स्त्रीपुरुष मैत्री आणि संसारात वादळ(भाग दुसरा)


 #स्त्रीपुरुष_मैत्री_आणि_संसारात_वादळ

(भाग दुसरा)


समजते काय ही स्वतःला. नवराय मी जरा तरी मान द्यायला नको का हिने. तो चरफडत राहिला. इतक्यात बेल वाजली..दारात सलील उभा होता..व्हाइट टिशर्ट नि नेव्हीब्लु जीन्स..आणि चकाचक स्माईल. 


"वेलकम. आज इकडे कुठे?" जान्हवी हसतहसत बोलली.


"अगं इकडूनच जात होतो. म्हंटलं वर येऊन पहावी तुझ्या मिस्टरांची तब्येत. बरं वाटतय ना आता." सलील जिग्नेशकडे बघत म्हणाला.


"अं.. हो हो." जिग्नेश कसनुसं हसला.

****************


जान्हवीने आत जाऊन सुंदर नक्षीदार कपांत चहा ओतला. ट्रेमधे कप्स घेऊन ती हॉलमधे आली.


"ए जानु,मला फक्त पाव कप दे हां. ऑफिसमधे बराच ढोसलाय चहा." सलील म्हणाला.


"हो रे. मीही कपभरच केलाय. मला ठाऊकय तुझी सवय म्हणून जास्त नाही केला." जान्हवी बेसनाच्या लाडूची डिश त्याला देत म्हणाली.


"आणि साहेबांना.."सलील जिग्नेशकडे पहात म्हणाला.


"तो कॉफी घेतो रे."चहाचा घोट घेत जान्हवी म्हणाली.


"आणि तू चहाची चाहती. नॉर्थ साऊथ पोल आहात वाटतं..कसं काय जमतं तुमचं..असो. चहा बाकी गोड केलाऐस मला आवडतो तसा नाहीतर तो ऑफिसातला पाणचट.. आणि लाडू तर बेस्ट. दोन बांधून देशील का गं! आईच्या हातच्या चवीची आठवण झाली."सलील म्हणाला तेंव्हा त्याचे डोळे पाणावलेले दिसले. 


"ओय सेंटी. बांधून देते तुला पण हे असं आठवण नको रे काढूस! आईला घेऊन येणार होतास ना?"


"ऐकत नाही गं ती शहरात यायला. आणि खरं सांगायचं तर माझ्या बायकोचं नि तिचं पटत नाही. आईला जाम स्वच्छता आवडते. ती फडकं घेऊन प्रत्येक वस्तूवरची धूळ साफ करत बसायची. अर्चुला म्हणजे माझ्या बायकोला वाटायचं..ती मुद्दामहून हिला कमीपणा आणण्यासाठी करते तसं..शेवटी आर्ची बोलायची बंद झाली तिच्याशी..आर्चीचा अबोला आईला सहन होईना. मला म्हणाली,"सल्या घरची आठव येती. घरला सोड." मग काय आलो सोडून."सलिल त्याची कैफियत मांडत होता.


"चालायचंच रे. घर म्हंटलं की भांड्याला भांड लागतच..आणि आता कसंय रे..दोघांच राजाराणीचा संसार.." 


"चाललाय म्हणायचं. आर्चीचं माहेर जवळ आहे, आमच्या घरापासून. वीकेंडला ती तिकडेच असते. आता तर हे नवीन घर विकून तिच्या आईच्या घराजवळच्या नवीन बिल्डींगीत ब्लॉक घ्यायला मागे लागलेय."


"का..हे गेल्यावर्षीच तर घर घेतलत ना."


"हो गं पण ती अशीचय. वनबीएचके पुरत नाही म्हणे..पाहुणे आले की मग जागा पुरत नाही म्हणते." आतापण मला फोन करुन सांगितलन की मी आईकडे आहे. यायला उशीर होईल. घरात बसून एकटा काय करु म्हणून आपलं राऊंड मारत होतो. बरेच दिवस तुझ्याकडे यायचं मनात होतं..सो आज आलो.


जिग्नेशने झोपेचं सोंग घेतलेलं खरं पण जान्हवी  व सलीलचं बोलणं मन लावून  ऐकत होता.."ऐला,याची बायको याला ऐकत नाय म्हणून याचा माझ्या बायकोवर डोळा.जानु म्हणतो काय..अरे काय बापजाद्याची इस्टेट वाटली की काय तुला!"जिग्नेश मनातल्या मनात चरफडला.


तब्बल पाऊण तासाने सलील जायला निघाला. जान्हवीने त्याला सोबत न्यायला बेसनलाडू डब्यात घालून दिले.


सो स्वीट ऑफ यू हे सलीलच्या तोंडून निघताच जिग्नेशला त्याचा खूपच राग आला.


"मुस्काट फोडू का आता याचं..सो स्वीथ ऑफ यू म्हणे..अरे आमच्या ऑफिसात इतक्या फाडू पोरी येतात पण आम्ही नाय केली असली चाटुगिरी कधी!"तो ओठातल्या ओठात पुटपुटला.


"मला काही म्हणालात का?" सलीलने विचारलं तसं छे छे,छे तुम्हाला नाही.. कसंबसं जिग्नेश म्हणाला. ओके,टेक केअर असं म्हणत सलील निघून गेला.


जान्हवीने जिग्नेशला त्याच्या आवडीचा इटालियन पास्ता करुन दिला. तो खाता खाता जिग्नेश विचार करु लागला.."तशी अगदीच वाईट नाही जान्हवी..म्हणजे माझी चॉइस शेवटी, चांगलीच असणार.


 अचानक वादळ आलं. सोसाट्याचा वारा सुटला..इतका की बाहेरची वाळूही घरात आली. नारळाची झाडं अगदी ढगांशी गप्पा मारणारी..दारु पिऊन बेवडे झिंगतात तशी इकडून तिकडे झिंगू लागली. अशोकाची झाडं तर बिचारी फेर थरुनधरुन अर्धमेली झाली.


 समोरच्या झोपडपट्टीत एकच गोंधळ उडाला. झोपड्यांवरचे पत्रे उडू लागले..एक छोटसं बाळ तिथंच एका टाकीच्या कडेला मातीत खेळत होतं. त्याची आई थोड्या वेळात बाहेर आली. सैरावैरा फिरत होती..माझं बाळ दिसलं का हो कुणाला? विचारत होती बहुदा..


थोड्याच वेळात एक मळके कपडे घातलेला पुरुष तिच्याजवळ आला. तो दिसताच ती रडू लागली. बहुदा नवरा असावा तिचा. तिला गप्प करुन ओट्यावर बसायला सांगत होता. एकदोन शेजारणीही तिच्यासोबत बसल्या. 


टाकीच्या बाजूला गर्द झाडी होती. अनंता छान वाढला होता,देवकेळीचं बनच होतं. केशरी फुलं,केशरी ठिपक्यांवाली पिवळी फुलं. किती सुंदर दिसत होती ती! बाळाने तिथेच लघवी केली नि काडी घेऊन त्या ओल्या रेतीत खेळत बसलं. नाकातून ओघणारा शेंबूड मज्जेत चाटत होतं.


आता जान्हवीही येऊन जिग्नेशसोबत बसली. जिग्नेशच्या नजरेतलं द्रुश्य तिनेही टिपलं. ते कुरळ्या केसांचं, गडद सावळ्या रंगाचं बाळ केसांत माती घालून घेत होतं. इतक्यात जोरजोरात वीज कडाडली. लख्ख प्रकाश पडला. बाळही घाबरलं..इकडेतिकडे बघून परत खेळू लागलं. 


"जिग्नेश,आपण आऊया का रे तिथे..आता पाऊस येईल न् ते बाळ भिजेल. त्याचे आईबाबा त्याला सगळीकडे शोधताहेत पण नेमकं टाकीच्या मागे कुणाचं लक्ष जात नाहीए." जान्हवी म्हणाली..इतक्यात कुणीतरी सपासप चाबकाचे फटके ओढावेत तशा पावसाच्या धारा कोसळू लागल्या. ते बाळ तोंड उघडं करुन पावसाचे थेंब घटाघटा पिऊ लागलं. देवकेळीसभोवताली पाणी साचलं..त्यात ते अगदी लडबडू लागलं. 


दुकानाच्या आडोशाला आपल्या आठदहा पिलांना दुधाला घेऊन बसलेल्या कुत्रीने डोळे उघडले..तिला ते बाळ असं भिजताना दिसताच ती उठून उभी राहिली. तिला पिलांचा जणू विसर पडला. ती बाळाच्या वडिलांकडे गेली. भुंकत त्यांना काही सांगू लागली. त्यांची पँट ओढत तिने त्यांना बाळाजवळ आणलं. बाळाची आईही आली.


आईने बाळाला उचलून घेतलं. त्याचे पटापटा मुके घेतले. त्याचं नाक पदराने पुसलं. बाळाच्या डोक्यावर पदर ठेवत त्याला काहीतरी समजावत ती आत घरात गेली. 

इकडे कुत्रीही आपल्या पिलांजवळ परतली. पिल्लं परत निवांत पसरुन कुत्रीला लुचू लागली.  जान्हवीच्या डोळ्यात पाऊस भरला. 


जास्मिनच्या आधीचं त्यांच बाळ..जय..अगदी त्या काळसावळ्या मुलाएवढाच होता. वर्णाचाच फरक काय तो. आकडी क काय आली नि त्यात गेला..अगदी तिच्या मांडीवर गेला..अजुनही जयबाळाचे दोन्ही सचेतन नि अचेतन स्पर्श आठवायचे तिला..जाणवायचेही.


 जय गेल्यानंतरच जिग्नेश नि जान्हवीमधलं अंतर वाढत गेलं. खतपाणी घरच्यांनीही घातलंच. वेळीच डॉक्टरकडे न्हेलं असतं तर वाचला असता वगैरे वगैरे. जिग्नेशनेही तीच अढी मनात कायम ठेवली. 


 एश ट्रेमधे दिसणाऱ्या सिगारेट्सच्या थोटकांमधे दिवसेंदिवस वाढ होत होती.  पार्कमधे खेळणारी मुलं पाहून त्याला त्याचीच घ्रुणा वाटू लागली होती. 


अधेमधे दोघांचे खटके उडतच होते. जिग्नेश हल्ली सलील व तिच्याविषयी उघड उघड बोलू लागला होता. जिग्नेशचा तापट,शंकेखोर स्वभाव विरुद्ध सलीलचा शांत,संयमी स्वभाव. परिणाम व्हायचा तोच झाला. ऑफीस सुटल्यावर जान्हवी सलीलसोबत एखाद्या क्याफेमधे गप्पा मारु लागली..मन मोकळं करु लागली. 


सलीलची बायको अजुनही माहेरच्या पाशातच मग्न होती. माहेर कोणाला नको असतं? पण लग्न झालं की नवऱ्यासोबत रहाण्याची,त्याच्या मनातलं जाणून घेण्याची,त्याची मैत्रीण बनण्याची खरी आवश्यकता असते. त्याची आई नको पण निदान त्याला तरी आपलंस करावं.. तनामनाने दोन जीव एकत्र आले की संसार सुखाचा होतो. हेच सुखी संसाराचं सुत्र अर्चनाला समजत नव्हतं. 


अर्चनाचा भाऊ हॉस्टेलला असल्याने अर्चना आली की घर भरल्यासारखं वाटतं या विचाराने तिची आईही तिच्या सारख्या येण्यावरुन तिला टोकत नसे.


एकट्या पडलेल्या सलीलला जान्हवीच्या गप्पा,तिचं त्याच्याशी प्रॉब्लेम्स शेअर करणं आवडू लागलं होतं. दोघांचाही कम्फर्ट झोन म्हणजे या एकमेकांशी मारलेल्या सुखदु:खाच्या गप्पा होत्या. सलीललाही आताशा वाटायचं..जान्हवी आपल्या आयुष्यात आधी आली असती तर..ती वयाने मोठी असली तरी त्याने तिच्याशी लग्न केलं असतं पण आता हे असे विचार मनात आणणं हे पापच..हे त्याच्या संस्कारित मनाला ठाऊक होतं.


*********


जिग्नेशने घरात काहीही मदत करणं सोडून दिलं होतं. सकाळी उठल्यापासनं जान्हवीची होणारी धावपळ बघताना त्याला आसुरी आनंद व्हायचा. तिच्या पेहरावावर त्याचं बारीक लक्ष असायचं.


 आज जान्हवी जांभळ्या रंगाची लिननची साडी नेसली होती. तिच्या गोऱ्यापान त्वचेवर तो रंग उठून दिसत होता. स्लीव्हजलेस ब्लाऊजची बारीक पट्टी तिच्या गोऱ्या गळ्याची,दंडाची शोभा वाढवत होती. हल्ली ती हलकासा मेकअपही करु लागली होती. 


जान्हवी अशी टवटवीत फुलासारखी सलीलच्या समोर जाऊन उभी राहिली की सलील तिला हवीहवीशी स्तुती करायचा जी जिग्नेशला करता येत नव्हती,त्याला करायचीच नव्हती कारण हे सारं नटणंसजणं परपुरुषासाठी असा त्याचा ग्रह झाला होता. 


आजही ऑफीसमधे जाताच सलीलने तिला हाय केलं व हळूच म्हणाला,आज तर क्रुष्णकमळ रेशनिंगच्या ऑफीसात फुललय बॉ. त्याच्या स्तुतीवर ती गोड हसली व क्लायंट समोर आल्याने कामाला लागली.


दुपारी जान्हवीला तिच्या आईचा फोन आला..

"हेलो जानू"


"हा बोल आई.  काय म्हणतेय तब्येत? जास्मिन काय म्हणतेय! मम्माची आठवण येत नाही वाटतं तिला."


"अगो,माझ्या तब्येतीला काय धाड भरलेय. चांगली ठणठणीत आहे मी पण आपली जास्मिन.."


"आई, अगं असं का बोलतैस! काय झालं जास्मिनला?""


"जास्मिन काल आपल्या शेतातल्या घरात आपल्या गड्याचा मुलगा.. तिच्यावर जबरदस्ती..नाही बोलवत मला..तुम्ही या नि पोरीला न्या तुमच्या."


क्रमशः


--गीता गजानन गरुड.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट