अवगत
#अवगत
़
मी साधा बीएमसीतला कारकुंडा. पगार काही फार नव्हता पण भागायचं कसंतरी. घरात मी न् आई.वडिलांनी दोन वर्षापूर्वी एक्झिट घेतलेली. आईने माझ्यापाठी लग्नाचा तगादा लावलेला. आयुष्यभर कष्ट केले तिने संसारासाठी.
वडिलांना पेरेलिसिसचा झटका आला होता. एक बाजू लुळी पडली होती. दोन वर्ष जाग्यावर अंथरुणाला खिळून. माझ्या आईने हगणंमुतणं सारं काढलं त्यांच. मीपण सुट्टीला मदत करायचो पण मग मला उलटून यायचं. तो वास मेंदूत शिरायचा,म्हणून आई शक्यतो मला बाहेर पिटाळायची.
नात्यातल्या मुलीचं स्थळ चालून आलं. मी थोडेसे आढेवेढे घेऊन मुलगी बघायला गेलो. मुलीला पाहिली.निमगोरीसी, रेखीव चेहरा.खालचा ओठ जरा जाड होता..पण एकंदरीत बरी वाटली. मनात म्हंटल आपण तरी कुठे परफेक्ट आहोत.
लग्न वैदिक पद्धतीने केलं. जास्त तामझाम करायला दोन्ही पार्टीकडे पैसा नव्हता. तिच्या नंतरच्या दोन्ही बहिणी अजून उजवायच्या होत्या. मोठा भाऊ लग्न होऊन केंव्हाच वेगळा झालेला. वडील पेंशनर .
उमा घरात आली आणि माझ्या आईला तिने तिच्या वागणुकीने आपलसं केलं. माझ्या आईला तिच्या रुपात लेक मिळाली. दोघी मी नसताना दुपारी छान गोधडीत गुडुप व्हायच्या. मायलेकीच जणू.आईच्या चेहऱ्यावरही टवटवी दिसत होती.
उमा माझ्या सर्व गरजा पुर्ण करत होती. आजकाल मी ऑफिसातलं थोडं काम घरी आणू लागलो होतो. उमा दुपारच्या वेळात ते पुर्ण करून ठेवायची.
त्यादिवशी शनिवार होता.आईनेच मला आग्रह केला. उमाला जरा दोन दिवस बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन जा. मी साहेबांना सांगून चार दिवसाची रजा घेतली. पावलो बसचं रिझर्वेशन केलं. संध्याकाळी सहा वाजता आम्ही बसमध्ये चढलो. सीट नंबर पाहून आमच्या केबिनमध्ये शिरलो.
निळाजांभळा बेड.. वरती दिव्याचा पिवळा सौम्य प्रकाश. छानच वातावरण होतं. केबिनचं दार बंद केलं. सोबत आणलेली शाल पांघरली अन् उमेला कुशीत घेतलं.तीही मला बिलगली. त्या मंद प्रकाशात रात्रभर आमचा प्रेमालाप सुरू होता. गाडी पाण्यासारखी चालत होती. मलातर स्वर्गात असल्यासारखं वाटतं होतं.
सकाळ झाली तसं देवगड आलं. आम्ही बेग घेऊन उतरलो. तिथून कुणकेश्वरला रिक्षा केली.रिक्षावाल्यालाच एखाद्या चांगल्या लॉजिंगमध्ये उतरवायला सांगितलं. विसावा लॉजसमोर रिक्षा थांबली. रिक्षाचं भाडं देऊन आम्ही लॉजमध्ये शिरलो.
छान दुमजली घर होतं ते. लॉजच्या मालकाने रुमची चावी दिली. रुममध्ये पांढराशुभ्र पलंगपोस. बाजूला ड्रेसिंग टेबल. एक टेबल त्यावर पाण्याचं तांब्याभांड..बाल्कनी..उमाला घेऊन मी बाल्कनीत गेलो. समोर फेसाळणाऱ्या लाटा दिसत होत्या.खारा वारा अंगाशी खेळत होता.
आम्ही दोघंही आंघोळ वगैरे करुन फ्रेश झालो व देवाच्या दर्शनाला गेलो. शिवशंकराच्या पिंडीवर बेल वाहिला. मनोभावे प्रार्थना केली.इतरही बरीच छोटी छोटी मंदिरं आजुबाजूच्या परिसरात आहेत. त्या देवस्थानांची भेट घेतली.
दुपारी सपाटून भूक लागली. लॉजमालक अण्णाने मस्त सुरमई फ्राय,खेकड्यांचा रस्सा ,तांदळाच्या भाकऱ्या व उकड्या तांदळाचा भात सर्व्ह केला. आम्ही दोघंही चापून जेवलो आणि छान ताणून दिलं ते रात्री नवाच्या सुमारास उठलो. तेही लॉजमालक ऑर्डरसाठी फोन करत होता म्हणून.
साधंच कोकमकढीभात बटाट्याची भाजी असं जेवण जेवलो आणि समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलो. उमेसोबत वाळूत पावलं उमटवत चालायला खूप भारी वाटत होतं. मधुनच लाट आमच्या पावलांना भिजवून जात होती. लाटांची ती मोत्यांची झालर फारच विलोभनीय भासत होती.
मी माझी बोटं उमाच्या बोटांत गुंफली होती.नारळाच्या झावळ्यांची मंद सळसळ ऐकू येत होती. आकाशात चंद्र नव्हता. अमावस्या होती वाटतं. समुद्राचं पाणी अधिकच गडद भासत होतं. बरंच चालून थकल्याने आम्ही लॉजकडे वळलो.
रात्री मी उमेला कुशीत घेतली खरी पण उमाचं केरेक्टर चेंज झाल्यासारखं वाटलं. म्हणजे नेहमी मी तिला जवळ घ्यायचो. हळूहळू खुलवायचो. हे कायतरी अजब घडत होतं.
उमा पिसाटल्यासारखी माझ्या शरीरावर तुटून पडली होती. अधाशासारखा प्रणय करत होती. मला तिच्याकडून थोडं ओपन प्रेम हवं होतं पण एवढंही नव्हे. आताशा तर ती मला चावे घेऊ लागली.
तिच्या दातांचे व्रण माझ्या छातीवर उमटले. ती अजून वर आली. माझ्या मानेच्या मागच्या बाजूला जोरात चावा घेऊ लागली..मला तर तक्क्षणी ड्रेक्युलाच आठवला .. सहन न झाल्याने मी तिला झिडकारलं.मी तिच्या डोळ्यांत पाहिलं. एक वेगळीच चमक दिसत होती. नक्कीच ती माझी उमा नव्हती.
मी रागात तिला एक लगावलीच त्याबरोबर क्षणार्धात तिच्या डोळ्यातली चमक नाहीशी झाली अन् माझी भोळीभाबडी उमा मला परत मिळाली. मी घाबरलो. च्यायला ही काय गडबड आहे. सकाळी आठ वाजले तरी उमा उठली नव्हती.
मी हळूच बाहेर आलो. लॉजमालकाला गाठला. त्याला सगळं सविस्तर सांगितलं. लॉजमालक म्हणाला,”ते साहेब काल अमावस्या होती. माझंच चुकलं मी तुम्हांला समुद्राकडे जावू नका सांगायला हवं होतं. आत्ता इथला मांत्रिकपण दोन दिवसासाठी बाहेरगावी गेलाय. आल्यावर नक्की दाखवू बाईसाहेबांना.
माझा या मांत्रिकावर वगैरे विश्वास कधीच नव्हता. मी रुममध्ये परत आलो तेंव्हा उमा छान आकाशी शिफॉनची साडी नेसून तयार झाली होती.
आम्ही सिंधुदुर्ग किल्ला,शिवाजी महाराजांच मंदिर,रॉक गार्डन पाहिलं. संध्याकाळी आठाच्या सुमारास घरी आलो.उमा अगदी नेहमीसारखी वागत होती. मी सुटकेचा निश्वास सोडला. रात्री खास रसशेवयांचा बेत होता. माझ्या आवडीचा. आम्ही भरपेट जेवलो.
उमा समुद्रावर जाण्याचा आग्रह करत होती पण मीच दुर्लक्ष केलं. तिथेच गार्डनमध्ये राऊंड मारले.दहाच्या आत रुममध्ये आलो.आज उमाने मला अगदी भरभरून प्रेम दिलं. त्या कालच्या खुणाही आपणच गायब झाल्या होत्या. उमा थोडी खुलली होती.हळूहळू मला चेतवत होती. मीही मग कालच उट्ट वसूल केलं पण हळूच कारण माझं माझ्या उमेवर भरपूर प्रेम होतं.
मध्यरात्री मला जाग आली, बाजूला पाहिलं तर उमा बेडवर नव्हती. मी बाथरुमकडे वळलो.तिथेही नव्हती.बाल्कनीत गेलो तर..तर मला उमा समुद्राकडे जाताना दिसली. मी तसाच धावत सुटलो वेड्यासारखा उमा..उमा जीवाच्या आकांताने हाका मारीत.
उमा समुद्रात कंबरभर पाण्यात गेलेली. तिला पोहता येत नव्हतं हे मला ठाऊक होतं. तिने पाठी वळून माझ्याकडे पाहिलं. मला तिच्या डोळ्यात कालचीच चमक दिसली. आत्ता उमा अजून आत आत जात होती. एका क्षणात सागरात..त्या काळ्याभोर जळात नाहीशी झाली.
मी अगदी थंडगार पडलो. माझे पाय जागचे हलेनात. डोकं बधीर झालं होतं. जीवाच्या आकांताने उमा उमा ओरडत होतो. माझी किंचाळी त्या काळ्याभिन्न अंधाराला फाडत होती. दूरवरुन कोल्हेकुई ऐकू येत होती.
एवढ्यात..एवढ्यात मला माझे बाबा लाटांतून वर येताना दिसले. त्यांनी उमेला खांद्यावर घेतलं होतं. मलाही एका हाताने पकडलं. त्यांचा स्पर्श मला बर्फासारखा जाणवला . आम्हां दोघांना ते समुद्रकिनारी घेऊन आले. उमेला त्यांनी वाळूवर निजवली.
मला म्हणाले,”अवगतीने ताबा घेतलेला माझ्या सुनेच्या शरीराचा. मी तिला हाकलून लावलंय. तू मात्र सकाळीच हिला घेऊन मुंबई गाठ. घाबरु नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.” परत एकदा माझ्या गालाला हात लावला व समुद्राच्या दिशेने त्यांची पांढरी आक्रुती जाऊ लागली. हळूहळू तो पांढरा ठिपका काळ्याभोर अंधारात गुडूप झाला.
मी उमेच्या पोटावर दाब दिला. तिच्या तोंडातून पाणी बाहेर पडलं. लॉजमालकाला जाग आली. तोही खाली आला. मग मी तिला रुमवर नेलं. तिचे कपडे बदलले. तिला तसंच झोपू दिलं. उठवलं नाही. सकाळी सात वाजताच मी उठून तयार झालो. उमाला उठवलं व तयार व्हायला सांगितलं. उमा विचारु लागली, “आज कुठे फिरायला जायचं?”
अगं बाई म्हंटलं मला जरा ऑफिसचं अर्जंट काम आलंय आपण घरी जाऊया.दिवा गाडी पकडली. रात्री हक्काच्या घरी आलो.
चार वर्ष झाली या गोष्टीला.आत्ता दोन मुलं आहेत आम्हांला.सगळं व्यवस्थित चाललंय पण काल उमा म्हणाली,”चला नं गडे सेकंड हनिमुनसाठी परत एकदा समुद्रकिनारी जाऊ.” मी डोक्याला हात लावून घेतला.
——सौ.गीता गजानन गरुड.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा