अंतर पिढीतलं


 

#अंतर_पिढीतलं

आजी आज एकटीच बसली होती,दुपारची कामं आवरुनसावरुन. दोघांचाच स्वैंपाक. त्यात हल्ली आजोबांच खाणं वयोपरत्वे थोडं कमीच झालं होतं.

 आजीला थोडीशीही दगदग आताशी झेपत नव्हती पण तरी आजोबांना काय हवं ते अगदी निगुतीने करुन घालायची ती. सगळं अगदी ताजं ताजं,गरमागरम. 
तब्येतीची कुरबुर ती चालूच असायची. गेल्या साताठ वर्षांपासून पेंशनीतला निम्मा भाग तरी दोघांच्या औषधपाण्याला खर्च होत होता. 

हल्ली तळणाचं,गोडधोडही खावसं वाटायचं दोघांना. आजी बरी असली की  एकेक खाऊचा पदार्थ करुन ठेवायची. कधी नारळाची बर्फी तर कधी मुगाचे लाडू. आजीच्या हाताला अफलातून चव शिवाय सदैव हात वरती. येणाराजाणारा आजीच्या हातचं खाल्ल्याशिवाय जात नसे,त्यांच्या कौतुकाने मग आजीलाही हुरुप येई.

मुलगा,सून बाहेरगावी रहायचे. त्यांचा फोन आला होता आजीला येणार आहेत म्हणून. आजीच्या अंगात अगदी उत्साह संचारला. नातवासाठी साजूक तुपात बेसनाचे लाडू बांधले,गोडाच्या शंकरपाळ्या केल्या. लेकाला ओव्याजिऱ्याच्या आवडतात म्हणून त्याही केल्या डबाभर. पावसामुळे चिवडा करायला जमला नाही म्हणून मग आजोबांकडून कुरमुरे आणून घेतले खमंग झणझणीत भडंगाचा दरवळ घरभर पसरला. 

पहाटेच लेकाची गाडी आली. लेक गौरांग, सून गायत्री व नातू प्रसन्न गाडीतून उतरले. आजीने पाहिलं,पन्नाशीचा लेक आता थोडा प्रोढ जाणवू लागला होता. कमी वयातच थकल्यासारखा वाटत होता. गायत्री नेहमीसारखीच आपल्याच नादात वावरत होती. प्रसन्नाला थोडीशी दाढीमिशी उगवू लागली होती. उंचापुरा प्रसन्न जणू तरुणपणातला त्याचा बाबाच. 

आजोबा म्हणाले,"अगं उंबऱ्यातच उभी रहाणार की आत घेणारैस लेकाला!"

आजोबांच्या बोलण्याने आजी भानावर आली. तिने तिघांना या म्हंटल. खरंतर त्यांचच घर , या तरी कशाला म्हणायला हवं! प्रसन्ना आजीआजोबांच्या पाया पडला. का बरं ही आली असावीत? आजीच्या डोक्यात पुन्हा किडा हुळहुळला. बँगलोरला रहात असुनही वर्षातून एकदाही यावसं वाटत नव्हतं त्यांना. सुनेला माहेरचंच कौतुक भारी होतं आणि लेकाला स्वतःचे आईवडील जुन्या वळणाचे वाटत होते. 

गौरांग एकुलता एक मुलगा पण म्हणून आजीने लाडावून ठेवला नव्हता. लहानपणापासून वळण लावलं होतं त्याला पण त्याच्या वडिलांशी त्याचं कधी जुळलच नाही. दोघांची तोंड नेहमीच पुर्वपश्चिम. गौरांग बारावीत होता तेव्हा काहीशा मार्कांनी त्याचा मेडीकल प्रवेश हुकला होता. गौरांगला वाटत होतं,वडील पैसे भरतील पण त्यांनी नाही भरले म्हणाले पुन्हा बस वाटल्यास परीक्षेलि पण डोनेशन नाही देणार मी.

 गौरांग मग चिडायचा..आयुष्यभर तत्वांना चिकटून राहिले. एवढी चांगली नोकरी..टेबलाखालून आरामात मलई मिळाली असती पण यांच्या तत्त्वात बसत नाही.  शिपायाचा मुलगा बाईक फिरवतो पण मला मात्र तू कमवता झालास की घे म्हणतात. गौरांगची आईकडे नुसती भुणभुण चालू असायची. आजी त्याला समजवायच्या,"अरे,तुझ्या भल्यासाठीच म्हणताहेत ते. उद्या कुठे पडलास किंवा अनवधानाने कोणाला ठोकलस तर. हेच तर दिवस आहेत राजा अभ्यास करायचे. सेटल झालास की घे कसली हवी ती गाडी." 

गौरांग मग हॉस्टेलला रहायला गेला. कॉलेजची चार वर्षे संपतासंपता त्याचं बँगलोरच्या कंपनीत सिलेक्शन झालं. रहायला टुबीएचके,दिमतीला गाडी..सगळं काही मिळालं. पुढे त्याच्याच ऑफिसातल्या गायत्रीशी त्याचं प्रेम जुळलं.

 दोन्ही घरांकडून लग्नाला मान्यता होती. लग्न झालं नि गौरांग व गायत्री बँगलोरला रहायला गेले. गायत्रीला दिवस राहिल्याची बातमीही गौरांगने त्यांना फोनवरून कळवली. आजीआजोबा दोघे लेकाच्या बँगलोरच्या घरी गेले पण दोन दिवसात त्यांना उबग आला त्या घराचा. लेक व सून दोघंही मोजकीच वाक्यं बोलायचे. स्वैंपाकीण बाई येऊन जेवण वाढायची. लेकाच्या भव्य घरात त्यांना मात्र उपऱ्यासारखं वाटू लागलं.

तब्येतीचं निमित्त सांगून माघारी परतले. शेजाऱ्यांच्या सुनेने आजीआजोबांना मोबाईल कसा हाताळायचा ते शिकवलं. आधी दोघांचा वेळ जाता जात नव्हता पण थोड्याच अवधीत दोघांचेही फेसबुक ग्रुप्स तयार झाले. फावल्या वेळात समवयस्कांशी चाटींग होऊ लागलं आजी तर पारंपारिक पाकक्रुती बनवतानाचे व्हिडिओ ग्रुपवर टाकू लागली. व्हिडिओ एडिटिंगचं काम आजोबा करु लागले. गौरांग,गायत्री आली तरी आजीआजोबांनी त्यांच्या दैनंदिनीत फारसा फरक नाही पडू दिला. 

गायत्रीला तर वाटलेलं,गेल्याबरोबर सासू काम  झेपत नाही,हेच दुखतं नि तेच दुखतं म्हणून रडगाणं लावेल पण इथे उलटं घडत होतं. आजोबांनी टेरेसमधे छोटीसी बाग केली होती.  टोमॅटो, कारली,वांगी,मिरच्या..काय काय म्हणून लावलं होतं. तेही फेसबुकच्या बगिचाप्रेमी ग्रुपचा प्रेमाचा सल्ला व मार्गदर्शन घेऊन. झेंडू,शेवंती,तगर..फुलांचा सुगंध दरवळत होता. जेवणं झाल्यावर प्रसन्ना टेरेसमधल्या झोक्यावर बसून मोबाईल गेम खेळत होता. गौरांग वडिलांजवळ आला.

"बाबा"

"बोल रे. कसा आहेस?"

"थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बाबा,हल्ली प्रसन्ना माझं ऐकत नाही."

"मित्र चांगले आहेत नं."

"हो बाबा,मित्र चांगले आहेत त्याचे पण माझ्याशी दोन शब्द बोलायला मागत नाही. माझं काहीच पटत नाही त्या गाढवाला. त्याच्या भल्यासाठीच सल्ले देतो ना मी त्याला. इंजिनिअरिंगला एडमिशन घ्यायला सांगतोय तर हा केटरिंग कॉलेजमधे एडमिशन घ्यायचं म्हणतोय. जरा दाढी कर म्हंटलं तर पकवू नका म्हणतो सरळ."

आजोबा हसले,"पकवू नका..गौरांग अरे जरा मागची पानं चाळ. तुझा भूतकाळ आठव. मीही तुला असंच सांगायचो शिस्तीचं जे तुला रुचत नव्हतं. मीही माझी मागची पानं चाळली तर माझं नि माझ्या वडिलांच नातंही काहीसं असंच होतं पण त्यावेळी उलट बोलायची पद्धत नव्हती. आतल्याआत धुमसत रहायचो मी. तुझ्या पिढीत तू थोडाफार आवाज उठवलास माझ्या शिस्तीविरुद्ध  तसाच  प्रसन्ना आता तुझ्याविरुद्ध बंड पुकारतोय. हे चालायचंच. त्याला जाऊदे त्याच्या मनाच्या वाटेने. तू त्याच्यासाठी वाट बनवून ठेवायचा प्रयत्न करु नकोस. धडपडूदेत,पडूदेत..जे मिळवायचं ते कष्टाने मिळवूदेत. आज भलेही तो तुझ्यावर रागावला असेल पण तुझ्या वयाचा होईल व मागे वळून पाहिल तेंव्हा तू त्याला तुझ्या जागी बरोबरच होतास हे कळेल."

"हो बाबा,तसंच झालंय खरंतर माझ्या बाबतीत. तुमच्या शिस्तीचं,संस्कारांच महत्त्व आता पटतय मला."

"बरं किती दिवस रहाणार आहेस? देवीला जाऊन येऊ आला आहेस तर."

"बाबा,मी कुठे जायला आलोय?"

"म्हणजे?"

"आम्ही दोघांनी आमची बदली इथल्या ऑफिसमधे करुन घेतली. आता तुमच्यासोबत रहाणार. चालेल ना तुम्हाला! आपण मिळून हे पिढीतलं अंतर सांधुया बाबा."

आजीआजोबा या अचानक चालत आलेल्या सुखाने हरखून निघाले.

------सौ.गीता गजानन गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट