तिची पाळी
#तिची_पाळी
दरवर्षी नित्यनेमाने संक्रांतीसाठी बिल्डींगमधल्या साऱ्या सख्यांना बोलावणारी वल्लरी आज मात्र अंधारात निपचित पडून होती. कित्ती आवडायचं तिला गोष्टीची पुस्तकं वाचायला! आत्ताही तिनं तिच्या आवडत्या विजया वाडचं पुस्तक घेतलं खरं पण डोळ्यात जमा झालेल्या पाण्याने पानावरची अक्षर दिसतच नव्हती. पुस्तकाचं पान मात्र आसवांनी भिजत होतं.
ह्या चारेक महिन्यापासून वल्लरीचं असंच चाललेलं. पाळी महिन्यातून दोनदा येत होती. कधी मध्ये दोनेक महिने येतच नव्हती. ती तिची एक सखीच खरी पण हल्ली त्या दोघींचा सूर जमत नव्हता. ती आली की वल्लरी अळूच्या पानासारखी कोमेजून जायची. अतिरक्तस्त्रावामुळे हैराण व्हायची.
कालच दादर फुलबाजारात जाऊन तिने व सोसायटीतल्या मैत्रिणींनी मोगऱ्याचे गजरे,चाफ्याची फुलं आणली होती. यावेळी तिने स्वतः तिच्या ज्वेलरी डिझायनिंग कलेचा उपयोग करुन साऱ्या सख्यांना वाण देण्यासाठी कर्णफुले बनवली होती. तिच्याच तर घरात तिळगुळाचा घाट घातला होता. अख्ख्या सोसायटीचं हळदीकुंकू म्हणून पाचेक किलोचे तीळगुळ साऱ्याजणींनी मिळून बनवले होते. हलवा मात्र विकत आणला होता. शिवाय काहीतरी अल्पोपहार हवा म्हणून तिने ढोकळ्याचं काम स्वतःच्या अंगावर घेतलं होतं. रात्री मार्केटिंग करुन ती घरी आली आणि कपडे बदलायला घेणार तोच तिला हिच्या आगमनाची चाहूल लागली. वॉश घेऊन येऊन तिने कुकर गेसवर चढवला व मेथीचे पराठे करायला घेतले तितक्यात साठे वहिनींचा फोन आला.
'अगं वल्लू ढोकळ्याची तयारी कुठवर आली?'
' वहिनी माझ्या न् जरा पोटात दुखतंय. जेवण आवरल्यावर करतेच तयारी.'
'काय होतय गं वल्लरी?'
'काही नाही विशेष, डेट आली ओ वहिनी माझी.'
'अगं बाई हो का..तिलाही आत्तच यायचं होतं🤔'
' तू तो ढोकळा चटणी काही बनवू नकोस हं. मी बघते कोणालातरी सांगून आणि हो तुला तर उद्या हळदीकुंकवाला येता नाही येणार. असं करते,मीच तुझं वाण तुला पाचव्या दिवशी आणून देईन. उगा अधेमधे शिवाशिव नको व्हायला. अगं बाई, आत्ता सोसायटीतल्या सगळ्या बायांच्या कानावरही घालायला हवं. तुझी वाट बघत बसतील नं. मी बाजूच्या राणीला पाठवते. तिच्यासोबत तू वाणासाठी तयार केलेली कर्णफुलं तेवढी पाठव हो.'
वल्लरीने फोन ठेवला पण तिला फारच अगतिक वाटू लागलं. राणी येऊन वाणं घेऊन गेली. रात्री तिचा नवरा,वरदही जरा उशिराच घरी आला. वल्लरी तोवर निजली होती. वरदनेच त्याच्याजवळ असणाऱ्या चावीने दार उघडलं. टेबलवर ठेवलेलं जेवण जेवला व गुमान झोपला. हल्लीच पदोन्नती झाल्याने त्याची जबाबदारी वाढली होती. त्यांचा मुलगा अभिषेक औरंगाबादला शिकायला होता त्यामुळे दिवसभर वल्लू घरी एकटीच असायची. नाही म्हणायला तिच्या मैत्रिणी होत्या खऱ्या पण त्यांना त्यांचे व्याप असायचे.
सकाळीही वरद फार लवकर ऑफीसला गेला. अतिरक्तस्त्रावामुळे वल्लू रात्रभर स्वस्थ निजली नव्हती. शिवाय एक पाय ढोपरापासून फुटत होता,तो भिंतीवर अधुनमधून आपटत होती. वरदला रात्री तिचं दुखणं जाणवत होतं. त्याने मध्यरात्री उठून तिच्या पायावर स्प्रेही मारला होता.
वल्लू जरा उशिराच उठली कारण पहाटेपहाटे कुठे तिचा डोळा लागला होता. तिने उठताच बेडशीट चेक केली. बेडशीट डागाळली होती. ती तिने धुवायला टाकली. भरपूर गरम पाण्याने न्हायली . डायनिंग टेबलवर वरदने तिच्यासाठी सँडविज तयार करून ठेवलं होतं. थर्मासमध्ये कॉफी होती. ते पाहून तिला खूप समाधान वाटलं. सँडविज व कॉफीचा आस्वाद घेत तिने वरदला लव यु चा मेसेज टाकला. वरदनेही तिला तितकाच गोड रिप्लाय दिला. दुपारी दोन वेळची भाजी,आमटी तिने बनवली. थोडा भात लावला व टिव्ही पहात जेवून घेतलं.
संध्याकाळ होत आली तसं तिला अधिकच अस्वस्थ वाटू लागलं. तिनेच तर दोन डान्स बसवले होते, खास हळदीकुंकूच्या कार्यक्रमासाठी. लहान्या मुलींची पायऱ्यांवरची धावपळ तिला अधिकाधिक जाणवत होती व त्याबरोबर तिचा अस्वस्थपणा वाढत चालला होता. तिच्या सर्वांगाला घाम फुटला होता. तिला खूप ओरडावसं,रडावसं वाटत होतं.
इतक्यात दाराची बेल वाजली. वल्लरीने दार उघडलं. तिची वन्स आभा दारात हसत उभी होती. वल्लूने तिला आत घेतलं. तिला पाणी आणून दिलं.
'वल्लू,अगं बरं नाही तर कळवायचं होतस ना मला.'
वल्लूने मग आभाला सोसायटीतल्या हळदीकुंकवाबद्दल व तिने त्यासाठी केलेल्या मेहनतीबद्दल सांगितलं. तसंच पाळीमुळे तिला जाता आलं नाही म्हणून किती वाईट वाटतंय हेही सांगितलं.
'वल्लू,तू तरी दिवा लावलास का गं आज? नाही नं. तसंच त्या बायांचही आहे. पुर्वापार आपल्या मनावर घट्ट बिंबवले गेलेले विचार सहजासहजी नाही मिटवू शकत स्त्रिया. तरी हल्ली हल्ली थोडाफार बदल जाणवतोय मला. तू घरात असतेस म्हणून जाणवत नसेल तुला.'
आभाने मग स्वतःच दिवावात केली. दोघींनी मिळून पोळ्या बनवल्या. जेवण गरम केलं व टेरेसमध्ये गप्पा मारत बसल्या.
'आभा, मला आधी पाळीचा कुठे त्रास व्हायचा गं. आत्ता मात्र कधी लवकर येते कधी उशिरा. येते तेंव्हा फारच ब्लीडींग होतं. मग गळून पडते गं मी. यायच्या आधी आठवडाभर ओटीपोटात भरपूर दुखतं. येऊन गेल्यावर दहा दिवसतरी अतिरक्तस्त्रावामुळे आलेला अशक्तपणा रहातो. वरद घेतो ग मला सांभाळून पण तोही हल्ली फार उशिरा घरी येतो व अभिच्या परीक्षा चालू आहेत त्यामुळे त्याला मी उगा माझं दुखणं नाही सांगत. किती लांब रहातं लेकरु माझं! आईला बरं नाही म्हंटल्यावर बेचैन होईल.
'अगं वल्लू चाळीशी उलटली नं तुझी. आत्ता पाळी जाण्याच्या मार्गावर असते. त्यामुळे होतो थोडा त्रास.'
'थोडा काय म्हणतेस! हा एकटेपणा मला अंगावर येतो. उगाचच रडू येतं. असं वाटतं कोणाशी तरी कचाकचा भांडाव. पण भांडण्यासारखं कोणी काही केलं पाहिजे नं. वरद किती जपतो मला!'
'वल्लू,आपण डॉक्टरकडे जाऊन तुझी सगळी तपासणी करुन घेऊ.'
वरद आल्यावर तिघंही एकत्र गप्पा मारत जेवले. बऱ्याच दिवसांनी वल्लरीने आभाच्या आग्रहाखातर गाणं म्हंटलं. रात्री बराच वेळ त्या तिघांच्या गप्पा रंगल्या.
दुसऱ्या आठवड्यात आभा वल्लरीला स्त्रीरोगतज्ञ डॉ. हर्षा वागळे यांच्याकडे घेऊन गेली. डॉ. हर्षांनी वल्लरीला तपासलं. वल्लरीने डॉक्टरांना तिला होणारा त्रास सांगितला.
डॉक्टरांनी तिच्या काही टेस्ट करावयास सांगितल्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी वल्लरीने डॉ.नी सुचविलेल्या सेंटरमध्ये जाऊन सगळ्या टेस्ट करुन घेतल्या.
वल्लरी,वरद व आभा तिघंही रिपोर्ट घेऊन डॉ. हर्षांकडे गेले.
वल्लरीचे रिपोर्ट पाहिल्यावर डॉक्टर हर्षा म्हणाल्या, ''वल्लरी तू कधी पाळी मागेपुढे जाण्याच्या गोळ्या घेतल्या होत्या का?''
वल्लू म्हणाली,"बरेचदा. म्हणजे आत्ता अनियमिततेमुळे गोळ्या घेता येत नाहीत. पण पाळी नियमित होती तेंव्हा गणपती,दिवाळी,मार्गशीर्ष, संक्रांत,होळी अशा सणाच्या वेळीच नेमकी डेट असायची. मग सगळ्यांचाच हिरमोड होऊ नये म्हणून या गोळ्या घ्यायचे."
डॉ. म्हणाल्या,"कुठून घ्यायचीस?"
"जवळच्या मेडीकलमधून. सगळ्या तिथूनच तर घेतात. माझ्या एका मैत्रिणीनेच तर सजेस्ट केलेलं मला. आत्ता डेट टू डेट येत नसल्याने नाही नं घेऊ शकत. त्यामुळेच तर काल सोसायटीच्या हळदीकुंकू समारंभालाही जाऊ शकले नाही मी."
डॉ. म्हणाल्या, "अगं या गोळ्या डॉक्टरी सल्ल्याशिवाय कधीच घेऊ नयेत.तुम्ही जेंव्हा बाहेरून progesterone पाळी पुढे जायच्या गोळ्यांच्या स्वरुपात (norethistrone) घेता तेंव्हा तुमच्या शरीरातील संप्रेरकांची(harmones)पातळी तुम्ही वाढवता. त्यामुळे पाळीच्या काळात गर्भाशयातील जे अस्तर पडून जात असतं त्या नैसर्गिक प्रक्रियेला तुम्ही
विरोध करता. तुम्हाला वाटतं पुढच्या पाळीत सगळं निपटून जाईल.
खरं म्हणजे ज्या स्त्रियांना अतिरिक्त रक्तस्त्रावाचा त्रास होतो, किंवा ज्यांना गर्भाशयाचा कर्करोग आहे अशा स्त्रियांना पूर्ण त्यांच्या केसचा अभ्यास करुन या गोळ्या आवश्यकता असल्यास आम्ही रेकमेंड करतो. फारच गरज असेल तर एखादेवेळी तीन चार दिवस या गोळ्या घेण्यास हरकत नाही पण तेही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. तुम्ही अक्षरश: चण्या, शेंगदाण्यासारख्या या गोळ्या घ्यायला लागला आहात. याचे घातक परिणाम तुमच्या घरच्या मंडळींनाही कळले पाहिजेत.
या गोळ्यांच अतिसेवन केल्याने डोकेदुखी, अनियमित रक्तस्त्राव, नैराश्य, वजन वाढणे, शरीरावर जास्तीची लव वाढणे, चक्कर येणे,यक्रुताच्या कार्यात बिघाड होणे, काविळ,ब्रेन स्ट्रोक,पँरालिसिस, फिट येणे,वारंवार गर्भपात होणे, तसेच पाळीसंबंधी समस्या(pcod) ,फायब्राँइड ह्या व अश्या अनेक आजारांना तुम्ही महिला बळी पडता.
तुझे रिपोर्ट्स मी पाहिले. काही फायब्रॉईडच्या गाठी आहेत. मी काही गोळ्याऔषधं देते. त्यांनी फरक पडेल. शिवाय तू नियमित चाललं पाहिजे. व्यायाम केला पाहिजे.
वल्लरी, तू जो मानसिक थकवा सांगत आहेस ,त्याचंही कारण सांगते. स्त्रीच्या शरीरात बिजांडातून इस्ट्रोजन हे संप्रेरक स्त्रवते.या संप्रेरकावर आपले पाळीचे चक्र अवलंबून असते. 45-50 या वयात बिजांड हे संप्रेरक बनवण्याचे काम कमी कमी करत हळूहळू थांबवते. त्यामुळे पाळी एक दोन वर्षे अनियमित होते व नंतर हळूहळू बंद होते.
यादरम्यान अंगातलं कँल्शिअम कमी हौतं.त्याने हाडं ठिसूळ होतात. चयापचय क्रिया मंदावते. अन्नपचन नीट होत नाही. निद्रानाश होतो. अंगातून गरम वाफा निघतात. वात वाढतो अंगातला. त्याने कंबरदुखी, गुढगेदुखी होते.
कोणाला अंगावरुन पांढरे जाते. कोणाला अतिरक्तस्त्राव होतो. चिडचिडेपणा येतो.
उगीच रडू येतं. स्तनांचा आकार लहान होतो. वजन वाढतं, कमरेकडच्या, पोटाकडच्या भागाची चरबी वाढते. रक्तवाहिनींत मेद जमा होतो. रक्ताभिसरण क्रिया मंदावते. तणाव, एकटेपणा जाणवतो, भूक लागत नाही, स्मरणशक्ती कमी होते. योनीमुख संकुचित होते, त्याची लवचिकता कमी होते,.सारखी थेंबथेंब लघवी होते.
हे सारे आजार एकाच स्त्रीला होतात असे नाही. प्रत्येकीला काही न काही त्रास होतो. यावर उपाय म्हणजे गोळ्याऔषधांबरोबरच तू रोज व्यायाम केला पाहिजेस. शिवाय स्वतः ला कोणत्यातरी छंदात व्यस्त कर."
आभा म्हणाली,''अगं तुझी चित्रकला किती छान आहे! तू चित्रकलेच्या ट्युशन घेऊ शकतेस.''
डॉ.हर्षा वरदकडे वळल्या.
मि.वरद,'कबुल आहे,तुम्ही फार व्यस्त असता. पण तुमची मिसेस मेनोपोजच्या फेजमधून जात आहे. तेंव्हा तुमच्या सोबतीची तिला नितांत गरज आहे. तुमचा काही ठराविक वेळ हा तिच्यासोबत घालवा. रोज सकाळी तिच्यासोबत फिरायला जा. एकत्र जीमला जा.' वरदने होकारार्थी मान हलवली.
वरद व आभाने दुसऱ्याच दिवशी ड्रॉईंग बोर्ड, कागद,रंग,ब्रशेस सगळं वल्लरीला आणून दिलं. ते साहित्य पाहून वल्लरीला खूप आनंद झाला. तिने चित्र काढायला प्रारंभ केला. पहिलंच आभाचं स्केच काढलं. ते स्केच आभाने तिच्या मैत्रिणींना दाखवलं तसं मैत्रिणींनी आपली मुलं वल्लरीकडे क्लासला पाठवायला सुरुवात केली.
मुलांच्या सहवासाने रंगांच्या दुनियेत,वल्लरीभोवती निर्माण केलेला एकटेपणाचा कोष गळून पडला.खास महिलांसाठी, वारली पेंटिंग, सिरेमिक पेंटींग,ज्वेलरी मेकींगचे क्लास तिने सुरू केले.
माघी गणपतीच्या जत्रेत वल्लरीने एक स्टॉल टाकला व त्यात मुलांची चित्रे व महिलांनी तयार केलेल्या सिरेमिक पॉट, इमिटेशन ज्वेलरी विक्रीसाठी ठेवल्या. ग्राहकांचा छान प्रतिसाद मिळाला. मुलांनाही स्वकमाईचं समाधान लाभलं. या प्रयोगामुळे तिच्याकडे शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी संख्येतही वाढ झाली.
रोज सकाळचं वरद व वल्लरीचं जॉगिंग व जीम चालू होतचं. या निमित्ताने दोघांच्या सहवासाचा वेळही वाढला. त्यांच्या नात्याचं छान रिनोवेशन झालं. दोन महिन्यांनी पुन्हा सोनोग्राफी केली असता फायब्रॉईड निघून गेल्याचे निदर्शनास आलं. डॉ. हर्षांनी वरद व वल्लरीचं कौतुक केलं व अशीच जीवनशैली चालू ठेवा म्हणून सांगितलं. आभाला हे कळताच ती खूप खूष झाली.
चैत्र उजाडला.आभाचा सकाळीच फोन आला. फोनवर आभाने वल्लरीला हळदीकुंकवाचं आमंत्रण दिलं. पण वल्लरीने नाही म्हंटलं कारण तिचा तिसरा दिवस होता.
' ते काही नाही. तू हळदीकुंकवाला येणार आहेस. हे बुरसटलेले विचार नष्ट करण्यासाठी आपण आपल्या घरातून सुरुवात केली पाहिजे वल्लू आणि ती मी करणार. तू मला साथ देशील नं?'
वल्लरी काहीच बोलली नाही. तिने फोन ठेवून दिला व आभाकडे जाण्यासाठी कोणती साडी नेसावी,कोणते दागिने घालावे,नथ घालावी का?याचा विचार करु लागली.
बेल वाजली म्हणून आभाने दार उघडले तर दारात हसतमुखाने वल्लरी उभी होती.
दोघींनी मिळून मग छान चित्रांगण रेखाटलं. कैरीची डाळ,पन्ह बनवलं. झोकात हळदीकुंकू केलं.
---------गीता गजानन गरुड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा