माळा
माळा
हा शब्द आता तसा हद्दपार झाला आहे. आमच्या चाळीतल्या घरात लाकडी फळ्यांचा माळा होता. या माळ्याच्या एका कोपऱ्यात दांडीवाला पंखा होता. एका वास्याला ट्युबलाइट लावलेली होती तर दुसऱ्या कोपऱ्यात एकावर एक दोन ट्रंका ठेवलेल्या. त्यात गोधड्या,चादरी,वगैरे ठेवलेल्या असायच्या. माळ्याच्या तिन्ही बाजूंना जाडजूड पुठ्ठे लावलेले होते. शेजारच्या माळ्यावर शशीची आजी निजायची. तिच्या नि आईच्या तिथूनच आज काय बनवलेलंपासून काय दुखतय पर्यंत गप्पा रंगायच्या.
डाव्या बाजूच्या घरातल्या मामी बाबा घोरताना श्वास कोंडत असला तर आईला सांगायची,माई कुशीने झोपायला लावा.
माळ्याचं छप्पर कौलांचं होतं. एक कौल काचेचं होतं..त्यातून उजेड यायचा. बिछान्यांचे रोल करुन ठेवले की याच माळ्यावर मी अभ्यासाला बसायचे. पुस्तकावर येणारा धुळीकणमिश्रित कवडसा मला फार जवळचा वाटायचा. त्यात बोटं घालून त्याला मधेच अडवायला आवडायचं मला.
या फुट्ट्यांवर कितीतरी गणितं सोडवली..रासायनिक अभिक्रिया लिहिल्या..अंगात कुठूनशी शिक्षिका यायची नि अद्रुश्य मुलं माझ्यासमोर बसायची..मग मी फळा,खडू आणि ती मुलं एकरुप व्हायचो. मांजरही फिरायची रात्रीची एका माळ्यावरुन दुसऱ्या माळ्यावर..कधी कुणाच्या माळ्यावर घाण करुन ठेवायची मग त्या माळ्याची मालकीण उठल्याउठल्या ती घाण निस्तरायची नि मांजराला घालघाल शिव्या घालायची. कोणाच्या तावडीत असं घाण करणारं मांजर सापडलंच तर त्याच्या पेकाटात दांडा पडायचा मग ते लंगडत चालायचं. बाहेर इतकी जागा असताना लोकांच्या माळ्याची शौचालयं करणं ही चूकच नाही का! वास्यावरनं उंदीर फिरु लागले की हीच मांजरं त्यांना खाऊनतरी टाकायची किंवा आपली शिकार आणून एखादीच्या अंथरुणात ठेवून जायची मग परत या मांजरांचा उद्धार व्हायचा.
माळ्यावरुन दोनतीन खोल्यांत मोठ्याने बोललेलं ऐकू यायचं. शशीची आई म्हणायची..तुमचे कापून तुकडे करतो ,नि तुम्हाला मीठमसाला लावून बरणीत भरतो..शिस्त म्हणजे शिस्त..तुम्ही एका सुशिक्षित आईच्या मुली अहात..मला तिचे संवाद पाठ झालेले..लोणचं केलेल्या शशीशैलाच्या तिखटमीठ लावलेल्या बरण्या मला दिसायच्या नि भितीच वाटायची.
मी छोट्या भावाला उठवण्यासाठी कविता म्हणायचे..उठा उठा चिऊताई..सारीकडे उजाडले..डोळे कसे चिमुकले अजुनही मिटलेले..शशीच्या आईला ते गाणं आवडायचं मग मला परत म्हणायला लावायची.
रात्री मला फार वेळ झोप यायची नाही..आई माझ्या अंगावर गोधडी घालायची व चिंधीने माझे हातपाय बांधून ठेवायची. छोटा भाऊ बाबांच्या बाजूला झोपायचा. चाळीतल्या मुलांच बघून त्याला कोणत्याही वस्तूला,माणसाला पाय लागला तर पाया पडायचं हे कळू लागलेलं..बन्यांचा सतीश तर टमरेलाच्याही पाया पडत जायचा. माझा भाऊ रात्री बाबांना पाय लागला तर झोपेतच उठून पाया पडायचा मग बाबा सकाळी त्याची गंमत सांगायचे. ताई लाथा हाणायची सटासट. मी तोंडावर गच्च पांघरुण घेऊन निजायचे..कुठूनही भुताला आत एन्ट्री मिळू नये म्हणून.
एकदा माळ्यावरून कोण पहिलं उतरणार यावर माझी नि भावाची शर्यत..मी शिडीवर होते..शिडीच्या बाजूस मोकळी जागा होती..त्यावरून भावाने उडी मारली..तो लादीवर पडला खाली..बुबुळं वर गेली त्याची..बाळ पडला म्हणताच माझे चुलत आजोबा फीट येऊन पडले..काहीजणं त्यांना कांदा लावायला धावली..मला काहीच कळत नव्हतं..भावाला केइएममधे घेऊन गेले मग तो बरा होऊन आला तसे आजोबाही बरे झाले.
याच माळ्यावर कोण पाहुणी आली की आम्ही उशा,चादरी घेऊन तंबू बनवायचो..घरघर खेळायचो. आत्तेबहीण आली की ती गोष्टींघ्या जगात न्यायची..अर्ध्यामुर्ध्या वयातल्या तिच्या त्या गोष्टी ऐकायला भारी वाटायच्या..आता हसू येत़ं..आता ती प्रसिद्ध रेडीओलॉजिस्ट आहे. भूतकाळ गिरवायला आवडतंय. काल्पनिक लिहिण्यात मेंदूला जोर द्यावा लागतो तर भूतकाळ गिरवताना मेंदूवर थंडगार धबधब्याचं पाणी पडून मेंदू शांत शांत होतोयसं वाटतं.
------सौ.गीता गजानन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा