कर्माचे भोग


 #कर्माचे_भोग


आजीबाई शांत झोपली होती. आजोबांनी पडदा बाजूला केला तशी उनहाची कोवळी किरणं खिडकीतीतून आत प्रवेशली.  आजोबांनी आजीला कोमट पाण्याने स्पंजिंग केलं. पांढरा गाऊन घातला..वरती निळसर फुलं होती. गेली दोन वर्ष आजी बिछान्याला खिळून होती. एकेकाळची इंग्रजीची प्राध्यापिका मिसेस कुमुद साठे पुर्वाश्रमीची कुमुद पै. आजोबांच्या डोळ्यांसमोर भुतकाळाची पानं फडफडत होती. 


अतिशय बुद्धिमान अशी ही कुमुद ,केवळ परिस्थितीमुळे कला शाखेत प्रवेश घेऊन पुढे नामवंत महाविद्यालयात प्राध्यापिका झाली होती. आजोबा मि. कुणाल साठे. अगदी कांदेपोहे पद्धतीनेच लग्न झालं त्यांच. कुणालचं लग्न झलं त्याआधी त्याच्या मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं. घरात कुणाल,कुमुद व कुणालचे आई वडील एवढीच माणसं. 


नव्याचे नऊ दिवस म्हणतात तसे काही दिवस चांगले गेले मग मात्र कुसुमचं व कुणालच्या आईचं पटेना. कुसुमचं म्हणणं असायचं की या घरात तर बसून असतात. ती यायच्या आधी त्यांनी स्वैंपाक करुन ठेवायचा. कुणालची आई जमेल तेवढं करायची. पण तीही थकायची आणि वय झालं असल्याने तिलाही थोडा आराम करावासा वाटायचा. मग दोघींत चांगलीच बाचाबाची व्हायची. माघार घ्यायला कोणीच तयार नसायचं. घरातली शांतता हळूहळू लोप पावत होती.


कुणालच्या बहीणीला काही द्यायचं म्हंटलं की कुसुमच्या कपाळावर आठ्या पडायच्या मग कुणालची आई म्हणायची,"अगं तुझा भाऊही तुला गीफ्ट देतोच ना. ते कसं घेतेस! माझ्या लेकीला काही द्यायचं झालं की नाक बरं मुरडतेस." कुसुम यावर उत्तरायची,"माझा भाऊ देतो कारण मीही अधनामधना त्याला काहीतरी देत असते. तुमची मुलगी कधी आम्हांला काही देते का? भाऊबीजेला कसलं फडतुसं शर्टपीस दिलेलं तिने".. ....अशी वादावादी होतच राहायची. शेवटी एके दिवशी कुणालची बहीण आईवडलांना तिच्या घरी घेऊन गेली ती कायमचीच. 


कुणालकुसुमच्या घरातून ती म्हातारी पावलं गेली ती परत कधी न येण्यासाठीच. कुसुमला मुलगा झाला तेंव्हा तिला इस्पितळात येऊन भेटून गेले होते पण तेंव्हाही कुसुम त्यांना आपल्या घरी चला असं म्हणाली नव्हती. मुलाचे नाव त्यांनी रुद्र ठेवलं. रुद्रला सांभाळायला एक मावशी ठेवली होती. दिवसभर रुद्र त्या मावशीजवळच असे. मावशीचं जवळचं असं कुणी नव्हतच. नाही म्हणायला एक दूरच्या नात्यातला भाचा होता. तो कधीतरी तिला भेटायला यायचा.


सकाळी उठून चहाचं आदण ठेवणं,पीठ मळणं,पोळ्या करणं,भाजी करणं..सगळी काम मावशीच करायची. कुसुम कॉलेजात गेली की रुद्रचं आवरून त्याला शाळेत सोडायची. मग घरातलं भांडी,कपडे,लादी..कुसुमच्या सुचनेनुसार संध्याकाळच्या जेवणाची तयारी..सगळं मावशी करायची..रात्री धकूनभागून हॉलमध्येच मुटकूळं करुन पडायची. 


एवढं करुनही कुसुम तिला अगदी नाममात्र पगार व वर्षाला दोन मांजरपाटाची लुगडी द्यायची. त्या लुगड्यांना बोळे धरायचे..आजुबाजूच्या कामवाल्या बाया तिला ते काम सोडायला सांगत व दुसरं काम शोधून देतो म्हणून सांगत पण मावशी त्यांना नाही म्हणे..कारण..कारण मावशीचं आपलं असं कोणी नव्हतं न् या रूद्रमध्ये तिचा जीव अडकला होता.


कितीही सुग्रास अन्न मावशीने बनवलं तरी मावशीच्या पानात पहिलं शीळं अन्न असे. ते संपल्यावर मगच तिला थोडसं ताजं अन्न मिळे. कुणाल यात काही बोलला तर कुसुम प्रचंड चिडायची. आठाठ दिवस अबोला धरायची. 


रुद्र मोठा झाला. तो ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला. तिथेच त्याला त्याची जन्माची जोडीदारीण भेटली. मावशीची तब्येतही नरमगरम राहू लागली. तिचा दमा वाढला. वयोमानानुसार तिला पहिल्यासारखी कामं झेपेनात तसं कुसुमने तिच्याशी भांडण उरकून तिला बाहेरचा रस्ता दाखवला. मावशीचा भाचा येऊन तिला घेऊन गेला. नवीन कामवाल्या लावल्या पण कुसुमच्या अशा स्वभावामुळे कोणी जास्त दिवस टिकत नसे. 


कुसुम व कुणाल दोघंही सेवानिवृत्त झाले. बऱ्यापैकी दिवस ढकलत होते. कोणत्या गोष्टीचा मनापासून आनंद घेणं,दुसऱ्याला आनंद देणं कुसुमच्या स्वभावात नव्हतं. एकेदिवशी कुसुम बाथरुममध्ये कोसळली. इस्पितळात न्हेलं. डॉक्टरांनी पक्षाघाताचा झटका आल्याचं सांगितलं.


 तेंव्हापासून दोन वर्ष आजोबा,कुणाल साठे  कुसुम आजीची सेवाशुश्रुषा करीत आहेत. कामासाठी बाया लावलेल्या आहेत तरी तिची स्वच्छता ते जातीने करतात. कुसुमच्या डोळ्यांतून सतत पाणी वहात असतं. तिची भुतकाळातली कर्म जणू तिच्यासमोर फेर धरून नाचत असतात व फिदीफिदी हसत असतात. म्रुत्युही तिला म्हणतो,"तुला सहजासहजी नाही न्हेणार मी." 


आजोबांच मात्र एकचं म्हणणं असतं,"देवा माझ्याआधी हिला उचलं. माझ्यापश्चात हिला कोण बघणार?"


-------गीता गजानन गरुड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट