आई मी चुकलो ग!


 गीता गजानन गरुड.

आंब्रड.


आई मी चुकलो गं!


नितीन निरोप मिळताच परदेशातून आला.

विमानात फार अस्वस्थ वाटत होतं त्याला.

पावसामुळे फ्लाईट तब्बल सहा तास लेट होती.

जिन्यात चढताना त्याला एकदम स्तब्धता जाणवली.


एरवी नितीनदादा आला म्हणून कल्ला करणारे बंट्या,बबडी,पप्या,गोटू,छकुली कुठे दिसेनात त्याला.

त्याने विचार केला दोन वर्षांनी येतोय मी,एव्हाना मोठी झाली असतील मुलं.

दाराजवळच्या जिन्यात सोसायटीतले पेंडसे काका,भेरे काका काहीतरी अस्पष्ट आवाजात बोलत उभे होते.

नितीन समोर दिसताच,पेंडसे काकांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

नजरानजर झाली.

नजरेनेच पेंडसे काका बरंच काही बोलून गेले.


घरात पाय ठेवताच हाँलच्या दारावर आईवडलांचा फोटो पाहून नितीन गळून पडला.

त्याने तिथेच बसून मोठ्याने हंबरडा फोडला.

म्हणाला,आई पप्पा मी चुकलो.

आई तु मला सांगत होतीस फोन करुन," आम्हांला अस्वस्थ वाटतंय फार.एकदा तरी येऊन जा.तुला डोळे भरून पाहू दे.तुझ्या गालांवर हात फिरवू दे.तुला ह्या थकलेल्या हातांनी गोडधोड करुन घालूदे.तुला मायेचा घास भरवू दे."

गेली दोन वर्षे तु विनवण्या करीत होतीस गं.

पण मी माझी माया,संपत्ती वाढवण्यात इतका गुंग होतो की मी तुम्हा दोघांना ग्रुहित धरलं.

धुंदी चढली होती मला करिअरची,एकामागून एक मिळणार्या प्रमोशनची नी त्याबरोबर वाढत जाणार्या माझ्या पेकेजमधल्या शुन्यांची.


शेजारी रहाणार्या डायनाच्या अदा पाहून पुरता घायाळ झालो होतो मी.

तुमच्या इच्छेविरुद्ध डायनाशी लग्न केलं.

तरी तुम्ही मनात राग नाही ठेवलात.

झालंगेलं विसरुन डायनाशी फोनवर बोललात.

तुम्हाला तिला एकदा डोळे भरून पहायचं होतं,

आम्हांला जोड्याने कुलदैवताच्या दर्शनाला न्यायचं होतं.


त्यासाठी किती आर्जवं केली तुम्ही.

पण मी डायनाबरोबर ऐश करत होतो.

प्रेमात पुरता आंधळा झालो होतो.

ज्या आईपप्पांनी मला तळहाताच्या फोडासारखं जपलं होतं त्यांना मी अडचण समजू लागलो होतो.

तुमचा फोन आला की काय कटकट आहे अशा स्वरुपाच्या आठ्या पडायच्या माझ्या कपाळावर.

डायनाला तर तुमच्यात काही इंटरेस्टच नव्हता. 


आईपप्पा जिच्यासाठी मी तुम्हांला सोडलं,ती डायना माझी कधीच नव्हती.

तिने माझ्याशी नव्हे तर माझ्या पैशांशी लग्न केलं होतं.

हवेतशे पैसे उधळत होती.

सारख्या तिच्या लेट नाईट पार्टीज,तिचे सो काँल्ड बाँयफ्रेण्ड्स.

मला फक्त एक मुल हवं होतं पण तिने सफशेल नकार दिला.

तिला तिची फिगर महत्त्वाची होती.

मी फक्त पैसे कमावणारा गाढव म्हणून उरलो होतो.


ती मला सोडून गेली,तिच्या दुसऱ्या प्रियकरासोबत.

त्या चार्लीकडे,माझ्या बोसकडे माझ्यापेक्षा जास्त संपत्ती म्हणून तिने सोडून दिलं मला.

आई मी खूप चुका केल्यात गं.

आत्ता वेळ निघून गेलेय.

मला तुझ्या कुशीत शिरून तुझा पदर डोक्यावर घेऊन खूप खूप रडायचयं.

बाबांशी संवाद साधायचाय.

त्यांना एकदा कडकडून मिठी मारायचीय.?

पण त्याला आत्ता फार उशीर झाला आहे.

माझ्या पैशांनी मी नाही तुम्हांला परत आणू शकत.

आत्ता या जगात एकटा जगून मी काय करू?


इतक्यात नितीनला त्याच्या पाठीवरून दोन मायेचे हात फिरत असल्याचं जाणवतं.

तो स्पर्श त्याला बराच ओळखीचा जाणवतो.

पाठीमागे वळून पहातो तर साक्षात त्याचे आई व पप्पा.

नितीनला काही कळतच नाही.

तेवढ्यात पेंडसे काका सांगतात , नित्या गाढवा ही आयडीया माझी.

हा फोटो वगैरे सगळा माझ्या सुपिक मेंदूतला प्लँन.

हल्ली मला सोसायटीतल्या चिल्लर गँगने फेसबुक अकाऊंट उघडून दिलंय.

शाळेतले,कामावरचे जुने फ्रेंड्स परत मिळाले मला या थोबाडपुस्तकामुळे.

तुझा पप्पा हल्ली फार खंगत चाललाय कारण विचारलं तर बेणं सांगायला तयार नाही.

आमच्याबरोबर पार्कात असतानाही असून नसल्यासारखा रहायचा.

एकटाच कुठेतरी शुन्यात बघत रहायचा.

मी म्हंटलं,इसका अब कुछ करना पडेगा.


शेवटी मीच तुझ्या आसपास रहात असणार्या माझ्या मित्रांच्या मुलांकडून तुझी माहिती मिळवली.

तुझ्यासोबत जे झालं ते ऐकून फार वाईट वाटलं.

तु त्यातून बाहेर पडावं म्हणून अर्जंट फोन केला मी व हा सगळा बनाव रचला.

भेरेकाका म्हणाले,"अरे मुलीसाठी कशाला रडतोस?

तुझ्यासाठी हवे तशी मुली आणतो मी .आम्ही सोसायटीच्या रिटायर्ड सदस्यांनी मिळून वधुवरसुचक मंडळ स्थापले आहे.त्यात नोंदणी करतो मी तुझी.

सो चिल माय बाँय अँड एन्जॉय दिस हेपिएस्ट मोमेंट."

नितीनने आईपप्पांना घट्ट मिठी मारली.तो कायमचा भारतात स्थायिक झाला.


छान, सोज्वळ,सुशील मुलीशी नितीनचं लग्न झालं.

नितीनचा संसार पुन्हा नव्याने बहरु लागला.

मात्र आत्ता या संसारात त्याच्या आईपप्पांनाही हक्काचं,मानाचं स्थान मिळालं.💐💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट