तिचं आईपण
#तिचं_आईपण
मि.पोंक्षे, उपजिल्हाधिकारी होते. नेहमीप्रमाणेच ते त्यांच्या कामात व्यस्त असताना परेश त्यांचा जावई केबिनमध्ये आला.
"परेशराव,या बसा. आज इकडे कसं काय येणं केलं?"
"पप्पा,तुमच्याशी बोलायचं आहे थोडं."
"भांडलात?"
"मी नाही,तुमची मुलगीच भांडण उकरुन काढते."
"बरं. लंच टाईम झालाच आहे. आपण बाहेर लंच घेऊ चल."
"नाही, नको मला भूक नाही."
"अहो,जावईबापू चला तर खरं. भांडणं तर काय होतच रहातात. त्यासाठी पोटाला उपाशी ठेवून थोडच चालेल!"
दोघजणं ऑफिससमोरच असणाऱ्या दाक्षिणात्य उपहारगृहात गेले. मस्तपैकी लुसलुशीत इडल्या,वाफाळतं सांबार,पेपरडोसा,ओल्या नारळाची चटणी व जोडीला फिल्टर कॉफी.
पोंक्षेंनी ओळखलं,जावई नाश्ता न करताच आले आहेत. जसजसा परेशचा जठराग्नी थंड होऊ लागला तसतसा त्याच्या चेहऱ्यावरचा त्रस्तपणाही निवळू लागला.
"हं आता बोला काय केलं प्राचीने?"
"प्राचीला प्रमोशन मिळतय. ट्रेनिंगसाठी वर्षभर तिला अमेरिकेत रहावं लागणार आहे."
"बरं मग.."
"आता प्राचीला एकतीसावं लागलय. ती अमेरिकेला जाणार म्हणून सध्या मुल नको म्हणतेय. आई फोन करुन सारखी सतावतेय की नातवंडाचं तोंड केव्हा दाखवतोयस. आधीच आमचं लग्न उशिरा झालंय त्यात अजून उशीर केला न् नंतर काही कॉम्प्लिकेशन्स आल्या तर म्हणून मी तिला समजावून सांगू पहात होतो की सध्या प्रमोशन घेणं आपल्याला परवडणार नाही. आपण जवळ असणं महत्त्वाचं आहे."
"बरं मग.."
"मग काय,लागली भांडायला. आधीच नाकावर राग तिच्या. म्हणते कशी,"तुझ्या आईने तुझ्या मनात काहीबाही भरलय आणि तू अजूनही कुक्कुलं बाळ आहेस. तुला तिचा पदर सोडवत नाही. माझी प्रगती सलतेय तुम्हा लोकांना. माहेरी असते तर पप्पा किती खूष झाले असते! मला माझी मतं आहेत. तू तुझी मतं माझ्यावर लादू शकत नाहीस. माझे पाय तू नाही असे खेचू शकत."
पोंक्षेंनी कॉफीचा एक सिप घेतला मग म्हणाले,"जर प्रमोशनमधे आलं नसतं तर तिला आई होण्याबद्दल हरकत नव्हती?"
एकदोन मिनटं अशीच गेली. पोंक्षेंनी अजून दोन कॉफी मागवल्या.
"तिला नं आई होणंच नकोय. म्हणून कदाचित ती बाहेरगावी ट्रेनिंगसाठी जातेय. नाहीतर त्यांच्या या ब्रेंचमधेही ट्रेनिंग मिळू शकतं सहज पण तिला का कोण जाणे मात्रुत्वच नको झालंय."
"बरं तू आता घरी जा व अगदी नॉर्मल वाग तिच्याशी. जसं काही घडलच नाहीए असं. ते अमेरिकेचं वगैरे सगळं खूळ मी घालवतो बघ तिच्या डोक्यातून. अरे बाप आहे मी तिचा आणि आता तुझाही."
पोंक्षेंनी रात्री लेकीला फोन लावला व म्हणाले,"उद्या जरा येऊन जाशील का गं घरी?"
वडिलांच्या फोनने प्राची कासावीस झाली. तिची आई गेल्यापासून पप्पांबद्दल ती जरा जास्तच हळवी झाली होती. कधी एकदा माहेरी जातेय व पप्पांना पहाते असं तिला झालं होतं. दोघांमधला अबोला चालूच होता. ऑफिसमधून सुटल्यावर पप्पांकडे जाणार आहे असं तिने चिठ्ठीत लिहून चिठ्ठी त्याच्या डब्यात ठेवली.
पोंक्षे लेकीची वाट पहात होते. प्राचीने येताना नेहमीच्या स्वादिष्ट सेंटरमधून पप्पांसाठी गरमगरम बटाटेवडे आणले. पोंक्षेंनी वडे मनापासून खाल्ले. मग प्राचीकडे मोर्चा वळविला.
"प्राची,तुझ्या बॉसशी बोलणं झालं माझं. तुला प्रमोशन मिळालं सांगत होता त्याबद्दल तुझं अभिनंदन पण ट्रेनिंगची सोय तुमच्या ब्रेंचला असतानादेखील तू अमेरिकेचा पर्याय का निवडलास बेटा?"
"पप्पा..आय कान्ट एक्स्प्लेन यू,स्टील आय व्हील ट्राय. परेशशी मी तुमच्या पसंतीनुसार लग्न केलं. परेश खरंच चांगला पती आहे पण हल्ली नं तो सारखं बाळ हवं म्हणत असतो. त्याची आईही त्याचीच री ओढत असते. मला मुल नकोय."
"मुल नकोय..की इतक्यात नकोय?"
"नको आहे मला मुल. मला असंच जगायचय."
"हा तुझा विचार तू लग्न करण्याआधी परेशला सांगितला होतास का?"
नाही पप्पा. तेव्हा माझ्याही मनात हा विषत्य नव्हता पण नुकतच माझी कलिग सारिका मेटर्निटी लिव्हनंतर परत ऑफिसात येऊ लागली आहे. पप्पा तिच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं आली आहेत. तिचे केस गळताहेत. रात्रीचं तिचं बाळ रडत रहातं ज्याने तिला फार जागरण होतं. दिवसभर अगदी म्लान दिसते ती. चार वाजले की तिची घरी जायची चुळबूळ सुरु होते. कधी लेकीला बरं नसलं की दांड्या ठरलेल्या.
तिचं हे अवघड रुटीन पाहून मला नकोच वाटतय बाळंतपण वगैरे. शिवाय ते सिझर झालं तर आणि पोट सुटणं वगैरे..माझ्या प्रोफेशनमधे माझ्या कामासोबतच माझा आऊटवर्ड एपिरिअन्सही महत्त्वाचा आहे पप्पा शिवाय घरी रहायचं म्हणजे फिनान्शिअल लॉसही आलाच."
"पैशाचं सांगू नकोस कारण मला. तुझं जेवढं आर्थिक नुकसान होईल ते मी देतो तुला."
"बाकीच्या नुकसानीचं काय पप्पा?"
"अगं पण प्राचे,तू परेशला लग्नाआधी या तुझ्या निर्णयाबाबत बोललेलीस का? नसशील बोललीस तर तू त्याला व त्याच्या कुटुंबाला,पर्यायाने मलाही फसवते आहेस. कुठून दुर्बुद्धी सुचली न् तुला एवढं शिकवलं,तुझं लग्न लावून दिलं असं झालंय मला."
"हे बघा पप्पा,मी कोणालाही फसवत नाहीए. त्यावेळी मला तसं वाटत नव्हतं म्हणून मी काही बोलले नव्हते पण माणूस आहे न् मी. निर्णय बदलू शकते मी माझे अँड आय थिंक आय हेव फुल राइट ऑफ माय बॉडी. परेशला मी समजावलं की आपण एखादं मुल दत्तक घेऊ किंवा सरोगेट मदरचा ऑप्शन निवडू तर केवढा खवळला माझ्यावर! तुमच्या मनातही त्याने माझ्याविरुद्ध किल्मिष पसरवलं असणार. मला एकटं पाडायला पहाताहेत,तो व त्याची आई."
"बरं चल जेवुया आता. पुढचं पुढे बघू."
प्राची घरी आली. अजुनही अबोला टिकून होता. रात्री ऑफिसातून येताना परेशने तिचं आवडतं ब्लेक करंट आईसक्रीम आणलं व स्वतःच सर्व्ह केलं. तिला सॉरीही म्हणाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी फ्लुरोसंट शर्ट घालून,छान अत्तर वगैरे शिंपडून परेश गुणगुणत ऑफिसला निघाला. नेहमीसारखी धुसफुस वगैरे काही नाही. घरी आला की ही मोबाईलवर मेसेज करत राहू लागला. मधुनच गालातल्या गालात हसू लागला. प्राचीला त्याच्या मोबाईलमधले मेसेजेस वाचावेसं वाटू लागलं पण त्या दोघांमधे काही अलिखित नियम होते. त्यात तिचं ते वागणं बसलं नसतं म्हणून तिने स्वतःला आवरलं.
एके दिवशी तर कहर झाला प्राचीचा बर्थडे तो विसरुन गेला. परेशने तिला सकाळी विश केलं नाही. प्राचीला वाटलं तो फोन करेल, किंवा संध्याकाळी सरप्राईज देईल. संध्याकाळी फोन करून परेशने तिला आज जरा जास्त काम आहे तेव्हा ऑफिसातच रहातो असं सांगितलं. पप्पांचा शुभेच्छा देण्यासाठी फोन आला तेव्हा प्राची खूप रडली. शेवटी रात्री पप्पा तिच्यासोबत झोपायला आले. येताना तिच्या आवडीचा केकही घेऊन आले. मग बापलेकीने मिळून बर्थडे साजरा केला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परेश घरी आला. परत तो तसाच च्याटिंगमधे गर्क होता.
आता प्राचीचा संशय बळावला. ते नियम वगैरे तिने चुलीत घातले व तो अंघोळीला गेला असता त्याचे मेसेजेस चेक केले. व्हाट्सअपला एका नवीन बाईचं अकाऊंट होतं,शोना म्हणून..बरंच काही लिहिलं होतं त्यात. दोघांनी एकमेकांशी घेतलेल्या प्रेमाच्या साक्षी..प्रत्येक वाक्यागणिक चार चार बदाम,ओठांचे चंबू केलेले साताठ किस. शेवटच्या ओळीत तिने टाईपलेलं,"हनि,आय कान्ट लिव्ह विदाऊट यू डार्लिंग. मिस यू टु मच. कालची रात्र माझ्या नसानसात भिनलेय. लवकरच आपण एकत्र येऊ. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. तू माझं ह्रदय चोरलंस परेश. लव्ह यू डिअर. आज पहाटे तू गेल्यावर मला तुझंच स्वप्न पडलं. स्वप्नात तू माझ्या बोटात एंगेजमेंट रिंग घातलीस व माझ्या हाताचं चुंबन घेतलंस..पुढचं काहीएक प्राचीला धुरकट डोळ्यांमुळे दिसेना. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. नाकपुड्या फुलल्या होत्या. डोळ्यातून झरझर गंगायमुना वाहू लागल्या होत्या."
परेश न्हाऊन बाहेर आला तसा प्राचीचा अवतार पाहून काय ते समजला. तो अंगाला पाऊडर लावत मस्त रोमँटिक गाण्याची शीळ घालत होता.
"परेश..परेश..ही शोना कोण? यु चीटेड मी परेश. यु आर अ बीग चीटर. यु बीट्रेड मी. आय वील नो लाँगर लीव्ह वीथ यू."
"प्राची,इट्स युवर चॉइस डिअर. इफ यू डोण्प वाँट टू लिव्ह विथ मी,यू आर फ्री फ्रॉम माय साईड."
"पण ..पण का केलंस तू असं परेश. काय कमी आहे माझ्यात. मी तुला माझं सर्वस्व दिलं आणि तू..तू त्या शोनासोबत रात्र..शी! मला किळस येतेय तुझी परेश."
"मला मुल हवंय प्राची. तू ते देण्यास समर्थ आहेस पण तुला ते होऊ द्यायचं नाही. तुला तुझ्या फिगरची काळजी लागून राहिलेय. तुझं शरीर..तुझा अधिकार..यात माझी बाप बनण्याची इच्छा मी का दाबून ठेवू,तेही मी एक सक्षम पुरुष असताना. बरं तू म्हणतेस सरोगेट मदरचा पर्याय.. जे मुल तुझ्या रक्तामासाचं नाही,त्याला तू लळा लावू शकशील?..तू तर तुझं गर्भाशयही द्यायला तयार नाहीस मुलाच्या वाढीसाठी तर पालनपोषण ही फार लांबची गोष्ट. नऊ महिने मुल आईच्या पोटात वाढतं तेव्हा आईच्या ह्रदयाची स्पंदनं व बाळाच्या ह्रदयाची स्पंदनं आपापसात संवाद साधत असतात प्राची. तिथून तो बाँड तयार होत असतो. आई होणं एवढं सोप्पं नाही प्राची.
बरं तू म्हणतेस दत्तक मुल घेऊ. अशी कोणालाही द्यायची म्हणून वाटत नाही दत्तक मुलं. कारणं द्यावी लागतात. आपलं कारण मुळीच पटणार नाही त्यांना हे फिगरचं,आर्थिक नुकसानीचं वगैरे..सो तुझा तुझ्या देहावर पुर्ण अधिकार आहे तसा माझा माझ्या. शोना एक ख्रिश्चन मुलगी आहे. काही कारणाने तिचं लग्न व्हायचं राहून गेलं. नुकतीच माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून जॉइंट झालेय ती. तिलाही मुलं खूप आवडतात व मलाही सो वी हेव डिसायडेड टू.."
"थांब परेश. एक शब्द बोलू नकोस पुढे. मला माझी चूक उमगलेय. मी तयार आहे आई व्हायला. पण ही शोना..हिच्या तर ना मी झिंज्या उपटेन. कोण समजते कोण ही स्वतःला असं म्हणून प्राची परेशच्या गळ्यात पडून रडू लागली. तितक्यात परेशने एका हाताने मेसेज टाईपला,' डन सर,थँक्यू सर.' परत मेसेज आला..प्राचीने स्क्रीनवर पाहिलं.."मग जावईबापू कशी वाटली माझी ट्रीक! अहो मी बाप आहे प्राचीचा. तिच्यासाठी थोडाकाळ शोना झालो इतकच. आता ठेवतो हं. यु बोथ एन्जॉय."
प्राचीच्या आता सगळं नाटक लक्षात आलं व तिने फोमच्या उशीने परेशला बदडायला सुरुवात केली. पुढे एका वर्षात त्यांच्या घरात 'टँटँ' चे सूर वाजू लागले.
------सौ.गीता गजानन गरुड.

chan gosht aahe!]
उत्तर द्याहटवा