हरवलेला भाऊराया गवसला
#हरवलेला_भाऊराया_गव
सला
रमा व माधव यांना दोन मुलं.मोठा सोहम.त्याच्यापाठीवर दोन वर्षांनी सई.सोहम व सईची भांडाभांडी किती असायची!आई वैतागायची त्यांची भांडणं सोडवून.अगदी लाडूत सुद्धा तुला मोठा,मला लहान मिळाला करुन भांडायची.फुटपट्टी घेऊन चॉकलेट माजून वाटे करायची.
घरात नुसता धुमाकूळ, उशांनी मारामारी,हात,पाय,दात,नखं सगळी अस्त्र वापरायचे.एवढं होऊन आईचा मारही एकत्र खायचे.मग तंगडीत तंगडी घालून झोपून जात
सोहम सईला गणितं शिकवे.शाळेत दोघं एकमेकांच बोट धरून जायची.सोहम मधल्यासुट्टीत फेरी मारुन सईचा हालहवाल बघून जायचा.कोणी सईची कळ काढलीच तर सोहम व त्याचे मित्र त्याची पळता भुई थोडी करीत.
काळ पुढेपुढे सरकत गेला तसतसे सोहम व सईही मोठे झाले.सोहमने वाणिज्य शाखा निवडली तर सईने आर्ट्सला प्रवेश घेतला.यथावकाश सोहमचं लग्न त्याच्यासोबत शिकत असणाऱ्या मोहिनीशी झालं.
मंदीमुळे सोहमला हवी तशी नोकरी मिळत नव्हती.तुटपुंज्या पगारामुळे तो नाराज असायचा.त्यातच त्याला लवकरात लवकर श्रीमंत व्हावसं वाटू लागतं.
सई एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून नुकतीच लागली होती.आईबाबा तिच्या लग्नाचं बघत होते.सोहमने सईला मस्का मारुन तिच्याकडून एक लाख रुपये घेऊन एका सहकारी पतपेढीत गुंतवले.सुरुवातीस त्याला त्यावर भरभक्कम व्याज मिळत होतं.सोहमला मग या व्याजाची हाव सुटली.तो सईकडे अधिक पैसे मागू लागला पण आई त्याला ओरडली.आईपुढे त्याची डाळ शिजेना.पुढे काही वर्षांत ती पतपेढी डुबली व सईचे पैसेही गंगेला मिळाले.
सईचं लग्न मामाच्या मुलाशी,आदित्यशी झालं.आदित्य चांगल्या पदावर कामाला होता.सईची नोकरीही बऱ्यापैकी टेंशनफ्री होती.मोहिनी सोहमला सारखं ताईकडे थोडे पैशे मागा सांगी व त्याची ताई त्याला वेळोवेळी मदतही करे पण आदित्यला हे खटकू लागले..मग सईने आपणहून मदतीचा हात आखडता घेतला.
सोहमला दोन मुली झाल्या.आईवडीलही आत्ता वयस्कर होऊ लागले होते.सोहमचे लक्ष आत्ता गावच्या घरावर व जमिनीवर गेले.जमीन रस्त्याला जाणार म्हणताच जमिनीला सोन्याचा भाव आला.घरही त्याच जमिनीत होतं.सोहमने जमीन विकल्यावर किती पैसे येतील याचा अंदाज लावला.पन्नास लाख तरी मिळणार होते.पण त्यात दोन वाटे होणार..अर्धे सईला अर्थे सोहमला.मोहिनी म्हणाली,"वनसंना काय कमी आहे.तुम्ही त्यांच्याकडे जा व हक्कसोडपत्र घेऊन या.सोहमलाही ही कल्पना आवडली.
तो अगदी साडीचोळी ,मिठाई घेऊन सईजवळ गेला.आदित्य सोहमला पुरता ओळखून होता.आपल्या भावाने आपल्यासाठी खाऊ आणला म्हणून भोळी सई खूश होती.तिने भावासाठी त्याच्या आवडते खिमा पेटीस,मटन बिरयानी बनवली.यथासांग पाहुणचार झाल्यावर सोहमने हळूच हक्कसोड पत्राचा विषय काढला.सई काही बोलायच्या आतच आदित्यने तिला नजरेनेच नकार द्यायला खुणावले.सईच्या अगदी जीवावर आलं होतं पण तिने जीवावर दगड ठेवून नाही म्हणून सांगितलं.सोहम म्हणाला,"अगं ताई मला माझ्या मुलींसाठी गुंतवणूक करायची आहे या पैशांतून"
आदित्य पुढे आला व म्हणाला,"अरे तुझी इस्टेट तुझ्या मुलींना द्यायची म्हणतोस पण सईच्या बाबांची इस्टेट मात्र तिने घ्यायची नाही.हक्कसोड पत्र द्यायचं म्हणतोस.ये बात कुछ हजम नहीं हुई . खर्चाचं म्हणशील तर खर्चाची दहा तोंड आवासून उभी आहेत.सध्या तुम्ही दोघं आईबाबांकडे नीट लक्ष देत नाही मग त्यांचं औषधपाणी, गोळ्या,महिन्याचा बाजारहाट सगळं सईच तर करते .
हां, तुम्ही दोघं आईवडिलांचा नीट सांभाळ करत असता तर एकवेळ विचार केलाही असता.सोहम रागारागाने तिथून निघून गेला.त्यानंतर चार पाच वर्ष ना त्याचा फोन ना घरी येणं.सईला दर भाऊबीजेला भाऊ असताना गुपचूप रहावं लागे.तिने बऱ्याचदा त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला पण सोहमने तिला ब्लॉक केले होते.
एकेदिवशी मात्र मोहिनीचा स्वतः हून फोन आला."ताई, सोहम फार आजारी आहे.त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत."
सई तडक इस्पितळात पोहोचली.डॉक्टरांना सांगून स्वतःच्या सर्व टेस्ट करुन घेतल्या व डॉक्टरांनी तिच्या मर्जीनुसार तिची एक किडनी सोहमच्या शरीरात बसवली.आदित्यला तिने आधीच समजावलं होतं.त्यालाही माहित होतं सईचा भावावर खूप जीव आहे व ती काही ऐकणार नाही.
जेंव्हा सोहम शुद्धीवर आला तेंव्हा मोहिनीने त्याला सईने त्याच्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल सांगितलं व म्हणाली,"आपण दोघांनीही सई वनसंना नेहमी पैशाने तोललं.घालूनपाडून बोललो.पण त्यांनी कुठचाच राग मनात ठेवला नाही.आत्ता माझंच मन मला खातंय."
दोन तीन दिवसांनी सोहम सईच्या रुममध्ये गेला व तिच्यासमोर कोपरापासून हात धरले.सई म्हणाली,"अरे वेडा का आहेस.मी तुझे प्राण वाचवले ते माझ्या स्वार्थासाठीच.माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभावं म्हणून.मात्र आत्ता आईबाबांचा नीट सांभाळ कर.जमीन म्हणजे आपली आई,ती विकू नकोस रे."
हळूहळू सईची तब्येत सुधारली.या भाऊबीजेला तिला भावाच्या वाटेकडे डोळे लावून बसावं नाही लागलं.दोन दिवस आधीपासूनच सोहम तिला व आदित्यला त्याच्या घरी घेऊन गेला.दोघांची भाऊबीज पाहून त्यांच्या आईवडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले.पुन्हा एकदा घराचं गोकुळ झालं.बहिणीला तिचा हरवलेला भाऊ परत मिळाला.✍️
------------गीता गजानन गरुड,आंब्रड,मोगरणेवाडी.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा