मी,इंदुमती कारखानीस,
आज कसं मळभ आलंय नई. आभाळात मळभ तसंच माझ्या मनातही मळभ साजलंय. अहो,आठवड्यापुर्वी लग्न झालं लेकीचं. कालपर्यंत नातेवाईक होते. काल उरलेसुरलेही गेले आपापल्या गावाला.. आणि आता हे रिकामपण खायला उठलंय मला. दोन बेडरुमचा ब्लॉक आमचा..अक्षरशः अंगावर येतोय माझ्या. हे सकाळीच गेले ऑफिसला. लेक,सुशांत नाशिकला असतो नोकरीला. तिथेच भाड्याने घर घेतलय नि रहातो.
सुशांतच तसं काही वाटत नाही ओ कारण बारावीनौतर तो तसा हॉस्टेललाच राहिला. सवय झालेय मला त्याच्या विरहाची पण अबोली..हे पिल्लू माझं..कधी मला सोडून दूर गेलं नाही. खरंतर मुलांना एकाद महिना आईबाबांपासून दूर धाडावंच मग मुलांना व आईबाबांनाही त्यांच्यापासून दूर रहाण्याची सवय होते. मी बरेचदा अबोलीला तिच्या आजीकडे पाठवू पहायची पण छे! अजिबात ऐकायची नाही. आताआतापर्यंत आमच्यामधे झोपायची.
सकाळी उठ उठ म्हणून सतरांदा हाका मारल्या की वैतागत उठायची. मगाशी नौ तिचं कपाट आ्रायला घेतलं होतं मी. बरेच ड्रेस इथेच ठेवून गेलीय ती. शिवाय तिची लॉची पुस्तकं. अभ्यासात हुशार होती पण जाम कंटाळा करायची. अबोलीची भातुकली,तिची लहानपणीची कल्पना साडी..सगळं जपून ठेवलंय खालच्या कप्प्यात. मला म्हणत होती,"आई,मी घेऊन जाते हे." तिला म्हंटलं,"नको गं पिल्लू, सगळंच घेऊन गेलीस तर मी माझं मन कसं रमवणार? तुझी आठव आली की हे कपाट उघडेन नि आज झालंही तसंच. अबोलीची आठव आली नि मी तिचं कपाट उघडलं. तिच्या ड्रेसचा गंध उरात भरुन घेतला. तिच्या वस्तुंवर माझा हात फिरवला. जरा बरं वाटलं मनाला.
तेवढ्यात मोबाईलची रिंग वाजली. अबोलीचा होता. मी सेंटी झालेलं दुरुनदेखील कळत तिला. आधी डोळे पुस अन् चीझ म्हण म्हणाली. मीही लहानपणी फोटो काढताना तिला म्हणायला लावायची अगदी तसं. उटीला जाताहेत म्हणे. तिला म्हंटलं,सांभाळून जा आणि जरा कमी बोल बाई नाहीतर अमोल जावई आमचा वैतागायचा. तसा बरा आहे हो. म्हणजे सध्या तरी तिच्या सासरचे सगळे बरेच वाटतायत पण वर्षतरी व्हावं लागेल हे नवीन नातं रुजायला. सासुबाई अबोलीच्या तोंड भरुन हसल्या,तुम्ही लेकीची काही काळजी करु नका म्हणाल्या पण असं थोडंच असतं. पंचवीस वर्ष,नऊ महिन्यांचा एकत्र सहवास..काळजी तर वाटणारच नं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा