डॉब आणि खडाप
गीता गजानन गरुड.
आंब्रड.
#डॉब_व__खडाप
आमच्या गावी घरापासून पाचच मिनटावर आमचं शेत आहे.मी जेंव्हा सासरी गेले तेंव्हा नणंद ,सासू म्हणायच्या, "कपडे धुवूक डॉबात बरा वाटता.हय मोरयेत मजा नाय येना."माझ्या मनात त्या डॉबाविषयी कुतूहल निर्माण झालेलं.कसा दिसत असेल तो?
लग्नाची पूजा झाल्यावर एके दिवशी माझी नणंद मला तिथे घेऊन गेली.तेंव्हा उन्हाळा होता.त्यामुळे शेतात कापलेल्या भाताची पांढरीखुटं दिसत होती.डॉब म्हणजे एक पाणी नसलेलं छोटसं तळं होतं.उन्हामुळे ते आटलं होतं व त्याच्या आजुबाजूस काळे भले मोठे खडाप(खडक) होते.माझा लहानगा चुलत दिर नितू व नणंद तिथे गेलो.थोडसं चढून आम्ही खडकावर बसलो.बराच वेळ गप्पा मारत होतो.
या खडकावरुन दूरवर चोहोबाजूंनी डोंगराच्या रांगा दिसतात व डोंगराआड सुर्यनारायण जात असताना आभाळ विविध छटांनी भरून जातं.केशरी रंगाचा तो गोळा हळूहळू डोंगराआड लुप्त होतो.
पावसाळा सुरु झाला तशी मग शेतीची काम जोरात सुरु झाली.मला ते सारं नवीन होतं.आमच्या रानबांबुळीत बसकीचा तरवा काढतात,म्हणजे विटेवर बसून.
इथे जवळच नदी वहात असल्याने कुणग्यांत पाणी असतं.तरवा ओणव्याने काढावा लागतो.पण ओढायला सोपा जातो. पावसाळ्यात हे डॉब चांगलच भरलेलं असायचं.रात्री माझे दिर तिथे मासे पकडण्यासाठी डोंब्या लावून यायचे.सकाळी ते डोंबं घेऊन यायचे.त्यात मासे उड्या मारत असायचे.
तरवा लावणं तसं ऐऱ्यागैऱ्याचं काम नव्हे.चिखलात ओणवं उभं राहून आवे लावत मागे यावं लागे.माझी एकंदरीत कामातली प्रगती पाहून सगळ्यांनी मला घरातली कामं करायची जवाबदारी सोपवली.तिथेही सगळा आनंदीआनंदच होता.कारण मी स्टोव्ह कधी जन्मात पेटवला नव्हता किंवा चुल पेटवली नव्हती.नितू एवढासा,पण मला स्टोव्ह पेटवून द्यायचा.मला जमत असलेली कामं करुन ठेवायचे.बाकीची आई आल्यावर करायच्या.
मग थोडे दिवस मी आईकडे माहेरी गेले.साधारण गणपतीत घरी आले.तेंव्हा हा तरवा बराच मोठा झाला होता.पोटर्यांत दूध तयार झालं होतं.सगळीकडे, पूर्ण शेतात नजर टाकू तिथवर हिरवागार पट्टा. वरती निरभ्र आभाळ व खाली हिरवाई.या शेतात एक विहीर आहे,त्यात पांढरी कमळं,लाल कमळं फुलायची.नितू ती बरोबर काढून आणायचा,देवाच्या पूजेसाठी.
दुपारची मी आमच्या खोलीत झोपायला गेले की मोती येऊन खाटीखाली निजायचा.पहिली पहिली भिती वाटायची कारण कुत्रं म्हंटलं की मला जाम घाबरायला होतं, पण मोती खूप गुणी होता.
कपड्याची बादली,साबण वगैरे घेऊन मी म्हेरेवरून डॉबाजवळ जायचे.तिथे लहान खडकांवर बादली ठेवून डॉबातल्या नितळ पाण्याने कपडे धुवायचे.ब्रशची गरज नसे.खडकावर जरा घासले की स्वच्छ व्हायचे.मोती माझ्यामागून रोज यायचा व माझे कपडे धुवून होईपर्यंत मोठ्या खडकावर राजासारखा दिमाखात बसायचा.त्याला माहिती होतं,मला त्याची भिती वाटते,त्यामुळे अंतर ठेवून चालायचा.
डॉबातल्या पाण्यात पाय सोडले की बारके बारके मासे चावायचे,पेडिक्युअर करायचे. मग कपडे तिथे मोठ्या खडकावर वाळत टाकून मी घरी यायला निघाले की मोती आज्ञाधारक मुलासारखा माझ्या मागून यायचा.
हे रात्री आले की मात्र त्याला ताल येई.उभा राहून पुढचे
पाय त्यांच्या खांद्यावर ठेवी.ते बघूनचं पहिलंपहिलं मला घाबरायला व्हायचं .मग त्या दोघांच्या यारान्याची मला सवय झाली.
ह्यांना मासे पकडायचे विलक्षण वेड होते.कधीकधी कामावरुन अर्धी सुट्टी टाकून येत, मासे पकडायला.
शेतात अजून चार पाच डॉब होते.बादली घेऊन जात व दिर आणि हे दोघे मिळून डोबातलं पाणी उपसीत.चिखलात रुतलेले ठिगूर दिसायचे.ते हातात घेऊन आपटून की काय मारायचे.एकदोनदा कुसही लागलेलं पण हौस कांदे खाते म्हणतात तसं.
मग आई त्या ठिगरांच तिखलं बनवायच्या.या सराईतच लहान चिपटं मिळायची.ही चिपटं आम्ही फडतरीवर साफ करायचो.नंतर स्वच्छ करुन,त्यांना फक्त मीठ,मसाला व आगळ लावून ठेवतात व तव्यावर जरासं तेल घालून भाजतात.ही चिपटं अफलातून लागतात.
एकदा आम्ही डॉब उपसताना बादलीत कितीतरी लांब पाणसाप आलेला.तो बघून मी पी.टी.उषाच्या वेगाने म्हेरेवरुन घराकडे पळत गेलेले.परत त्यांच्यासोबत डोब उपसायला जायची हिंमत केली नाही.काही मासे,व माश्यांची चटणी एकत्र कालवून केळीच्या पानात नीट बांधून मुमरात ठेवत.सकाळी ती चटणी व तांदळाची भाकरी भारी लागे.
शेतकऱ्यांना खूपच कामं असतात.तेवढं ते भात कापायचं.पेंढे बांधून मांगरात आणून ठेवायचं,झोडायचं,त्याला वारा द्यायचा..गिरणीवर नेऊन तांदूळ,पोहे करुन आणायचे,चार कापायची..बरीच कामं.
तर हे डॉब मात्र मला फार आवडतं.मे महिन्यात डोबाच्या खडकावर ताडपत्री टाकून सोलं,कैरीचं आंबट सुकवतात.किती पिढ्यांचा साक्षीदार असेल तो डॉब व ते खडाप.
छायाचित्र सौजन्य: नितीन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा