कातरवेळ


 गीता गजानन गरुड.

आंब्रड.


#कातरवेळ


सोसायटीतले सीनिअर सिटीझन्स पावसाळ्यात दोन दिवस सावंतकाकांच्या गावच्या घरी फिरायला जातात. सकाळची गाडीने प्रवास करायचे ठरते पाच महिला व पाच पुरुष समोरासमोर बसतात. 

सुनंदाने थर्माससमधून आणलेला आलं, वेलची घातलेला चहा कागदी कपांतून सर्वांना देते.

गाडी चालू असताना असा सुनंदाच्या हातचा घरचा चहा अगदी फर्मास लागतो.

त्याबरोबर खायला गुलाबच्या सुनेने बनवलेल्या कुकीज गुलाब सर्वांना देते.

सगळीजणं गुलाबच्या सुनेच्या बेकींग प्राविण्याचं कौतुक करतात.


गाण्याच्या भेंड्या ताल धरु लागतात.

एकापेक्षा एक हिंदी गाणी,

है प्रित जहाँ की रित सदा, मैं गीत वहाँ के गाता हूँ भारत का रहेनेवाला हूँ भारतके गीत सुनाता हूँ..खोतकाका तालात गातात. बाकी मंडळी त्यांच्या सुरात सुर मिळवतात.

गुलाब गाते,होठोंपे ऐसी बात मैं दबाके चली आई खुल जाये वही बात तो दुहाई हो दुहाई।

कोरगावकर सुरु करतात,इन्ही लोगोने इन्ही लोगोने ले लिया दुपट्ट मेरा...

रमा गाते,रात्र काळी घागर काळी

यमुना जळे ही काळी ओ माय

बुन्थ काळी बिलवर काळी 

गळामोती एकावळी काळी ओ माय..।

बने गातात, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे..

मग या भेंड्यांत दुपार होते.


विमलने ठरल्याप्रमाणे खमंग मेथीचे ठेपले व बनेकाकांनी दहीबुत्ती ,जोडीला आवळ्याचं लोणचं सौ.कडून मस्का मारुन करून आणलेलं असतं. सगळी यावर ताव मारतात.

डब्यात एक छोटा बाळ व त्याचे आईबाबा असतात.त्यांनाही या आनंद सोहळ्यात सहभागी करतात.


मग सर्वजण डुलकी काढतात.

गाडीतून या सिझनमध्ये कोकणाचं निसर्गसौंदर्य डोळ्यांत साठवण्यासारखं हिरवगार असतं.मधेच कुठे फांद्यांवर माकडं दिसतात, कुठे ह्या हिरवाईत गुरे चरताना दिसतात.डोंगरावरुन पाण्याचे धबधबे वहात असतात.

लाल मातीची कौलारु घरं दिसू लागतात.


कणकवलीला सगळी उतरतात. तिथून आंब्रडला  सिक्स सिटर करतात.

सगळ्यांनी आपली घरं नवीन बांधली पण सावंतकाकांनी अजूनही त्यांच घर तसंच ठेवलय, लाल मातीचं शेणाने सारवलेलं,समोर खळा,खळ्यात तुळस.

आजूबाजूला पोफळी,माड, चिकू,फणस,आंब्याची झाडं,चहूबाजूंनी जास्वंदीची वय.

घराची देखभाल करायला नात्यातल्या रामभाऊंना व त्यांच्या बायकोला ठेवलेले असते.


न्हाणीतल्या कढत पाण्यानं सगळी जणं पोटभर स्नान करतात.

रात्रीच्या जेवणात घावणे,बटाट्याची गोडी भाजी,गावठी चण्यांची आमटी असा बेत असतो.सगळीजणं यथेच्छ जेवतात व वळईत लांबलचक गोधड्या अंथरतात.काहीजण पत्ते खेळतात.

बायका आपले हितगुज करतात.


दळवीकाका म्हणतात,बऱ्याच दिवसांनी आपुलकीनं वाढलं मला .नाहीतर घरी मला जेवायला वाढतात पण सून,नात,मुलगा माझ्याशी दोन प्रेमाचे शब्द बोलत नाहीत. मला आपल्यात धरतच नाहीत. मग काय आमच्या हिच्या फोटूशी हितगुज करतो.


राणेकाका म्हणतात,"दोन मुलांना मी माझं सगळं  डबोलं

दिलं.आत्ता औषधांसाठी मला त्यांच्यापुढे हात पसरावे लागतात. फार गरीब झाल्यासारखं वाटतं."


गुलाब म्हणते, "आताशीनं मला असंच चटपटीत खावसं वाटतं. पण या मधुमेहाने अंग खिळखिळं झालयं.करुन खाण्याची ताकद नाही. अभिमानाने तुम्हाला सांगते, मुलगा अमेरिकेत आहे.पण मला व यजमानांना इथे पोळीभाजीच्या डब्यावर गुजराण करावी लागते. नाही म्हणायला शेजारची बापटांची सून कधी थालीपीठ, लोणी, मसालेभात आणून देते. फार लाघवी पोर. वेळ असला की आमच्याशी प्रेमाचे चार शब्द बोलते. माझ्या केसांना मेंदी लावून देते. आमचे हे नी ती व.पु.प्रेमी आहेत. त्यांचे विचार,गप्पा रंगतात. कुठचे पुर्वजन्मीचे ऋणानुबंध होते तिच्याशी देव जाणे.


सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग येते.

रामभाऊच्या शेवंताने चुलीवर चहाचे आधण ठेवलेले असते व शिरवाळ्या रसांची तयारी चाललेली असते.

बनेकाका,राणेकाका,विमल,शोभा तिला मदत करत असतात.कुणी नारळाचा रस काढून देतं तर राणेकाका शेवंताने सोऱ्या घातलेला गरमगरम पिठाचा गोळा सोर्याने गाळतात,बनेकाका खाली केळीचे पान धरुन त्यात शिरवाळ्या जमा करुन मग सुपातल्या केळीच्या पानावर ठेवतात. 

टोपात गरम पाण्यात भागवलेल्या तांदळाच्या पिठाचे गोळे तरंगत असतात.

बर्याच शिरवाळ्या तयार होतात.

सर्वजणं न्हाणं झाल्यावर रस शिरवाळ्या यथेच्छ खातात. 

ज्यांना अजिबात गोड खायचं नाही तीही चवीपुरता रस घालून खातात.


मग रामभाऊ यांना शेतात नेतो.शेतात तरवा काढण्याचं,लावण्याचं काम चालू असतं.

काढण्याचं काम सोप्पं पण लावायला थोडं कसबं लागतं.

भाताची चार पाच रोप आडवी चिखलात रुतवायची , एक आवा रुतवला की त्याच्या दोन्ही बाजूंना दोन आवे असे एका लायनीत चिखलात ओणवं उभं राहून लावायचं.

सगळी हौसेनं हे काम शिकून घेतात व करतात.


शेतात छोटं तळं असतं.

त्यातं पांढरी कमळं फुललेली असतात. 

वरती निळभोर आकाश, चोहोबाजूंनी  हिरवागार शालू नेसलेल्या डोंगररांगा, वार्यावर हलणारा गर्द पोपटी तरवा. काहीजणं फोटोत ते सीन कँप्चर करतात. दुपारी परत रस शिरवाळ्या खातात व जरा आराम करतात.


शोभा म्हणते,"सूनबाई तासनतास आईशी बोलते फोनवर पण माझ्याशी दोन शब्द बोलायला तिला वेळ नाही."

तशी पोर बरी आहे.

नवऱ्याचं ,मुलाचं सगळं करताना तिची दमछाक होते. म्हणून मी पोळ्यांचं काम माझ्याकडे घेतलयं.

संध्याकाळची भांडी घासते.

तेवढीच माझ्या म्हातारीची मदत.

पण आपण दहा शब्द बोललो तर ही दोन शब्द बोलणार. मी म्हणते आई नाही म्हंटलसं तरी चालेलं पण आईशी करतेस तसं मन मोकळं कर माझ्याशी.

मलाही कळते तुझी धावपळ.

पण कसलं काय, इकडचं तोंड तिकडं करुन निघून जाते.

तरी गुणी आहे माझी सून. 

मला आजारपणात हलायला देत नाही.

रात्री जागून माझ्या तब्येतीची काळजी घेते.

माझ्या आवडीचा गोडाचा शिरा, मेथीची पेज करते.

वेळेवर औषध,गोळ्या,ऊन पाणी देते."


पेंडसे म्हणतात, "आत्ता विषय निघालाचं आहे तर सांगतो.

दोन वर्षापूर्वी मला मुलाने अमेरिकेला न्यायचा बेत रचला होता. 

सून म्हणाली,"चला बाबा आपण तुमच्या बँकेत जाऊन तुमचं खातं बंद करुया. तुम्ही नि ममा तिथे आमच्यासोबत रहाणार,मग इथे खात्याची गरजच काय?"

मी सरळ आठलेकराला फोन लावला. काही झालं तरी लंगोटीयार आम्ही.आयुष्यातले सगळे निर्णय एकमेकांच्या सल्ल्यानेच घ्यायचो.

आठलेकर म्हणाला,"पेंडश्या, माझी आण हाय तुला. खातं बंद करशील,ट्रान्स्फर करशील तर दात तोडून हातात देइन म्हणायला दातही राहिले नाहीयेत तुझ्या बोळक्यात.

माझ्याकडे पाठव त्या जोडगोळीला मी शाळा घेतो त्यांची." आठलेकर प्राथमिक शाळेत या जोडगोळीचे शिक्षक होते.त्यांच नावं ऐकताच बरोबर गप्प बसले दोघे. मात्रा लागू पडली.


"तू वाचलास रे पेंडश्या,तुझ्या मित्रामुळे,गवस म्हणतात., "माझा मुलगा,कसलीतरी स्कीम आहे सांगून आमच्या हिच्या अंगावरचे बोरमाळ,लक्ष्मीहार,तोडे,बांगड्या असे सारे दागिने मोहिनी घालतात तसे घेऊन गेला. माझ्या बायकोला लंकेची पार्वती केली रे त्याने."


कोरगावकर गप्प गप्प असतात,मग एक सुस्कारा सोडून म्हणतात," काय सांगू,आमच्या हिची बायपास सर्जरी झाल्यापासून खूप भिती वाटते रे.उद्या सकाळी ती माझ्या बरोबर असेल की नाही अशी धाकधूक वाटत रहाते.

तीही रात्रीचं उठून माझं पांघरुण नीट करण्याच्या निम्मित्ताने माझा कानोसा घेत असते.

भा.रा.तांबे म्हणून गेलेत रे,

सूर्य तळपतील,चंद्र झळकतील,

तारे अपुला क्रम आचरतील

असेच वारे पुढे वाहतील.

होईल काही का अंतराय

मी जाता राहील कार्य काय?

पण मला नाही रे हे खरं वाटत.जोडीदार गेलेली माणसं रेटायचं म्हणून आयुष्य रेटत आहेत.

तरुणपणात रुसवेफुगवे,तावातावाने भांडणं,मग हळूहळू संसाराचं लोणचं मुरतं.

त्याची चव चाखायला घेणार तोच पैलतीर खुणावू लागतो."


संध्याकाळी पुरुष माणसं रामभाऊबरोबर मासे पकडायला जातात.

बायका शेवंताला मदत करायला घरी थांबतात.

पाट्यावर सारासाठी चटणी वाटतात.

म्हळवे,खवळे,वाळय,शेंगटे,ठिगुर नी फातका घेऊन येतात.

चुलीवर गरमगरम भाकर्या करतात.

माश्यांचा सार करतात.

थोडे वाळय,ठिगूर, म्हळवे,शेंगटे भाजतात.

जेवण लाजवाब होतं तेही कंदीलाच्या प्रकाशात.

रात्री खळ्यात बसून अंधारलेल्या गर्द झाडींतला काजव्यांचा खेळ बघतात.


सकाळी नाश्त्याला खापरोळ्या असतात.

नाश्ता करुन ही सर्वजण भदगवतीदेवीच्या मंदिरात जातात.

मंदिरात जाताना वाटेत गाणी गातात.

उमा गाते, आठवणींच्या आधी जाती

तिथे मनाचे निळे पाखरू

खेड्यामधले घर कौलारू...

शोभा म्हणते,तुका साद तुझ्या माहेराची वाट देता गो

कानी मायेच्या त्या सागराची गाज येता गो...


मंदिरात गेल्यावर भगवतीदेवीचे दर्शन घेतात.

तिथल्या निरव शांततेत देवीच्या सानिध्यात थोडा वेळ बसतात.

दुपारी थोडी वामकुक्षी घेतात.

रामभाऊ व शेवंताला घेऊन संध्याकाळी सिंधुदुर्ग किल्ला पाहून येतात.

रात्री तिथूनच जेवून येतात.

 सकाळी जाण्याची तयारी करतात.

राणे सर्वांना काजूगर,कुळथाची पुठी,उकडे तांदूळ,कोकम अशी भेट देतात.

सर्वजण रामभाऊ व शेवंताचा निरोप घेऊन त्यांना परत यायचे आश्वासन देऊन परतीच्या प्रवासाला लागतात.

कोकणची ही सफर त्यांना खूप काही देऊन जाते.😍😍

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट