बावळट कुठची!


 #बावळट_कुठची!


सुलेखाचं लग्न झालं अन् तिने सासरचा उंबरठा ओलांडला. आधीच आईवडलांच्या विरहामुळे ती कावरीबावरी झाली होती. त्यात शेजारपाजारची,घरातली,नातेवाईक सारीजणं तिच्याकडे  प्राणी संग्रहालयातल्या दुर्मिळ प्राण्याकडे पहातात तसं येऊन येऊन पाहू लागली व एकमेकांच्या कानात कुजबुजू लागली. हळूच हसू लागली.


बिचारी सुलेखा पार गांगरून गेली. ज्या बायका तिला भेटायला येत होत्या.त्या तिच्या गळ्यातलं ,अंगठ्या,कानातली कुडी सारं काही निरखून पहात होत्या.मंगळसूत्र हातात घेऊन ते किती तोळ्याचं असेल हे खात्रीपूर्वक तिला सांगून तिच्याकडून खात्री करुन घेत होत्या.


 काहीजणी हे काहीच नाही आमच्या सुनेचं किती मोठं गंठन आहे अशा बढाया मारत होत्या.

सुलेखाचा हात हातात घेऊन बांगड्या सोन्याच्या की बेंटेक्सच्या असंही काहींनी तिला विचारलं. काहींनी त्या बांगड्या किती तोळ्याच्या असतील याचा अंदाज लावणं सुरु केलं.


पण कुणी एकानेही सुनबाई तू किती शिकली आहेस, तुझे छंद कोणते, तुला कोणती पुस्तकं वाचायला आवडतात, तुझा आवडता पदार्थ कोणता असं तिला विचारलं नाही.


हळूहळू पाहुण्यांची पांगापांग झाली. सुलेखा अजुनही अस्वस्थच होती.  तिच्या जावेने तिला हसतं करण्याऐवजी बाई गं तुझ्याघरुन तुझ्यासोबत एकतरी व्यक्ती आलेली. माझ्यासोबत तर कुणीच आलं नव्हतं बाई,अशी स्वतःचीच टिमकी मिरवली.


साताठ दिवस सगळी सुलेखाशी चांगली वागत होती पण नंतर मात्र सुलेखाला या ना त्या कारणावरुन चिडवण्यात जाऊबाईला  कोण आनंद वाटू लागला. आपण मोठी म्हणजे सुलेखाने आपण सांगितलेली सगळी कामे निमुटपणे केली पाहिजेत असा तिचा एकंदरीत आग्रह होता. 


सुलेखाला काम करायची आवड होती पण तिच्यावर माहेरी अशा ऑर्डरी कुणी सोडल्या नसल्याने तिचे मन खट्टू व्हायचे.  तिचं जरा काही चुकलं की जाऊबाई निमित्तच शोधायची व जरा सटकलेली दिसतेय असं नणंदेला हळूच सांगायची.  सुलेखाच्या कानात ते शब्द तापल्या लोखंडी सळीवर ओतलेल्या  पाण्यासारखे शिरायचे. पण सुलेखा हतबल होती.  तिला तिच्या आईवडिलांनी सगळं शिकवलेलं पण उलट उत्तर करणं शिकवलं नव्हतं.  सुलेखा काही उलट बोलत नाही याचा अर्थ ती बावळट आहे असा तिच्या जावेने घेतला.

सुलेखाला ते गाणं आठवायचं..

सब कुछ शिखा हमने न शिखी होशियारी

सच है दुनियावालो की हम है अनाडी..


जाऊबाईला एक लहान मुलगा होता. तो साधारण दिड वर्षाचा होता पण जाऊबाई सतत त्याला कामाच्या वेळी दुधाला घेऊन झोपून राही.  तिच्या मुलालाही  तसं झोपून रहाण्याची सवय झाली होती. ती बाजूला झाली की ते बाळ मोठमोठ्याने रडे मग सासू तिला त्याच्याबरोबर झोप म्हणून सांगे. तिचं चांगलंच फावे.


महिनाभरात जाऊबाई तिच्या शहरातल्या घरी निघून गेली. सुलेखाला जरा हायसे वाटले. पण तसं नव्हतं खरं. सुलेखाने केर काढला की तिची नणंद परत त्या जागेचा केर काढी. अगदी कपाटाखालून वगैरे केर काढून सुलेखा कसा नीट केर काढत नाही ते दाखवी. सुलेखा कोणती आमटी करायला गेली की नणंदबाई तिला वाटण काढून ठेव. फोडणी आई देईल म्हणून सांगे. 


 तिने कोणता पदार्थ बनविला तर तिच्यापेक्षा तोच पदार्थ तिची नणंद किती उत्कृष्ट बनविते असं सासू तिला सांगे. या अशा सासरकडच्या बायांच्या वागण्यामुळे सुलेखाला सासरची आपुलकी वाटण्याऐवजी तिचा जीव तिथे गुदमुरु लागला. माहेरची आठवण तिला प्रकर्षाने येऊ लागली.


सुलेखाचा नवरा हे सर्व पहात होता. एकदा त्याने त्याच्या बहिणीला समजावण्याचा प्रयत्न केला की सुलेखाशी जरा समजुतीने वागत जा . एवढं ऐकल्यावर सुलेखाची नणंद मोठमोठ्याने रडू लागली.  वहिनी दादाकडे आपल्या कागाळ्या करते म्हणू लागली.  सुलेखाच्या सासुलाही तिच्या मुलाचा फार राग आला.  दोघींनीही सुलेखाशी बोलणं बंद केलं.  सुलेखाला फारच एकटंएकटं वाटू लागलं.  शेवटी सुलेखाच्या नवऱ्याने ऑफिसजवळच रुम घेतली व तिथे आपला संसार थाटला.


सुलेखाला आपलेपणाची वागणूक आधीपासूनच घरच्यांनी दिली असती तर सुलेखाच्या नवऱ्याने वेगळा संसार कदाचित थाटला नसता.


नवऱ्याच्या आपुलकीने,प्रेमाने सुलेखा हळूहळू उमलू लागली.  सणासुदीला गोडधोड पदार्थ घेऊन ती सासरच्या घरी जाई.  सासरी सासुबाईला,नणंदेला साड्या घेई. तिने मनात कडवटपणा ठेवला नाही. सणासुदीलाही पैसे कमी असले तर सासुला साड्या घेई आपण आधीच्यातल्या साड्यांवर सण साजरा करे. तिचं मनच तसं होतं. तिला स्वतःसाठी घेण्यापेक्षा इतरांसाठी खरेदी करायला अधिक आवडायचं.  


सुलेखाची जाऊबाई मात्र सणासुदीला स्वतःसाठी भारीतल्या साड्या खरेदी करे व सासुला काही द्यायची वेळ आली की आमचंच आम्हाला पुरत नाही तर इतरांना कुठून देणार असं सांगे. जाऊबाई सासू पुढ्यात असली की तिच्याशी अगदी मधाळ बोले व ती बाहेर गेली की तिची चांगलीच मापं काढे.  सुलेखाला ते आवडत नसे. ती कोणाबद्दल सूलेखाजवळ चुगली करु लागली की सुलेखा तिथून पळ काढे त्यामुळे सुलेखा तिच्या नजरेतून एक नंबरची बावळट होती. जाऊबाई घरी कधी पैसे पाठवत नसे उलट सुलेखाला सांगे,"शंभर रुपये तुला नवऱ्याने घरी पाठवायला दिले तर पंचवीस रुपये तुझ्याजवळ ठेव .फक्त पंच्याहत्तर रुपये पाठव.  कोणाला काही कळणार नाही."


सुलेखा मात्र जाऊबाईच्या नादाला लागली नाही. तिच्या आईवडिलांनी तिच्यावर केलेले संस्कार तिने सार्थ ठरविले. हळूहळू सुलेखाचं मोठं मन तिच्या सासूने व नणंदेने मनातून तरी मान्य केलं.


--------गीता गजानन गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट