शुभमंगल
#शुभमंगल
विभा व रामचं शुभमंगल झालं.राम सैन्यात होता.नव्या नवलाईचे दिवस कापरासारखे उडून गेले.रामचा ड्युटीवर जाण्याचा दिवस उजाडला.निरोपाचा तो जीवघेणा प्रसंग.विभाच्या सासूने तिला समजावलं की फौजी मायभुमीच्या रक्षणाकरीता जाताना त्याच्या पत्नीने,आईने त्याला सुहास्यवदनाने निरोप द्यायचा असतो.विभाने सासूने सांगितल्याप्रमाणे वागण्याचा आटोकाट प्रयत्न केला.अश्रुंना थोपवून धरले मात्र राम गेल्यावर सासूच्या कुशीत शिरून लहान बाळासारखी रडली.सुधाताई, तिच्या सासू तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिल्या व त्यांनी तिला निवांत निजवले.
हळूहळू विभा सासरी रमली.फोनवर तिला तिच्या रामची ख्यालीखुशाली समजे.त्यांच्या घरी मोठे कपाट होते,गोष्टीच्या पुस्तकांचे.विभा त्या गोष्टींत हरवून जायची .शिवाय सुधाताई तिला छानछान पदार्थ बनवायला शिकवत होत्या.विभालाही स्वैंपाक करणे फार आवडे...
राम येण्याची तारीख जवळ आली होती.विभा खूप खूश होती..राम येणार म्हणून तिने सगळ्या घराची साफसूफ केली.तिच्या आवडीचे फुलाफुलांचे अबोली रंगाचे बेडशीट व उशांचे अभ्रे आणले.रामला आवडणार्या पदार्थांची सुधाताईंकडून माहिती करुन घेतली..व त्याप्रमाणे यादी बनवून वाण्याला नेऊन दिली.सुधाताईही सुनेची लगबग पाहून फार खूश होत्या.
रात्रीचे दहा वाजले असतील..फोनची रिंग वाजत होती.सुधाताईंनी फोन उचलला.पलिकडून रामच्या निधनाची बातमी त्यांच्या कानी आली.रामचे वडीलही देशासाठी शहीद झाले होते.रामला नको म्हणत असतानाही राम हट्टाने सैन्यात गेला होता . आज शत्रूची एक गोळी एका भारतीय सैनिकाच्या छातीत घुसली होती व तो भारतीय सैनिक सुधाताईंच्या पोटचा गोळा,राम होता..सुधाताईंनी तिथेच बसकन घातली व मोठ्याने आभाळालाही तडे जातील असा हंबरडा फोडला.आजुबाजूची माणसं जमा झाली.
विभा बिचारी लवकर निजलेली.तिला उठवून ही वाईट बातमी काही शेजारणींनी सांगितली..पण विभाची नजर एकदम स्थिर झाली..तिला जबरदस्त धक्का बसला.विभाच्या डोळ्यांतले अश्रूच जणू नाहीसे झाले.खरंतर तिने रडणं गरजेचं होतं.तसा प्रयत्न तिच्या आईने,बहिणींनी केला. पण.. काही उपयोग झाला नाही.रामचं असं अकाली जाणं विभाचं कोवळं मन मानायलाच तयार नव्हतं.
दुसर्यादिवशी संध्याकाळपर्यंत रामचे पार्थिव तिरंग्यात लपेटून त्याच्या गावी आणण्यात आले.त्याच्या गावातली तसेच पंचक्रोशीतील सर्व गावकरी या शुर योद्ध्याचा अंतिम निरोप घेण्यासाठी आले होते.शासकीय इतमामात रामच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली व अंतिम संस्कार करण्यात आले.
विभाचे आईवडील बारा दिवस विभा व सुधाताईंसोबत राहिले.विभाच्या आईने तिला माहेरी चलण्याचा आग्रह केला मात्र, विभा म्हणाली,"अगं आई,चार दिवसांत राम येणार आहेत.मी सगळं सामान आणून ठेवलंय.मला रामच्या आवडीचे मोतीचुराचे लाडू व भाजणीच्या चकल्या बनवायच्या आहेत.घरात एवढी कामं पडलैत.मला येता येणार नाही.त्यापेक्षा तुम्हीच राम जाईपर्यंत इथे रहा.माझ्या सासूबाईंनापण आवडेल." व ती सुधाताईंकडे उत्तराच्या अपेक्षेने पाहू लागली.
@गीता गरुड
सुधाताईंनी विभाच्या आईची कशीतरी समजूत काढली व मनात म्हणाल्या,'या नाजूक कळीसाठी तरी मला माझे दु:ख विसरले पाहिजे.हिचं आयुष्य परत वळणावर आणलं पाहिजे.'
सुधाताईंची भाची रिना मनोविकारतज्ञ होती.सुधाताई विभाला रिनाच्या क्लिनिकमध्ये घेऊन जाऊ लागल्या.सात आठ सिटींग्समध्ये विभात सुधारणा दिसू लागली.एका सिटींगमध्येतर विभा भरून आलेलं आभाळ कसं कोसळतं,अगदी तसं धो धो रडली. सुधाताईंना हायसं वाटलं.विभा, तिने स्वतःभोवती विणलेल्या कोशातून बाहेर आली व तीने सद्यस्थितीचा स्विकार केला.दोन महिन्यात विभा बर्यापैकी सावरली पण तिच्या चेहर्यावरचे तेज मात्र हरपले..अकाली प्रौढत्त्व आलं.
सुधाताईंचा पुतण्या, अमर एका प्रायव्हेट कंपनीत कामाला होता.त्याची काही काळासाठी रत्नागिरीच्या युनिटमध्ये बदली झाली .तो सुधाताईंकडे,रत्नागिरीला राहू लागला.विभा अमरची सगळी सरबराई करी.त्याचा नाश्ता,त्याचं जेवणखाण..सगळं विभा बघत असे.अमरमध्ये व रामध्ये बरंच साम्य होतं.तीच उंची..तीच चेहर्याची ठेवण,तसेच दिलखुलास हसणे..
विभाला अमरमध्ये राम दिसे..पण ती स्वतःला सावरे. विभालाही अभ्यासाची आवड असल्याने,अमरच्या सल्यानुसार तिनेही एमपीएससीच्या परीक्षेचा फार्म भरला.दोघं एकत्र अभ्यास करु लागले.संध्याकाळी फिरायला जाऊ लागले. आजुबाजूच्या बायाबापड्यांमध्ये कुजबूज सुरु झाली.
सुधाताईंच्याही कानावर ही कुजबूज आली पण सुधाताई हलक्या कानाच्या नव्हत्या.परीक्षा झाली.अमरचे रत्नागिरीतले प्रोजेक्टही संपले तसा तो त्याच्या पुण्याच्या घरी गेला.दूर गेल्यावर अमर व विभाला एकमेकांची उणीव जाणवू लागली.फोनवर गप्पा रंगू लागल्या.सुधाताई हे सर्व पहात होत्या.कोमेजलेली कळी पुनश्च उमलताना पाहून सुधाताईंना समाधान वाटले.
एमपीएससीचा निकाल लागला.अमर व विभा दोघेही अव्वल गुणांनी पास झाले.अमरची उपजिल्हाधिकारी या पदासाठी निवड झाली..तर विभाची गटविकास अधिकारी या पदासाठी निवड झाली. दोघांनाही पुण्यात यशदामध्ये ट्रेनिंग घ्यावे लागणार होते.अमर तर तिथेच रहायचा.
सुधाताई विभाला घेऊन अमरच्या घरी जाऊन राहिल्या.एके संध्याकाळी सुधाताईंसमोर अमरने त्याच्या व विभाच्या प्रेमाची कबुली दिली.सुधाताईंनी अमरच्या आईवडलांकडे ह्या दोघांचा विषय काढला.अमरची आई तयार होत नव्हती..तरी सुधाकाकूंनी हळूहळू तिचे मन वळवले.तिथल्या जवळच्या देवळात वैदिक पद्धतीने अमर व विभाचे लग्न पार पडले.सुधाताईंनी साश्रू नयनांनी विभाला निरोप दिला व त्या रत्नागिरीच्या घरी रहायला आल्या.दाराचे कुलुप उघडले.समोरच्या भिंतीवर त्यांच्या शहीद पतीचे व पुत्राचे फोटो लावलेले होते.सुधाताई फोटोंजवळ आल्या.मऊ फडक्याने धुळ बाजूला सारली.फोटोतले सुधाताईंचे पती त्यांना समाधानी भासले.रामही समाधानाने हसत असलेला भासला,जणू त्यांना सांगत होता," आई,तु फार छान निर्णय घेतलास.विभाचं आयुष्य पुनश्च मार्गी लावलंस."
#गीता गरुड
सुधाताई आत्ता त्या घरात एकट्या रहातात पण..त्यांनी एक संस्था उभारली आहे 'रामसदन' नावाची. या संस्थेमार्फत दोन वेळचं वरण,भात,पोळीभाजी असं पूर्ण जेवण..प्रत्येकी पाच रुपयांत असहाय्य, ज्येष्ठ नागरिकांना देतात.जे ज्येष्ठ नागरिक तिथे येऊन जेवू शकत नाहीत त्यांच्यासाठी डबेवाले ठेवले आहेत.बरीच मोठमोठी दयाळू लोकं सुधाताईंच्या या कार्याला देणगीरुपाने हातभार लावत आहेत.तसंच जवळपासच्या महिला आपल्या घरातलं काम आवरुन फावल्या वेळात सुधाताईंच्या या संस्थेच्या स्वैंपाकघरात आपली सेवा देतात.सुधाताई या संस्थेमार्फत ज्येष्ठांच्या औषधपाणी,शस्त्रक्रिया यांसाठीही आर्थिक सहाय्य करतात.विभा व अमरही त्यांच्या या कार्यात आपल्यापरीने मदत करतात.✍️

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा