आमचे अण्णा

 गीता गजानन गरुड.

आंब्रड.


#आमचे_अण्णा


अण्णा म्हणजे माझे चुलत सासरे.त्यांच्या बायकोला आम्ही सर्वजण अण्णांच्या काकी म्हणतो.तर हे अण्णा नी अण्णांची काकी हे दोघेही आमच्या कुटुंबातले लय महत्त्वाचे सदस्य.जीवंत झराच म्हणा.😊


अण्णा लहान असतानाच त्यांचे वडील देवाघरी गेले.अण्णांना दोन बहिणी होत्या.एक बहीण कायमचीच आजारी असायची.अण्णांच्या आईने या तिन्ही मुलांना शेतमजुरी करुन,गोधड्या शिवून लहानाचे मोठे केले.घरची परिस्थिती गरीब असल्याकारणाने अण्णांना लवकर शाळा सोडावी लागली.


अण्णा जसे मोठे होऊ लागले तसे दुसर्यांच्या घरी गडीपण करु लागले.गडीपण म्हणजे..शेतीच्या काळात आपलं जोत नेऊन लोकांची शेती करुन देणे,चार कापणे,भात कापणे,मळणी करणे,गवताची तणस करुन देणे,पावसाळ्यात लोकांची गुरे माळरानावर चरायला घेऊन जाणे,गुरांना वैरण घालणे,पाणी दाखवणे..अशी कामे ते करीत.अण्णांना कसलंच व्यसन नाही.पानतंबाखूचंही नाही. खरंतर आमच्या घरात सगळेच निर्व्यसनी.हा गप्पांच व्यसन मात्र आहे.

मात्र खाण्याचे शौकीन.आपण बनवलेल्या एखाद्या पदार्थाची अण्णा तोंड भरुन पावती देतात.


भातकापणीनंतर कोकणात म्हेरा बांधायची कामं असतात.अण्णा लोकांच्या म्हेरा बांधून द्यायचे.कवळं तोडण्याचे काम करायचे.लोकांच्या परड्यांची,घराभोवतालची कुंपणे(वय) करुन द्यायचे.

आपल्या घरच्या शेतीसोबत इतरांचीही कामं करुन देऊन हातातोंडाची जुळवाजुळव करायचे.कोणाचा तरवा,भातकापणी मागे राहिली तर अण्णा न बोलवता त्यांच्या मदतीला जातात.


गरीबीतही माणूस अत्यंत समाधानी व चेहरा सदाहसरा.कधीच कुणाला अपशब्द बोलत नाहीत किंवा कुणाचं मन दुखवत नाहीत.मोकळाढाकळा स्वभाव.कोणाशी बोलताना पहिलं,'वायच ऐकून घेशीत'अशी सुरुवात करतात.मला 'सुने' अशी हाक मारतात.वायच चायचा पानी असला तर देवा सांगतात नी शेवाचे गोटे.😊


गणपतीच्या दिवसांत वाडीतल्या लोकांचे बाप्पा डोक्यावरून आणणे हे त्यांच फार महत्त्वाचं काम असे.त्यासाठी लोकं त्यांना आधीच सांगून ठेवत.प्रत्येक मुर्तीमागे फक्त एक श्रीफळ मिळे.पण अण्णा श्रद्धेपोटी हे काम आनंदाने करायचे.तसंच विसर्जनाच्यावेळीही अण्णांना लोक हक्काने बोलवतात.


आमच्या घरचा गणपती आणण्यासाठी अण्णा व त्यांचे भाऊ कसालला चालत जायचे.अण्णांचे लहान लहान पुतणे त्यांच्यासोबत जाण्यासाठी हट्ट करायचे पण अंतर जास्त असल्याने घरातली नकार द्यायची.तरी अण्णा घरातल्यांना पटवून आपल्या पुतण्यांची गँग बाप्पा आणण्यासाठी घेऊन जायचे.घरच्यांना सांगायचे,"त्यांका काय उचलून घेवून जावचे हत.ते चालत येतले आमचेबरोबर,येऊंदेत तेंका."


त्यावेळी आमची व अण्णांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती.त्यामुळे पेटारे आणण्यासाठी पैसे नसायचे तरी अण्णा जुळवाजुळव करुन आपल्या प्रत्येक पुतण्याला दोन चार कासारे पेटारे(फटाके)आणून द्यायचे.हे कासारे पेटारे त्यावेळी भरपूर प्रसिद्ध होते.

गणपतीच्या दिवसांत संपूर्ण वाडीत अण्णा आपल्या पुतण्यांना भजनाला,आरतीला घेऊन जायचे.गावातला धैकाला,सप्ताह,पूजा,.या सगळ्या कार्यक्रमांना अण्णा आपल्या पुतण्यांना आपल्यासोबत घेऊन जायचे.


वाडीत कोण आजारी पडलं तर त्याला डाँक्टरकडे नेण्यासाठी लोकं हक्काने अण्णांना हाक मारतात.रात्रीअपरात्री वाडीतल्यांच्या वेळप्रसंगाला अण्णा धावून जातात.कणकवलीच्या बाजारातून जास्तीचे सामान आणणे असो,लोकांचे भात गिरणीवर पोचवणे,तांदूळ करुन आणणे,दळण आणणे..ही सर्व कामे अण्णांनी केली आहेत.अण्णांच्या डिक्शनरीत नाही हा शब्द नसावा पण आत्ता वयोमानापरत्वे त्यांना ही कामे झेपत नाहीत.


गरिबीमुळे अण्णांचे लग्नही जरा उशीराच झाले.पण या विठोबाला साजेशी अशीच रुक्मिणी मिळाली.सावळी,नाकीडोळी नीटस अशी.सदैव हसतमुख. अण्णांसारखीच आपल्या घरातली कामं संपवून इतरांना मदत करणारी.ही काकी मात्र पानसुपारी खाते.आरामात पानाचं ताट पुढ्यात घेऊन बसते.कसल्याकसल्या गजाली करीत सुपारी कातरते अन् पानाचा विडा बनवून खाते.बाळंतपणानंतर मुलांची,बायकांची मालीश काकी आनंदाने करते.गणपतीच्या वेळी करंज्या,लाडू बनवण्यात काकीचा हातखंडा.कितीही माणसांच जेवण करायचं असुदे.कंटाळा नाही.मोठेमोठे भाताचे,आमटीचे टोप उतरवते.जेवणानंतर भांड्यांचा खटारा काढण्यातही पुढे.आळशीपणा कसला तो नाहीच.😍


काकीचं घर पुर्वी नळ्यांच व शेणाने सारवलेलं होतं.आकाशी रंगाच्या,खाली शेंदरी पट्टा असलेल्या भिंती..आम्ही गावी गेलोकी बहुदा दुपारी अण्णांच्या काकीकडे पडीक असायचो कारण तीचं घर..अतिशय सुंदर सारवलेलं.उन्हाळ्यात पंखा नसतानाही त्या घरात कधी गरम व्हायचं नाही.काकीच्या पडवीत पाटा वरवंटा आहे.काकी त्यावर छान गंधासारखी चटणी वाटून आमटी बनवे.हाताला लय भारी चव.


अण्णांच्याकाकीला दोन मुलगे.दोघांचीही आत्ता लग्न होऊन त्यांना दोनदोन मुलं आहेत.त्यातला धाकटा नितू.माझं लग्न झालं तेंव्हा हा चौथीत होता.माझे मिस्टर तेंव्हा वैभववाडीच्या हाफिसात होते.उशीर झालाकी तिथंच रहायचे.मग नीतू माझ्यासोबत झोपायचा.जाम लाथा मारायचा,लोळायचा.माझे मिस्टर त्याला जेवायला बोलवल्याशिवाय जेवत नव्हते.


आत्ता अण्णांनी नवीन घर बांधलय.ही मुलं नोकरीची वाट बघत राहिली नाहीत. त्यांनी घरासमोरील जागेत पोल्ट्री सुरु केली.शिवाय सुना आठवड्याच्या बाजारात नारळ,कांदे विक्री करतात.त्याही कष्टाळू आहेत.काकी आत्ता नातवंडं सांभाळते.सुनांना खूप जीव लावते.वाटेन जाताना कुठचंही फुलं असो ते काकीच्या वेणीत जाऊन बसतं.


आमच्याइथे एखाद्या बाईचा नवरा गेला तर इतर सवाष्ण स्त्रियांनी बारा दिवस तिचं तोंड पहायचं नाही अशी कुप्रथा आहे.माझे मधले दिर गेले तेंव्हा मी तिच्या सांत्वनासाठी गेले असता काही तिर्हाइत मला चांगलेच रागे भरल्या पण काकी मला म्हणाली गीता तु काही चुकीचं केलं नाहीस.इतर बायकांचा रोष पत्करुन काकीने माझ्या जावेची बारा दिवस सेवा केलेली.काकी म्हणायची,"माझो देव असो हलक्या इचारांचो नसा.माका जा वाटतला ता मी करतलयं.मी कुनाक घाबरत नाय." काकीने तिला बारा दिवस जेवण देणे,तिचे कपडे धुणे..ही सर्व कामे केली.तेंव्हा मला तिचा अभिमान वाटलेला.कुठे इतर शिकलेल्या अंधश्रद्धाळू बायका आणि कुठेही आमची अर्धशिक्षित तरी माणुसकी जपणारी,अंधश्रद्धेच्या आहारी न जाणारी काकी.


सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच या दोघांचीही सदैव इच्छा असते.जास्त देवदेव करत बसत नाहीत.माणसातल्या देवाची सेवा करतात.ह्या दोघांच्याही तोंडून कधी कोणाबद्दल राग,दुस्वास ऐकला नाही.


लोक म्हणतात माणसांचे मुखवटे असतात.पण मी पाहिलैत अशी बिनमुखवट्याची माणसं.मला ते सुने म्हणून हाक मारतात तेंव्हा लय भारी वाटतं.☺️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट