बंध नात्यांचे


 #बंध नात्यांचे


महिना झाला दिगुअण्णांना जागेवर पडून होते.थोरल्या लेकाने बोलणच टाकलं होतं. दिगुअण्णा होतेच तसे,तिरशिंगी. लहानपणापासून लेकीचंच कौतुक केलं त्यांनी. का तर म्हणे लेक परक्याचं धन. चार दिवस आपल्या अंगणात चिमणपायांनी थिरकणार आणि एक दिवस कोणएक चिमणा येणार नी चिमणीला घेऊन जाणार. दिगुअण्णांची सुमी होती पण हुशार. भरभर धडे वाचायची. पाढे,स्तोत्र अगदी मुखोद्गत. एकपाठीच होती.


 सुमीचे वडील म्हणून चार लोकांत दिगुअण्णांना मान होता. सुमी दहावीत जिल्ह्यात पहिली आली मग तिने मागे वळून पाहिले नाही. अकरावी,बारावी काकांकडे पुण्याला केली.  तिथेच तळेगावला मेडीकलला प्रवेश मिळाला. एक उत्तम स्त्रीरोगतज्ज्ञ झाली.  याच दरम्यान  चित्रकार आनंदच्या प्रेमात पडली. दिगुअण्णांना जेंव्हा तिचं प्रेमप्रकरण कळलं तेंव्हा ते जाम संतापले पण पोरगी हाताबाहेर गेली होती. लग्न करुन मोकळी झाली होती. दिगुअण्णांच्या बायकोने त्यांना खूप समजावलं पण त्यांनी सुमेला त्यांच्या घरात पाय ठेवू नको असं निर्वाणीचं सांगितलं. 


हर्षद,दिगुअण्णांचा थोरला लेक कसाबसा बारावी पास झाला. त्याने टायपिंग व शॉर्टहँडचा कोर्स केला. स्वतःची टायपिंग इंस्टिट्यूट काढली. तिथेच नेमाने टायपिंग शिकायला येणाऱ्या मालविकाशी त्याची नेत्रपल्लवी होऊ लागली. तिच्या झुपकेदार वेणीच्या शेपट्यात तो पुरता गुंतला. 


मालविका हर्षदच्या जातीची नसल्याने दिगुअण्णांनी त्यांच्या लग्नाला तीव्र विरोध केला. आनंद व सुमीने या दोघांच लग्न लावून देण्यात पुढाकार घेतला. त्यांना घर घेण्यातही मदत केली. हर्षदला मुलगी झाली तेंव्हाही दिगुअण्णांनी माझा व त्याचा काडीचाही संबंध नाही असं निक्षून सांगितलं. हर्षदची आई मात्र अधूमधून हर्षदकडे जायची. सुनबाईला डिंकाचे लाडू,मेथीची खीर नेऊन द्यायची. छोटीसाठी कुंची,बाळलेणं तिने स्वतः शिवलं. ती बाहेर गेली की दिगुअण्णा गुपचूप त्या अर्धवट शिवलेल्या बाळलेण्यांना छातीशी धरायचे व त्यांचे पटापट मुके घ्यायचे. झरझर अश्रुधारा त्या कातळातून वाहू लागायच्या.


सुमी पुढे परदेशात गेली. तिथे तिला इथल्यापेक्षा जास्त मानमरातब,पैसा मिळू लागला. लहानपणापासूनच कौतुकाची चट लागलेली सुमी त्या वातावरणात अगदी सुखावली. गेली तेंव्हा दोन वर्ष आनंदला इमेल पाठवायची. हळूहळू तिचे इमेल्स विरळ होत गेले. एके दिवशी तिचा व्हिडिओ कॉल आला. तिच्यासोबत रॉबर्ट होता. तिला अगदी खेटून तिच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता. आनंदला काही कळलच नाही. हायहेलो झाल्यावर सुमीने बोलणं सुरु केलं. 'आनंद हा रॉबर्ट माझा कलिग आहे. कामाच्या निमित्ताने आम्ही जवळ आलो. आमचे व्हयूज,जगण्याकडे बघण्याचा आमचा द्रुष्टीकोन तंतोतंत जुळतो. मी रॉबर्टमध्ये गुंतत गेले. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलोय आनंद. तुझ्यापासून मी काहीच लपवणार नाही. मी एकाच जोडीदाराबरोबर आयुष्य नाही काढू शकत. तुही माझ्यात गुंतून राहू नकोस. तुझ्यासाठी तुला समजून घेणारा जोडीदार निवड.'


 आनंदच्या डोळ्यांसमोर मिट्ट काळोख दाटला. लहानपणापासून अनाथालयात वाढलेला तो. त्याचा जन्म झाला तेंव्हा त्याची आई त्याला अनाथालयाच्या पायरीवर ठेवून गेली होती, एवढंच कळलं होतं त्याला अनाथालयातल्या ताईंकडून. त्या ताईंनीच त्याला नाव दिलं होतं. शिकवलं होतं. त्याच्या कलेला प्रोत्साहन दिलं होतं. त्याच्या बोटांत जादू होती. त्माच्या चित्रांना एक कारुण्याची किनार असायची त्यामुळे त्याची चित्रं जीवंत,बोलकी वाटायची. त्या चित्रांवरच तर भाळली होती सुमी. त्याच्या साऱ्या चित्र प्रदर्शनांना आवर्जून भेटी द्यायची. मैत्रिणींना मोठ्या तोऱ्यात चित्रकार आनंदच्या चित्रांबद्दल व त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल सांगायची. 


अशी ती आनंदची सुमी..एकेकाळी त्याच्यासाठी घरातून पळून आलेली..आत्ता त्याला स्पष्ट सांगत होती की ती आयुष्यभर त्याच्यासोबत राहू शकणार नाही. एवढी निसरडी गाठ होती तिच्या प्रेमाची! आनंद त्या रात्रीच्या भयाण अंधारात गुडघ्यात डोकं खुपसून बसला होता. अश्रु कधीच थिजून गेले होते. आनंद भावनाप्रधान होता. नात्यांना मानणारा,हळवा पती होता पण सुमीने तिच्या अतीमहत्त्वाकांक्षेपायी त्यांच्या प्रेमाचं रोपटं खुरडून टाकलं. ती एक स्वच्छंदी जीव होती. पण आनंदचं काय? त्याचं तर पुरं आयुष्यचं सुमीत सामावलं होतं. 


सुमी अमेरिकेला जाणार म्हंटल्यावर फार हौसेने कुठलेही आढेवेढे न घेता,पतीपणाचा बडेजाव न दाखवता आनंदने तिला जाऊ दिलं होतं. तिची स्वप्न साकार व्हावी ही त्याचीही इच्छा होती. त्याला बिचाऱ्याला कुठे माहित होतं की त्याच्या प्रेमाची अशी राखरांगोळी होईल. बरेच दिवस तो असा भणंग अवस्थेत होता. शेवटी हर्षद व मालविकाने त्याला या धक्क्यातून बाहेर यायला मदत केली. ती दोघं आनंदला सायकेट्रीस्टकडे घेऊन गेली. चार पाच सिटींगनंतर आनंद पुर्ववत होऊ लागला. त्याच्या मनाने परत उभारी घेतली. कुंचला हाती धरला. त्याचा कुंचला व रंग हेच त्याचं सर्वस्व बनले होते पण कोणत्याही चित्रांत आनंदाच नामोनिशाण नव्हतं. 


एकदा आनंदला त्याच्या अनाथाश्रमातल्या बाईंनी संस्थेला भेट द्यायला बोलावलं. आनंदने तेथील मुलांना चित्र काढण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. मुलांच्या विनंतीप्रमाणे दर शनिवारी दोन तास शिकवण्याचं कबूल केलं. त्या लहानग्यांनी आनंदच्या जीवनात परत आनंदाची बीजं रोवली. 


एक दिवस आनंदला हर्षदचा फोन आला की दिगुअण्णांची तब्येत बिघडलेय व तो गेला तर ते अजून खवळतील म्हणून त्याने आनंदला तिथे त्यांच्या देखभालीसाठी जाण्यास सांगितलं. आनंदने आपला मुक्काम दिगुअण्णांच्या घरी हलवला. दिगुअण्णांच्या पत्नीलाही हायसं वाटलं. आनंद त्यांच्या औषधगोळ्या नियमित देत होता. त्यांना स्पंजिंग करत होता. पेज भरवत होता.


 आनंदच्या सेवाभावामुळे थोड्याच दिवसांत दिगुअण्णांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली. ते हळूहळू आनंदशी मोकळेपणे बोलू लागले. त्यांनी आनंदला कधी समजून घेतलं नाही व त्यांच्या लेकीनेही आनंदसारख्या हिऱ्याला असं वाऱ्यावर सोडलं याचं शल्य सतत त्यांना बोचत होतं. अगदी अश्वत्थाम्याच्या भळभळत्या जखमेसारखं.  इतकं सगळं होऊनही जावई आपली सेवा करतोय पण हर्षद मुलगा असुनही आपल्याला तोंडदेखलं बघायलाही आला नाही ही खंत दिगुअण्णांनी आनंदला बोलून दाखवली.


आनंदने दिगुअण्णांच्या मनातलं मळभ दूर केलं. हर्षद त्यांच्याबाबतीत किती हळवा आहे व त्याला त्यांना भेटण्याची किती तीव्र इच्छा आहे ते त्याने दिगुअण्णांना पटवून दिलं. आनंदने दिगुअण्णांच्या संमतीनुसार हर्षदला बोलवून घेतलं. हर्षद मालविकेला व छोट्या जाईला घेऊन आईवडिलांना भेटायला आला. दिगुअण्णांनी दोन्ही हात फैलावून त्याला मिठीत घेतलं व म्हणाले ,'हर्षद बाळा माफ कर मला मी तुला सदैव दुय्यम लेखत आलो. तुझी हेटाळणी केली." हर्षदची आई, मालविका व आनंद  बापलेकाची भेट पाहून खूष झाले. 


सुमीचा इमेल आला. तिला तिच्या दुसऱ्या जोडीदाराने सोडून दिलं होतं. सुमीला स्तनांचा कर्करोग झाला होता. तिच्या आयुष्याचे काही दिवस उरले होते व ती आनंदची माफी मागत होती. आनंदने तिला केंव्हाच माफ केलं होतं. 


सुमी परत भारतात आली. आनंदने मागचं सारं विसरुन तिची सेवा केली. या दुखण्यात सुमीचे स्तन काढावे लागले. ती निराशेच्या गर्तेत जात असताना आनंदने तिला प्रेमाचा,आपुकीचा आधार दिला. दिगुअण्णांनीही तिला माफ केले. आनंदच्या मायेने,आपुलकीने नात्यांचे बंध पुनश्च जोडले गेले.💐💐


-------गीता गजानन गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट