सावीच्या भावी सासुबाई
#सावीच्या_भावी_सासूबाई
आज सावीला सकाळीच एक बंद लिफाफा बाजूच्या काकूंनी आणून दिला.काल सावी घरी उशिरा आली म्हणून काकूंनी दार ठोकवलं नव्हतं.घरात ती एकटीच होती.आईबाबा व लहान भाऊ गावच्या घरी गणपतीला गेले होते. सावीने लिफाफ्यावरचं नाव वाचलं, सौ.वसुंधरा श्रीकांत सावंत.सावीच्या लक्षात आलं,अरे हीतर अमोलची आई.अमोल, तिचा प्रियकर कम भावी पती.
जराशा धाकधुकीनेच सावीने लिफाफा उघडला.काकू जायला निघाल्या तसं.सावी त्यांना म्हणाली,"काकू,तुम्ही पण ऐका". काकू सावीच्या शेजारी बसल्या.
प्रिय भावी सुनबाईस(सावी),
सावीबाळा तुला खूप खूप आशीर्वाद.
चार दिवसांपूर्वी अमोलने आमच्यावर बाँबच टाकला.मी माझं जमवलय म्हणाला.मला तर बाई अगदी टेंशनच आलं.मग ह्यांनी तुझ्या बाबांची भेट घेतली, त्यांची बोलणी झाली व मला येऊन सांगितलकी आपल्या अमोलची आवड उत्तमच आहे.काही घाबरायचं कारण नाही.तेंव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला बाई.
लग्नपण तुम्हाला डिसेंबरमध्ये करायचंय.अडीज तीन महिन्यात सगळी तयारी करावी लागेल नं.ए पण ते ओनलाईन नको हं मागवू.आपण किनई दादर किंवा ठाण्याला जाऊन तुझे ड्रेस,साड्या घेऊ.तिथे खूप छान
व्हरायटी मिळतील. तुझ्या नितळ कांतीला खरं तर कोणताही रंग शोभून दिसेल.पण साड्या घेताना बरोबर आलेल्या वडीलधार्या माणसांच मनपण जप हं.तेवढचं बर वाटतं आम्हा ज्येष्ठांना.फार दिवसांची इच्छा आहे माझी चिंतामणी रंगाची पैठणी घ्यायची.मीही तुझ्यासोबतच घेईन.तुमचं आधीच खरेदीबाबत काय ठरलं असेल तर सांग हं मोकळेपणाने.
तुला सांगते सावी,हल्ली न बरंच काही दाखवतात सिरियलमध्ये सासूबद्दल.एवढ्या वाईट नसतात ग सासवा.सासूही एक स्त्रीच असते.एक पत्नी असते,एक आई असते.काकी,ताई,मावशी,मामी,आजी,वहिनी..ही सारी रुपं आवडतात ना तुला.तशीच ही दोन रुपं सासू व नणंद.पण त्यांचा प्रवेश मुलीच्या आयुष्यात तिच्या लग्नानंतर होतो.तुला सांगते,सासूतही एक छोटी मुलगी दडलेली असते.तिलाही वाटतं,नटावंथटावं,हौसमौज करावी,..सासू म्हणजे कुणी दुसर्या ग्रहावरून आलेला प्राणी नसतो.तीही हाडामासाचीच बनलेली असते.तिलाही मन असतं.पण पुर्वग्रहदूषित नजरेने या नात्याची सुरुवात झाली की हे नातं गढूळ होतं गं.
सासूही लहानपणी तिच्या माहेरच्या अंगणात चिमणीसारखी बागडलेली असते.पुढे लग्न झाल्यावर काडीकाडी जमा करुन तिने आपला संसार उभा केला असतो.भातुकली घेतलेली असते.तिच्या संसारवेलीला फळं येतात.माझ्याही संसारवेलीला एक फळ आलं, तुझा अमोल.माझा,तुझा अमोल.अमोलवरुन मात्र आपल्यात माझा बाहुला,तुझा बाहुला असा वितंडवाद नको व्हायला.
माझा अम्या शेवटपर्यंत माझा मुलगा रहाणार.तो माझ्याशी जास्तवेळ बोलला,माझ्या पाककलेचं कौतुक केलं तर हिरमुसू नकोस हं.तुलापण येत असतील नं छान छान पदार्थ बनवायला.अन् नाही येत असलं तरी डरनेका नही.मैं हूँ ना.मी शिकवेन तुला.आपण दोघी मिळून निगुतीने स्वैंपाक करु.कधीकधी होटेलिंग करु.मला बाई डोमिनोजचा पिझ्झा आवडतो,टेंडर कोकोनट आईसक्रीम आवडतं.आपण अधुनमधून जात जाऊ तुला वेळ असला की.
हो,आणि मला चोकलेट्सही भारी आवडतात गं.वडापाव,पावभाजी,पाणीपुरी,शेवपुरी,मसालेभात, उकडीचे मोदक,पुरणपोळी....मी तर बाई खवय्याचं आहे.करायला,करुन घालायला व स्वतः खायला जाम आवडतं मला.नवीन नवीन इअर रिंग्स,लटकन,नेकलेस,बांगड्या, छान छान पर्सेस सगळं आवडतं मला.आपण अधुनमधून शोपिंगला जात जाऊ दोघी मिळून.माझ्या सासुबाईही हौसी होत्या फार.त्यांना फुलं फार आवडायची.मोगरा,जाई,जुई,सायली यांच्या गजर्यांची त्यांची आवड आत्ता माझ्यातही आली.
हो,आणि माझ्या व माझ्या सासुबाईंच्या भातुकलीवर माझा लय जीव आहे बरं.तुझ्या आवडीची भातुकली तु त्यात वाढवं पण आमच्या भातुकलीला मात्र नावं नको ठेऊस हं.मलाना समाजकार्याची आवड आहे.मी आदिवासी पाड्यांवर जाऊन तिथल्या मायलेकरांना स्वच्छतेच्या चार गोष्टी शिकवते.माझ्या ओळखीच्यांकडून कपडे वगैरे जमा करुन त्यांना नेऊन देते.एकदा मी तुला घेऊन जाईन तिथे.तु त्यांना तिथे तुझी चित्रकला शिकव.तुला आवड नसली तर हरकत नाही.
तुझी आई नाही का तुला रागे भरत.अगदी तसचं तुझं काही जास्तच चुकलं तर मी तुला रागे भरेन.कारण मी काही डोक्यावर बर्फाची लादी घेऊन नाही नं फिरत.तुझं चुकलं तर हक्काने रागवेन पण राग शांत झाला की तुला मायेने जवळ घेईन.तेवढी स्पेस मात्र दे मला.दोघात तिसरं आणलं की वाद होतात,तसे आपल्यात होणार नाहीत याची आपण काळजी घेऊ.
खरतर नं सावी एवढं सगळं मला तुला बोलून नीट समजावता आलं नसतं.कागदावर कसं छान व्यक्त होता येतं.माझ्या भावनाही तुझ्यापर्यंत नीट पोहचल्या असतील अशी आशा करते.
तुही मला हे पत्र वाचल्यावर अभिप्रायाचं पत्र पाठवं.तुझ्या इच्छा,आकांक्षा, तुझी मतं , तुझ्या आवडीनिवडी मला
कळू देत.तुझं मन जाणून घेऊ देत.
तुझीच सासू,
वसुंधरा सावंत.
शेजारच्या काकू सावीला म्हणतात,"सावे, खरंच छान मनमोकळी आहे गं तुझी सासू.किती मस्त व्यक्त झाली आहे पत्रातून.तुही तुझ्या मनातलं कळवं तिला.मनं जाणून घेतली ना की पुढे नात्यांची वीण छान बसते."
-------सौ.गीता गजानन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा