ए आई मला कुशीत घे!


 ए आई,मला कुशीत घे!!


#माझेलेखन  (पैसे व नाती सांभाळताना)


किलबिल किलबिल पक्षी बोलती,झुळझुळ झुळझुळ झरे वाहती

पानोपानी फुले बहरती,फुलपाखरे वर भिरभिरती

स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई....


रिया वर्गात सर्वांसमोर गाणं गात होती.

बाईंनी रियाचा नेहमीसारखाच गालगुच्चा घेतला.

तिला लाल,हिरवा असे दोन रंगीत खडू बक्षीस दिले.


रिया क्रिशच्या शेजारी जाऊन बसली.क्रिश तिचा जानी दोस्त होता.तिचे आबा अंताक्षरीत गाणं म्हणायचे,

ये दोस्ती हम नहीं तोडेंगे....

अगदी तस्सा याराना होता या दोघांत.क्रिश गप्पगप्प होता.रियाने विचारलं,"आवडलं का माझं गाणं?

अरे माझ्या आजीने तयार करुन घेतलयं माझ्याकडून.


क्रिश, अरे झालं काय?"


"काही नाही ग. 

काल पुन्हा ममापप्पांची भांडणं झाली जोरात.

ममाला नं प्रमोशन मिळालयं.तिला दोन महिन्यांसाठी अमेरिकेला जावं लागणार आहे.पप्पा म्हणाला,"तुझ्या लेकाची तु काय ती सोय कर नी जा."


ममा म्हणाली,"क्रिश काय फक्त माझचं बाळ आहे.तू कोण लागत नाहीस का त्याचा?तुझी त्याच्याप्रती काही जबाबदारी नाही का.तुला टूरवर जायचं असलं की कसा जातोस खुशालचेंडूसारखा.

ते काही नाही.मी माझ्या करिअरमध्ये कोणतीही रिस्क घेणार नाही."


मग ना पप्पा जेवलाच नाही.ममापण उपाशीच झोपली.

मी माझ्या बेडरुममध्ये बेडवर गेलो.ममा झुरळांसाठी बेगॉन मारत होती. अगं ते बेगॉन मारलं नं की ती झुरळं पोट वर करुन पडतात.

ए रिया मी थोडसं घेऊ का ग ते?🤔🤔

मग मीपण तसा पोट वर करुन पडेन आणि बाप्पाकडे जाईन परत.ममा म्हणायची बाप्पाने मी त्यांना गिफ्ट दिलंय.

पण मला कशी गाडी जुनी झाली की नको होते तसाच त्यांना कंटाळा आलाय माझा.मी गाडी नवीन घेतो तसं ते हवं असलं की दुसरं बाळ आणतील."


"तू आत्ता डबा खा माझ्यासोबत.आईने नं तुला आवडतात तसे भोकाभोकांचे घावणे आणि कैरीची आंबटगोड चटणी दिलीय आज.क्रिश तुझा वाढदिवस आहे ना रे पुढच्या महिन्यात.मग तू ते बेगॉन सध्यातरी पोस्टपोन कर.वाढदिवस झाला की बघूया."इति रिया.


क्रिशला रियाचं म्हणणं पटलं. दोघांनी मिळून गप्पा मारत डबा संपवला.


बाई आल्या.बाईंनी मुलांना 'माझी आई' या विषयावर निबंध लिहून आणायला सांगितला.

दुसऱ्या दिवशी रियाने तिचा निबंध वाचून दाखवला.

"माझी आई सावळी,बुटकी आहे.तिना फार गोड हसते.

तिचा पापा फार गोड आहे.

आई व आजी दोघं मिळून स्वैंपाक करतात.

आई आँफीसला 🛵जाते.

संध्याकाळी येताना खाऊ,भाजी ,फळं घेऊन यैते.

मला बरं नसलं तर आई व आजी दोघीही माझी खूप काळजी घेतात,"😍😍......


आत्ता क्रिशची वाचायची पाळीआली.

क्रिश वाचू लागला, "माझी आई सकाळी उठते.मोबाईलवर,लँपटाँपवर 📲काहीतरी काम करत बसते.

माझा डबा,आंघोळ कामवाली ताई करते.

तो डबा मी बाहेरच्या मोत्याला घालतो कारण त्यापेक्षा मला रियाचा डबा आवडतो.रियाची आई माझ्यासाठीही डबा देते. माझी आई माझ्यासाठी भरपूर इंपोरटेड चोकलेट्स आणून ठेवते."


थोडा निबंध वाचून झाल्यावर क्रिशला पुढे बोलवेना.बाईंनी त्याची वही घेतली व खुर्चीवर बसून निबंध वाचला.


"मी संध्याकाळी खेळल्यावर रियाच्या घरी जातो.

तिथे तिच्या आजीच्या हातचे दडपे पोहे,शिरा,थालिपीठ,गुळपापडी असं छानछान खाऊ खातो.😋😋

फक्त खाण्याआधी तिची आजी हातपाय धुवायला लावते.

शुभंकरोती,मनाचै श्लोक म्हणून घेते.

मी त्यांच्या घरी जातो हे मी ममाला सांगितले नाही कारण ममा हिच्या आईला डाऊन मार्केट म्हणते व आपण मोठ्या हाय स्टेटसवाले आहोत.तसं रहायचं म्हणते.


रात्री कामवाली ताई मला थोडा डाळभात वाढते.

मी तिच्याशी माझं सीक्रेट शेअर केलयं.पण ममा म्हणते

नोकरांशी जास्ती बोलायचं नाही.मग मी बोलू तरी कोणाशी?"🤔🤔


ममापप्पा लेट घरी येतात.आल्यावर लेपटोप मोबाईल बघता बघता जेवतात.मला गुड नाईट,स्वीट ड्रीम्स म्हणतात व आपल्या रुममध्ये झोपी जातात. 


मला नं रियासारखं आजीच्या कुशीत झोपायचंय पण ममा पप्पाला, आजीला आमच्या घरी आणायला परमिशन देत नाही कारण आजी पान खाते,नऊवारी नेसते.ते तिच्या मैत्रिणींना आवडणार नाही म्हणते.😕

सुट्टीत पप्पा मला चार दिवस आजीकडे घेऊन जातात.

ती आत्ता फार थकली आहे.😢


आत्ता तिच्याच्याने घरातली कामं होत नाहीत.बाबाने तिथे कामाला,आजीला बघायला एक मावशी ठेवलेय.

गेल्यावेळी मी आजीचे पाय दाबून दिले तर आजी रडू लागली.माझा पापा घेतला.😊

माझी ममा माझ्यासाठी खूप महागडे,भारीभारी कपडे आणते,भारी खेळणी आणते.

पण मला कुशीत घेऊन कधीच झोपत नाही.माझ्या गप्पा ऐकायला माझ्या बिझी ममाकडे वेळचं नसतो."😢😢....

क्रिशचा निबंध वाचून बाईंच्या डोळ्याला धारा लागल्या.


रात्री क्रिशची मम्मा,क्रांतीला फोन आला तिच्या माहेरून,तिच्या आईची तब्येत बिघडलेय म्हणून.

ती तिघंही लगेच निघाली.

वाटेत विचित्र विचार येत होते क्रांतीच्या मनात.

तिचे डोळे सतत झरझर वाहत होते.

 अमोघ गाडी चालवता चालवता तिला थोपटत होता.

मध्ये थोडसं जेवणासाठी गाडी उभी केली.

अमोघ व क्रिश यांनी त्यांची फेवरेट बिरयानी घेतली.

क्रांतीच्या घशातून पाणी जातानाही अटकत होतं.

आजूबाजूची माणसंही बघू लागली.

अमोघने तिला भानावर आणलं व हाताला धरून 

गाडीत बसवलं.

क्रांती म्हणाली,"अमोघ आय कान्ट लिव्ह विदाऊट माय ममा.आय नीड हर डेसपरेटली."


पहाटे पहाटे ती आईच्या बंगल्याजवळ पोहोचली.

बाहेर गार्डनमध्ये तिचे  बाबा झाडांना पाईपाने पाणी घालत होते.

क्रिशने आजोबांना धावत जाऊन मिठी मारली.😊


क्रांती:बाबा आई कुठाय?


बाबा:अग पहाटेच उठलेय.काहीतरी बनवतेय घरात.तुम्ही तर सरप्राईज दिलंत आम्हाला.


क्रांती व अमोघ एकमेकांकडे बघू लागले.

क्रांती पटकन माजघरात गेली.आईला गच्च मिठी मारुन  पोटभर रडली.रडू ओसरल्यावर आईला असं का केलसं म्हणून विचारलं.


आई : हातपाय धुवून ये. मग बोलूया.


सगळ्यांच्या आंघोळ्या उरकल्यावर बाहेर बागेत बसून.सर्वजणांनी धपाटे खाल्ले.😋

सोबत लिंबाचं गोड लोणचं.क्रिशचे आजोबा क्रिश व अमोघला घेऊन शेतावर गेले. 


हिरवंगार शेत,तळं,तळ्यातली कमळं,झाडावर बसलेली उड्या मारणारी माकडं बघून क्रिशची कळी खुलली.


एक माकडीण एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर डाय मारत होती, तेंव्हा तिच्या बाळाने तिच्या पोटाला घट्ट धरुन ठेवलेलं असतं.


ती गोठ्यात गेली. तिथे नुकतचं व्यायलेलं गाईचं वासरु

गाईला लुचत होतं.


गोठ्याच्या बाहेर त्यांची रुबी कुत्री पहुडलली होती.तिची पिल्लं तिच्या अंगावर खेळत होती.मधूनच तिचं दुधू पित होती.


लेकुरवाळी कोंबडी आपली पिल्लं पाठीशी घेऊन मोठ्या डौलात चालली होती.


तिथेच उन्हाला बसलेली मनीमाऊ आपल्या पिलांचे अंग चाटत होती.

क्रिश आजोबा व पप्पाला सांगू लागला की त्याला या प्राण्यांचं पिल्लू बनायला खूप आवडेल.

आजोबा,पप्पानी एकमेकांकडे पाहिलं..समजायचं ते समजले.

क्रिशला प्रेमाची,मायेची भूक लागली होती.


इकडे घरी क्रांतीच्या आईने क्रांतीचं डोकं मांडीवर घेतलं ,तिच्या केसांत हात फिरवू लागली.😊

क्रांती म्हणाली,"आई परत अशी थट्टा करु नकोस हं माझी."


आई म्हणाली," मला जरा बरं नाही म्हंटल्यावर इतकी खालीवर झालीस.तुझी सासू तर वर्षभरापासून आजारी आहे.तिला एखादा फोन करत नाहीस.तिला बघायला जात नाहीस.तिच्याच घरी तिला यायला देत नाहीस.हेच शिकवलं का मी तुला.माझे संस्कार कुठे कमी पडले ग?"


क्रांती म्हणाली,"आई त्या नं लुगडं नेसतात.मग माझ्या मैत्रिणी मला चिडवतात."


आई म्हणाली,"माणसाच्या वेशावरुन त्याची किंमत ठरत नाही बाळ.त्याच्या गुणांवरुन ठरते.अमोघच्या आईने त्याच्या वडलांच्या माघारी जीवाचं रान करुन त्याला मोठं केलयं.गावात त्यांना किती मानतात लोकं. 

आम्ही बघून आलो त्यांना.पैशाने श्रीमंत नसतील त्या पण मनाने खूप मोठ्या आहेत.खरचं खूप आजारी आहेत गं त्या.


तुझं तोंड भरुन कौतुकच करत होत्या.सोन्या, ही जीवाला जीव देणारी माणसं एकदा आयुष्यातून गेली ना मग कितीही अश्रु ढाळले तरी परत भेटत नाहीत.पैशाने मोल करु नकोस गं नात्यांचं.माणूस असेपर्यंत त्याच्याशी भरभरुन बोलून घ्यायचं.त्यांची काळजी घ्यायची.तीच खरी ईश्वरसेवा."


क्रांतीला आपली चुक कळाली.तिच्या आईने तिला प्रेमाने समजावलं.आईला माहिती होतं की तिचं कोकरु वाईट नाही.थोडसं भरकटलयं बाहेरच्या जगामुळं.पैशाच्या मोहमायेत नाती विसरलंय.आपण त्याला योग्य वाटेवर आणलं पाहिजे.


दुपारच्या जेवणात मऊसुत पुरणपोळ्या होत्या.

जोडीला नारळाचं घट्ट दूध,कुरडया,नाचणीचे पापड,

साजूक तुप घालून केलेला मसालेभात.सगळी  गप्पा मारत पोटभर जेवली.क्रांतीची आईने आग्रह करुन करुन जावयाला पुरणपोळ्या वाढल्या.तोही खूश झाला.


रात्री सोलकढी, भात असा हलका आहार घेतला.

अन् बागेत लॉनवर सगळी गप्पा मारत बसली

क्रिशची आजीने त्याला,निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई,आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही....ही अंगाई गाऊन त्याचं डोकं थोपटून झोपवलं.


निजलेल्या क्रिशचा चेहरा अगदी आकाशातल्या चंद्रासारखा दिसत होता.

आई क्रांतीला म्हणाली,"क्रांती,क्रिशची क्लासटिचर माझी विद्यार्थिनी होती.आम्ही फेसबुक फ्रेंड आहोत.

गप्पांमधून मला कळलं की ती याची क्लासटिचर आहे.

मी तिला याच्यावर नीट लक्ष ठेवायला सांगितलं.

काल तिने मला क्रिशचा निबंध शेअर केलाय.

तुम्ही दोघं वाचा तो.


मी कुणा एकाला दोष देणार नाही.तुम्ही दोघंही तुमच्या कर्तव्यात कमी पडताय.

अमोघ जेवढं हवं तेवढं तुला क्रिशचा बाबा होता आलंच नाही रे.

तुझ्या मानसशास्त्रातल्या पदवीचा उपयोग काय?


क्रांती,तुला काही वेगळं सांगायला नको.पैशापाठी धावताय नुसते.त्यात सोयिस्करपणे नात्यांची आहुती देत अहात.


गावी घरी म्हातारी आई एकटी आहे.तिला सोबत नेलात तर क्रिशलाही सोबत होईल.असं कितीसं खाणार रे ती.हवं तर तिचा खर्च मी देते तुम्हा दोघांना पण पैशासाठी तिला अव्हेरु नका रे बाळांनो.


क्रिश मायेला पोरका झाला आहे,तो तुमच्या पैशाच्या लोभामुळे.क्रांती, तू याच्या मैत्रिणीच्या आईला डाऊन मार्केट म्हणतेस असं लिहिलंय क्रिशने पत्रात.


आपणही पुर्वी गरीब होतो.ते दिवस इतक्या लवकर विसरलीस? त्याला कुशीला घेत नाहीस.कामवालीकडून त्याची कामं करुन घेतेस.सकाळी ठीक पण तुला संध्याकाळी वेळ असतो नं.तेंव्हा तरी दोन घास मायेचे भरव त्याला.त्याच्या शाळेत काय काय झालं ते विचार त्याला.पोरं माझं अगदी बावून गेलंय.सगळं हातचं जायच्या आधी स्वतःला आवरा.


करिअर व घर या दोघांचा ताळमेळ तुम्हाला साधता आलाच पाहिजे.नात्यांची हळूवार गुंफण तुंम्हाला जपावीच लागेल,नाहीतर माझ्या नातवाला माझ्याकडेच ठेवा."


क्रांती म्हणाली,"आई,बरं झालं तु आमचे डोळे उघडलेस.

करिअरच्या,जास्त पेकेजच्या मोहापायी मी ना अमोघला पुरेसं सुख दिलं ना माझ्या बाळाला. 


माझं बाळ दुरावतयं माझ्यापासून माझ्या लक्षातच आलं नाही गं. आत्ता मी त्याला पुरेपूर वेळ देईन.

वेळप्रसंगी साहेबांना नाही म्हणायला शिकेन .

अमोघ आपण जाताना तुझ्या आईला आपल्याबरोबर घेऊन जाऊ. दोघं मिळून त्यांच्याकडे लक्ष देऊ.

लवकर सुधरतील त्या."


अमोघ म्हणाला,"मीही हल्ली खूप चिडचिड करायचो घरात.त्या खडूस बाँसचा राग क्रांतीवर,क्रिशवर काढायचो.आत्ता यापुढे तसं करणार नाही."


क्रिश व त्याच्या ममापप्पांनी आजीआजोबांना टाटा केला व क्रिशच्या आजीला(अमोघच्या आईला)घरी घेऊन गेले.

तिला चांगल्या डॉक्टरला दाखवले.तिला योग्य आहार सुरु केला.आजीची पन्नास टक्के तब्येत तर आपल्या माणसांत आल्यानेच सुधारली.


रोज रात्री क्रिश त्याच्या आजीच्या कुशीत झोपू लागला.

आजी त्याला छान छान गोष्टी सांगू लागली.रियाही त्याच्या घरी आत्ता खेळायला येऊ लागली.


क्रिशच्या आजीने त्या दोचांच्या भातुकलीसाठी बेसनाचे लाडू,कडबोळ्या बनवून ठेवल्या.

इतकचं काय गेदरिंगमध्ये गायला गाणंही शिकवलं.

शाळेत आजीआजोबा दिन होता.

क्रिश त्याच्या आजीला व रिया तिच्या आजोबांना घेऊन गेली,

स्टेजचा पडदा उघडला,

रिया व क्रिश दोघे मिळून गाऊ लागले,....


छोटेसे बहीण भाऊ,उद्याला मोठाले होऊ,

उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला,

नवीन आकार देऊ।।ध्रु।।


© गीता गजानन गरुड.

आंब्रड.

#माझेलेखन (पैसे व नाती सांभाळताना)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खरी गोम

ताई, धर माझे पाय!

ए पिस ऑफ वेलवेट