सुंदरी
#सुंदरी
मी अमोघ धुरी. कोकणातील एका खेड्यात वडिलोपार्जित कौलारू घर आहे आमचं. भातशेती आहे. आम्ही तिघे भाऊ. थोरले दोघे नोकरीनिमित्ताने मुंबापुरीत स्थायिक झाले. मी धाकटा..आईबाबांचा लाडका. त्यांना सोडून लांब रहायला जाणं. ओ नो..कल्पनाच नाही करु शकत.
बी.एड केलं. वैभववाडीच्या जिल्हा परिषद शाळेत चिकटलो प्राथमिक शिक्षक म्हणून. आईबाबा खूश झाले. एकतरी मुलगा आपल्या म्हातारपणीची काठी होईल म्हणून. बऱंच वधुसंशोधन सुरु होतं माझ्यासाठी पण अगदी जुळत आलेलं कार्य मोडत होतं. दर रविवारी मुलगी पाहून अन् चहा कांदेपोहे खाऊन खाऊन, मी आत्ता कंटाळलो होतो.
आईलापण सांगितलं, थोडे दिवस ही मोहीम थांबवुया नाहीतर पोट फुटून पोटातून पिवळेधम्मक पोहे बाहेर पडायची भिती.
आज आमच्या शाळेत तपासणी होती. तालुक्यावरुन गटशिक्षणाधिकारी येणार होते. ते नेमके उशिरा आले. सगळं आवरेपर्यंत मला शाळेतच साडेसात वाजले. स्टँडात आलो तर सात चाळीसची गाडी निघून गेलेली. आत्ता सकाळशिवाय आमच्या गावाकडे जायला गाडी नव्हती. मी शाळेतच मुक्काम करायचं ठरवलं.
शिपाई शाळेला कुलुप लावून जातच होता. मी त्याला सांगितलं की मी तिथेच थांबणार आहे. संध्याकाळी आजुबाजूची मुलं येऊन शाळेच्या पटांगणात खेळत होती. माझा जीव रमला. मीसुद्धा थोडावेळ बॉलिंग केली. पोरं जाम खूश झाली.
तिन्हीसांज झाली तशी पोरं पांगली. मी शाळेच्या व्हरांड्यात बसलो. मला चित्र काढायची हुक्की आली.
आमच्या शाळेच्या भिंतीवर काळा ऑईलपेंट मारुन फळे बनवले होते. मुलं त्यावर सुविचार लिहायची. मी एक डस्टर घेतला व फळा पुसला. पांढरा खडू घेतला व तन्मयतेने चित्र काढू लागलो. मी काही मोठा चित्रकार नव्हतो पण का कोण जाणे माझ्या बोटांतून चित्र फळ्यावर झरझर रेखाटले जात होते. थोड्याच वेळात चित्र पुर्ण झाले. मी आत्ता जरा भानावर आलो. फळ्याकडे नीट निरखून पाहिलं. एका सुंदर स्त्रीचं चित्र फळ्यावर उमटलं होतं.
थोड्याच वेळात गावकरी आले. त्यांनी माझ्यासाठी डबा आणला होता. डब्यात डुकराचं मटण नी भाकऱ्या होत्या. बघताच तोंडाला पाणी सुटलं. मी हात धुतले व मन लावून भाकरीमटण खाऊ लागलो.
अतिशय रुचकर बनवलेलं. आताशा डुकरा़च्या शिकारीवर बंदी आहे,पुर्वी नव्हती. ग्रामदेवाचा कौल घेऊन जमावाने लोकं डुकराची पारध करायचे. त्याला गावपारध म्हणीत.गावकार अण्णाचं लक्ष फळ्यावर गेलंच. ते म्हणाले,”गुरुजी, हे चित्र तुम्ही काढलंत?” मीही हो म्हणालो.तरी त्यांच्या नजरेत संशय होता.
अण्णा मला म्हणाले,”आमच्या घरला रातच्याला निजायला चला.” मी कांकू करत होतो. अण्णांनी मला बळेबळे ओढत नेलच.छान चौसोपी वाडा होता त्यांचा. अण्णांनी एका खोलीत माझी निजायची व्यवस्था केली. आपण स्वत: अंगणातल्या बाजेवर निजले. भरपेट जेवण जेवल्यामुळे माझा डोळा लागला.
कौलारू घर असल्यामुळे व आजुबाजुला भरपूर झाडं असल्याने छान गार वाटत होतं. मध्यरात्री मला खिडकीच्या काचेजवळ कसलातरी आवाज आला.तसा मी भ्याड नाहीच. मुळात माझा देवावरही विश्वास नाही. म्हणजे पुर्वी होता पण सारखे अपयश पदरी पडू लागल्यावर तो गळून पडला होता. आमच्या घरी मात्र रोज शिवलिलाम्रुत, दत्तबावनी सुरु असायची.
मी खिडकीजवळ गेलो. तिथे एक बाई खिडकीच्या बाजूने वळचणीला उभी असलेली दिसली. मी बाहेर आलो. अण्णांच्या घोरण्याचा आवाज वातावरणात घुमत होता. मी त्या बाईजवळ गेलो. गर्दजांभळी लुगडं,खणाची चोळी,हातात हिरवागार चुडा,कपाळाला भलं मोठं कुंकू ,डोळ्यात काजळ,रेखीव भुवया,पाणीदार डोळे,नाकात मोत्याची नथ,कानात डुल,गळ्यात मंगळसूत्र,सैलसर अंबाडा,त्यावर गजरा,..मला संध्याकाळी मी काढलेलं चित्रच माझ्या समोर उभं आहे असं वाटलं. मी तिला विचारलं,” बाई,इतक्या रात्री हिथं कुठं?”
मला म्हणाली,” मास्तर,रानात गेले हुते.ती बघा मोळी.येईपर्यंत रात झाली. वायच तुमची बेटरी दाखवा.”
तिने मोळी उचलून डोक्यावर घेतली. मी तिच्या मागून चालत होतो. गार वारं अंगाला झोंबत होतं.मधुनच वटवाघळांचा थवा डोक्यावरुन फिरत होता. जोरात वारा सुटला होता. झाडांच्या फांद्यांतून खेळत होता.त्यामुळे विचित्र आवाज ऐकू येत होते.
वातावरणात एक दमटपणा,गिळगिळीतपणा आला होता. ती वाटेतल्या विहिरीपाशी थांबली. तिथल्या कळशीने पाणी काढलं व मला थोडं पाणी प्यायला दिलं. आपण प्याली. पौर्णिमेचा चंद्र आकाशात शोभून दिसत होता पण त्याहीपेक्षा विहिरीतल्या पाण्यात त्या सुंदरीचं मुखकमल उठून दिसत होतं. मी तर तरुण होतो. मी पुरता तिच्यावर मोहित झालो.
परत तीने मोळी उचलली व झपझप पावलं टाकत चालू लागली. तिचं ते ठेक्यात चालणं माझ्या काळजाचा ठाव घेत होतं. तांबडं फुटेपर्यंत आम्ही चालतच होतो. तांबड फुटताच ती झाडीत कुठे लुप्त झाली. मी थकूनभागून त्या झाळीतच पडलो. पडलो तिथेच निजलो.
डोळे उघडले तेंव्हा अण्णांच्या खाटीवर होतो. अण्णांना घडलेली घटना सांगितली तेंव्हा अण्णा म्हणाले,” गुरुजी, तुमचं घराणं दत्तभक्ताचं म्हणून वाचलात.त्या विहिरीच्या बाजूला घर होतं तिचं. नवरा व ती शेती करून पोट भरायची. एकदा दरोडेखोरांनी घरावर दरोडा घातला तेंच्या. नवऱ्याच्या कपाळावर कुराडीचा घाव घातला. बिचाऱ्याचा खेळ एका घावात आटपला.
सगळं सोननाणं लुटलंच पण हरामखोरांनी हिचं शीलही लुटलं. त्या विहिरीत जीव दिला तिने.पौर्णिमेला दिसते लोकांना ती. म्हणून सहसा लोकं बाहेर पडत नाहीत रात्री. तुमची तर खोलीत सोय केलेली मी तरी इथपर्यत आली म्हणजे बघा.”
थोडं बरं वाटताच मी अण्णांसोबत त्या विहिरीजवळ गेलो. विहीर कोरडीठाक होती. मातीने बुजली होती. मग मी पाणी कुठचं प्यायलो? मला दरदरुन घाम फुटला.
तेंव्हापासून आजतागायत दत्तगुरुंचा जप नियमित करतो. या गोष्टीला आत्ता दोन वर्ष झाली. मधल्या काळात लग्न झालं पत्नी दिसायला सुंदर आहे. एक बाळ आहे आमचं.
पण दर पौर्णिमेला रात्री मला तो प्रसंग आठवतो मग मी दत्तगुरुंचा जप सुरु करतो. थोड्याच वेळात दत्तगुरु त्यांच्या मांडीवर थोपटून मला निजवत आहेत असा भास होतो. माऊलीच्या मांडीवर मी शांत निजतो.🙏🙏
———-सौ.गीता गजानन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा