ती जाताना
# गीता गजानन गरुड.
आंब्रड.
ती जाताना
गेली दहा वर्षे वच्छीमावशी डॉ. अनघा लेले यांच्याकडे स्वैंपाकाच्या कामाला होत्या. मावशींच्या हाताला चव होती.पुरणावरणाचा स्वैंपाकही त्या अगदी निगुतीने करीत.
अनघाच्या मुलाला आंबोळ्या, घावणे करुन खाऊ घालीत. मधुमेही आजीआजोबांसाठी कधी नाचणीचे घावण, कधी ज्वारीच्या पिठाचे धपाटे, मिस्र पिठाच्या भाकर्या असे रोज काही नवीन करून
खाऊ घालीत. अनघा व तिचे डॉ. यजमान क्लिनीकहून आले की त्यांना चहा, नाष्टा करुन देई. थोडक्यात वच्छीमावशीच्या रुपात त्यांच्या घरी अन्नपूर्णा वास करीत होती.
दरवर्षी कोकणात गावी जामसंड्याला जायला त्या वीस दिवस सुट्टी घेत. बाकी वर्षभर त्या नी त्यांचे काम.त्यांचा नवरा डॉ. लेलेंच्या प्रसुतिग्रुहात वाँर्डबोय म्हणून कामाला होता. तर मुलगा एम पी एस सी ची परीक्षा देऊन नायब तहसिलदार या पदावर रुजू झाला तसे नात्यातली मुलगी पाहून मावशीने वैदिक पद्धतीने मुलाचे लग्न
लावून दिले.
मुलाने तीला काम सोडायला सांगितले होते
पण मावशी म्हणाली, "आपल्या येळेक त्यांनी आपनाक मदत केली हुती.आपुन तेंची सेवा करुक व्हयी. माका त्यांचा काम
करुक आवाडता."
दोन दिवस मावशीची सून कामाला येत होती. अनघाने कारण विचारले असता ,तीने मावशी आजारी असल्याचे सांगितले.
अनघाच्या सासूबाईंनी अनघाला येताना मावशीला बघून यायला सांगितले. दुपारी अपाँटमेंट्स आटपून अनघा मावशींच्या घरी गेली. खाटीवर झोपलेल्या मावशी अनघाला पहाता क्षणी बळेबळेच उठून बसल्या. मावशीच्या सुनेने त्यांना पाण्याचे तांब्याभांडे व लिंबूसरबत आणून दिले. अनुने शहाळी व फळे तिच्याकडे दिली.
अनघाने मावशींना तपासले, त्यांचा बी पी कमी झाला होता. मावशी सांगू लागली, "गे अनु ,याक काय तरी होता तर सांगिन मी तुका . आंगमास निसता फुटताहा. गरम गरम वाफा येतहत डोक्यातसून,.नी ह्या भरल्या घरात माका आपनच रडा येताहा.ही सूनबाय काय म्हनीत माका. तु सांग अनु, मी आसा होतय काय?"
अनुने मावशीला विचारले, "मावशी, पाळी वेळेवर येते ना.मावशी म्हणाली, कधी चार मह्यन्यान येता तर कधी दोन मह्यन्यान.हे, वरुसभर (वर्षभर)असा चललहा.मी म्हणलय(म्हंटलं) नाय येत ती उलट बरा.कटकट नाय.पन येऊक लागली की हे लोट व्हावतत(अतिरक्तस्त्राव)मगे गळान जाऊक व्हता(अशक्तपणा)."
अनु म्हणाली, "मावशी, तुमचं हे पाळी जायचं वय आहे.12-13 वर्षाचंअसताना मुलींना पाळी सुरू होते ती 45-50वयानंतर हळूहळू बंद होते. स्त्रिच्या शरीरात बिजांडातून इस्ट्रोजन हे संप्रेरक स्त्रवते.या संप्रेरकावर आपले पाळीचे चक्र अवलंबून असते. 45-50 या वयात बिजांड हे संप्रेरक बनवण्याचे काम कमी कमी करत हळूहळू थांबवते. त्यामुळे पाळी एक दोन वर्षे अनियमित होते. व नंतर हळूहळू बंद होते.
यादरम्यान अंगातलं कँल्शिअम कमी हौतं.त्याने हाडं ठिसूळ होतात. चयापचय क्रिया मंदावते.अन्नपचन नीट होत नाही. निद्रानाश होतो. अंगातून गरम वाफा निघतात. वात वाढतो अंगातला. त्याने कंबरदुखी, गुढगेदुखी होते.
कोणाला अंगावरुन पांढरे जाते.कोणाला अतिरक्तस्त्राव होतो. चिडचिडेपणा येतो.
उगीच रडू येतं. स्तनांचा आकार लहान होतो. वजन वाढतं, कमरेकडच्या, पोटाकडच्या भागाची चरबी वाढते. रक्तवाहिनींत मेद जमा होतो. रक्ताभिसरण क्रिया मंदावते. तणाव, एकटेपणा जाणवतो, भूक लागत नाही, स्मरणशक्ती कमी होते. योनीमुख संकुचित होते, त्याची लवचिकता कमी होते,.सारखी थेंबथेंब लघवी होते."
वच्छीमावशीची सून म्हणाली, "ताईंनू, माकाव(मला) ह्यो मेनोपोजचो प्रोब्लेम आसतलो असो डाऊट इलेलो कारण माझ्या आयेकव(आईला) ह्यो आजार होतो.तिची तर गर्भपिशी काढूची लागली हुती. मीया सासूबाईंकडे आत्ता जातीनं लक्ष देईन."
अनु म्हणाली, "तुझ्या आईला आलेली रजोनिवृत्ती ही अनैसर्गिक (गर्भाशयाबाबत काही कँसर,गाठींसारखी समस्या असेल तर गर्भाशय शस्त्रक्रियेद्वारे काढले जाते) तर तुझ्या सासूला येतेय ती नैसर्गिक आहे. हा त्रास सगळ्यांना सारखा नसतो. काहींना काही त्रास होत नाही. काही जणींत धोडीशी लक्षणे दिसतात.तर काहींना अतित्रास होतो.
याकाळात आहारावर ध्यान दिलं पाहिजे. भात,गहू,ज्वारी, नाचणी,कडधान्ये खाल्ली पाहिजेत. फळभाज्या, शेंगास्वरुपातील भाज्या, फळे खाल्ली पाहिजे. दूध,अंडी,राजगिरा,सोया,मासे हे पदार्थ खाल्ले पाहिजे.
अतिप्रमाणात शिळे, आंबट, तिखट,तेलकट,खारट व आंबवलेले पदार्थ खाणे टाळावे. रात्रीचं जागरण टाळले पाहिजे. रात्रीचा आहार हलका असावा. जेवणाच्या वेळा नियमित असाव्यात.
भजन, किर्तन, विणकाम असा एखादा छंद आपल्या मनाला दिला पाहिजे कारण संप्रेरकांच्या अभावाने तयार झालेलं हे दुखणं बर्याच अंशी मानसिक असतं.तेंव्हा मनाच्या श्लोकात म्हंटल्याप्रमाणे, मन करा रे प्रसन्न. सर्व सिध्दींचे कारण.चालण्याचा व्यायाम
केला पाहिजे."
वच्छीमावशीची सून म्हणाली," ताई ,माका योगासना येतत.आमच्या वाडीवर शिबिरात शिकवलेली.तुम्ही माका नावा सांगा आसनांची तेवढी मी आईंकडून करून घेईन. नी योनीमुख टाईट करुचेसाठी कसो आत घेऊचो, बाहेर सोडूचो ताव (तेही)मी तेंका(त्यांना)
समजवीन."
अनु म्हणाली," याकाळात त्वचा कोरडी होते.म्हणून रोज आंघोळीआधी अभ्यंग करायचं म्हणजे तेल जरा कोमट करुन आपल्या अंगाला चोळायचं. मग त्वचा लवकर सैल पडत नाही. मधुमेह, अतिरक्तदाब यांसारखे आजार या कालावधीत डोकं वर काढायला बघतात. तेंव्हा दर तीन चार महिन्याने आम्हा डाँक्टरांकडून नीट तपासणी करुन घ्यायची.काही टेस्ट करायल्या सांगितल्या तर त्या करुन घ्यायच्या.°
अनु म्हणाली, "रजोनिवृत्ती/मेनोपोज हा काही आजार नाही. ती स्त्रीच्या जीवनातील एक अवस्था आहे. कुटुंबव्यवस्थेत स्त्रीचं स्थान फार महत्त्वाचं आहे.तेंव्हा कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून स्त्रीला या अवस्थेतून बाहेर येण्यास मदत केली पाहिजे."
अनुने वच्छीमावशीला काही औषधगोळ्या लिहून दिल्या व मावशीचा नी तिच्या गोड सुनेचा निरोप घेऊन ती घराकडे निघाली.
डॉ. अनघांच्ं व सुनेचं बोलणं ऐकल्याने वच्छीमावशींच्या मनाला उभारी आली. तिला खूप हलकं हलकं वाटलं.☺️☺️

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा