पुरुषी अहंकार


 #पुरुषी_अहंकार 


देशपांड्यांच्या घरातली भांडणं शेजाऱ्यापाजाऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. एकदोनदा सोसायटीने त्यांना नोटीसही दिली होती पण तन्मयचं म्हणणं असायचं,आम्ही आमच्या घरात काहीही करु. लोकं कोण विचारणारे?


तन्मय व तनुजाचा प्रेमविवाह झाला होता. कॉलेजमध्ये दोघं एकत्र शिकत हौती. येताजाता कधी एकमेकांच्या प्रेमात पडली,हे त्यांच त्यांनाच कळलं नाही. दोघांनीही शिक्षण पूर्ण करुन स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावरच लग्न करायचा निश्चय केला. यथावकाश दोघांनीही डिगरी संपादन केली,पुढे एमबीए केलं. नोकरीचे अर्ज भरायला सुरुवात केली. दोघांनाही नोकऱ्या मिळाल्या. तन्मयच्या आईला तन्मयची पसंती मान्य होती पण तनुजाच्या आईवडिलांच्या द्रुष्टीने तन्मय त्यांच्या स्टेटसला शोभून दिसणारा नव्हता. तनुजाने आईवडिलांना हरतर्हेने समजावलं पण त्यांचा तनुजाच्या निर्णयाला ठाम नकार होता.


शेवटी तनुजा एकेदिवशी घरातून पळाली. लांब शहराबाहेर असलेल्या एका मंदिरात मोजक्या मित्रमंडळींच्या व तन्मयच्या आईच्या,राधिकाताईंच्या उपस्थितीत त्यांच शुभमंगल झालं. पहिली दोन वर्ष खूप सुखात गेली. राधिकाताई तिची हरतर्हेने काळजी घेत होत्या. तनुजाला घर,ऑफीस हे करताना दगदग होऊ नये म्हणून त्या बरीचशी कामं स्वत: आवरायच्या.


तनुजाने प्रमोशनसाठीची परीक्षा दिली . त्यात ती पासही झाली व हेडक्लार्क म्हणून तिची पदोन्नती झाली. आत्ताचं तिचं ऑफीस घरापासून बरंच लांब होतं म्हणून तिने हफ्त्यावर स्कुटी घेतली. स्कुटी आणली तेंव्हा तिची पूजा करुन राधिकाताईंना तिने सोसायटीभोवती दोन राऊंड फिरवून आणले. तन्मयने स्कुटीच काय सायकलही कधी चालवली नसल्याने तन्मयला हे प्रकरण जरा नवीन होतं पण त्याने तिच्या स्कुटीचं साधं तोंडभरलं कौतुकही केलं नाही. तनुजाने स्वतःला समजावलंकी त्याचा मूड नसेल. 


तनुजाच्या पगारात पदोन्नतीमुळे चांगलीच वाढ झाली होती. तन्मयचा पगार तिच्याहून दहा हजाराने मागे पडला .  इथेच माशी शिंकली. तन्मयचा इगो दुखावला गेला. तो कितीही आधुनिक असला तरी बायकोने त्याच्या वरचढ होणं हे त्याच्या पुरुषी मनाला पटलं नाही. तो आतल्याआत धुमसत होता. त्यामुळे साहजिकच ऑफिसात त्याच्या हातून चुका होऊ लागल्या. साहेबाची बोलणी रोजचीच झाली. या साऱ्याचा राग तन्मय तनुजावर काढू लागला होता. 


सतत तिच्यावर संशय घेऊ लगला होता. जरा उशीर झाला तर 'माझी आई घरात आहे म्हणून हे घर चालतय' असं बोलू लागला. "तुझा साहेब तुला आवडू लागला आहे म्हणून तू त्याला रिझवण्यासाठी भारी भारी साड्या नेसून,मेकअप करुन जातेस", असं बोलून डिवचू लागला. राधिकाताईंना फार वाईट वाटायचं. त्या तन्मयला ओरडायच्या पण त्याच्यावर काही फरक पडत नव्हता. एकेकाळच्या प्रीतीची जागा असुयेने घेतली होती. तन्मयने तनुजाच्या चारित्र्यावर घेतलेले संशय तिच्या जिव्हारी लागायचे मग तीही त्वेषाने भांडायची. शब्दाला शब्द वाढत जायचा. 


राधिकाताई थकल्या होत्या. त्यांच्या स्वर्गवासी नवऱ्याचेच गुण त्यांना त्यांच्या मुलात दिसत होते. पत्नी ही फक्त मिरवण्याची वस्तू आहे,तिने नवऱ्यापेक्षा एक पायरी खालीच राहिलं पाहिजे, तिने नोकरी करावी पण फक्त अर्थार्जनासाठी.. करिअर म्हणून नव्हे,स्वतःला सिद्ध करण्यासाठी नव्हे अशा बुरसटलेल्या विचारसरणीची पुटं तन्मयच्या वडलांच्या वागण्याबोलण्यातून तन्मयवर चढली होती.  कितीही समजावलं तरी तन्मय ती उतरवण्यास तयार नव्हता. 


तन्मयच्या वडिलांच्या पुरुषी अहंकारामुळे राधिकाताई शिक्षण असूनही चार भिंतीतच राहिल्या होत्या. किती हौस होती त्यांना नोकरी करण्याची,बाहेरचं जग बघण्याची पण तन्मयच्या वडलांनी व त्यांच्या(राधिकाताईंच्या) सासूसासऱ्यांनी त्यांच्या विचारांना,इच्छा आकांक्षांना  पायदळी तुडवलं होतं. 


स्त्री एकदा घराबाहेर पडली की हाताबाहेर जाते,पायपुसणं हे पायाखालीच ठेवावं अशी जिव्हारी लागणारी वाक्यं राधिकाताई झेलत आल्या होत्या. वडील माणसांचे हेच संस्कार तन्मयच्या मनावर पेरले गेले होते. 


एके दिवशी साऱ्या मैत्रिणींनी जीन्स घालून कुठेतरी सहलीला जायचं ठरवलं. तनुजाने तन्मयला आवडत नाही म्हणून सासरी आल्यापासून जीन्स घातली नव्हती  पण साऱ्या मैत्रिणींच्या आग्रहाखातर ती तयार झाली. सहलीला जायच्या दिवशी राधिकाताईंनी तनुजाला मोठ्या हौसेने तिखटमीठाच्या पुऱ्या करुन दिल्या सोबत लिंबाचं लोणचं दिलं. पांढराशुभ्र चिकनचा टॉप व स्कायब्लू कलरची जीन्स, खांद्यावर रुळणारे कुरळे केस,हलकासा मेकअप, ओठांना बेबीपिंक कलरची लिपस्टीक.. तनुजा फार सुंदर दिसत होती व खूष होती. राधिकाताईंनी तिचं कौतुक केलं व नेहमी अशी आनंदी रहात जा असं सांगितलं.


 तन्मय सकाळीच ऑफिसला गेला होता. तन्मयला घरी यायला रात्रीचे नऊ वाजले. तनुजाचा अजुनही पत्ता नव्हता. तन्मयच्या कपाळावरची शीर उडू लागली. त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. अखेर दहा वाजता तनुजा घरी पोहोचली. तिला जीन्स टॉपमध्ये बघताच तन्मय अजुनच खवळला. त्याने तनुजाच्या श्रीमुखात भडकावून दिली. 


तनुजा रागाने लाल झाली पण तन्मय परत तिला मारायला धावून गेला तिथेच स्टूलला अडखळून पडला. राधिकाताई,तनुजा दोघी त्याला उठवायला धावल्या,पण  त्याला उठता येईना. शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला इस्पितळात दाखल केलं. 


सगळ्या तपासण्या झाल्या. डॉक्टर म्हणाले,कंबरेच्या नसीला मार लागला आहे. रोज फिजीओथेरपिस्ट दाखवतील तसे व्यायाम करावे लागतील,व्यायामात सातत्य हवं. 


तनुजाने डॉक्टरांना विचारलं,"डॉक्टर, हा स्वतःच्या पायावर उभा रहायला किती वेळ लागेल?"


डॉक्टर म्हणाले,"ते नाही सांगू शकत. इच्छाशक्ती,व्यायाम या साऱ्यावर अवलंबून आहे. नाहीच झालं तर शेवटचा इलाज म्हणून शस्त्रक्रिया करु."


आठ दिवसांनी तनुजा तन्मयला घरी घेऊन आली. तन्मयला फक्त आपल्या हाताने खाता येत होतं पण बाकीच्या विधींसाठी आईची व बायकोची मदत लागत होती. त्याही त्याची सर्वतोपरी काळजी घेत होत्या. तनुजा तन्मयकडून व्यायाम करुन घेत होती. तिने सुट्टी घेतली होती. तनुजा,तन्मयच्या बाजूला बसून त्याला आवडणाऱ्या विषयावर गप्पा मारायची. घरातलं वातावरण प्रफुल्लित ठेवत होती.


 थोड्याच दिवसात योग्य व्यायामामुळे तन्मयमध्ये सुधारणा जाणवू लागली. तनुजाच्या खांद्यावर हात ठेवून तो एकेक पाऊल चालू लागला. तन्मयला आत्ता एका स्त्रीमध्ये किती शक्ती असते, तिच्यात किती वात्सल्य असतं,प्रसंगी ती कशी धीराने आलेल्या अडचणींशी लढते हे कळू लागलं होतं. त्याच्या भूतकाळातील चुकांचा,तनुजाचा त्याने वेळोवेळी केलेल्या अपमानाचा त्याला खूप पश्चात्ताप होत होता. 


पण कोणत्या तोंडाने तो तिची माफी मागणार होता? अखेर त्याने तनुजाला एक पत्र लिहिलं. त्या पत्रात त्याने तिच्यावर केलेल्या अन्यायाची माफी मागितली. लिहिता लिहिता त्याच्या डोळ्यातली आसवं पडून पत्रावरची अक्षरं धुसर होत होती.  तनुजा कधी येऊन त्याच्या मागे उभी राहिली त्याला कळलच नाही. तनुजाने त्याला गच्च मिठी मारली व म्हणाली,"नको रे तन्मय मला तुझी माफी. तू फक्त  मला माणसासारखं वागव. माझ्या भावना समजून घे. तुझ्या मनातलं संशयाच भूत काढून टाक. आपल्या नात्यात जीवघेणी स्पर्धा नको आणूस. संशयाची जाळी विनाकारण पेरु नकोस. तन्मयने तिला यापुढे सन्मानाने वागवेन असं वचन दिलं. राधिकाताईंना तरी अजून काय हवं होतं. या दोन लेकरांची एकी झालेली पाहून त्या भरुन पावल्या.


--------गीता गजानन गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट