राणीहार


 #सुधाकाकू_व_रामभाऊ 


रामभाऊ खोलीत येरझारा घालत असतात.


रामभाऊ:  अगं तो पेपरवाला आला नाही अजून तो? जेवताना वाचायचा असतो का पेपर?


सुधाकाकू: विचारा की त्याला फोन लावून. इथे घरात लेफ्टराईट करुन का पेपर मिळणार आहे?


रामभाऊ:  सोडतो की काय त्याला.विचारतोच.


सुधाकाकू:  हो हो तुम्हीच विचारणार.


(कपडे धुणारी चंदा आत प्रवेशते. केसांची बट गालावर,भली मोठी टिकली,डोळ्यात काजळ,ओठाला लाली,बारीक एकशिवडी अशी,साधीच सहावार चापूनचोपून नेसलेली,रामभाऊ टवटवीत गुलाबाचं फुलं पहावं तसं अगदी तसं चंदाकडे पहातात. चंदाही निर्ढावलेली. सहजच एक मुरका घेते व मोरीकडे वळते.

सुधाकाकूंच लक्ष जातच. सुधाकाकू जोरात खाकरतात. त्याबरोबर आपण त्या गावचे नाहीच असा चेहरा करुन रामभाऊ मारुतीस्तोत्र म्हणत येरझाऱ्या घालू लागतात.)


सुधाकाकू:  कळतात हो सगळी थेरं. पाय दुखतील ते फिरुनफिरुन. बसा एका जागेवर गुपचुप आणि ही गवार मोडून द्या मला. हा अर्धा किलो मटार जरा सोला. दोन लसणाचे गड्डे सोला. हा नारळ फोडून द्या आणि हो दोन शिट्ट्या झाल्या की लगेच गेस बंद करा.


रामभाऊ:  आलीया भोगासी असावे सादर. भाज्या नीट करुन देतो पण तुझ्या कुकरचं आपलं तुच काय ते बघ हो. नाहीतरी मला शिट्टीतलं काही कळत नाही. मी आपला साधासुधा माणूस.


सुधाकाकू:  हो तर अगदीच साधेसुधे म्हणे. शिट्टी झाली की गेस बंद करा गुमान नाहीतर मऊभात खावा लागेल.


रामभाऊ:  अगं हो. मऊभातावरून आठवलं. आई काय सुंदर मऊभात करायची मडक्यात. छानच चव यायची त्या भाताला. गरमगरम मऊभात व त्यावर चटकेदार मेतकुट छान.अहाहा! तोंडाला पाणीच सुटलं.


सुधाकाकू:  पाणी सुटेल तर काय. सारखं बघावं तेंव्हा आईचं कौतुक. माझं मेलं कौतुक आयुष्यात कधी केलंच नाही.

रांधा,वाढा नी उष्टी काढा यातच जन्म गेला. कधी म्हणून चार दिवस सहलीला नेलं नाही मला. आपणच करायचं नी आपणच खायचं.


रामभाऊ:  बरं, रविवारी आक्काकडे जाऊया का? एका तासावर तर आहे.


सुधाकाकू:  काही नको. भाऊ आला तर चांगलं बासुंदी पुरी

करुन घालायची तर नाही. चपाती नी कडधान्याची उसळ खाऊ घालतात. अर्धीअधिक कामं मलाच करायला लावतात.

मला मेलं कुठे आरामच नाही. शिट्ट्या झाल्या जा बंद करा गेस.


रामभाऊ:  तू जा नं.


सुधाकाकू:  माझ्याच्यानं उठलं तर बसवत नाही नी बसलं तर उठवत नाही.


(रामभाऊ गेस बंद करायला जातात.हळूच पुटपुटतात..जरा कमी खायचं,व्यायाम करायचा.)


सुधाकाकू: काय म्हणालात? माझं खाणं काढता रोज तुम्ही. असं कितीसं खाते ओ मी. तुम्हाला नं माझ्याबद्दल प्रेमच नाही.


रामभाऊ:  असं मी कधी म्हणालो?


सुधाकाकू: म्हणायला कशाला हवं. उठसूठ मला टोचून बोलता. तुमच्या आईने छळलं टोमणे मारुन,तुमची आक्काही तसलीच. तुम्हीही त्यातलेच. सगळं गाढवे कुटुंब नावाला साजेसं आहे.


रामभाऊ:  तुही गाढवेच हो.


सुधाकाकू: ते फक्त म्हणायला. देशमुखांचं रक्त आहे अंगात.


रामभाऊ:   देशमुखच भारी बरं.


सुधाकाकू:  बरं काय आहेतच मुळी.


(मटार बटाटा आमटी व वरणभात. जेवणं होतात. सुधाकाकू भांडी घासून बाहेर येते. चंदाही कपडे वाळत घालून निघून जाते.)


सुधाकाकू: अहो ऐकलं का? अहो ऐका नं.

(रामभाऊ विचारात..एवढा मस्का खिशाचं खरं नाही.)


रामभाऊ:  हं बोल.


सुधाकाकू:  मला नं राणीहार हवाय या पाडव्यापर्यंत घ्याल नं.


रामभाऊ:  तो आणि कशाला? अगं तुच राणी आहेस माझी. मी तुझा हार.😍दुसरा हार कशाला?


सुधाकाकू:  मस्करी नका करु. त्या परबीनीने घेतला दिवाळीत. फराळ द्यायला म्हणून आली होती. तासभर बसली. मला कळेना ही बया जात कशी नाही. बोटांनी त्या राणीहाराशी चाळे करत बसलेली. मी लक्षच दिलं नाही. शेवटी म्हणते कशी,"गाढवे वहिनी,"तुम्ही दिवाळीला काय घेतलं?"

मी म्हंटलं कपडे..साडी वगैरै.तर म्हणते ," मी बघा हा राणीहार घेतला. साडेचार तोळ्याचा,आणि मेचिंग इअररिंग्स सुद्धा. अहो बरंच सोनं आहे माझ्याकडे. मी नकोच म्हणत होते पण आमचे हेच मागे लागले घे घे म्हणून. तुम्ही काय सोनं घेतलंत?"🤔मी नाही म्हंटलं.


रामभाऊ:  अगं त्या परबाला वरकमाई भरपूर आहे. एकदा पकडलं की ढेंगा वर होतील तेंव्हा समजेल दोघांनाही.


सुधाकाकू:  शिवाय गावची जमीन विकली म्हणे. त्या राणेवहिनी सांगत होत्या. ते असो.पण मला राणीहार पाहिजे.😙


रामभाऊ:  घेऊया गं तुला राणीहार नक्की घेऊया पण जरा पैसे साठू दे. सोन्याचा भाव जुनजुलैमध्ये कमी होईल तेंव्हा बघुया.


सुधाकाकू:  तुम्ही नेहमी असेच करता.जुनजुलैला हात वर करता.🤓


रामभाऊ:  नीजू दे गं मला जरा.आठवड्यातून एक सुट्टी मिळते. जय हरी विठ्ठल.


(रामभाऊंचा मोबाईल वाजू लागतो. ते झोपेतून उठून फोन उचलतात.)


रामभाऊ: हेलो हेलो(फोन स्पीकरवर असतो.)


रामभाऊंचा भाचा रमेश: हेलो मी रमेश मामा. मामा आईला बरं नाही पोटात जास्त दुखतय . डोंबिवलीच्या आयकॉन हॉस्पिटलमध्ये एडमिट केलंय. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल म्हणून सांगितलंय.


रामभाऊ: अरे देवा!बरं आत्ता कोण आहेत तिच्यासोबत.


रमेश: मी ,बाबा व शेजारचे सावंत काका. मामा तू लवकर येना.😢


रामभाऊ: हो रे बाळा. येतो मी अर्ध्या तासात.तू काही काळजी करू नकोस.


सुधाकाकू: अगं बाई कुठून हे दुखणं आलं.(सुधाकाकू ठेवणीतल्या साडीतले पन्नास हजार आणून रामभाऊंना देतात.)हे द्या भावोजींना.


रामभाऊ(डोळ्यात पाणी तरळतंय):हे एवढे कधी साठवलेस गं? ठेव तुला राणीहार करु नंतर.


सुधाकाकू: तीस वर्षांच्या संसारात एवढंच ओळखलत मला.आपल्या माणसापेक्षा का सोनं मोठं असतं. आम्ही बायका नावं ठेवतो एकमेकींना, पण मनात वाईट भावना नसते हो आमच्या. आक्का लवकर बऱ्या होऊदेत रे परमेश्वरा. थांबा जरा चहा करुन देते थर्मासभर आणि हो गरम पाणीही देते. मीही येते पण जरा पोळीभाजी करुन घेऊन येते. भुकेले असतील सगळे.


(आक्काचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडते. तीन महिन्यांनंतर सुधाकाकूंच्या व रामभाऊंच्या लग्नाच्या वाढदिवसाला आक्का,रमेश,भावोजी सगळे येतात. केक कापतात. दोघे एकमेकांना केक भरवतात.त्यां ची मुलगी दिपा केमेऱ्यातून कोडँक मोमेंट टिपते.)


(रामभाऊ एक बॉक्स हळूच घेऊन येतात व सुधाकाकूंसमोर उघडतात.)


सुधाकाकू: अय्या! राणीहार.🤗🤗


रामभाऊ: हो माझ्या राणीसाठी खासा राणीहार!!😍😍


--------गीता गजानन गरुड,आंब्रड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट