ती पाहताच बाला




 © गीता गजानन गरुड.

आंब्रड.


ती पाहताच बाला..


आमचा सदू लहानपणापासूनच कल्पनेत रमणारा,

दिवास्वप्नं पहाणारा.

इयत्ता तिसरी,

बाईंनी एक मुलगा एक मुलगी असं बसवलं.

सदूच्या बाजूला नाजूकशी घार्या डोळ्यांची,

गोरीपान सखू.

हळूहळू धीर चेपला

दोघं एकमेकांशी बोलू लागली.

डब्यातल्या साखरपोळीची देवाणघेवाण,

पेन्सिलची फायटींग,

बाकाला कान लावून फोन फोन खेळणं,

सखूनं गिरमिट आणलं असलं तरी

तिच्या पेन्सिलची टोक तुटली रे तुटली की

याचं तिला म्हणजे तिच्या पेन्सिलला झाकपैकी

टोक काढून देणं.

सखूचं थेंक्यू म्हणणं.

नी आमच्या यड्या सदूचं लाजणं.

सदूला लय भारी वाटायचं..

सदू घरी सिनेमा बघायचा

सलमान व भाग्यश्रीचा

त्यातलं गाणं..

कबूतर जा जा जा कबूतर जा जा जा

पहेले प्यारकी पहेली चिठ्ठी $$$

साजन को दे आ..

या गाण्यात सदूला सलमानच्या जाग्यावर तो 

व भाग्यश्रीच्या जागी गोरीगोरी सखू दिसायची.


झालं तिसरीतून सर्व विद्यार्थी चौथीत गेले.

सदू व सखू वेगवेगळ्या वर्गांत.

इथं बाईंनी मुलं मुली वेगवेगळ्या बसवल्या.

सदोपंत मित्रांच्यात राहून सखू नावाचं पान

हळूहळू विसरुन गेले.

वर्गात कागदाची विमानं उडवणं,

एकमेकांना मधल्या सुट्टीत बुकलून काढणं

परत ज्याला बुकललं त्याला तो आईला नाव 

सांगू नये म्हणून पेप्सी,बोरं,बर्फ का गोला,

खारातिखा भुटा खायला घालणं हे पराक्रम चालू झाले.


घरचा अभ्यास अपूर्ण असला की

बाई बर्याच जणांना कोंबडा बनवायच्या.

कोंबड्यांच्या नामावलीत सदोपंतांचं नाव अग्रेसर.

बाई त्याच्या पार्श्वभागाला फुटपट्टीने फोडायच्या.

असचं एकदा सदूचा चोप काढताना व सदू मार चुकवताना बाईंच्या बांगडीवर फुटपट्टी बसते.

बाईंची बांगडी वाढवते.

व तिचा तुकडा त्यांच्या मनगटात रुतून

भळाभळा रक्त वाहू लागतं.

सदूला त्याची आजी मांडीवर घेऊन निजवे 

व त्याचं डोकं थोपटत अंगाई म्हणे ,

भरजरी गं पितांबर दिला फाडून

द्रोपदीस बंधू शोभे नारायण

सुभद्रा क्रुष्णाच्या पाठची बहीण

विचाराया गेले नारद म्हणून..

सदूचे चिमुकले डोळे लकाकतात.

तो त्याचा नवा कोरा रुमाल काढतो

व जखमेवर बांधतो.

बांईंच्या डोळ्यांना अश्रूंच्या धारा लागतात.

बाई सदूला कवेत घेतात.

म्हणतात, किती रे गुणी बाळ आहेस तु सदू?

का रे मला मारायला लावतोस.

अभ्यास वेळेवर करत जाना.

सदूलाही भरुन येतं.

बाईंना सांगतो,आजपासून नक्की.

सदू खरंच सुधारतो.

रोज ग्रुहपाठ पुर्ण.

बाई सदूला वर्गप्रमुख बनवतात.


इयत्ता पाचवी ते दहावी

मुलामुलींची शाळा वेगवेगळी

मित्रांबरोबर सतत राहून सदूचे मुलींविषयीचे आकर्षण कमी होते.

सदू अभ्यासात चमकू लागतो.

निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा गाजवू लागतो.

शिक्षकांचा आवडता विद्यार्थी बनतो.

दहावीला तर सदूचा आदर्श विद्यार्थी म्हणून सत्कार होतो.


अकरावीत असताना परत

नुकतीच मिसरूड फुटलेली मुलं नी वयात 

आलेल्या मुली एकत्र.

पण आमच्या सदोपंतांना कोण आवडू लागतं माहितीय?

गोर्यापान,लांब शेपटा असणार्या,

जुईचा गजरा माळणार्या,

फुलाफुलांची साडी नेसणार्या,

स्लिव्जलेस ब्लाऊज घालणार्या 

इकनोमिक्सच्या मिस.

चवळीची शेंगच जणू.

सदूची प्रेझेंटी एकदम परफेक्ट.

इतर विषयांत प्रगती पण

इकोच्या पिरियडला..

पोप्युलेशन,इन्फ्लेशन,इनइक्वेलिटी,

पावर्टी लाइनच्या वेळी

मिसचा गोरापान चेहरा,मेचिंग बांगड्या,

कर्णफुलं,मेचिंग लिप्स्टीक, नेलपेंट..

सदोपंतांच्या इकोचा बट्ट्याबोळ.

शेवटी कशीबशी

एकमेका सहाय्य करु,अवघे धरु सुपंथ करुन

सदोपंतांची इकनोमिक्सची नैया किनार्याला लागते.


असचं तेरावी,चौदावीत,

ट्युशनमधली एक चाफेकळी सदोपंतांच्या मनात भरते.

प्यारवाली घंटी पुनश्च बजते टणटणाटणटणटणटारा..

ती यौवना केस मोकळे सोडून यायची.

सदूच्या पुढच्या बेंचवर आसनस्थ.

सदू बिचारा तिच्या केसांच्या सुगंधात पुरता गुरफटायचा.

त्याचचं डेप्रिशिएशन व्हायचं.

आजुबाजूचे मित्र सज्जन.

त्यांना सदोपंतांचा नाजूक विकनेस माहिती.

ते याला कसाबसा त्या गुंत्यातून बाहेर काढून

बेलन्सशीटमध्ये आणायचे.


पंधरावीला टेक्शेशनची तामिळ मिस,

कपाळावर चंदनाचा टिका लावणारी,

सदोपंतांचं ह्रदय चंदनी चंदनी..

डायरेक्ट,इनडायरेक्ट टेक्स सगळा 

एकमेकात मिसळून जायचा.

कसलं स्टेंडर्ड डिडक्शन नी कसलं काय?

परत मित्रांनी त्याला बखोटीला धरुन त्या

चंदनाच्या जंगलातून बाहेर काढलं

व अहोरात्र सदूकडून अभ्यास करुन घेतला.

असे मित्र मिळणं म्हणजे सदोपंतांचं पुर्वजन्मीचं पुण्य म्हणायचं.

मित्रांच्या क्रुपेमुळे सदोपंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतात.


नोकरी लागल्यावर कार्यालयातली बाँस सदोपंतांच्या

स्वप्नात येऊ लागली.

सदूची आई त्याचं लग्न गावातल्या ,तिच्या ओळखीच्या,

गुरुजींच्या मुलीशी,सईशी लावून देते.

वर्षभरात सई काय जादू करते कोण जाणे,

पण सदोपंत तिच्या प्रेमात विरघळू लागतात

व त्यांचा ती पाहताच बालाचा नाजूक आजार 

हळूहळू लोप पावतो.

सदोपंतांच्या ह्रदयाच्या कप्प्यात गुणी,गोड गळ्याची,

केतकी वर्णाची,सालस,सोज्वळ सई आपलं स्थान पटकावते.💐💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट