सासुबाई माझं चुकलं!

 #सासुबाई_माझं_चुकलं!


सत्यभामा काकूंनी एकटीच्या जीवावर उमेशला लहानाचं मोठं केलं होतं.  उमेशचे वडील नेहमी आजारीच असायचे.  त्यामुळे संसाराचा गाडा तिनेच तिच्या खांद्यांवर लिलया पेलला होता.  चिवडा,लाडू बनवून आजूबाजूच्या दुकानांमध्ये,जवळच्या ऑफिसांमध्ये ती विकायला ठेवी.


उमेश वयात येताच तोही आईला या कामात जमेल तशी मदत करी.वडील मधुमेहामुळे कायम आजारीच असायचे.  उमेश सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला व त्याला कँपसमधून बक्कळ पगाराची नोकरी मिळाली.  त्याने आईला फोनवरुन ही बातमी कळवली व घरी यायला निघाला.


आईने हलवायाकडून कंदीपेढे आणले व उमेश आला तसे देवासमोर ठेवले व देवाला प्रार्थना केली की असाच माझ्या लेकराच्या पाठीशी रहा.  उमेश आईच्या व वडलांच्या पाया पडला.  अति मधुमेहामुळे त्यांची आताशा वाचाही गेली होती.  काय हवं नको ते सांगण्यासाठी सत्यभामाकाकूंनी त्यांच्याजवळ एक बेल ठेवली होती. 


 त्यांनी बेल वाजवली की काकू त्यांच्याजवळ जात. ते खुणेनेच काय हवंय ते सांगत.अगदी लहान बाळाची करतात तशी सेवा सत्यभामा काकू आपल्या नवऱ्याची करत होत्या.  उमेशने त्यांच्या पायाला हात लावताच त्यांच्या डोळ्यांतून ऊन आसवं बाहेर पडली.  उमेश म्हणाला,"घाबरु नका भाऊ,तुम्ही लवकर बरे होणार."  उमेशने मग वडलांना व आईला पेढा भरवला व आईसोबत चाळीतल्या प्रत्येक घरी पेढे वाटायला गेला.


पेडणेकर काका तर उमेशचं हे यश पाहून खूप खूश झाले.  त्यांनी उमेशचं व उमेशच्या आईचं मनापासून अभिनंदन केलं.  फडके काकूंच्या नाकाला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबल्या कारण लहानपणी त्यांच्या राजशी त्या नेहमी उमेशची तुलना करायच्या व त्यांचा राज कित्ती कित्ती हुशार आहे हे चाळीत सांगत फिरायच्या. पण झालं उलटंच.  


फडके काकूंच्या अतिलाडामुळे राजमध्ये फाजिल आत्मविश्वास निर्माण झाला.  आपण हुशार मग आपल्याला जास्त अभ्यास करायची गरजच काय असं त्याला वाटू लागलं. चौथीला स्कॉलरशिप मिळवणारा राज फडके दहावीत दोन विषयांत नापास झाला.  मग मात्र त्याने शाळा सोडून दिली व इस्टेट एजंटच्या धंद्याकडे वळला.


उमेशच्या आईने उमेशसाठी नात्यातली एक मुलगी पाहिली. उमेशनेही आईच्या पसंतीला होकार दिला.  आदल्यादिवशी साखरपुडा व दुसऱ्यादिवशी लग्न पार पडले.  लग्नात सत्यभामा काकूंनी साऱ्या बायकांच्या साडीचोळी घालून ओट्या भरल्या.  कार्य यथासांग पार पडलं.  


दुर्वा दिसायला साधारणशी होती.  म्हणजे सावळी म्हणता येईल अशी.  उमेशने दहा दिवसांची सुट्टी घेतली होती.  पूजा,पाचपत्रावन,मामाच्या देवाकडे पाया पडायला जाणं यात सुट्टी भुर्रकन उडून गेली.  हवी तेवढी त्या पतीपत्नींची ओळख झालीच नाही.  


एकतर टिचभर जागा. .त्यात घरी आलेल्या पाहुण्या त्यांच्या रुमला कान लावूनच असायच्या. ही दोघं जरा काही बोलायला लागली की बाहेर पाहुण्यांची खसखस पिकायची.  त्यामुळे दुर्वालाही नवऱ्याशी हवं तसं बोलता येत नव्हतं.


दहा दिवसांसाठी ती  दोघं केरळला फिरायला गेली.  तिथे  निसर्गाच्या सानिध्यात त्यांना एकांत मिळाला. फुलांची पुडी अलगद उघडावी तशी दोन मनं एकमेकांजवळ मोकळी झाली. एकमेकांच्या आवडीनिवडी,चांगल्या वाईट सवयी जाणून घेतल्या गेल्या व प्रेमाच्या शिंपल्यात दोन मनांचे मोती एकत्र आले. 


 केरळमधील मुन्नार येथील एर्वीकुलम राष्ट्रीय उद्यान,गुलाब उद्यान त्या दोघांनी पाहिलं. बोटीवरुन सुंदर खेडी,तिथली भातशेते,छोटीछोटी चर्चेस,मंदिरै पाहिली.  पद्मनाभस्वामी मंदिराला भेट दिली. कन्याकुमारीला गेल्यावर स्वामी विवेकानंद स्मारक पाहिलं.  


दुर्वा केसांवरून न्हाऊन आली की टॉवेल बाजूला सारी व ओलेते केस जरासे झटकी. तिच्या त्या केसांतले जलमोती उमेशला वेडं करीत. पुन्हा तो तिला आपल्या बाहुपाशात घेई. तिचा चेहरा मग लाजेने गोरामोरा होई.  हे गुलाबी दिवस कधी वाऱ्यासारखे भुरकन उडून गेले दोघांनाही कळलंच नाही.


घरी येताच उमेश दुर्वाला आईकडे ठेवून पुण्याला नोकरीवर रुजू झाला. सासूसोबत दुर्वेचे छान गुळपीठ जमले होते. सत्यभामा काकूंना मुलगी नसल्याने त्या दुर्वाचे भरपूर लाड करीत.  दुर्वा त्यांना त्यांच्या उद्योगात मदत करु लागली.  सासऱ्यांची काळजी घेऊ लागली.


सगळं चांगलं चाललेलं काही विघ्नसंतोषी माणसांना बघवत नाही.  सत्यभामा काकूंच्या चाळीतल्या आगलावे काकू या नावाप्रमाणेच आगलावे होत्या.  दुर्वा त्यांच्याकडे 

फराळाची पाकीटं द्यायला गेली की त्या मुद्दाम तिला बसवून ठेवू लागल्या  व सासूविरोधात दुर्वेचे कान भरु लागल्या. 


कोवळं मन होतं दुर्वाचं.त्यात आगलावे काकूंनी विष पेरायला सुरुवात केली.  वेगळं रहाण्याचा विचार तिच्या मनात पेरला.  वास्तविक पहाता सत्यभामा काकूंनी कधीच कुणाचं वाकडं केलं नव्हतं पण काही लोकांना दुसऱ्याचं चांगलं चाललेलं कधी पहावतच नाही. 


 दुर्वा आताशा सासूशी जरा परकेपणानेच वागू लागली पण भोळ्या,गरीब,बिचाऱ्या सत्यभामा काकूंना ते लक्षात येत नव्हतं.  दुर्वा पुर्वीसारखी सासऱ्यांची काळजी घेईनाशी झाली.  त्यांच्या जागेवर सगळे विधी करण्याचा आत्ता तिला त्रास वाटू लागला.  


उमेश सुट्टीला आला की दुर्वा त्याच्याकडे वेगळं रहाण्याचं टुमणं लावू लागली.  उमेशला मग सत्यभामा काकूच म्हणाल्या ," मी आहे ना तुझ्या वडलांच बघायला.  तू दुर्वेला घेऊन जा तुझ्यासोबत एकटी कंटाळते इथे."


उमेशने मग कोथरुडमध्ये  ब्लॉक घेतला व दुर्वाला घेऊन गेला.  दुर्वाला उमेशचा नित्याचा सहवास फार आवडत होता.  जाईच्या फुलाप्रमाणे तिच्या कांतीवर नव्या नव्हाळीचे तेज येऊ लागले.  दोघांचं प्रेम दिवसेंदिवस बहरत होतं. 


 सत्यभामा काकू इकडे आपल्या नवऱ्याची सेवा व कुटीरोद्योग झेपेल तसा करीत होत्या. त्यांची गिराईकही वाढू लागली होती.  त्यामुळे हाताशी दहा बारा माणसं ठेवली होती. 


 पेडणेकर काकूंचा राज त्यांना मार्केटींगमध्ये मदत करायचा.  शेजारच्या बर्व्यांचा आशुतोष व शिंद्यांचा संतोष दोघंही रात्री कामावरुन आले की उमेशच्या बाबांची विचारपूस करायला जात व सत्यभामा काकूंना लागेल ती औषधं आणून देत. काकांना स्पंजिंग करायला मदत करीत.  पुरी चाळच सत्यभामा काकूंच्या मदतीला उभी होती. 


दुर्वाला आताशा काही खावेसे वाटेना.  अन्नावर वासनाच नव्हती तिची.  एकदा ती भाजी घ्यायला गेली असताना तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली व काही कळायच्या आत ती रस्त्यातच कोसळली.  भाजीवाल्याने तिला उठवले.  ती पुर्ण घामाघुम झाली होती.  


उमेशला फोन करुन कळवताच उमेश लगोलग तिच्यापाशी आला व तिला डॉक्टरकडे घेऊन गेला.  डॉक्टर स्मितांनी दुर्वाला तपासले.  तिची युरीन टेस्ट केली व उमेशला व दुर्वाला सांगितले,"अभिनंदन,तुम्ही आईबाबा बनणार अहात. पहिले तीन महिने फार जपून वागावं लागेल."


डॉक्टरांनी आवश्यक त्या गोळ्या,औषधं लिहून दिली.

घरी येताच उमेशने दुर्वाला आपल्या बाहुपाशात घेतले व तिच्यावर चुंबनांचा वर्षाव केला.  दुर्वाला कुठे ठेवू व कुठे नको असं उमेशला झालं होतं.  


दुर्वाला फार कडक डोहाळे लागले होते. अन्नाचा एक कणही पोटात टिकत नव्हता. तिचे ते हाल पाहून उमेशला फार अपराधी वाटे.  तो मनापासून दुर्वाची माफी मागे.  दुर्वा म्हणे," वेडा का रे तू?आपल्या बाळासाठी एवढं सहन करायलाच हवं.प्रत्येक स्त्री या यातना सहन करते. मी तरी कसा अपवाद असेन!"


सत्यभामा काकूंना ही गोड बातमी कळाली तेंव्हा त्या कोण आनंदल्या. आपल्या बेडवर निजलेल्या नवऱ्याच्या कानातही त्यांनी ही आनंदाची बातमी स़ागितली तेंव्हा ते क्षीण डोळे लकाकले.


उमेश दुर्वाची सर्वतोपरी काळजी घेत होता. अशक्तपणामुळे तिला अधुनमधून हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागत होतं.चौथा महिना लागला तशी तिची तब्येत   हळूहळू सुधारु लागली. 


 सत्यभामा काकू दर चार दिवसांनी तिला फोन लावून तिच्या तब्येतीची चौकशी करीत होत्या.  सातवा महिना लागला अन् दुर्वा माहेरी गेली. ओटीभरण्याच्या कार्यक्रमाला सत्यभामा काकू जाऊ शकल्या नाहीत पण उमेशकडे त्यांनी लाडक्या सुनेसाठी मोरपिसी रंगाची साडी,फळं,सोनचाफ्याची फुलं, मोगऱ्याचे गजरे,स्वतः बनविलेले तिच्या आवडीचे मोतीचुराचे लाडू व चिवडा पाठवला होता.  


निशिगंधाच्या फुलांचा मुकुट,बाजूबंद,गळ्यातला हार, जांभळ्या रंगाची साडी व मोकळ्या केसांत सोडलेली निशिगंधांच्या फुलाची जाळी..दुर्वा जणू फुलराणीच भासत होती.


उमेशने दुर्वाचे काढलेले ते फोटो पहाताना सत्यभामा काकूंचे डोळे आनंदाने पाणावले.  उमेश स्वतःशीच म्हणाला,कित्ती कौतुक आहे आईला आपल्या सुनेचं. सुनेने वेगळा संसार थाटला तरी तसुभरही प्रेम कमी झालं नाही हिचं.


दुर्वाचं माहेरपण अगदी छान चाललं होतं.  आजुबाजूच्या मैत्रिणींसोबत गुजगोष्टी,थट्टामस्करी चालायच्या.

दुर्वा माहेरी तिच्या वहिनीचं,आनंदीचं निरीक्षण करायची. तिची वहिनी तिच्या (दुर्वाच्या आईबाबांशी) पोटच्या पोरीसारखी वागत होती.  त्या दोघांचं औषधपाणी, पथ्याचं जेवण सगळं सांभाळत होती.  दुर्वाचा भाऊ त्यामुळे फार सुखी होता.


  दुर्वाच्या आईचा स्वभाव जरा कडकच होता पण आनंदी कधीच तिच्यावर रागवत नव्हती व दुर्वाच्या आईनेही तिच्या सुनेच्या मनाचं मोठेपण दुर्वासमोर उघड केलं होतं. दुर्वाला आत्ता आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला.  तिनं तसं आपल्या आईजवळ बोलुनही दाखवलं. 


उमेशच्या वडलांची तब्येत खालावली व हॉस्पिटलला नेता  नेता एम्बूलन्समध्येच त्यांचे निधन झाले.  उमेश तत्काळ आईकडे रवाना झाला. सगळे चाळकरी सत्यभामा काकूंच्या सांत्वनासाठी जमले होते.  


माणसं अंत्यविधी उरकून आली अन् इकडे सत्यभामा काकूंचा फोन वाजला.  दुर्वाच्या आईने त्यांना नातू झाल्याची बातमी दिली. सत्यभामा काकूंनी देवापुढे हात जोडले व म्हणाल्या," बरं केलंस देवा,माझ्या अस्थिपंजर पतीला नवीन देह दिलास."


बारसं झालं. बाळाचं नाव दुर्वेश ठेवलं..दुर्वा व उमेशचा मिलाफ..दुर्वेश.  दुर्वाला घेऊन जाण्यासाठी उमेश सासरवाडला गेला तेंव्हा दुर्वाने आपण आपल्या चाळीतील घरी बाळाला घेऊन जावूया असा हट्ट धरला. तिचे हे बोल ऐकून दुर्वाचे आईबाबा सुखावले व उमेशलाही खूप आनंद झाला.


 बाळबाळंतीण घरी पोहोचताच सत्यभामा काकूंनी भाकरतुकडा त्यांच्या अंगावरून ओवाळून टाकला व त्यांच्या डोळ्यांना पाणी लावले.

दुर्वेशचे पटापटा मुके घेतले.  दुर्वाने सासूचे पाय धरून तिची चूक कबूल केली असता सत्यभामा काकूंनी तिला छातीशी धरले. तिच्या डोळ्यांतली आसवं पुसली.  बाळाच्या आईने कसं खूष रहायचं असतं.हो की नाही दुर्वेश असं म्हणताच दुर्वेश खुदकन हसला.


------- सौ.गीता गजानन गरुड.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट