यात जमा करायचे. व रतांब्यांच्या पाकळ्या करुन त्या आगळात बुडवून ठेवायचे. ताडपत्रीवर उन्हात वाळवायचे परत आगळात बुडवून ठेवायचे परत वाळवायचे.अशाप्रकारे त्या कोकमांना दोनतीनदा आगळ लागे.कोकमं उन्हात चांगली खडखडीत सुकत.आगळ काचेच्या बाटल्यांत भरुन ठेवत व कोकम बियांना राख लावून सुकत घालत.त्या खडखडीत वाळल्या की लाकडी चेपण्याने त्यांच्यावरची टरफले आम्ही काढायचो.साधारण तपकिरी,चोकलेटीसर अशा त्या बिया आजी एकतर आठवडी बाजारात विके नाहीतर व्हाइनात घालून कुटे व त्यापासून कोकमतेल(मुठ्याल) तयार करत. हे मुठ्याल हातापायांना भेगा पडतात,त्यावर गुणकारी असते.जुलाब होत असले तर गरम वरणभातावर थोडे कोकमतेल घालून देतात.


संध्याकाळी कधीकधी आम्ही काकांबरोबर गुरं राखायला जायचो.तिथे वाळूत काठीने भरपूर चित्रे रेखाटायचो.डोंगराआड होणारा सुर्यास्त पहायचो.म्हशींना व्हाळात आंघोळ घालत.म्हशी एकदा पाण्यात बसल्या की उठताउठत नसत.संध्याकाळी आम्ही गुरांना त्यांचं खाणं,पाणी,गवत द्यायचो.गाण्याच्या भेंड्या खेळायचो.


आठवडाबाजारादिवशी आजोबा आम्हाला कांदाभजी व खोबर्याची कापं आणून द्यायचे शिवाय एक आजोबा आम्हाला लिंबाच्या गोळ्या आणून द्यायचे.फणसाचे गरे,हापूस आंबे यानेच आमचं पोट भरायचं.रायवळ आंबेही झाडाच्या मुळांवर बसून चोकून चोकून पारंबी पांढरी होईपर्यंत खायचो.तशीच करवंद.करवंदाच्या झाळींत जाऊन करवंद पळसाच्या पानांचा कोन करुन त्यात गोळा करायचो.ह्या झाळ्या मात्र घरापासून फार लांब होत्या.काका आम्हाला तिथे घेऊन जायचे.करवंद आत लाल निघालं तर कोंबडा व पांढरटफिकट गुलाबी निघालं तर कोंबडी मिळाली म्हणायचो.एकंदरीत आमची खाण्यापिण्याची चंगळ असे.


आजी कधी खापरोळ्यांचा बेत करे तर कधी शेवयारस.शेवयारसचा बेत असलाकी वरणभातभाजीला सुट्टी असायची.पोट तुडुंब भरेपर्यंत रसशेवया खायचो.उरलेल्या परत सकाळी उठल्यावर खायचो.भल्यामोठ्या टोपात पाणी उकळत असायचं.परातीत  तांदळाचं पीठ घेऊन आजी ते गरम पाण्याने मळे व त्याचे मोठे लांबडे गोळे करुन गरम पाण्यात सोडी.ते गोळे शिजलेकी पाण्यावर तरंगू लागत.मग एकेक गोळा लाकडी सोर्यात घातला जाई. दणकट माणूस सोरा वरतून फिरवे.दुसरी व्यकती खाली केळीचं पान पुढे मागे करी.त्या पानावर लांबलचक पांढर्याशुभ्र शेवया पडत.मग त्या सुपात एकावर एक रचून ठेवीत.शेवया व रस खूपच भारी लागे.


कधी वडेमटणाचा बेत असे.आमच्यागावी चिकनलाही मटणच म्हणतात.गावठी कोंबडा पकडून गरम पाण्यात घालून त्याची पिसे काढत.व त्याला जरा आगीवर भाजून मग त्याच्या बारीक फोडी करत.गरमागरम वडे नुसतेच खायला मजा येई.टम्म फुगलेले ते मेथीदाणे, धणे घातलेले वडे..खूपच खमंग लागत.चुलीत भाजलेलं काळीज,कोंबड्याचे पाय अफलातून लागत.


आजी कुळदाची पीठी खूप भारी बनवे.पीठीभात आमच्या सगळ्यांचा फेवरेट होता.

पाऊस जवळ आला की आम्ही आजीला गोवर्या,लाकडं गोठ्यात भरुन द्यायचो.त्या कामात खूप मजा यायची.त्याकाळी गावात लाईट नव्हती.आजोबा कंदील पेटवायचे.त्या कंदीलाभोवती पिंगाणी फिरायची.


सकाळी झाप उघडून कोंबड्यांना सोडून घालणे व संध्याकाळी त्यांना पकडून झापात ठेवणे हेही मुलांचे काम असे.


खूपचं मजेशीर दिवस होते ते.वर्षभरासाठी लागणारी उर्जा घेऊन आम्ही मुंबईला परतायचो.मनात पुढच्या सुट्टीचे प्लँन चालू असायचे.😍😍

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट