जोशी आजीआजोबा
#जोशी_आजीआजोबा
जोशी आजी व जोशी आजोबा आज घरात एकटेच आहेत..
काय गं ,गेली कुठे सगळी मंडळी?
सुनबाईचं ऑफिस उशिरा सुटणार आहे म्हणे आज.
विराज(मुलगा) च्या ऑफिसात कोणाचीतरी रिटायरमेंटची पार्टी आहे म्हणे.
तनू कुठेशी बाहेर गेलीय.तिचं काय म्हणतात नाईट आऊट ककाय ते आहे मैत्रिणींसोबत.
कोणाची रिटायरमेंट झाली गं?
नाही बाई मला माहिती.
पहिलं अगदी हगलंमुतलंपण येऊन सांगायचा हा विराज तुला.आताशा जरा लांबलांबच रहातो.
अहो चालायचंच.त्याला काय टेंशनं कमी आहेत.तुम्ही नका मनाला लावून घेऊ.
आणि ही तनू कुठे गेली हुंदडायला? दांडगीदुंडगी पोर.आजकाल कुणाचा भरवसा नाही.टिव्हीत कायकाय ऐकतो आपण.
तिच्या आईबाबांना चालतं नं .मग आपण काय करणार?
काय चालतं काय.काय ते कपडे घालते.चड्डया घालून घरभर फिरते.बाहेरही त्याच.अरे फेशन करावी.पण ही अशी?
तुम्ही नका हो मनाला लावून घेऊ.आजकाल मुलींना स्वातंत्र्य आहे.मुलंमुली एकच मानतात.
कमी कपडे घालण्याला स्वातंत्र्य म्हणतात? ही स्वातंत्र्याची नवीन परिभाषा काही माझ्या गळी उतरत नाही.अरे स्वातंत्र्य विचार करण्याचं,मतं मांडण्याचं,शिक्षणाचं हवं.मगतर नग्न साधूंना पुरं स्वातंत्र्य आहे म्हणायचं.
अहो काय तुमच्या जीभेला हाड?
काळजी वाटते ग नातीची.म्हणून बोलतो हो.आपलीपण कोणतरी आहेच नं ती.आजकाल सकाळी फिरताना कॉलेजात जाणाऱ्या मुलंमुली पहातो.मुलीपण त्या मुलांसोबत सिगरेटी फुंकत असतात गं.पुढे यांना बाळाला जन्म द्यायचाय त्यासाठी निरोगी शरीर हवं की नको? मुलांचंही तेच पण स्मार्ट समजतात सिगरेटी ओढून स्वत:ला .पुढे फर्टीलिटी प्रॉब्लेम्स होतात
मग यांच्यात.
आणि तू म्हणतेस स्वातंत्र्य.तर सूनबाईला इनव्हेस्ट करायची होती शेअर्समध्ये.माझा सल्ला मागत होती.त्या तुझ्या चिरंजीवाने खुणेने बोलावून घेतलं व नाही म्हणून सांगितलंन.हेच का स्वातंत्र्य?
अगं व्यक्ती..मग ती पुरुष असो वा महिला..आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या स्वतंत्र झाली पाहिजे व तीने इतरांनाही स्वतंत्र होण्यास मदत केली पाहिजे.
अहो,थालिपीठ लावू का दोन?लोणी आहे ताजं.
नको गं.बस अशी माझ्याजवळ.तुझ्याशी चार गोष्टी बोलत बसल्याकी मन हलकं होतं.
इश्श! तुमचं आपलं काहीतरीच.
कसली लाजतेस अगं! अजुनही तितकीच सुंदर दिसतेस.दंताजी गेले तरीही.
आधी कधी नाही बोललात ते इतक्या वर्षात.
अगं मनात बोलायचो गं मधु.
काय म्हणालात?
मधु.इतक्या वर्षांत तुझं नाव घेतलं नाही कधी.माझ्याच व्यापात मग्न होतो.तुही मला सोडून दिला होतास बैलासारखा.दोन मुली(विणा,विभा)व विराज..तिघांची लहानपणं आठवतही नाहीत मला.सारखी पायाला भिंगरी लागलेली.बदली होईल तिथे फिरायचो.तू मात्र ठाण्यात म्हणजे ठाण्यात ठाम राहिलीस.स्वतः च्या तारुण्यातील इच्छांना ह्या लेकरांसाठी बांध घातलास.त्यांची दुखणीखुपणी,त्यांची शिक्षणं,पालकसभा,तरुणवयातली थेरं..सगळं सगळं सांभाळलस हो.अगदी काडीचीही तक्रार न करता.शिवाय तुझ्या सासूची ती असेपर्यंत सेवा केलीस.
केलं खरं सगळं.तेच तर बाईचं आयुष्य असतं.
अहो ऐकलतं का. विराजच्या मनात हा बंगला विकायचं चाललंय.मला म्हणत होता कोण केशवानी नावाचा बडा बिल्डर आहे.तळमजल्याचे दोन फ्लेट आपल्याला देणार शिवाय पैसे वेगळे.
त्याला सांग माझ्या घराची एक वीटही नाही मिळायची तुला विकायला.घामाच्या,कष्टाच्या पैशाने बनवलंय हे घर आपण.यात जीव आहे तुझामाझा.जीभ कशी रेटते याची घर विकतो म्हणायला.बापाचा माल वाटला काय?
अहो काय हे स्वत:लाच बोलता😊
त्यादोघी काय म्हणाल्या यावर?
एकीचं चाललय आम्हाला वाटा हवा.विभाचं म्हणणं,मला फक्त तुम्ही दोघे हवे.तुम्ही तुमची तब्येत सांभाळून रहा.बाकी मला काही नको.
चला तर एकीला तरी काळजी आहे म्हणायची आईबापाची.
तसं नाही हं.बाकी दोघांनाही आहे.पण जरा व्यावहारिक आहेत इतकंच.
ते कसेही असोत तिकडे.माझा बंगला द्यायचोच नाही त्यांना.बघतोच काय करतात लेकाचे माझं ते.
अहो,जरा धीरानं.किती उसळता.तुम्हाला काही सांगायलाच नको.
नकोच सांगूस.
(थोडावेळ शांतता.आजी जरा लवंडते.आजोबा पुस्तक वाचतात.चार वाजता आजी उठते.)
अगं जरा चहा टाक नं.
(आजी चहा घेऊन येते.आलं,वेलची घातलेल्या चहाचा दरवळ घरभर पसरतो.)
ए मधु ,जरा डोळे मीट बघू.
अय्या हे कसले म्हातारचळ.
एकदाच गं.
(आजी डोळे मिटते.आजोबा तिच्या गाऊनमध्ये गपचुप फ्रीजमध्ये आणून ठेवलेला मोगऱ्याचा गजरा व ड्रेस ठेवतात.)
हं,आत्ता डोळे उघड पाहू.
(आजी डोळे उघडते)
अय्या,हे काय !
तो धुंद मोगरा गं आवडतो नं तुला आणि तुझ्या आवडीच्या कोकमी रंगाचा पंजाबी ड्रेस.तेंव्हा किती आर्जव करायचीस मला ड्रेस घ्या म्हणून.पण मी कर्नलसारखं नाहीच म्हणत राहिलो.आत्ता नाही हं तसं करणार.तुझ्या साऱ्या इच्छा पूर्ण करणार.
ड्रेस सुरेख आहे हो.कोकमी..माझ्या अगदी आवडीचा रंग हा.
घाल बघू.
आजी ड्रेस घालून येते.आजोबा तिच्या केसांत मोगऱ्याचा गजरा थरथरत्या हाताने माळतात.आजी भरुन पावते.
---------गीता गजानन गरुड,आंब्रड,मोगरणेवाडी.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा