मी एक चिमणी


 पहिलं माहेर अगदी जवळ होतं दहा मिनटांच्या अंतरावर. सुट्टी पडली की भाच्या फोन लावायच्या,"आत्ते,आज येऊ तुझ्याकडे?" मग या म्हणून सांगायचा अवकाश..सायकली हाकीत यायच्या दोघीही..आधीच गोर्यापान..उन्हाने लालगुलाबी होऊन यायच्या. 

मोठी पक्की शाकाहारी..तिला तूपभात दिला तर आवडीने खाते नि छोटी माझ्या लेकासारखी चिकनमासे खाऊ. काय बनवून घालेन ते तिघं मिळून खायची..मग नवा व्यापार काढायचे..थोडा वेळ पैश्यांच्या वाटण्या. छोटू बँक व्हायची..आम्ही तिघं खेळायचो.

 ते झालं की एसी सुरु करुन हवा असायचा. थोडं थंडात पडायचे..परत तीन दप्तरं काढायचे..त्यात काय भेटतील त्या वह्यापुस्तकं भरुन ए भंगारवाले करत बेडरुमधून हॉलमधे फेऱ्या मारायचे. मग दादासोबत कॉम्पुटरवर गेम चालायचा. छोटूला त्यात इंटरेस्ट नसायचा. ती ब्रश,रंग,पाणी,वही,स्केचपेन घेऊन कलाकारी करण्यात मग्न असायची. कधी अंधारघुडूप करुन पिक्चर लावून तंगड्यात तंगड्या घालून बघत बसायचे. एकदा तर भूताचा हनिमुन म्हणून पिक्चर लावला..माझी इकडे हवा टाइट..काय बघतायत नि काय नाय. ठीकठाक होता पिक्चर. 

एकदा छोटूला घेऊन बँकेत गेले..एन्ट्री करुन आणायला. उन्हात छोटू लालेलाल. मला म्हणते,"हे काम तू उद्या करु शकली असतीस ना." संध्याकाळचं बागेत खेळायला घेऊन जायचे. तिघं मिळून बॉलबॉल,घसरगुंडी..मस्त खेळायची..मग भेळ,शेवपुरी..छोटू बाहेरचं खात नसल्याने चोकोज वगैरे घ्यायची. बाकी दोघं मस्त हाहाहूहू करत खायची..खूप मजा यायची. 

आता मोठी भाची यंदा दहावीला..छोटी आठवीत. माझा कॉलेजात..तिघं भावंडं आपापल्या उद्योगात मग्न..मी एक चिमणी..माझ्या पिलांचं बालपण वेचतेय..त्यात हरवतेय.


--सौ.गीता गजानन गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट